स्थळ, काळ बदललं.. पण विष पसरतच राहिलं
मुंबईत गावठी दारूने तब्बल १०४ जणांचा बळी घेतला आणि पुन्हा एकदा खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने राज्यभरातील गावठी दारूच्या अड्डय़ांवर छापे घालण्यास सुरुवात केली. या छाप्यांच्या निमित्ताने अनेक गंभीर बाबी समोर येत गेल्या आणि गावठी दारू म्हणजे दुसरे तिसरे काही नसून थेट एखादे रसायनच माणसाला प्यायला दिले जाते इथपर्यंतचा तपशील समोर आला. याच जोडीला आर्थिक लाभासाठी माणसाचा जीवही घेण्यास तयार असलेल्या राक्षसी प्रवृत्ती आणि त्यांची प्रशासनाची असलेली जवळीकही समोर आली. या भीषण वास्तवाचा आढावा.

मालाडच्या मालवणीमधील विषारी दारूकांडनंतर मुंबईतल्याच नव्हे तर राज्यभरातील बेकायदेशीर दारूचे राजरोसपणे चालणारे गैरव्यवहार समोर आले. २००४ मध्ये मुंबईतल्या विक्रोळी येथे हातभट्टीची विषारी दारू प्यायल्यामुळे शंभरहून अधिक लोकांचे बळी गेले होते. मिथेनॉल या विषारी रसायनाचा वापर करून बनावट दारू बनवून विकण्यात आली होती. तेव्हापासून हातभट्टीच्या दारूवर राज्यभरात बंदी घालण्यात आली. पण ज्याप्रमाणे बंदी असलेल्या अनेक बाबी जशा राजरोस सुरू असतात तशाच पद्धतीने हातभट्टीच्या दारूचा हा व्यवहारही  नियमित सुरू होता. मुंबईतल्या बेकायदेशीर झोपडपट्टय़ा वाढू लागल्या होत्या. त्या बकालपणात अनेकानेक अनैतिक गोष्टींची भर होत होती. त्यात या बेकायदेशीर दारूचा धंदा वाढीस लागला होता. तो एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर आहे की त्याला खरोखर बेकायदेशीर म्हणावं का असा प्रश्न पडत होता. स्थानिक पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक समाजसेवकांच्या आशीर्वादाने या धंद्यात वाढ होत गेली. विक्रोळीच्या घटनेनंतर अशा विषारी दारूकांडाची पुनरावृत्ती होणार नाही, अशी समजूत सरकारने करून घेतली होती. पण भ्रष्ट यंत्रणेमुळे विषाचा हा व्यापार सुरूच होता. म्हणूनच या विषारी कांडाने १०४ जणांचे बळी घेतले.
काय घडलं मालवणीत..
गोरेगाव ते दहिसपर्यंतचा भाग हा उत्तर मुंबईत येतो. त्याच्या पश्चिम किनारपट्टीलगतचा भाग बकाल वसाहतींनी वाढला आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षांत या भागात झोपडपट्टय़ा वाढू लागल्या. मालाडमधील मालवणी हा त्यातीलच एक. सध्या हा भाग गुन्हेगारीचे नवे केंद्र म्हणून ते उदयास येत आहे. मालवणीमधील राठोडी गाव, लक्ष्मीनगर, अली तलाव, गावदेवी, खारोडी गाव या परिसरात खाडी होती. तेथे अनधिकृत झोपडय़ा उभ्या राहिल्या. लोकप्रतिनिधींचे आशीर्वाद मिळाले. पाणी माफिया, वीज माफिया आले. आणि बघता बघता या वसाहतीत अनैतिक धंदे उपजू लागले. दारू विक्रीचा धंदा हा त्यापैकीच एक. विषारी दारूकांडाची घटना याच राठोडी गाव आणि लक्ष्मीनगरमध्ये घडली आहे. या भागात राहणारा बहुतांश श्रमिक मजूरवर्ग. मराठी, मुस्लीम तसेच उत्तर आणि दक्षिण भारतीयांची वस्ती. दिवसभर अंगमेहनतीचे काम करणाऱ्या या वर्गाला श्रमपरिहारासाठी रात्री जी गोष्ट लागायची ती म्हणजे दारू. बारमध्ये जाऊन पिणे परवडणारे नसल्याने त्यांना हातभट्टीची दारू लागायची. ती गरज ओळखूनच दारू विक्रीचा धंदा या भागात फोफावला. दारू विक्रेत्यांची एक साखळी आहे. त्यात प्रत्यक्ष हातभट्टीची दारू तयार करणारे, त्याचा पुरवठा करणारे आणि प्रत्यक्ष किरकोळ विक्री करणारे यांचा समावेश आहे. हातभट्टीची दारू या भागात तयार होत नाही. फार फार तर मढ, गोराई, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जंगलात ती तयार होते. पण खरी आयात होते ती वसई, मनोरी या ग्रामीण भागांतून.
मालवणीच्या विविध भागांत जे बेकायदेशीर दारूचे गुत्ते आहेत त्यात ही हातभट्टीची गावठी दारू आणून विकली जात होती. परंतु बेकायदेशीर धंद्यात पैशांच्या लोभासाठी सगळ्याच गोष्टी बेकायदेशीर आणि अनैतिक केल्या जातात. हातभट्टीच्या दारूच्या नावाखाली त्यांना पाण्यात मिसळलेले मिथेनाईल हे रसायन दिले जायचे. गेल्या पाच वर्षांपासून हे रसायनमिश्रित दारू त्यांना दिली जात होती. मन्सूर ऊर्फ आतिक खान हा पूर्वी गावठी दारूचा व्यवसाय करायचा. त्याने गुजरातमधून मिथेनाईल आणण्यास सुरुवात केली. तेथील किशोर पटेल नावाच्या व्यापाऱ्याकडून तो मिथेनॉईलचे ड्रम आणून फ्रान्सिस आल्मेडा आणि सलीम शेख यांना द्यायचा. ते या मिथेनॉईलमध्ये पाणी टाकून त्याची बनावट दारू बनवायचे आणि स्थानिक दारूचे गुत्ते चालविणाऱ्यांना विकायचे. मिथेनॉईलमुळे गावठी दारूसाठी लागणारा पैसा वाचायचा आणि नफा भरपूर व्हायचा. पाण्यात मिथेनॉईल टाकून ते सहज दारू म्हणून विकले जात होते. परंतु ज्या दिवशी दुर्घटना घडली त्या दिवशी पाण्यात न मिसळलेले मिथेनॉईलच विकले गेले होते. त्यामुळे थेट मिथेनॉईल प्यायल्याने १०४ लोकांचे बळी गेले. एकामागोमाग एक अटकसत्र सुरू झाल्यानंतर या धक्कादायक बाबी समोर आल्या. गावठी दारू पिऊन कुणी मरत नाही (अर्थात त्याचे दूरगामी परिणाम असतातच). परंतु अधिक नफ्यासाठी मिथेनॉलची दारू बनवून विकली जायची. जेव्हा पैशाच्या लोभापायी सगळे नियम, नीतिमत्ता तुडवली जाते, त्याचा कळस अशा पद्धतीने गाठला जातो आणि मग त्याची परिणती अशा दुर्घटनेत होते. थोडक्यात काय तर विक्रोळीच्या २००४ मधील घटनेची ही पुनरावृत्ती. काळ बदलला, स्थळ बदलले, आरोपींची नावे बदलली. पण घटना तीच राहिली. बळींची संख्या वाढत गेली.
पोलीस कनेक्शन
कुठलेही बेकायदेशीर काम पोलिसांच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नसतं. बेकायदेशीर दारूसुद्धा त्याच प्रकारात. पोलिसांसाठी ते पैशांचे कुरण. वरिष्ठ पोलिसांनाही याची माहिती असते. या परिसरातील दारूचे वाढते धंदे रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय कार्यालय मालवणीत उघडण्यात आले होते. ज्या राठोडी गावात दुर्घटना घडली तेथून अवघ्या १०० मीटर अंतरावर उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे. परंतु पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादानेच हे धंदे चालत होते. म्हणून या घटनेनंतर मालवणीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह ८ पोलीस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. दारूच्या या बेकायदेशीर गुत्त्यांचा रोजचा धंदा दहा हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत आहे. त्यातून मग सगळ्यांचे हप्ते आणि नफा. यामुळे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागावरही हत्येचा गुन्हा दाखल करा अशी राजकीय मागणी आता जोर धरू लागली आहे. या दुर्घटनेनंतर अवघ्या सात दिवसांत ५१ दारू विक्रेत्यांना अटक करण्यात आली तर २३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. म्हणजे दारू विक्रीचे हे जाळे किती खोलवर पसरलेले होते, त्याची कल्पना येऊ शकते. आता ज्यांच्यावर कारवाई होतेय त्यांच्यावर भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३२८ अन्वेय कारवाई करण्यात येत आहे. म्हणजेच विष देऊन मृत्यूस कारणीभूत ठरणे असे हे कलम असून त्याची शिक्षा दहा वर्षांपर्यंत आहे. जर पूर्वीच अशी कडक कारवाई झाली असती तर मृत्यूचे हे तांडव झाले नसते. या धंद्याला तेव्हाच आळा बसला असता.
