ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ दिवंगत चंद्रशेखर व्यंकट रमण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी ‘रामन परिणाम’ हा प्रकाशाच्या गुणधर्माबाबतचा शोध जाहीर केला, त्यासाठी त्यांना पुढे १९३० मध्ये विज्ञानाचे नोबेल पारितोषिकही मिळाले. २८ फेब्रुवारी हा दिवस भारतात १९८७ पासून राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त, विज्ञानाचा इतिहास मानवाइतकाच जुना आहे याची आठवण करून देणारे आणि आज आपण कुठे आहोत हे पाहणारे टिपण..

साधारण दीड लाख वर्षांपूर्वी कृत्रिममरीत्या अग्निनिर्मिती किंवा अग्नीचे नियंत्रण आवाक्यात आल्यानंतर मानवाने प्रगती करण्यासाठी पहिले पाऊल टाकले. काही अंशी स्थिरस्थावर झाल्यानंतर माणसाने सभोवतालच्या घटनांचा आणि त्या अनुषंगाने निसर्गाचा विचार करण्यास सुरुवात केली. मग स्वतंत्र ओळख होईल, अशी मानवी संस्कृती निर्माण झाल्यानंतर ‘हे जग कशाचं बनलंय?’ हा प्रश्न सर्वप्रथम उपस्थित झाला आणि रूढार्थाने विज्ञान विषयाची मुहूर्तमेढ रोवली गेली, असे म्हणता येईल. हे जग जमीन, पाणी, हवा, अग्नी आणि आकाश मिळून तयार झाले आहे, असे जवळपास सर्वच संस्कृतीमध्ये सांगण्यात येते. या सर्वच संस्कृतींनी सुरुवातीला केवळ तर्काच्या आधाराने निसर्गातील तत्त्वे उलगडण्याचा प्रयत्न केला.. त्या वेळी प्रयोगांसाठीची साधने जवळपास नव्हतीच. मात्र यातून निसर्गाच्या अनुषंगाने तत्त्वज्ञान आकाराला आले.
विज्ञानाची वाटचाल सुरू झाली, ती इथे. मर्यादित का होईना, प्रयोग करण्यासाठी खडक, पाणी, जमीन यांचा वापर झाला आणि निरीक्षण-तर्क यांच्या आधारे आकाशाचा अभ्यास सुरू झाला. खगोलशास्त्राचा इतिहास आज चार पर्वामध्ये विभागला जातो. पहिले पर्व थेट आदिकालापासून गॅलिलिओच्या कालखंडापर्यंतचे मानले जाते. या प्रदीर्घ कालखंडात फक्त उघडय़ा डोळय़ांनीच अवकाश निरीक्षण केले जाते. सतराव्या शतकाच्या प्रारंभी गॅलिलिओने खगोलीय निरीक्षणांसाठी सर्वप्रथम दुर्बीण वापरली आणि खगोलशास्त्राच्या दुसऱ्या पर्वाचा प्रारंभ झाला. अठराव्या शतकात वर्णपटीय विश्लेषणातून खगोलीय अभ्यास सुरू झाला, हे तिसरे पर्व. साधारण विसाव्या शतकाच्या मध्यापासून खगोलशास्त्राच्या चौथ्या पर्वाचा प्रारंभ झाला वेगवेगळ्या प्रारणांच्या दुर्बिणींचा उदय याच शतकाच्या मध्यावर झाला. या संदर्भात १९६७ मध्ये चंद्रावर ठेवलेले पाऊल हे मानवाने खऱ्या अर्थाने केलेले सीमोल्लंघन म्हणता येईल.
अणुभौतिकीची वाटचालही अशीच जुनी आहे. इसवी सनपूर्व सहाव्या शतकात पदार्थाच्या लहानात लहान कणाला अणू असे संबोधले गेले होते. यानंतर किमान २४०० वर्षांनी एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी आधुनिक विज्ञानात अणुसिद्धांत मांडण्यात आला. तथापि अणूचे अद्ययावत स्वरूप स्पष्ट होण्यास विसावे शतक उजाडावे लागल़े. आज अणूच्याही मूलकणांची संकल्पना स्पष्ट होऊन, मूलकणांच्या टकरी घडवून माणूस विश्वाच्या प्रारंभीची स्थिती जाणून घेत आहे.
गुरुत्वाकर्षण गतीचे नियम विद्युतचुंबकत्व उष्मागतिकीचे नियम सापेक्षता सिद्धांत पुंजवाद हे भौतिकशास्त्रातील मैलाचे दगड ठरलेले आहेत. संदेशवहन हा मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आदिकालात हातवारे, खाणाखुणा, वेगवेगळे आवाज यातून संदेशवहनाची निर्मिती झाली. पुढे भाषालिपीमुळे हे काम खूपच सोपे होत गेले. वाहनांच्या माध्यमातून साध्य झालेला कमाल वेग आणि केवळ एका क्लिकच्या अंतराने जोडले गेलेले जग; यातून दळणवळण आणि संदेशवहन ही प्रगती गेल्या दीडशेच वर्षांतली आहे. आज विद्युतचुंबकीय प्रारणांच्या माध्यमांमधून ध्वनी आणि दृश्य स्वरूपाचे प्रसारण थेट समुद्रापारच नाही तर अंतराळातही अगदी सहज साध्य झाले आहे. आजच्या जगण्यात विद्युतचुंबकीय प्रारणांचे ऑक्सिजनइतकेच महत्त्व आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. उपग्रहांद्वारे भ्रमणध्वनींसाठी वापरल्या जाणाऱ्या रेडिओ लहरींच्या प्रक्षेपणाचे कार्य चालते, ते काही काळासाठी बंद पडले तरी माणसे कासावीस होतात.
 रसायनशास्त्राची चार पर्वे सांगितली जातात. अतिप्राचीन काळापासून ख्रिस्तकाळापर्यंत जी काही रसायनशास्त्राची माहिती उपलब्ध होती ती गूढ असल्यामुळे या पर्वाला गूढपर्व असे संबोधले जाते. दुसरे पर्व ख्रिस्तकाळापासून सतराव्या शतकापर्यंतचे हा अल्केमी म्हणजेच किमयागारांचा काळ. तिसरे पर्व सतराव्या शतकाच्या मध्यापासून एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंतचे, त्या पर्वाला पारंपरिक रसायनशास्त्राचा कालखंड म्हणतात. त्यापुढचा कालखंड आधुनिक रसायनशास्त्राचा मानला जातो. रसायनशास्त्राच्या अनुषंगाने सांगायचे झाले तर इसवी सनपूर्व तीन हजार वर्षांपूर्वी फार तर नऊ ते दहा धातुस्वरूप मूलद्रव्ये परिचयाची होती, आज त्यांची संख्या ११८ झाली आहे.
प्राचीन जीवशास्त्रामध्ये सृष्टिनिर्माणाचे श्रेय ईश्वराला बहाल करून जीवशास्त्र धार्मिकतेच्या बंधनाखाली होते. मात्र एकोणिसाव्या शतकातील उत्क्रांती सिद्धांताने या सगळ्याचा पाया उखडून टाकला. आज पेशीची जनुकीय संरचनाही समजावून घेण्यात आली आहे. जीवशास्त्रासंदर्भात इसवी सनपूर्व दोन ते तीन हजार वर्षांपूर्वी फक्त २०० आजार ज्ञात होते. आज ३० हजार आजारांची परिपूर्ण माहिती मानवजातीला झाली आहे. दूरस्थ ठिकाणी यंत्रमानवाच्या साहय़ाने केली जाणारी शस्त्रक्रिया, इथवर शरीरविज्ञानाची प्रगती केली आहे.  
कालखंड किंवा वेळेबाबत विचार केला तर आदिम काळात ढोबळपणे ऋतूंचे मोजमाप करणाऱ्या माणसाने आज सेकंदाचेही अब्जावधी भाग पाडले गेले आहेत आणि त्यावर तंत्रज्ञानही आधारलेले आहे. आज तळहातावर मावणारा संगणक सुरुवातीला अवाढव्य खोलीभर पसरलेला असायचा आणि संगणकाच्या पायाचा दगड रोवला गेला. सतराव्या शतकातल्या ‘अबॅकस’द्वारे.  
एकविसावे शतक हे सूक्ष्मातिसूक्ष्म म्हणजे नॅनोविज्ञान-तंत्रज्ञानाचे असेल असे म्हटले जाते. मात्र माणूस सूक्ष्मातिसूक्ष्म विज्ञानाकडे चौथ्या शतकात वळला होता. काचा, हिरे, माणिक,मोती यांच्यावरील नाजूक नक्षीकामातून सूक्ष्मातिसूक्ष्म विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रारंभ अगदी बीजरूपानेच का होईना, झाला होता.
दैनंदिन व्यवहारातील विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातील असंख्य उदाहरणे डोळसपणे अभ्यासताना सामान्यजनांना एक प्रश्न पडायला हवा की विश्वाच्या प्रारंभापासून अस्तित्वात असलेले विज्ञान जर मानवाची आदिकालापासून साथसंगत करीत आहे तर विज्ञान आपलेसे का झाले नाही?
देशोदेशीच्या क्षितिजांवर विस्तारलेल्या विज्ञानाचा अत्यंत महत्त्वाचा फायदा झाला आहे, तो म्हणजे मानवी जीवनात आलेली पारदर्शकता. निसर्गातील न सुटलेले प्रश्न मानवी मनात गूढ बनून राज्य करतात. याचा रोजच्या जीवनमानावर अनुचित प्रभाव पडत राहतो आणि यात सर्वसामान्य भरडले जातात. मात्र जसजसे नैसर्गिक घटनांमागील विज्ञानाचे आकलन होत जाते तसतसे मानवी मन कणखर होण्यास मदत होते. आजवरच्या वैज्ञानिक कालखंडाचा आढावा घेतला तर याचा प्रत्यय येईल. तथापि आज आपला देश महासत्तेकडे वाटचाल करताना सर्वसामान्यांची वैज्ञानिक मानसिकता सुदृढ होणे हे एक मोठे आव्हान आहे. दुर्दैवाने राज्यकर्ते आणि शासनकर्ते हे आव्हान स्वीकारण्याबाबत उदासीन आहेत.
 आजकाल कर्मकांडांशी विज्ञानाचा कसा तरी कुठे तरी ओढूनताणून संबंध जोडत कर्मकांडांचेच उदात्तीकरण होत आहे. यातून समाजाची दिशाभूल केली जात आहे. कर्मकांडांमुळेच मानवता धोक्यात आली आहे, हा न विसरता येणारा कटू इतिहास आहे.
अखेर एका महत्त्वाच्या मुद्दय़ाचा उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे पर्यावरणऱ्हासाचा. पर्यावरणऱ्हास हा आजचा कळीचा मुद्दा आहे यात शंका नाही, परंतु त्याचे खापर विज्ञान-तंत्रज्ञानावर फोडले जात आहे. मुळात पर्यावरणऱ्हास हा विज्ञानाने केला की माणसाने, याचा विचार सर्वप्रथम झाला पाहिजे. विज्ञान-तंत्रज्ञानाचा गैरवापर टाळून जर पर्यावरणही समृद्ध आणि संपन्न अवस्थेत टिकून राहिले तर पृथ्वीचा आणि माणसाचा भविष्यकाळ उज्ज्वल असेल.

elon musk postpones trip to india
‘टेस्ला’चे मस्क यांचा भारत दौरा लांबणीवर; वर्षअखेरीस भेटीचे सुतोवाच
anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
peter higgs death marathi news, peter higgs god particle marathi news
‘देव कणा’चा सिद्धान्त मांडणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड… पीटर हिग्ज यांच्या ‘हिग्ज बोसॉन’ संशोधनाचे मोल काय?
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

आपण कुठे आहोत..?
साधारण १४०० कोटी वर्षांपूर्वी विश्व तर ४५० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी निर्माण होऊन ३८५ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर पहिला जीव तयार झाला. यथावकाश ३०० कोटींपेक्षा जास्त वर्षे पार पडल्यानंतर म्हणजे ७० कोटी वर्षांपूर्वी प्राणी निर्माण झाले. यामध्ये मानवसदृश प्राणी अगदी अलीकडचा म्हणजे ४५ लाख वर्षांपूर्वीचा. आदिमानव ४ लाख वर्षांपूर्वी तर आजच्या आपल्या पूर्वजाची अवस्था १ लाख वर्षांपूर्वी प्राप्त झाली. हा मानव स्थिरस्थावर होऊन संस्कृती निर्माण होण्यास तब्बल ८० ते ९० हजार वर्षे लागली़. इसवी सनापूर्वीचा फार तर १० हजार वर्षांचा कालखंड ज्ञात असून आता इसवी सनानंतर फक्त २ हजार वर्षे पार पडली आहेत. पृथ्वीच्या आजवरच्या आयुष्याचा कालखंड एका वर्षांत मांडला तर, आपण ३१ डिसेंबरच्या रात्रीच्या शेवटच्या सेकंदातील आहोत.