डॉ. मंगला नारळीकर mjnarlikar@gmail.com

आठवीपासून जर विद्यार्थी लक्ष देऊन शिकत असतील, तर ऑनलाइन पद्धतीने शिक्षण उपयोगी ठरू शकते. पण आधीच्या इयत्तांतील विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देण्याची, पाठय़पुस्तके समजावून सांगण्याची जरुरी असते. कोणतीही प्रौढ व्यक्ती त्यांच्यासाठी रोज थोडा वेळ देऊन हे काम करू शकते. पण कसे?

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य

गेली काही वर्षे शालेय शिक्षणाची स्थिती पाहून माझ्या मनात काही विचार येत होते. आता करोना आपत्तीत शाळा सुरू होण्यास उशीर होत आहे, विद्यार्थ्यांचा वेळ फुकट जात आहे आणि सर्वाना याची चिंता आहे. माझे शालेय शिक्षणासंबंधी, विशेषत: प्राथमिक शिक्षणासंबंधी विचार आता अधिकच महत्त्वाचे वाटत आहेत, म्हणून हे लिहिते.

मी ६ ते १०-१२ वर्षांची मुले (इथे पुल्लिंगी उल्लेख विद्यार्थ्यांसाठी आहे; पण मुलगा/मुलगी असा भेद अपेक्षित नाही.) पाहिली की विचारते, ‘‘कोणत्या शाळेत जातोस/जातेस? शाळा आवडते का? शिक्षक शिकवतात ते समजते का? गृहपाठ करता का? कोणता विषय आवडतो?’’ मध्यमवर्गातील मुले असली, तर एखाद्या विषयाला शिकवणी किंवा क्लास चालू केल्याचे समजते. वॉचमन, ड्रायव्हर, भाजीवाला, माळी अशा लोकांची मुले असली, तर ते अगदी ठासून सांगतात, ‘‘बाई, आम्ही अशिक्षित. आम्ही कसा यांचा अभ्यास घेणार? आम्ही क्लास लावला आहे सगळ्या विषयांचा.’’ बहुधा आई एक-दोन तासांचे घरकाम करून पैसे मिळवते आणि ते कोचिंग क्लासवाल्या शिक्षकाला देते. मुलाला कोचिंग क्लासला घातले की मूल परीक्षेत चांगले गुण मिळवून वरच्या वर्गात जाते, त्याचा अभ्यास चांगला होतो, हे मध्यमवर्गानेच तर दाखवून दिले आहे. त्यांचे पाहूनच इतर लोक मुलांचा अभ्यास घेण्याचे काम ‘आऊटसोर्स’ करू लागले आहेत. शिकवणीच्या वर्गामध्ये पाठ केलेली प्रश्नोत्तरे परीक्षेत गुण मिळवून देतात किंवा उत्तीर्ण करत असतील कदाचित; पण तो योग्य अभ्यास असतोच असे नाही. विद्यार्थ्यांला विषयाचे आकलन झाले आहे का हे पाहायला हवे, हे यांना कसे सांगायचे? मी सांगते, ‘‘तुम्हाला लिहिता-वाचता येत नसेल, तरी समज मोठय़ा माणसाची आहे ना? रोज मुलाकडून एकेका विषयाचा एक धडा मोठय़ाने वाचून घ्या. तुम्ही तुमचे काम करता करता ऐका, दोघे मिळून त्याचा अर्थ लावा. सहा, सात, आठ, नऊ किंवा दहा वर्षांच्या मुलाला समजेल अशी पुस्तकेलिहिली आहेत, ती तुमच्यासारख्या मोठय़ा माणसाला कळणार नाहीत का? मुलाचे वाचन चांगले होतेय ना पाहा, तुमच्याही ज्ञानात सहज भर पडेल आणि मुलाचा अभ्यासही होईल.’’

