News Flash

खाडीपात्र, डोंगरभाग हातभट्टीचे अड्डे

खाडीपात्र, डोंगरभाग हातभट्टीचे अड्डे नीलेश पानमंद, ठाणे ठाणे जिल्हय़ाला मोठा खाडी किनारा आणि विस्तीर्ण जंगल लाभले असून या खाडीपात्रात आणि डोंगर परिसरात गावठी दारूच्या हातभट्टय़ा

| June 28, 2015 12:19 pm

खाडीपात्र, डोंगरभाग हातभट्टीचे अड्डे
नीलेश पानमंद, ठाणे
ठाणे जिल्हय़ाला मोठा खाडी किनारा आणि विस्तीर्ण जंगल लाभले असून या खाडीपात्रात आणि डोंगर परिसरात गावठी दारूच्या हातभट्टय़ा उभ्या राहिल्या आहेत. शीळ-डायघर येथील देसाई गावातील खाडीपात्रात शंभरहून अधिक गावठी दारूच्या भट्टय़ा होत्या, पण विक्रोळीच्या दारूकांडानंतर या भट्टय़ांवर कारवाई होऊ लागल्याने भट्टय़ांचे प्रमाण घटले आहे.

गेल्या आठवडय़ात ठाणे पोलिसांनी शीळ-डायघर येथील देसाई गावातील खाडी किनाऱ्यापासून एक ते दीड किलोमीटर आतील पात्रात गावठी दारू निर्मितीची भट्टी उद्ध्वस्त केली असून या कारवाईदरम्यान पोलिसांच्या हाती एकच भट्टी लागली. यावरून पूर्वीच्या तुलनेत या भागात हातभट्टय़ांचे प्रमाण घटल्याचे उघड झाले आहे. भिवंडी भागातील काही गावांमध्ये अशा प्रकारच्या भट्टय़ा असून तिथे गावठी दारूची निर्मिती करण्यात येते. याशिवाय, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या मामा-भाचे डोंगराच्या पलीकडील बाजूसही अशा हातभट्टय़ा आहेत. वनदेवीच्या परिसरात या भट्टय़ा असून तिथे जाण्याचा मार्ग अडचणीचा आहे. मात्र, मालवणीच्या दारूकांडानंतर खडबडून जाग आलेल्या पोलिसांनी हातभट्टय़ांवर कारवाई सुरू केली आहे. डोंगर भागातील या हातभट्टय़ांवर सहसा कुणाची नजर पडत नाही आणि वन विभागाकडून त्याविषयी कारवाई होताना दिसून येत नाही. गावठी दारू निर्मितीसाठी हातभट्टय़ा सुरू असताना मोठय़ा प्रमाणात धूर बाहेर पडतो. त्यामुळे पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी भट्टय़ा लावण्यात येतात आणि पहाटे गावठी तयार होताच तिचे वितरण सुरू होते.
दारूच्या साहित्याची ने-आण करण्यासाठी बोटींचा वापर करण्यात येतो. मात्र, खाडीपात्र आणि डोंगर परिसरातील भट्टय़ांवर पोलीस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून फारशी कारवाई होताना दिसून येत नाही.

राजरोस विक्री
हर्षद कशाळकर, रायगड
रायगड जिल्ह्य़ाला खोपडी दारूकांड आणि स्पिरिटकांड यांचा इतिहास लाभला आहे. युती सरकारच्या काळात खोपोलीजवळ झालेले खोपडीकांड असो अथवा आघाडी सरकारच्या काळात पाली परिसरातील स्पिरिटकांड या दोन्ही दारूकांडांत १०० हून अधिक जणांचा बळी गेला आहे. यात आदिवासी समाजाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे गावठी दारूची निर्मिती आणि वाहतूक रोखणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन रायगडच्या उत्पादन शुल्क विभागाने विशेष भरारी पथकांची स्थापना केली आहे. या भरारी पथकांना दर महिन्यासाठी विशिष्ट लक्ष्यांक दिला जातो आहे. गुन्हे दाखल करताना वारस गुन्हे दाखल करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याचे चांगले परिणाम आता दिसण्यास सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्य़ातील अवैध दारू विक्रीचा इतिहास लक्षात घेऊन, आता उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्री करणाऱ्यां विरोधात धडक कारवाईला सुरुवात केली आहे.
मात्र या व्यापक कारवाईनंतर रायगड जिल्ह्य़ातील गावठी दारूचे उत्पादन आणि विक्री थांबली का असे कोणी विचारले तर त्याचे उत्तर नकारार्थी येईल, करण आजही रायगड जिल्ह्य़ातील अनेक भागांत हातभट्टी आणि गावठी दारूचे उत्पादन आणि विक्री राजरोसपणे केले जाते आहे. जिल्ह्य़ातील घनदाट जंगलांचा या गावठी दारू उत्पादनांसाठी राजरोसपणे वापर केला जात आहे. ..

