अशोक नायगावकर

‘च्यांदोबा च्यांदोबा बाग्लास का लिंबोणीच्या जाडामागे लप्प्लास का..’

job opportunity in indian coast guard
नोकरीची संधी : इंडियन कोस्ट गार्डमधील संधी
Inspiring story of Mumbai's varun sawant who is autistic chef and ultra marathoner
गोष्ट असामान्यांची Video: ऑटिस्टक शेफ आणि अल्ट्रा मॅरेथॅानर वरुण सावंतचा प्रेरणादायी प्रवास
Performance of Pankaj Mohit from Wadala slum in Pro Kabaddi League mumbai
प्रो कबड्डी लीग मध्ये वडाळ्याच्या झोपडपट्टीतील पंकज मोहितेची कामगिरी; पुणेरी पलटणचा आधारस्तंभ
Gutkha smuggler Israr Mansoori in police custody nashik
गुटखा तस्कर इसरार मन्सुरी यास पोलीस कोठडी

प्रेस्टनच्या गणेशोत्सवात ती पाच-सहा वयाची चिमुरडी काय छान नाच करत होती. तिच्या नाचण्यात दंग होता होता खरे तर तिच्या ‘च्यांदोबा’ शब्दावरच सगळ्यांनी ताल धरला. कम्युनिटी हॉलमध्ये शंभरेक माणसे जमलेली. मधल्या एका रविवारी सकाळी गणेशमूर्तीची स्थापना. छान आरत्या वगैरे. नंतर भोजनोत्तर सांस्कृतिक कार्यक्रम. त्यात नाचगाणी, लावण्या, ढोलकी, वगैरे. सर्वाची वेशभूषा दृष्ट लागावी अशी. लावणीला तर शिट्टीदेखील आली. सगळीच धावपळ. साडेपाचला हॉल खाली करायचा होता.

मी मनात म्हटलं, बिचारे खूपच मागासलेले आहेत, म्हणून विविध मराठी कार्यक्रम करतायत. आपल्याकडे आता बहुतेकांनी सांस्कृतिक कार्यक्रमांना बादच केलंय. एक काळ गणेशोत्सव म्हणजे कलावंतांच्या वर्षभराच्या बिदागीचा शुभारंभ! मागे एकदा मुंबईत आपल्या इथे एका थोर गायिकेचं गाणं होतं. समोर फक्त १५ श्रोते (?)! असो.

विदेशात कुठेही जा.. कार्यक्रमाला निम्मी मंडळी म्हणजे त्याचे किंवा तिचे आई-वडील, मित्रमंडळी वगैरे. सुरुवातीला अप्रूप असतं! तुमचं कुणीतरी विदेशात आहे यामुळे कॉलर टाइट असतेच. मित्राचा मित्रसुद्धा असला तरी चारचौघांत त्याचा आदराने उल्लेख होतो! त्यातसुद्धा पुन्हा ग्रेड असतेच. म्हणजे मुंबईत कसं तुम्ही ‘वेस्टर्न’ म्हटल्यावर मान अशी वर जाते, की ऐकणाऱ्याला हे असं अमिताभचं घर आणि दोन बिल्डिंगा सोडून हा राहतो असं वाटतं. ‘सेंट्रल’ म्हटल्यावर कशीबशी मान हलवत तो बिचारा ‘विक्रोळी-कांजूरमार्ग’ असं पुटपुटतो आणि गेलाबाजार कुठंतरी राहतोय अशी आपण समजूत करून घेतो. मात्र, आपण ‘गोवंडी-मानखुर्द’ म्हटलं की मात्र तो समोरचा एकदम ‘हाऽऽऽर्बर?’ असं तुच्छतेनं म्हणत हात झटकतो आणि आपण कचरपट्टीतच राहतो की काय असं वाटतं! तसं दुबई- अबुधाबी वगैरे ठीक आहे. किंवा सिंगापूर, बँकॉक म्हटलं तरी हल्ली घरटी कुणी ना कुणी तरी असतोच तिथं. किंवा ‘आम्ही गेल्याच महिन्यात केसरीबरोबर जाऊन आलो,’ म्हणत त्याची हवा काढून घेतो. मात्र, यूके, फ्रान्स, जर्मनी म्हटल्यावर जरा दाद मिळायला सुरुवात होते. तरी पण समोरचा ‘साधारण मुंबईहून नांदेडएवढाच वेळ लागतो,’ म्हणत आपला एकदम थ्री-टायरच करतो.

खरी कॉलर टाइट म्हणजे यूएस! अठरा-वीस तास न थांबता- म्हणजे मधे श्वास घ्यायला पण विमान थांबत नाही. त्यात पुन्हा कमी लेखायचे असेल तर दुबई, कतार, लंडन वगैरे हॉल्ट घेत जाणारे आणि डायरेक्ट जाणारे या जाती असतातच. या सर्वात कुणी हळू आवाजात प्रीमियम किंवा बिझनेस क्लासने जाणारा निघाला तर सगळ्यांचीच मान खाली! वर उल्लेख केलेल्या देशांपेक्षा वेगळे असे देश जर कुणी सांगितले- आफ्रिका खंडातले किंवा साऊथ अमेरिका, रशियाच्या आसपासचे- तर मात्र एखादा बरीच वर्षे लग्न रखडलेला शेवटी एकदाचा जेव्हा लग्न करतो, तेव्हा अशा माणसाकडे जसे सगळे बघतात तसंच वाटत राहतं. काहीही असलं तरी जो सहारवरून आकाशात उडाला तो सिलोनला जावो की नायजेरियाला; त्याने देश सोडला- हे त्याच्या पासपोर्टवर इमिग्रेशनचा स्टॅम्प पडला की नक्की झाले.

