तंत्रज्ञान आणि माणसाची मानसिकता यांचा जवळचा संबंध आहे. उत्क्रांतिशास्त्राच्या प्रगतीमुळे माणसाच्या मनाची उत्क्रांती कशी झाली हे समजू लागले आहे. दहा लाख वर्षांपूर्वी माणूस दोन पायांवर उभा राहू लागला, तरी त्यानंतरची नऊ लाख वर्षे तो अन्य प्राण्यांसारखाच होता. साधारण ७० हजार वर्षांपूर्वी त्याच्या मेंदूचे वेगळेपण दिसू लागले. तो अमूर्त विचार करून प्राण्यांच्या शिकारीचे नियोजन करू लागला, त्यासाठी कामे वाटून घेऊ लागला, मोठ्ठे खड्डे खणायचे, कुणी हाकारे घालायचे, कुणी प्राणी खड्डय़ात पडला की त्याला मारायचे.. हे ठरवू लागला. अशा ‘टीमवर्क’मुळे तो त्याच्यापेक्षा किती तरी मोठय़ा प्राण्यांची शिकार करू लागला. हळूहळू तो प्राण्यांना जिवंत पकडून त्यांना प्रशिक्षण देऊ लागला. रेडे, घोडे यांना त्याने आपलेसे केले. हत्तीसारख्या प्रचंड मोठय़ा प्राण्यालादेखील त्याने आपल्या कह्य़ात आणले. हे त्यापूर्वी कोणत्याही अन्य प्राण्यांना शक्य झाले नव्हते. स्वत:च्या मेंदूचा उपयोग करून माणूस अन्य प्राण्यांचा उपयोग ऊर्जासाधने म्हणून करू लागला.

माणूस अग्नी वापरू लागला होता, तरी वाफेच्या इंजिनाचा शोध लागेपर्यंत जैविक ऊर्जासाधने हेच जगभरातील माणसाचे ‘तंत्रज्ञान’ होते. रथाला घोडे, गाडीला बैल तो जुंपत होता. प्रचंड मोठी जहाजे माणसेच वल्हवत होती. प्रवासाच्या गतीला मर्यादा असल्याने या काळात स्थैर्य हा स्थायिभाव होता. बिनबैलाची गाडी माणूस चालवू लागला आणि त्याची गती वाढली. कारखाने निर्माण झाले. हजारोंच्या संख्येने एकत्र येऊन मुले शिकू लागली, कामगार एकत्र काम करू लागले. यामुळे शहरे वाढू लागली. एकत्र राहावे लागत असल्याने या काळात एकमेकांशी जुळवून घेणे महत्त्वाचे होते. संदेशवहन धिमे असल्याने वाट पाहणे क्रमप्राप्त होते. मात्र, गेल्या पन्नासेक वर्षांत माहिती तंत्रज्ञान विकसित झाले आणि त्याचा फार मोठा परिणाम माणसाच्या मानसिकतेवर होऊ लागला.

आता मुले त्यांच्या फोनवर त्यांना हवे ते एकटय़ाने शिकू शकतात, माणसे घरात बसून काम करू शकतात. यामुळे प्रत्येक माणसाचे स्वातंत्र्य वाढले आहे; मात्र सहकार्याची वृत्ती कमी होईल की काय, अशी भीती आहे. जीवनशैली बदलल्याने तणावजन्य शारीरिक, मानसिक आजार वाढू लागले आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून सर्वागीण स्वास्थ्याचे प्रशिक्षण देणे हे आजच्या काळातील या समस्येवर उत्तर आहे.

– डॉ. यश वेलणकर
yashwel@gmail.com