भुकेल्या मुलाला जेवण देऊन तृप्त करण्यात जे समाधान आहे, तसेच समाधान एखाद्या मुलाला न समजलेली अभ्यासातील गोष्ट समजावून सांगितल्यावर होणारा आनंद पाहून मिळते. पालकांनी हे समाधान चुकवू नये. वास्तविक हा लहान मुलांचा अभ्यास घेण्याचा उत्तम प्रकार आहे. विद्यार्थ्यांने पाठय़पुस्तक एकदा तरी लक्ष देऊन संपूर्ण वाचले पाहिजे. त्यासाठीच तर ते तयार केले आहे. अशा वाचनाने पालक आणि मूल यांचा भावबंधदेखील दृढ होईल. कारण एखादी गोष्ट सातत्याने बरोबर केल्यामुळे परस्पर भावबंध (बॉण्डिंग) घट्ट होतात. निदान पाचवीपर्यंतचा आणि खरे तर आठवीपर्यंतचा अभ्यासदेखील कोचिंग क्लासशिवाय व्हावा. यात मुलांना स्वयंअध्ययनाची सवय लागते; कारण ते स्वत: पुस्तक वाचून शिकण्याची क्रिया शिकतात. स्वयंअध्ययन हा गुरू त्यांना जन्मभर मदत करतो.

आता करोनामुळे अनेक शाळा बंद आहेत. ऑनलाइन शाळा सुरू करण्याचे प्रयत्न होत आहेत. अजून कित्येक मुलांना ऑनलाइन क्लास उपलब्ध होणार नाहीत. जिथे वीजदेखील पुरेशी नाही, तिथे या आधुनिक सोयी कशा मिळणार? अर्थात, सर्व मुलांकडे टॅब किंवा संगणक नाहीत. ऑनलाइन शाळा हा एक नाइलाजाने स्वीकारावा लागणारा पर्याय आहे. तो शहरांतील थोडय़ा लोकांना उपलब्ध आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या प्रत्यक्ष भेटीएवढा तो नक्कीच परिणामकारक नाही. वर्गात शिक्षक शिकवत असतानादेखील मुलांचे लक्ष किती तरी वेळा इतरत्र जाते; शिक्षक ते लक्षात आले की चुचकारतात, रागावतात. हे ऑनलाइन शाळेत कसे शक्य होणार? ‘अटेन्शन स्पॅन’ किंवा ‘अवधान काळ’ हा सहसा मोठय़ा माणसांचादेखील मोठा नसतो, लहान मुलांचा तर नक्की कमी असतो.

शालेय शिक्षण चांगले होण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत : शिकण्यास उत्सुक विद्यार्थी, शिकवण्यास उत्सुक, उत्साही शिक्षक आणि उत्तम पाठय़पुस्तके. अर्थात, शाळेची हवेशीर मोकळी इमारत, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, शौचालयाची व्यवस्था, खेळण्यासाठी जागा या गोष्टीही आवश्यक आहेतच. पण त्याहून प्राथमिक म्हणजे विद्यार्थी, शिक्षक आणि पुस्तके यांचा इथे विचार करू. करोनामुळे शाळा चालू झाल्या नाहीत तरी सुदैवाने सगळी पुस्तके छापून शाळांकडे व बाजारात गेली आहेत. काही विद्यार्थ्यांना ती मिळाली आहेत, तर इतरांना ती लवकरच मिळावीत. अनेक लेखक व तज्ज्ञ लोकांनी ही पुस्तके उत्तम लिहिली आहेत. शाळेची पाठय़पुस्तके गेली अनेक वर्षे मुलांना वाचण्यास/ समजण्यास सोपी, आकर्षक अशी होत आली आहेत. गणिताच्या पुस्तकांचा मी खास उल्लेख करू शकते. ७० वर्षांपूर्वी आम्ही ‘हातच्याची वजाबाकी’ अतिशय यांत्रिक पद्धतीने शिकलो. ती रीत लक्षात ठेवणे, वापरणे अनेक मुलांना कठीण वाटे. कोणत्याही प्रकारचे कारण रीतीमागे दिले जात नव्हते. साधारण ४५-५० वर्षांपूर्वीपासून ही वजाबाकी क्रियेचा अर्थ समजावत शिकवली जाते, लिहिली जाते. थोडा वेळ लागतो, पण मुलांना क्रिया ‘समजते’.

