घुमान साहित्य संमेलनाला जायचं ठरवलं त्याला दोन-तीन कारणं होती. एक म्हणजे संत नामदेवांच्या कर्मभूमीचं दर्शन घ्यायचं होतं. दुसरं- माझ्या अत्यंत आवडत्या कवयित्री व लेखिका अमृता प्रीतम यांची घडण ज्या मातीनं केली, त्या मातीचा उत्कट गंध मला हृदयात साठवून घ्यायचा होता. तिसरं : पंजाबचा सुजलाम् सुफलाम् ग्रामीण भाग पाहायचा होता. तिथले लोक, त्यांची संस्कृती जवळून अनुभवायची होती. खरं तर कुठल्याही संमेलनात तेच ते नेहमीचं चर्वितचर्वण असतं. घुमान त्याला काहीसं अपवाद असलं, तरी त्यापलीकडे तिथली माणसं, त्यांची संस्कृती अनुभवणं जास्त महत्त्वाचं वाटत होतं.   
पहिल्या दिवशी संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडेतो संध्याकाळ झाली होती. भूकही लागली होती. मी आणि चित्रकार दत्तात्रय पाडेकर पोटपूजा करण्यासाठी कुठं एखादं हॉटेल आढळतं का, हे पाहण्यासाठी मंडपाबाहेर पडलो. म्हटलं, गावात एक चक्कर मारावी. हॉटेलात काहीतरी पोटात घालावं. पण त्या एवढुशा गावात हॉटेलं ती कसली असणार? मिठाया, बिस्किटांचे पुडे, कुरकुरे यांशिवाय आमच्या चटावलेल्या शहरी जिभेचे चोचले पुरवणारं असं तिथं काहीच नव्हतं. दोन-तीन पाणीपुरीवाले होते; पण आमच्या ‘हेल्थ कॉन्शस’ मनाला त्यांच्याकडची पाणीपुरी खाणं रुचेना. खाण्याच्या शोधमोहिमेत बाजारपेठेत फिरता फिरता अंधार पडू लागला होता. एका बोळकांडीत काहीतरी तळण चाललेलं दिसलं. म्हटलं, पाहू तरी. तिथे तीन-चार शीख माणसं एका मोठ्ठय़ा कढईत कांदाभजी तळत होते. भजी पाहून जीभ चवताळली. तिथल्या एका रिकाम्या माणसाला ‘दो प्लेट भजी दो’ म्हटलं. त्यानं मोठय़ा कागदांत दोघांना चांगली बचकाभर भजी बांधून दिली. ‘याचे किती पैसे?’ विचारलं तर म्हणाला, ‘आपके लिए ही हम ये बना रहे है. आप चाहे जितना खाओ. पैसेवैसे कुछ नहीं.’ आम्हाला धक्काच बसला. कुठल्या ओळखीच्या ना पाळखीच्या प्रदेशातले आम्ही! आणि आमच्यासाठी त्यांनी हा घाट घातला होता! त्यांचे तोंडभरून आभार मानत आम्ही तिथून निघालो. पंजाबी माणसांच्या जिंदादिलीचा तो पहिला प्रत्यय होता.vv03दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी आणि पाडेकर आम्ही घुमानच्या आजूबाजूची गावं आणि तिथली माणसं पाहावीत म्हणून बाजारपेठेच्या तिठय़ावर आलो. घुमान हे तसं छोटंसंच गाव. तिथं आपल्याकडच्यासारख्या रिक्षा नसल्यानं नाइलाजानं सायकलरिक्षा करणं भाग पडलं. माणसानं ओढायच्या रिक्षेत बसायचं आमच्या अगदी जीवावर आलं होतं. पण करता काय? दुसरा काही इलाज नव्हता. सायकल रिक्षावाल्यानं जवळच्या दोन-तीन गावांतून फेरफटका मारून आणायचे शंभर रुपये सांगितले. एवढय़ा लांबच्या पल्ल्याचे फक्त शंभर रुपये! हा आणखीन एक आश्चर्याचा झटका!
