‘विवेकानंदांचा ‘धर्म’!’ हा दत्तप्रसाद दाभोळकर यांचा लेख वाचला. लेखक म्हणतात की, ‘विवेकानंदांनी हिंदू धर्माचा झेंडा त्रिखंडांत फडकावला हे शतप्रतिशत खोटे आहे.’ परंतु शिकागो सर्वधर्म परिषदेतील विवेकानंदांची भाषणे सर्वत्र उपलब्ध आहेत. तिथे स्वत:चा परिचय अभिमानाने करून देताना विवेकानंदांनी म्हटले होते की, ‘‘मी जो धर्म सर्व धर्मांची जननी आहे अशा जगातील सर्वात प्राचीन धर्माचे, त्यातील कोट्यवधी हिंदूंच्या सर्व पंथांचे प्रतिनिधित्व करीत आहे.’’

या परिषदेत स्वामी विवेकानंदांनी सहा भाषणे दिली, त्यातील १९ सप्टेंबर १८९३ चे ‘पेपर ऑन हिंदुइझम’ हे भाषण विशेष उल्लेखनीय आहे. या भाषणांनी अमेरिकेतील केवळ आध्यात्मिक नव्हे, तर शास्त्रीय जगतातही खळबळ उडवून दिली होती. वैज्ञानिक निकोलस टेस्ला हेही ते भाषण ऐकून प्रभावित झाले होते, अर्थात तो वेगळा विषय आहे.

विवेकानंद पुन्हा मायदेशी आले तेव्हा त्यांचे जहाज कोलंबो बंदरात लागले. त्या भूमीतही त्यांचे अभूतपूर्व स्वागत झाले. भारतात सर्वप्रथम ते रामेश्वर येथे पोहोचले. तेथेही त्यांच्या स्वागतासाठी रामनाडचे राजे सेतूपती व हजारोंच्या संख्येने सामान्यजनही उपस्थित होते. रामेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते व सर्व हिंदूंचे ते श्रद्धास्थान आहे. तिथल्या मंदिराच्या दर्शनी भागात विवेकानंदांना दिलेले मानपत्रही लावले आहे. हे मानपत्र त्यावेळच्या रामनाडच्या जनतेतर्फे दिले गेले आहे. त्यात स्पष्टपणे लिहिले आहे की, ‘आपण हिंदू धर्माची विजयपताका साऱ्या जगात फडकावली त्याबद्दल आम्ही आपले अभिनंदन करत आहोत.’ विवेकानंदांचे कोलंबो ते अल्मोरा म्हणजे जवळजवळ पूर्ण भारतात स्वागत समारंभ व मानपत्र देण्याचे कार्यक्रम झाले, त्यातील अनेक कार्यक्रम देवळात झालेले आहेत. त्यामुळे ‘हिंदू धर्मीयांनी विवेकानंदांना नाकारले होते,’ हे लेखकाचे म्हणणे सत्य ठरत नाही.

‘कसेबसे पैसे गोळा करून विवेकानंद अमेरिकेत गेले,’ हा लेखकाचा दावाही गैरच. विवेकानंदांनी या धर्म परिषदेत जावे व जागतिक व्यासपीठावर मांडणी करावी असे भारतातील अनेक दिग्गजांना (राजे/ महाराजे/ संस्कृत अभ्यासक/ इंग्रज अधिकारी/ शासकीय अधिकारी) वाटले, तेव्हा अनेक राजे/संस्थानिक यांनी सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शवली. पण विवेकानंदांचे म्हणणे असे होते की, जर मी सर्वसामान्य हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून जाणार असेल तर सर्वसामान्य लोकांनीच त्याचा भार उचलला पाहिजे. म्हणून आपल्या शिष्यांकरवी त्यांनी अर्थसंकलन केले, ज्यात अनेक संस्थानिकांचाही सहभाग होता. विवेकानंदांचे मूळ साहित्य सर्वत्र उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी अधिकृत साहित्याचा अभ्यास करावा अन् स्वत:ची मते स्वत: बनवावीत असे वाटते.

– अभय बापट (प्रांतप्रमुख, महाराष्ट्र विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी)