संपूर्ण देशात ग्राहकाच्या हक्कांची सर्वप्रथम मांडणी करणारे बिंदुमाधव जोशी यांनी ग्राहक पंचायतीद्वारे ग्राहकाला शोषणमुक्त करणारे तत्त्वज्ञान प्रभावीपणे मांडले. ग्राहकाच्या हक्कांसाठी झगडताना मोच्रे, आंदोलने यांसारख्या सर्व मार्गाचा अवलंब केला. जोशी तसेच  लेखन आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून शिवचरित्रातील विविध पैलूंचे दर्शन घडविणारे व्याख्याते निनाद बेडेकर   या दोघांनीही अलीकडेच जगाचा निरोप घेतला. त्यांच्या आगळ्यावेगळ्या  कार्याची ओळख करून देणारे लेख.

शिवचरित्रावरील व्याख्यानांच्या श्रवणातून मनामध्ये जडलेली शिवभक्ती.. इतिहास विषयाचे कोणतेही औपचारिक शिक्षण न घेताही ऐतिहासिक साधने, दस्तऐवज आणि दुर्मीळ कागदपत्रांचा अभ्यास करून निर्मिलेली साहित्यसंपदा.. देशातील आणि परदेशातील किल्ल्यांची भटकंती करणारे जगातील एकमेव अभ्यासक.. लेखन आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून शिवचरित्रातील विविध पैलूंचे दर्शन घडविणारे प्रभावी व्याख्याते.. एकाच व्यक्तिमत्त्वाचे हे वेगवेगळे पैलू असलेल्या निनादराव बेडेकर यांचे ‘शिवभक्तीतून साकारलेला इतिहासकार’ असेच वर्णन करावे लागेल. अशा या अभ्यासू आणि जगन्मित्र व्यक्तीशी माझा परिचय झाला, एवढेच नव्हे तर साडेतीन दशके आमचे मैत्र जुळले हा मी माझा भाग्ययोगच समजतो.
माझा आणि निनादरावांचा संबंध हा १९८० च्या सुमारास आला.  आम्ही दोघेही मंडळाच्या ग्रंथालयात आपल्या आवडीच्या विषयाचा अभ्यास करीत होतो. शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांच्यामुळे माझा निनादरावांशी परिचय झाला. भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये येण्यापूर्वीच तरुण वयातील निनादराव हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सान्निध्यात आले. ओघवत्या वाणीतील बाबासाहेबांच्या व्याख्यानांनी ते प्रभावित झाले. या शिवभक्तीतूनच त्यांनी शिवचरित्राचा अभ्यास करण्याचे ठरविले. शिवचरित्राचा गाभ्यात जाऊन शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यासाठी भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये जावे लागेल, असे पुरंदरे यांनी निनादरावांना सांगितले. त्यामुळेच निनादरावांनी मंडळामध्ये अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. शिवचरित्राचा सर्वागीण अभ्यास करावयाचा असेल तर, शिवाजीमहाराजांचा ज्यांच्याशी संबंध आला आणि संघर्ष झाला त्या सर्व सत्तांच्या इतिहासाचा आणि त्या राजवटीतील कागदपत्रांचा अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास केल्यानंतरच आपले इतिहासाविषयीचे तटस्थ मत तयार होते, असे गजानन मेहेंदळे यांनी निनादरावांना आणि मला सांगितले होते. आम्हा तिघांच्या एकत्रित गप्पा व्हायच्या. या गप्पांच्या माध्यमातून माझी निनादरावांशी मैत्री कधी झाली ते कळलेच नाही.
लहान वयातच किल्ल्यांचे आकर्षण असलेले निनादराव शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने युरोपला गेले होते. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, पोर्तुगाल येथील कॅसल्सचा म्हणजेच किल्ल्यांचा त्यांनी अभ्यास केला. किलरेस्कर कमिन्समध्ये नोकरी करीत असताना त्यांनी आसाम, बंगाल, कर्नाटक या राज्यांतील किल्ल्यांसह ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन त्यांचा बारकाईने अभ्यास केला होता. त्यामुळे मराठय़ांच्या राज्यातील किल्ले, दक्षिणेकडील राज्यांतील किल्ले, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील किल्ले, पूर्व भारतातील किल्ले आणि युरोपातील किल्ले या किल्ल्यांचा तुलनात्मक अभ्यास केला. हा अभ्यास त्यांनी लालित्यपूर्ण लेखनाच्या माध्यमातून वाचकांसमोर आणला.
कवी भूषणाच्या शिवकाव्याने निनादरावांना भुरळ पाडली. हे काव्य त्यांनी आत्मसात केले. त्यासाठी उत्तर भारतातील िडगल बोली ते शिकले. कवी भूषणाचे शिवकाव्य मुखोद्गत असणारी निनादराव ही एकमेव मराठी व्यक्ती आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी शिवकाव्यावर पुस्तकही लिहिले आहे. शिवचरित्रातील विविध पैलूंवर निनादरावांनी देशात आणि परदेशात मिळून पाच हजारांहून अधिक विषयांवर व्याख्याने दिली आहेत. टिळक स्मारक मंदिर येथे निनादरावांची शिवचरित्रावर सात दिवसांची व्याख्यानमाला झाली होती. शिवरायांची राजनीती, अर्थनीती, दुर्गनीती, सागरीनीती, युद्धनीती आणि शिवरायांचे आरमार असे शिवचरित्रातील पैलू त्यांनी दररोज तीन तासांच्या या व्याख्यानांच्या माध्यमातून प्रभावीपणे उलगडले होते.
छत्रपती शिवाजीमहाराज यांच्यापासून प्रेरणा घेतलेल्या मराठय़ांनी १८ व्या शतकामध्ये हिंदूुस्थानवर आपली सत्ता प्रस्थापित केली आणि सांस्कृतिक प्रभाव निर्माण केला. त्या इतिहासाचे निनादराव हे एक जाणते अभ्यासक होते. मराठे सरदारांनी परकीय आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी प्रचंड संघर्ष केला आणि प्रसंगी अटेकपार झेंडे लावले. तर प्रसंगी बलिदानही दिले. त्याचे पानिपत हे उदाहरण आहे. हा देदीप्यमान इतिहास मराठी माणसासाठी प्रेरणादायी आहे. मात्र, या इतिहासाचे मराठी माणसांनाच विस्मरण झाले होते. त्यामुळे हा देदीप्यमान इतिहास लोकांसमोर आणण्याचा प्रेरणादायी संकल्प निनादरावांनी सोडला आणि या इतिहासाच्या अभ्यासासाठीच त्यांनी आपले आयुष्य वेचले. मराठय़ांच्या अटकेच्या विजयाची २५० वर्षे साजरी होऊ शकली नाहीत याचे शल्य निनादरावांना होते. मात्र, पानिपत युद्धाच्या २५०व्या स्मृतिदिनाची योजना आखून आम्ही निनादरावांचे हे शल्य दूर केले. पानिपतासह देशभरामध्ये पानिपत युद्धासंदर्भात निनादरावांनी व्याख्याने दिली. पानिपत म्हणजे अपयश ही कटू आठवण उराशी बाळगणाऱ्या मराठी माणसांचा न्यूनगंड दूर करीत पानिपतचा इतिहास हा मराठय़ांना गौरवास्पदच आहे हे ठासून सांगितले.  
निनादरावांनी १७ ऑगस्ट २००९ रोजी वयाची साठ वर्षे पूर्ण केली. त्यावेळी शुभेच्छा देताना ‘निनादराव साठीचा संकल्प कोणता सोडला’, असे त्यांना विचारले होते. त्यावेळी त्यांनी दोन संकल्प माझ्यापाशी बोलून दाखविले. केंद्रीय अभ्यासक्रमाच्या पाठय़पुस्तकामध्ये (एनसीईआरटी) महाराष्ट्राच्या इतिहासावर घोर अन्याय केला असून, ऐतिहासिक पुरुष, मराठी संत आणि समाजसुधारक यांच्याविषयीची त्रोटक माहिती असल्याचे सांगितले. २२०० पानी पुस्तकामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासावर, महाराष्ट्रावर अवघी दोन पाने आली आहेत. इतिहासकार म्हणून या अन्यायाविरुद्ध संघर्ष करणे हे आपले कर्तव्य आहे, अशी त्यांची धारणा होती. त्यानुसार, दोन वेळा परिषदा घेऊन आम्ही हा विषय मराठी भाषा, साहित्य आणि संत साहित्याचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांच्या निदर्शनास आणून दिला होता.
६१व्या वर्षांत पदार्पण करताना ६१ किल्ल्यांची भटकंती करण्याचा संकल्प निनादरावांनी सोडला होता. त्यानुसार नऊ महिन्यांतच हे ६१ किल्ले पाहून झाले. मग उरलेल्या चार महिन्यांमध्येही त्यांनी ऊन-वारा-पाऊस याची तमा न बाळगता भटकंती करून हा आकडा १०१ किल्यांपर्यंत नेला.
हा संकल्प पूर्ण झाला खरा. पण शरीरावर निश्चितच अनिष्ट परिणाम झाले. मधुमेहाने निनादराव प्रदीर्घ आजारी पडले. दीड महिना अतिदक्षता विभागामध्ये होते. मधुमेहाच्या विकाराचा परिणाम किडनीवर झाला. मात्र, प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी या आजारावर मात केली. एवढेच नव्हे तर, प्रवास, लेखन आणि व्याख्याने देण्यासही सुरुवात केली होती. मात्र, विकारांनी पोखरलेल्या शरीराने त्यांना साथ दिली नाही. त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्राला आणि मराठय़ांच्या इतिहासाला नितांत आवश्यकता असताना निनादराव आपल्यातून निघून गेले आहेत. त्यामुळे मराठय़ांच्या इतिहासाच्या अभ्यासकार्याची अपार हानी झाली आहे.
– पांडुरंग बलकवडे

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन