04 July 2020

News Flash

पारदर्शी संघटक

राज्यकर्त्यांकडे आम्ही भीक मागत नसून आम्ही आमच्या घामाचे दाम मागत आहोत

शेती या क्षेत्राला दुय्यम दर्जा दिला जातो आणि शेतीत झालेल्या गुंतवणुकीपेक्षा त्यातून मिळणारे आर्थिक उत्पन्न हे कमी आहे असे निदर्शनास आल्यानंतर शरद जोशी यांनी शेतकरी संघटित करण्यास सुरुवात केली. चाकणबाहेर त्यांची पहिली सभा झाली, ती नाशिक जिल्ह्य़ातील निफाड सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहामध्ये. विश्रामगृहाच्या बैठक कक्षाची क्षमता जेमतेम ५० लोक बसतील एवढी. कक्ष भरला होता. त्यांची विषय मांडण्याची पद्धत आणि कळकळ लक्षात आल्यावर याच तालुक्यात त्यांच्या ५०-५० हजारांच्या सभा झाल्या. शेजारीच असलेल्या चांदवड येथे एका सभेला तर एक लाख लोक जमले होते. त्यातील ५० टक्के महिला होत्या. महाराष्ट्रात ग्रामीण भागात महिलांची पुरुषांच्या बरोबरीने उपस्थिती अनुभवण्याचे भाग्य निवडक वक्त्यांना आहे. तुकडोजी महाराजांची भजने, बाबासाहेब पुरंदरेंची व्याख्याने, नेहरू-गांधी घराण्यातील कुणाच्याही सभा आणि त्यानंतर शरद जोशींच्या सभा आहेत. यात दोन भाग आहेत. स्त्रियांना सभेला जावेसे वाटणे आणि घरच्यांनी जाऊ देणे. शेतकरी संघटित होऊ शकत नाही, असा भ्रम महाराष्ट्रात होता. हा भ्रम जोशींनी मोडून काढला. एवढेच नव्हे, तर शेतकऱ्यांना त्यांनी प्रबोधनातून बोलके केले. शेतकऱ्यांची मुले शेतीचा हिशेब मांडून मागण्या करू लागले. किमान भाव आणि आयात-निर्यातीच्या परिणामांची चर्चा करू लागले. राज्यकर्त्यांकडे आम्ही भीक मागत नसून आम्ही आमच्या घामाचे दाम मागत आहोत, असा हक्काचा पवित्रा जोशींनी शेतकऱ्यांना शिकविला.
शेतकरी चळवळ गेली काही दशके महाराष्ट्रात ठाण मांडून आहे. कारण, या चळवळीची उपयुक्तता. उपयुक्त नसलेली आंदोलने थांबतात. उपयुक्त चळवळी दीर्घकाळ टिकतात. शरद जोशींची चळवळ दीर्घकाळ टिकली. कारण, ती उपयुक्त आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताची आहे म्हणूनच. जोशींवर- हे शेतकरी नाहीत व यांना शेतीतील काही कळत नाही- असे आरोपही झाले. मुळात प्रश्न समजला की, त्याची सोडवणूक करता येते. तुम्ही राज्यकर्ते म्हणून त्या व्यवसायातीलच असणे गरजेचे नाही. शिवाय, जोशींचे मन हे शेतकऱ्यांचे होते. त्यांची विचार करण्याची पद्धत शेतकऱ्यांची होती. म्हणजेच शरद जोशी ‘दिल, दिमाग और जुबान से’ पक्के शेतकरी होते. शिवाय, चाकणजवळ शेती होतीच आणि ते ती जमीन कसत असत. त्यांची भाषणे, व्याख्याने आणि प्रबोधन हे पीक लागवडीच्या पद्धतींवर नव्हते. तर ते शेतीच्या अर्थशास्त्रावर बोलत असत. त्यांचा विषयच मुळात वेगळा होता. शरद जोशींच्या चळवळीचा हवाला दिल्याशिवाय महाराष्ट्राच्या शेतीचा विषय मांडता येणारच नाही. महाराष्ट्राच्या शेतीविषयात ज्यांचा संदर्भ दिल्याशिवाय, शेती विषय पूर्ण होत नाही, त्यात महात्मा फुले, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतरावदादा पाटील, शरद पवार आणि शरद जोशी ही नावे आहेत. या सगळ्यांचे योगदान महत्त्वाचे आणि सारखेच आहे. त्यात डावे-उजवे करण्याचे कारण नाही.
एखादा नेता गेला की, त्याची पोकळी कोण भरून काढणार अशी चर्चा सुरू होते. शरद जोशींच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी सध्या भरून निघेल असे दिसत नाही. निर्लेप, अभ्यासू आणि फक्त शेतकरीहिताचा अजेंडा शरद जोशींचा होता. असे तिन्ही गुण एकत्र असलेला म्होरक्या मिळेपर्यंत आपल्याला वाट पहावी लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2015 12:31 am

Web Title: honest organizer
टॅग Sharad Joshi
Next Stories
1 शेतकरी तितुका मेळवावा
2 योद्धा शेतकऱ्याची अखेर
3 ‘भविष्यवेध’ : तंत्र शिक्षणाच्या बाजारीकरणाचा!
Just Now!
X