सायकलरिक्षानं आम्ही निघालो. काहीएक अंतर तोडल्यावर एक गाव लागलं. सभोवती मैलोन् मैल पसरलेली गव्हाची हिरवट पिवळी शेतं.. त्यांत मधूनच कुठं कुठं ओळीत शिस्तीत उभी असलेली वृक्षराजी.. फार फार तर सायकलरिक्षा जाऊ शकेल एवढाच शेत दुभागणारा छोटासा रस्ता.. वाटेत अधेमधे शेतातून परतणारे, डोक्यावर गवताचे भारे घेऊन चाललेले शेतकरी भेटत होते. सोबत पोरांना घेऊन चाललेली बायको.. बाकी रस्ता निर्मनुष्य. मधेच कुठंतरी एखादं कुडानं शाकारलेलं झोपडं लागे.
आमच्या मनात आजवर जोपासलेल्या पंजाबच्या ‘सुजलाम् सुफलाम्’ भूमीच्या चित्राला काहीसं तडा देणारंच हे दृश्य. असं स्वप्नील चित्र रंगवणं हीच मुळात आमची चूक होती. कारण कुठलाही प्रदेश कितीही सुजलाम् असला तरी तिथली सगळीच माणसं काही श्रीमंत असणं शक्य नव्हतं. हे चित्र काहीसं स्वप्नरंजनात्मकच होतं. त्यामुळे वास्तवात यायला आमच्याकरता हा असा धक्का गरजेचाच होता.  पण या प्रवासातले माणसांचे अनुभव मात्र खरोखरच स्वप्नवत होते..
घुमानच्या भोवतालच्या गावांतील डोळे निववणारा निसर्ग श्वासांत भरून घेत आमचा प्रवास चालला होता. वाटेत एखादा वाटसरू आमच्याकडे पाहून हात हलवी. तोंडभरून स्वच्छ, निर्मळ हसे. त्याच्या डोळ्यांत कुतूहल दाटलेलं दिसे. या गावंढय़ा गावात ही कोण बरं शहरी माणसं आलीयत, असा भाव त्याच्या चेहऱ्यावर असे.
इतक्यात तीन मोटरसायकलींवर स्वार होत गाव उंडारायला निघालेली मुलं आम्हाला हात दाखवीत थांबली. आम्ही निसर्गदृश्यांचे फोटो काढतोय हे बघून ‘हमारे भी एक फोटो निकालो..’ म्हणाली. आम्ही त्यांचे फोटो काढले. त्यानं ती खूश झाली. म्हणाली, ‘अभी हमारे घर चलो. चायवाय ले लो.’ आम्ही त्यांना नम्रतापूर्वक नकार दिला. ‘आम्हाला तुमचा गाव बघायचाय. संध्याकाळ झालीय. उशीर होईल..’ असं म्हटलं.
तिथून थोडं पुढं गेल्यावर एका झोपडीवजा घराबाहेर दोन-तीन मुलं खेळताना दिसली. त्यांनी सायकलरिक्षात बसलेल्या आम्हाला पाहून घरातल्या लोकांना आरडाओरडा करत बाहेर बोलावलं. गरिबीच्या खुणा त्यांच्या पेहेरावापासून दिसण्या-वावरण्यातही जाणवत होत्या. त्यांच्यातल्या एका बाईनं ‘हमारे घर आईए. चाय पीजिए..’ म्हणत आम्हाला चहाचा आग्रह केला. दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत असावी असं त्यांच्याकडे पाहून वाटत होतं. अशा माणसांनी कुठलीही ओळखपाळख नसलेल्या आमच्यासारख्या वाटसरूंना चहाला बोलवावं? त्यांचं आमचं नातं काय? त्यांच्या त्या मनापासूनच्या आग्रहानं मन भरून आलं. त्यांचे फोटो काढून आणि त्यांच्या आग्रहाबद्दल आभार मानत आम्ही निघालो तरीही त्यांचा चहाचा आग्रह सुरूच होता. आम्हाला त्यांना नकार देताना वाईट वाटत होतं; पण करणार काय? कुणाकुणाकडे आणि किती वेळा चहा पिणार?
पुढल्या गावात शिरलो. एका चारपाईवर हुक्का ओढत बसलेले दोघे-तिघे आमच्याकडे पाहून छानसं ओळखीचं हसले. आम्हीही त्यांना नमस्कार केला. शेजारच्या गोठय़ात एक वयस्क स्त्री म्हशीचं दूध काढत होती. तिनं आम्हाला थांबायला सांगितलं आणि आपल्या उघडय़ा नातवंडाला घरात पिटाळत ग्लासं आणायला सांगितली. ‘थोडा दूध पीके जाओ..’ म्हणाली. आमच्यापुढे आणखीन एक अगत्याचं संकट ठाकलं होतं. तिची कशीबशी समजूत काढत आम्ही तिला सांगितलं, ‘आम्हाला अजून सगळा गाव बघायचा आहे. पुन्हा कधी येऊ तेव्हा तुमच्या हातचं दूध नक्कीच पिऊ.’ ती थोडीशी हिरमुसली झाली. आम्हालाही तिचा आग्रह मोडताना जीवावर आलं होतं.
गावातल्या प्रत्येक घरासमोरून जाताना याच अगत्याचा अनुभव येत होता. आपण स्वप्नात तर नाही ना, असं वाटत होतं. ही कुठली कोण माणसं! नात्याची ना गोत्याची! आपल्याला प्रेमानं घरी बोलावताहेत. आदरातिथ्य करू मागताहेत. आपण असं कुणा अनोळखी माणसाचं स्वागत केलं असतं का? नात्यातलंही कुणी भलत्या वेळी न सांगतासवरता घरी आलं तर कपाळावर सूक्ष्म आठी पडणारे आपण! आमची आम्हालाच क्षणभर लाज वाटली.
तिथून आणखी थोडं अंतर काटतो- ना काटतो तोच एक मोटरसायकलस्वार आमच्या सायकलरिक्षाला आडवा आला. त्यानं आमची रिक्षा थांबवली आणि रिक्षावाल्याला काहीतरी त्यांच्या भाषेत सांगितलं. रिक्षावाल्यानं त्याचं म्हणणं आम्हाला सांगितलं. तो आम्हाला आपल्या घरी घेऊन यायला त्याला सांगत होता. ‘तुम्ही सगळ्यांना नाही म्हटलंत. पण याच्या घरी तरी चला..’ असा रिक्षावाल्यानंच मग आम्हाला आग्रह केला. एवढय़ावरच तो थांबला नाही तर त्याच्या बाइकमागोमाग आम्हाला त्याच्या घरी घेऊनच गेला. एका शेतात त्या गृहस्थाचं घर होतं. घराचं बांधकाम अर्धवट पडलेलं दिसत होतं. अंगणात एक ट्रॅक्टर ट्रॉली होती. त्यानं आमचं आगतस्वागत केलं. आपल्या आईला बाहेर बोलावलं. तिला चहा करायला सांगितलं. आम्ही चहा पीत नाही, म्हटलं तर ‘फिर दूध लो’ म्हणत त्यानं अगदी आग्रहच केला. आईला दूध घेऊन यायला सांगितलं. ‘तोवर आपण घर बघू..’ म्हणत तो आम्हाला आपलं घर दाखवायला घेऊन गेला. घराचे काही खांब उभे राहिले होते. कसंबसं तात्पुरतं राहण्यायोग्य घर पुरं झालं होतं. पण विटांच्या काही भिंतींना अद्याप प्लॅस्टर व्हायचं होतं. छतावरची स्लॅबही अर्धवट होती. ‘घराचं बांधकाम सुरू आहे का?’ आम्ही त्याला विचारलं. तर तो म्हणाला, ‘अभी काम बंद पडा है. पैसे की थोडी तकलीफ है. जब पैसे मिलेंगे तब थोडा थोडा करके काम पुरा कर लेंगे.’
घराला लागूनच शेत होतं. अवकाळी पावसानं त्याच्या पिकाचं नुकसान झालं होतं. घरातली गरिबी स्पष्ट दिसत होती.  त्यानं आम्हाला विचारलं, ‘तुमच्याबरोबर आणखीही कुणी आलेत का?’ मी म्हटलं, ‘हो. आमचे दोन-तीन मित्रही आहेत सोबत. संमेलनात आहेत.’ ‘मग त्यांना का नाही आणलंत? मी जाऊन त्यांना घेऊन येऊ का? आलाच आहात तर आता राहा आमच्याकडे. जेवूनच जा.’ आम्ही त्याला आजच रात्रीच्या गाडीनं आम्ही मुंबईला परतणार असल्याचं सांगितलं. तरी त्याचा राहायचा आग्रह सुरूच होता. एवढय़ात त्याच्या आईनं दुधाचे ग्लास समोर आणून ठेवले. पाडेकरांनी ‘आमच्यासोबतच्या रिक्षावाल्यालाही दूध द्या,’ असं त्याला म्हटलं. ‘त्याला आम्ही तुमच्याआधीच दूध देऊन आलोय..’ असं तो गृहस्थ अदबीनं म्हणाला. बाहेर जाऊन पाहिलं तर खरंच रिक्षावाला दुधाचा ग्लास पिऊन खाली ठेवत होता.
इकडच्या तिकडच्या गप्पा मारून आम्ही त्यांच्या घरून निघालो. आम्हाला निरोप द्यायला घरातली झाडून सगळी मंडळी अंगणात आली होती. त्या गृहस्थानं काहीतरी सांगत शंभराची नोट रिक्षावाल्याच्या खिशात कोंबली. रिक्षावाला ‘नको, नको’ म्हणत होता. पण त्यानं त्याचं काहीएक न ऐकता जबरदस्तीनं त्याच्या खिशात नोट कोंबलीच. आम्हाला वाटलं, रिक्षावाल्यानं आम्हाला त्याच्या घरी आणलं त्याची बक्षिसी तो देत असावा.
त्या सर्वाचा निरोप घेऊन आम्ही निघालो. त्यांच्या त्या आदरातिथ्यानं एवढं भारावलो होतो, की क्षणभर स्तब्धच व्हायला झालं.
रिक्षावाल्यानं दोन-तीन गावांतून हिंडवून आम्हाला पुन्हा संमेलनस्थळी आणून सोडलं. मी शंभराच्या दोन नोटा त्याला देऊ केल्या, तर तो पैसे घेईना. म्हणाला, ‘उन्होने मुझे आपके पैसे दे दिए है.’ तेव्हा कुठं आमच्या डोक्यात प्रकाश पडला. त्या गृहस्थानं आमच्या भाडय़ाचे पैसे त्याला दिले होते! आम्ही स्तंभितच झालो.
तरी रिक्षावाल्याच्या खिशात पैसे कोंबत मी म्हटलं, ‘हमने आपकी सेवा ले ली है. इसलिए आपको ये पैसे लेनेही पडेगे. अपने बच्चों को मिठाई लेके जाना.’ तरीही तो ऐकेना. त्यानं मी जबरदस्तीनं त्याच्या खिशात कोंबलेले पैसे पाडेकरांच्या खिशात कोंबायचा प्रयत्न केला. त्यांनी त्या पुन्हा त्याच्या हातात कोंबल्या.
तोवर हा काय तमाशा चाललाय, हे बघायला सभोवती बघ्यांची गर्दी गोळा झालेली होती. त्यांच्यापैकी काहींच्या घडला प्रकार लक्षात आला. त्यांनी त्या रिक्षावाल्याला समजावलं.. ‘ते जर एवढं म्हणताहेत तर घे ना पैसे!’ तेव्हा कुठं नाइलाजानं त्यानं ते पैसे घेतले.
ते घेतानाही त्याच्या डोळ्यांत पाणी तरळत होतं..