|| प्रशांत कुलकर्णी

विनोदी कथालेखन आणि  बालसाहित्यात मुशाफिरी करण्याबरोबरच व्यंगचित्रकलेविषयी आस्वादक लेखन करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका-कथाकथनकार शकुंतला फडणीस यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या व्यक्तित्व आणि कार्याचा वेध घेणारे हे लघुटिपण…

 

मुळात लहान मुलांसाठी लिहिणं खूप कठीण. त्यातही शौर्य, धाडस, गूढ, गडबड-गोंधळ, चमत्कृती यांबरोबरच शब्द आणि प्रसंगनिष्ठ विनोद यांच्या साहाय्याने नवनवीन कथानके रचावी लागतात. हे काम शकुंतला फडणीस यांनी नेटानं केलं. अनेक वर्षं केलं. त्यांनी कुमारवयीन वाचकांना वाचनाची आवड लागावी म्हणून नुसतंच लेखन केलं नाही, तर विविध संस्थांमार्फत ही चळवळ रुजावी म्हणून प्रयत्न केले. प्रसंगी पुस्तकंही विकली. कारण बाल-वाचकच पुढे जाऊन अधिक अभिरुचीने वाचतील याबद्दल त्यांना विश्वास होता.

पती शि. द. फडणीस हे चित्रकार, त्यातही व्यंगचित्रकार! हे क्षेत्र एकदम बेभरवशाचं. अशा स्थितीत पतीची कारकीर्द बहरण्यासाठी त्याचा सर्वतोपरी आधार व्हायचं आणि त्याचबरोबर स्वत:ची लेखनऊर्मीही कोमेजू द्यायची नाही, ही तारेवरची कसरत शकुंतला फडणीस यांनी ६५ वर्षं केली. तीही हसतमुखानं, हे महत्त्वाचं.

त्यांच्या बहुतेक पुस्तकांची मुखपृष्ठं ही शि.दं.नी चितारली आहेत. पण त्याचबरोबर शि.दं.च्या प्रत्येक नव्या प्रयोगात शकुंतलाबाईंचाही सक्रिय सहभाग असे. ‘हसरी गॅलरी’ या देश-विदेशांत झालेल्या हास्यचित्रांच्या प्रदर्शनात पडद्यामागील संपूर्ण जबाबदारी ही शकुंतलाबाईंची असे. ‘चित्रहास’ हा हास्यचित्रं आणि त्याबरोबरचं समालोचन असा ‘स्लाइड-शो’ ते दोघं मिळून फुलवायचे. तीच गोष्ट गणिताच्या पुस्तकातील रेखाटनांची. हे अद्भुत पुस्तक घरच्यांची साथ असल्याशिवाय शक्य झालं नसतं, असं शि.दं.नीच म्हणून ठेवलं आहे. शि.दं.च्या सर्व पुस्तकांवर शकुंतलाबाईंचा नेटकेपणाचा कटाक्ष असायचा, हे खरं आहे. त्यांच्या या पुढाकाराबद्दल खुद्द शि.द. म्हणतात, ‘‘प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं म्हणतात. पण माझ्याबाबतीत तर ती गरजेनुसार पुढेही असते!’’

पतीच्या व्यंगचित्रकार या पेशामुळे असेल, शकुंतलाबाईंनी व्यंगचित्रांचे रसग्रहण करणारे अनेक लेख लिहिले. अनेक देशी-विदेशी व्यंगचित्रांची आणि व्यंगचित्रकारांची ओळख रसिकांना त्यामुळे झाली. ‘संवाद हास्यचित्रांशी’ हा त्याचा संग्रहही प्रसिद्ध झाला. यातील त्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या एका लेखाचा उल्लेख करणं भाग आहे, तो म्हणजे- ‘हिंदू पंच’ या सव्वाशे वर्षांपूर्वीच्या नियतकालिकातील व्यंगचित्राबद्दल त्यांनी लिहिलेला लेख. त्या लेखाबरोबर प्रसिद्ध झालेली व्यंगचित्रं हा नव्यानं खुला झालेला खजिना होता.

‘वेगळ्या वाटेने’ या त्यांच्या अलीकडच्या पुस्तकात त्यांनी अनेक सुहृदांविषयी मोठ्या ममत्वानं लिहिलं आहे. खरं तर स्वत:ची असंख्य पुस्तकं लिहीत असताना, व्यंगचित्र या माध्यमाचा ‘तरल कल्पना ते प्रत्यक्ष चित्र ते रसिकांची दाद’ असा अनुभव त्यांनी ६५ वर्षं घेतला; तेव्हा त्याही अशा रीतीनं वेगळ्या वाटेनं प्रवास करत होत्या हे जाणवतं.

(लेखक व्यंगचित्रकार आहेत.)

prashantcartoonist@gmail.com