येत्या एक मार्चपासून देशात करोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. गेल्या दोन आठवडय़ांपासून करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. त्यादृष्टीने हा टप्पा खूप महत्त्वाचा असणार आहे.

दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्येष्ठांसह (६० वर्षांवरील) सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना सरकारी रुग्णालयांत मोफत लस देण्यात येणार आहे. या गटात जवळपास २७ कोटी लोकांचा समावेश आहे. करोनापासून सर्वाधिक धोका हा याच वयोगटाला आहे. त्यासाठी सुमारे १० हजारांहून अधिक सरकारी केंद्रांवर विनामूल्य लसीकरण करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. तर खासगी रुग्णालयात लाभार्थ्यांना लसीकरणासाठी शुल्क मोजावे लागेल. आरोग्य मंत्रालयाकडून येत्या दोन-तीन दिवसांत खासगी रुग्णालयांसाठी लसीकरणाचे दर जाहीर करण्यात येतील.

* लसीकरणासाठी नोंदणी कशी कराल?

दुसऱ्या टप्प्यात स्वयं-नोंदणीची प्रणाली असेल. लाभार्थ्यांना को-विन अ‍ॅप २.० डाउनलोड करावे लागेल आणि लसीकरणासाठी नोंदणी करावी लागेल.

* नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील?

वय पात्रता सिद्ध करण्यासाठी लाभार्थ्यांकडे एकतर निवडणूक ओळखपत्र किंवा आधार कार्ड असणे गरजेचे आहे. लाभार्थ्यांला को-विन अ‍ॅप २.० डाउनलोड करून नावाबरोबरच या कार्डाचीही नोंदणी करावी लागेल; आधार आणि मतदार यादी या दोन स्रोतांकडून माहिती घेण्यात येईल. वयोगटाबाबतची माहिती जुळल्यानंतरच हे अ‍ॅप लाभार्थ्यांची पुढील माहिती अपलोड करेल. तसेच निवडणूक ओळखपत्रावर वयाचा दाखला जुनाच असेल आणि सध्याचे वय ५० हून अधिक असेल तर वय पात्रता पडताळून पाहण्याचे अधिकार जिल्हादंडाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जिल्हादंडाधिकाऱ्याकडून पडताळणी झाल्यानंतर सध्याच्या वयाची नोंद होईल.

* सहव्याधी गटात कोणाचा समावेश असेल?

सहव्याधी असलेल्या गटात कोणाचा समावेश करणार, ते केंद्र सरकारने अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र, ज्यांना हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोग आहे, त्याशिवाय अवयव प्रत्यारोपण झालेले रुग्ण आणि स्टेरॉइडवर असलेल्या रुग्णांचा या गटात समावेश होण्याची शक्यता आहे. करोनामुळे मृत्यूचा धोका असलेल्यांचे विशेष गट बनवण्यात आले आहेत.

* लसीकरणाचे ठिकाण आणि तारीख निवडण्याचे स्वातंत्र्य आहे का?

लाभार्थ्यांना लसीकरणाचे ठिकाण व तारीख निवडण्याचे स्वातंत्र्य आहे.  को-विन अ‍ॅॅपवर वयाची पात्रता जुळल्यानंतर अ‍ॅप लसीकरण केंद्रांची सखोल माहिती प्रदर्शित करेल. त्यानुसार लाभार्थी केंद्राची निवड करू शकतो. त्यांना तारीख निवडण्याचा पर्यायदेखील उपलब्ध असेल. पर्यायांच्या उपलब्धतेनुसार लाभार्थी लस घेण्यासाठी जागा व वेळ ठरवू शकतो.

* एका राज्यातील मतदार यादीत नाव असलेल्या व्यक्तीला दुसऱ्या राज्यात लस घेता येईल काय?

लाभार्थीना देशातील कोणत्याही राज्यात लस घेता येणार आहे, तसा पर्याय सरकारने उपलब्ध करून दिला आहे. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशमध्ये राहणारी व्यक्ती कर्नाटकमध्ये काम करत असेल तर तेथे लस घेऊ शकते.