आता प्रत्येक वर्षांचा अभ्यासक्रम त्या-त्या इयत्तेतील मुलांना वाचून समजावा अशा रीतीने लिहिला गेला आहे. गोष्टी, उदाहरणे सांगून कल्पना/ संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. २० च्या पुढचे पाढे, पाउणकी, सव्वाकी अशी पाठांतरे केव्हाच बाद झाली. नव्वदच्या दशकात शि. द. फडणीस या सिद्धहस्त चित्रकाराच्या सुंदर चित्रांनी पुस्तके सजली, अधिक आकर्षक झाली. मुलांना करता येतील अशा कृती, गोष्टी, गाणी यांचा अंतर्भाव झाला. आता तर अगदी सातवी-आठवीपर्यंत सगळीच पुस्तके बालप्रिय (स्टुडंट फ्रेण्डली) आहेत असे दिसून येईल. त्यामुळे पालकांसमवेत मुले ती सहज वाचू शकतात. शिक्षकांचा अभाव जमेल तसा पालकांनी भरून काढायला हवा, ते सहज शक्य आहे. रोज प्रत्येक मुलासाठी अर्धा ते एक तास काढायला हवा. एका विषयाचा एक धडा दोघांनी मिळून वाचावा. त्याचा सावकाश अर्थ लावावा. दुसऱ्या दिवशी थोडी उजळणी करावी. आता संचारमर्यादेमुळे आई-बाबा यांपैकी एक तरी घरी असतील. एखाद्या घरात आजोबा, आजी किंवा आणखी एखादा प्रौढ असू शकेल. यांपैकी कुणीही, नाही तर शेजारचे महाविद्यालयामध्ये शिकणारे दादा वा ताई हे काम करू शकतात. दाट वस्तीत राहणाऱ्यांमध्ये जवळपास एकाच इयत्तेत शिकणारी तीन-चार मुले असू शकतील. तसे असेल, तर ती मुले एकत्र ‘होम स्कूलिंग’ घेऊ शकतात, त्यांचे पालक एकेक विषय वाटून घेऊन शिकवू शकतात. पाठय़पुस्तके समजावून घेऊन वाचणे, त्यातील प्रश्नांची उत्तरे शोधणे हा उत्तम अभ्यास आहे. गणितासाठी उदाहरणे सोडवण्याची थोडी सवय हवी, त्यासाठी पाठय़पुस्तकात सोडवलेली नमुन्याची उदाहरणे असतातच. भाषेच्या अभ्यासात रोज एखादी गोष्ट, चुटका किंवा पत्र लिहायला सांगावे. वर्तमानपत्राचे वाचन करावे. पाचवीपर्यंत तरी शिक्षक आणि विद्यार्थी यांची प्रत्यक्ष भेट आवश्यक आहे असे वाटते. कारण या विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देणे जरुरी असते. प्रत्येकाची शिकण्याची गती वेगळी असू शकते. उत्तम पाठय़पुस्तके वापरून कोणतीही प्रौढ व्यक्ती रोज थोडा वेळ देऊन हे काम करू शकते. पुढे जेव्हा प्रत्यक्ष शाळा सुरू होईल, तेव्हा अशा विद्यार्थ्यांचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला असल्याने शिक्षक उरलेला पाठय़भाग निश्चित पूर्ण करू शकतील. शिवाय विद्यार्थी स्वयंअध्ययन शिकल्यामुळे आत्मविश्वासाने नेहमी प्रगती करतील.

आठवीपासून जर विद्यार्थी लक्ष देऊन शिकत असतील, तर ऑनलाइन पद्धतीने शिक्षण उपयोगी ठरू शकते. इथे शिक्षकाच्या कौशल्याबरोबर विद्यार्थ्यांची ग्रहणक्षमता आणि इच्छा फार महत्त्वाची आहे. मात्र, ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देणे शिक्षकांनी शिकायला हवे.