महागडय़ा दारूला पर्याय
दयानंद लिपारे, कोल्हापूर
गावठी विषारी व्होल्टम नावाच्या दारूमुळे ३० वर्षांपूर्वी करवीर नगरीत १४ जणांचा बळी जाऊनही अद्याप गावठी दारूची खुलेआम विक्री सुरू आहे. पोलीस-राज्य उत्पादन शुल्क खात्यातील जबाबदारीची निश्चिती, शासनाचे बदलणारे धोरण, महाग बनलेली देशी-विदेशी दारू अशा अनेक कारणांचा परिपाक गावठी दारू सुरू राहण्यामध्ये असल्याचे दिसते.
कोल्हापूर जिल्ह्य़ातील काही विशिष्ट गावे ही गावठी दारूची केंद्रे बनली आहेत.  गावठी दारूच्या विरोधात जिल्ह्य़ातील महिलांनी गेली उग्र आंदोलने केली. अनेक देशी दारूची दुकानेही उभी-आडवी बाटली मतदानाद्वारे बंद पाडली. दहा वर्षांपूर्वी माणगांववाडी या गावठी दारू विक्रीच्या मोठय़ा केंद्रावर पोलिसांनी धाड टाकली. तेव्हा दारू विक्रेत्यांनीच त्यांच्यावर हल्ला केल्याने प्रकरण चांगलेच गाजले होते. दुसरीकडे पोलीस व उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडूनही अधूनमधून गावठी दारू दुकानांवर धाड सुरू असते. अटक, मुद्देमाल जप्त, साहित्याची नासधूस असे प्रकार घडतात. पण यथावकाश सर्व काही शांत होते आणि हातभट्टीच्या पहिल्या धारेची दारू हप्तेबाजीच्या आश्रयाने उघडपणे विकली जाते.

हजारो लिटर रसायन जप्त
चंद्रशेखर बोबडे, नागपूर
नागपूरमध्ये  पाचपावली, नाईक तलाव, लकडगंज, पांढराबोडी, तकीया, कुंभारटोली आणि जिल्ह्य़ात सावनेर, उमरेड, काटोल आणि रामटेक या तालुक्यांतील काही वस्त्यांमध्ये अवैध गावठी दारूची जोरात विक्री केली जाते. जोपर्यंत वाईट घटना घडत नाही तोपर्यंत चालू द्या, अशी स्थानिक पोलीस आणि उत्पादन शुल्क या दोन्ही खात्यांची कार्यशैली आहे. सध्या होत असलेली कारवाई त्याचेच प्रतीक म्हणावे. १८ ते २५ जून या सात दिवसांत उत्पादन शुल्क विभागाने ८२ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईतून १६९८ लिटर हातभट्टीची, २३१.६ लिटर अवैध देशी, २४.३४ लिटर विदेशी, ३०० मि.लि. मोहाफुले, ७० लिटर ताडी आणि मोहापासून दारू काढण्यासाठी लागणारे ९ हजार ५३६ लिटर रसायन जप्त करण्यात आले. रसायनाचा साठय़ावर नजर टाकली तर किती मोठय़ा प्रमाणात अवैध हातभट्टीचा व्यवहार पसरला असावा याची खात्री पटते.

गावठी दारू निर्मितीतही अव्वल
अनिकेत साठे, नाशिक
देशाची वाइन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्य़ात कागदोपत्री सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गावठी दारूचे अड्डे बंद आहेत. परंतु मालवणीच्या घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठिकठिकाणच्या कारवाईत तब्बल ७० हजार लिटर दारू आणि ३५ हजार लिटर रसायन जप्त झाले. यावरून पडद्यामागील वास्तव लक्षात येते. उपरोक्त घटना घडली नसती तर, सर्वाच्या सहकार्याने सुखनैवपणे चाललेल्या गावठी विक्रीच्या संसारात अकस्मात आणीबाणी उद्भवली नसती. गावठीच्या अड्डय़ांवर छापे मारण्याच्या भानगडीत पोलीस यंत्रणा फारशी पडत नाही. छुप्या अर्थार्जनाचा तो स्रोत असल्याने छापे मारण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभागाचे असल्याची साळसूद भूमिका घेतली जाते. अपवादात्मक स्थितीत कधी कारवाई करावीच लागल्यास बनावट दारू सापडल्याचे दाखवून गावठीच्या धंदेवाल्यांची पाठराखण करण्याची चलाखी केली जाते. कारण गावठी दारूची निर्मिती वा विक्री आपल्या ठाण्याच्या हद्दीत बंद असल्याने पोलीस यंत्रणा स्वत:ची सुटका करून घेते. एकंदरीत असे हे नाशिक जिल्ह्य़ातील चित्र आहे. १० व २० रुपयांच्या प्लास्टिक पिशवीत हाती पडणारी गावठी ‘फुग्यातील दारू’ म्हणून ओळखली जाते या फुग्यांमध्ये नक्की कसले मिश्रण असेल हे मात्र कोणी सांगू शकणार नाही. गावठी दारू पिऊन मोठी दुर्घटना नाशिकमध्ये घडलेली नाही. या दारूमुळे अनेकांचे बळी नक्कीच गेले, मात्र त्यांची तशी नोंद पोलीस दप्तरी नाही. वाइन निर्मितीत देशात अव्वल स्थान पटकावणाऱ्या नाशिकमध्ये स्वस्तातील गावठी दारूही निर्मितीत मागे नाही एवढे मात्र नक्की.

..तरीही हाक ना बोंब
एजाज हुसेन मुजावर, सोलापूर
यंत्रमाग व विडी उद्योगामुळे कामगारांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरात शासनाचे महसुलाच्या माध्यमातून गल्लाभरू धोरण कायम राहिल्यामुळे त्यातून विषारी ताडीची विक्री होते. सोलापुरात ताडीला शिंदी म्हणतात. राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत दर वर्षी शिंदी दुकानांचा लिलाव होतो. मागील वर्षांत सर्व १५ शिंदी दुकानांच्या लिलावाद्वारे पाच कोटींचा महसूल मिळाला होता. शुद्ध शिंदी जवळपास दुर्लभ असल्यामुळे बनावट शिंदी तयार केली जाते. ही विषारी शिंदी प्राशन करून महिन्यात किमान दोन- तीन व्यक्ती मरण पावल्याच्या नोंदी होतात. शिंदी पिऊन मरण पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलाच तर  न्यायवैद्यक अहवाल लवकर येत नाही. बनावट शिंदी दुकानांच्या रूपाने मृत्यूचे कारखाने खुलेआम चालू आहेत. त्याची हाकही नाही आणि बोंबही नाही.

हातभट्टीचा कुटिरोद्योग
सतीश कामत, रत्नागिरी
राज्याच्या अन्य भागांप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्य़ातही हातभट्टीच्या दारूचा ‘कुटिरोद्योग’ पूर्वीपासून बिनदिक्कतपणे चालत आला आहे. जिल्ह्य़ातली लाडघर (दापोली), तिसंगी (खेड), वालोपे, सावर्डे (चिपळूण), मिरजोळे (रत्नागिरी), डोंगरगाव (राजापूर) इत्यादी गावं ‘दारूग्रस्त’ म्हणून ओळखली जातात. या शिवाय प्रत्येक तालुक्यात स्थानिक पातळीवरचे अड्डे किंवा अड्डय़ांवरून आणलेली दारू विकण्याची ‘केंद्रे’ आहेत. नदी किंवा खाडीच्या किनारी संध्याकाळी-रात्री अशा प्रकारच्या हातभट्टय़ा अक्षरश: रांगेने भडकलेल्या बघायला मिळतात. या डोंगराळ जिल्ह्य़ाच्या अंतर्भागातली दाट जंगलं या व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय सोयीची. खेड तालुक्यातलं तिसंगीचं जंगल म्हणजे तर गावठी दारू अड्डय़ांचं माहेरघर. अशा जंगलांमध्ये पोलीस किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांना धाडी घालण्यासाठी पोचणं अतिशय जिकिरीचं. खेडजवळच्या बोरघरच्या जंगलातही हा व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर चालतो. इथून मुंबई-गोवा महामार्ग अगदी जवळ असल्यामुळे वाहतुकीचीही चांगली सोय होते.
या व्यवसायाचं कोकणातलं अर्थशास्त्रही गमतशीर आहे. एका ड्रमची भट्टी लावण्यासाठी सुमारे २ हजार ६०० रुपये खर्च येतो. त्यातून सुमारे ८० बाटल्या तयार होतात आणि प्रत्येकी ८० रुपये, या दराने विकल्या जातात. त्यामुळे एका ड्रममागे हातभट्टीवाल्याला साधारणपणे ६ हजार ४०० रुपये मिळतात. कच्चा माल आणि इतर सर्व खर्च वजा करता सुमारे ३ हजार ८०० रुपये नफा होतो. पण त्यापैकी सुमारे २ हजार ८०० रुपये ‘रॉयल्टी’ पोटी जातात. त्यामुळे भट्टीवाल्याच्या हातात जेमतेम १ हजार रुपये पडतात. म्हणजे व्यावसायिकापेक्षा त्याला अभय देणाऱ्यांचा लाभ जास्त!

थातूरमातूर कारवाई
सुहास सरदेशमुख, औरंगाबाद
तसे मराठवाडय़ात दारू गाळणारी एक जमात वर्षांनुवष्रे याच व्यवसायात वाढलेली. औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्य़ात पारधी समाजाला या आरोपावरून पकडणे तसे नित्याचे वाटावे असे चित्र. विशेष म्हणजे या धंद्यात महिलांची संख्या एवढी की आरोपातून सुटका होताना तिचे शोषण नक्की ठरलेले. पोलिसांशी रोज कोण पंगा घेणार, त्यामुळे कधी चोरून लपून तर कधी हातमिळवणी करून दारूधंदा तेजीत असतो. टँकरच्या पाण्यावर व्यवसाय कोटय़वधीची उड्डाणे दरवर्षी मारतो. ते सर्वाना चालते, तो धंदा वाढवायचा असेल, त्यातून उत्पन्न अधिक असेल, तेव्हाच अवैध दारूधंद्यांवर कारवाई करा, असा संदेश येतो. काही कारवाया होतात. पण पारधी वा अन्य समाजातील अटक आरोपीला शिक्षा झाल्याचे एकही प्रकरण ऐकीवातही नाही.
पारधी समाजातील अनिलने उपस्थित केलेला प्रश्न महत्त्वाचा आहे, केवळ भट्टीवर छापे टाकून काय होणार? दारू गाळण्यासाठी आवश्यक असणारा सडका गूळ घेऊन जाणारे कोण, टायर टय़ूब शेतात चोरून नेणारे कोण, दारू गाळण्यासाठी लागणारे नवसागर विकणारे व्यापारी याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिसांकडे असतेच. या राजरोस धंद्याला रोखता येणारी व्यवस्थाच एवढी सडकी आहे की तेथे थातूर मातूर कारवाईपलीकडे काही होणारच नाही.

रासायनिक दारूचा राक्षस हातभट्टीपेक्षा मोठा!
महेंद्र कुलकर्णी, अहमदनगर
जिल्ह्य़ात हातभट्टीच्या दारूपेक्षाही आता रासायनिक ताडी आणि बनावट देशी दारूचे मोठे आव्हान आहे. हातभट्टीच्या दारूतही रासायनिक  द्रव्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.
ताडीही आता नैसर्गिक राहिलेली नाही. देशीतही बनावट दारूचेच प्रमाण प्रचंड असून याच दारूतून पुढेही मालवणीसारखी घटना घडू शकते. यातील मुख्य अडचण आहे ती कायद्यातील तरतुदींची. मुळात या कायद्यातच अनेक त्रुटी असून त्याचाच आधार घेऊन हा उद्योग गावोगाव पसरतो आहे. ग्रामीण भागातही नवी पिढी आता हातभट्टीच्या दारूला फारसा हात लावत नाही. ही दारू गाळण्याच्या प्रक्रियेतील कष्ट, वेळखाऊपणा, देशी आणि बनावट देशी दारूची किंमत आणि हातभट्टीची दारू यातही आता मोठा फरक राहिलेला नाही. अशा विविध कारणांनी हातभट्टीच्या दारूचे प्रमाण कमी झाले. मात्र त्यापेक्षा अधिक खात्रीशीर विष रासायनिक ताडी, बनावट देशी दारूतून पोटात उतरते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2015 12:19 pm

Web Title: illegal hooch trade in maharashtra
Next Stories
1 ‘अॅक्ट ईस्ट’चा मार्ग ईशान्येचा!
2 दारूबळी रोखणार कसे?
3 सेना सनावळी
Just Now!
X