अशी बनते हातभट्टीची दारू
मोहाच्या फुलापासून, कुजलेल्या फळांपासून, बाभळीपासून ही गावठी दारू बनवली जाते. ताडी, खोपडी, हातभट्टी, आदी विविध नावांनी ती विकली जाते. ड्रममध्ये पाणी टाकून फळे, उसाचा चोथा कुजवला जातो. त्यात गूळ टाकला जातो. हे मिश्रण लवकर कुजण्यासाठी त्यात नवसारी टाकली जाते. बारा ते पंधरा दिवसांत वॉश येतो म्हणजे फेस येऊन वास येतो. त्यातील वाफेला द्रव रूपात आणून ही दारू बनवली जाते. मोहाच्या गोड फुलापासूनही दारू तयार केली जाते. विशेष म्हणजे मोहाची फुलं चाखली तर नशा येत नाही, परंतु दारू बनते. आदिवासी पाडय़ांमध्ये मोहाच्या फुलापासून दारू बनविली जाते. बाभळीपासूनही दारू बनवली जाते. त्यात भेसळ म्हणजे फार फार तर पाणी टाकून वाढ करायची. येणाऱ्या गरीब ग्राहकाला हातभट्टीची नशा चढावी इतकीच अपेक्षा. पण त्याला इजा व्हावी असे कुठलेही कृत्य करण्याची ठाणे, वसई, भाइंदर, उत्तन, आरे कॉलनीतील हातभट्टीखोरांची इच्छा नसायची. हा काळ निव्वळ हातभट्टीची दारू बनण्याच्या कालावधीतील. परंतु हातभट्टीचा पुरवठा कमी होत गेला आणि खिशाला न परवडणाऱ्या देशी दारूचे प्रस्थ वाढल्यानंतर हातभट्टीचा मिथेनॉलमिश्रित प्रवास सुरू झाला आणि त्यातून दारूकांडाची बीजे रोवली गेली.
मिथेनॉलमिश्रित स्पिरिट हे हातभट्टीच्या दारूसारखे लागते. याचा पुरेपूर फायदा उठवीत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या परवान्याशिवाय विकण्याची बंदी असलेले मिथेनॉल सर्रास वापरले जाऊ लागले. मुंबईत हातभट्टीची दारू कमी प्रमाणात तयार होते. मात्र ठाणे, पालघर जिल्ह्य़ांतून ती मागणी पुरी होते. तरीही मागणी खूप असल्यामुळे आपल्या वाटेला आलेल्या हातभट्टीच्या दारूत भेसळ करण्यासाठी आवश्यक असलेल्या रसायनांचे ड्रमच्या ड्रम ३० ते ४० रुपयांना मिळू लागल्यानंतर हा धंदा बहरला. मुंबईतल्या झोपडपट्टय़ांतून मध्यरात्रीच्या वेळी हे ड्रम भरलेले टेम्पो हमखास दिसतात. जवळच्या ठाणे, पालघर जिल्हा तसेच काही वेळा सुरतमधून हे टेम्पो येतात. मध्यरात्रीच्या वेळी जुनाट गाडय़ांतून अजूनही हातभट्टीच्या मिश्रित दारूची वाहतूक सुरू असते. यापैकी काही गाडय़ा उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी पकडतातही. परंतु कारवाईचे प्रमाण कमी आहे.
गोराई, भाइंदर, उत्तन, आरे कॉलनीत आजही चोरटय़ा मार्गाने हातभट्टी तयार होते. त्याची वाहतूकही चोरटय़ा पद्धतीने होते. परंतु साठा कमी असल्यामुळे तो वाढविण्यासाठी भेसळ केली जाते. पाणी वा स्पिरिट मिसळण्याचे प्रमाण अंगावर बेतत नाही. परंतु मिथेनॉलमिश्रित रसायन (ज्यात निव्वळ मिथेनॉलपेक्षा अन्य रसायनेही असण्याची शक्यता) नशेसाठी मिसळले जात असले तरी त्याचे प्रमाण अधिक झाले तर विक्रोळी, मालवणी दारूकांडासारखी घटना घडते. हातभट्टीच्या दारूत भरपूर पाणी आणि त्या तुलनेत मिथेनॉल मिसळण्याची प्रक्रिया गेली अनेक वर्षे सुरू आहे. मात्र त्याचे प्रमाण नियंत्रित होते. मिथेनॉलमिश्रित हातभट्टीचा कथित प्रवास उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाशिवाय सुरूच राहू शकत नाही. मालवणी दारूकांड घडल्यानंतर मोठय़ा प्रमाणावर मिथेनॉलमिश्रित स्पिरिटचे साठे पकडण्यात आले. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाने करावी, असा अध्यादेशच २०११ मध्ये शासनाने जारी केला आहे. त्याकडे उत्पादन शुल्क विभागाने बोट दाखविले आहे. परंतु १०४ जणांचे बळी गेली ही वस्तुस्थिती आहे आणि मिथेनॉलमिश्रित हातभट्टीचा प्रवास तूर्तास रोखला गेला आहे, इतकेच!

महिलांचा सहभाग
एकामागोमाग एक अटकसत्र सुरू झाले तेव्हा एक बाब समोर आली ती म्हणजे महिलांचा वाढता सहभाग. दारूच्या धंद्यात कारवाई करण्यात आलेल्या ७४ जणांपैकी ४० आरोपी या महिला होत्या. भाभी, आंटी नावाने या महिला धंदा करत होत्या. त्यांच्या या सहभागाने पोलीस चक्रावले आहेत. महिला असण्याचा फायदा घेत त्या या धंद्यात स्थिरावल्या. पूर्वी महिला पोलिसांची कमतरता असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नव्हती. तेव्हापासून त्यांचे प्रमाण वाढले. या महिला अशिक्षित असतात, पती बेरोजगार असतो किंवा दारूच्याच धंद्यात असतो, घरी बसून दारू विकणं सोप्प असतं, यातून झटपट पैसा मिळतो म्हणून त्या हा धंदा स्वीकारत असतात.