ऐंशी-नव्वदच्या दशकांत आखाती देशांत जाणाऱ्यांचा अक्षरश: लोंढाच असायचा. त्या काळात बँकेत कामाला असताना रोज आठ-दहा तरी एनआरआय खाती उघडली जायची. त्यातले उच्च तंत्रज्ञान शिकलेले थोडेच असायचे. गावखात्यातले गवंडी, सुतार, ड्रायव्हर अशा मंडळींना त्यावेळी अक्षरश: पर्वणी होती. कविवर्य नारायण सुव्र्यानी अनुवादित केलेली ‘काय ते पत्रात लिवा’ ही कविता/ गाणं ते दहा हजार श्रोत्यांसमोर गाऊन म्हणायचे. कारण त्यात त्या कर्त्यां पुरुषाला सोडून इथं संसार रेटणाऱ्या स्त्रीची, कामगारवर्गाची एक प्रातिनिधिक वेदनाच त्यातून व्यक्त व्हायची. कुणाकुणाला काय काय पैसे दिले याचा एक ताळेबंद त्या गाण्यात होता. सुव्र्यानी अक्षरश: अनेक संमेलने या गाण्याने डोक्यावर घेतली. कारण त्यात स्त्रीची ससेहोलपट चित्रित झाली होती. नव्वदच्या दशकानंतर कष्टकऱ्यांची आखाती देशांत जाण्याची लाट मंदावली. आज आखाती देशांत जी मंडळी आहेत ती उच्चशिक्षित. अतिशय कार्यक्षमतेने मराठी मंडळे जिवंत ठेवणारी ही सर्व माणसे आमचा कार्यक्रम बघायला या म्हणाली. तुम्हाला सांगतो- अक्षरश: आपल्या कार्यक्रमांपेक्षाही ही स्थानिक मंडळी जे कार्यक्रम सादर करतात त्याने थक्क व्हायला होतं.

मुलांची दहावी होईपर्यंत ही माणसं फॅमिलीसह राहतात. मात्र, पुढे त्यांना एकटय़ानेच राहावं लागतं. प्लान्टवरच्या शिफ्ट असतात. दिवसा-रात्री अशा पाळ्या बदलत असतात. कामावरचा गणवेश चढवून बस येण्याची ही मंडळी अवाढव्य फ्लॅटमध्ये एकटय़ाने वाट बघत असतात तेव्हा आपला जीव कालवतो. एकीकडे प्रचंड आर्थिक संपन्नता असते आणि आत कुठेतरी बायका-मुले शिक्षणापायी दूरवर मायदेशात राहतात याचा ताणही असतो. त्यांच्या व्हिडीओ कॉलच्या रोजच्या वेळाही ठरलेल्या असतात. तेव्हा घरातील किचनमधल्या पदार्थाचे दर्शन होते. डोळे सुखावतात. पण दूरवर त्यांचा वास मात्र पोहोचू शकत नाही!

सांस्कृतिक कार्यक्रम ओसरले की आभाळात उंच उडणारी वाळू दिसायला लागते आणि सुन्न करून टाकणारा उन्हाचा दाह आठवतो. हीच माणसे दरमहा आपल्याला परकीय गंगाजळी आणून देतात! आखाती देशांत तुम्ही हॉटेल उघडू शकता (आशा भोसलेंची अशी हॉटेल्स आहेतच.); पण तुम्ही कधीही तिथले नागरिक बनू शकत नाही.

आखाती देश काय, इस्रायल काय अथवा सिंगापूर, बँकॉकपासून अमेरिका काय, हे सगळे देश कवितेमुळे फिरायला मिळाले, हे खरंच आहे. एक छोटीशी चोपडी तुम्हाला जग फिरवून आणते, हा खरे तर चमत्कारच वाटतो.

पण खरा परदेशप्रवास सुरू झाला तो म्हणजे मोठी मुलगी लग्न होऊन कायमची लंडनला गेली तेव्हा आणि धाकटी मुलगी ऑक्स्फर्डमध्ये शिकून तिकडेच स्थिरावली तेव्हा! २००४ पासून एक पाय भारतात आणि एक पाय लंडनमध्ये असं चक्र सुरू झालं. गेली पंधराएक र्वष तरी मान्सून वेशीवर आला की लंडनचे वेध सुरू होतात. कुळथाच्या पिठीपासून ते गव्हाच्या कुरडयांपर्यंत खास मराठी असं काय नेऊ नि काय नको असं होऊन जातं. नातवंडांसाठी अगदी परकर-पोलक्यापासून ते नेहरूशर्ट-पायजमा असं सगळं बॅगांमध्ये ठासून भरलं जातं.

पण असं निघणंही तसं सोपं नसतं. चार-पाच महिन्यांसाठी घर बंद ठेवून जायचं म्हणजे अवघडच. किती कठीण परदेशात पोहोचणं! अथवा ‘घराकडच्या आठवणी.. दाराची कडी लावल्याच्या- न लावल्याच्या’ या विंदांच्या ओळी सतत ओठावर येतात. आपण साधं बडोदा, इंदौर, ग्वाल्हेरला गेलं तरी महाराष्ट्रापासून तुटलोय असं जाणवत राहतं. मातृभाषा सारखी कानी पडत राहणं यासाठी आपलं भाग्य असावं लागतं. ते कमी कमी होत गेलं की जिभेचा सरावच संपतो. सरस्वती मंदावते. ‘तुम्ही मूर्ख आहात’ किंवा ‘गाढव आहात’ हे ऐकण्यासाठी आपण उतावीळ असतो. हगल्या-पादल्याला ‘थँक्यू’ ऐकायची आपल्या रांगडय़ा भाषेला सवय नाही. (अर्थात ज्ञानदेव अपवाद!)

‘साधना’चा अंक, ललित, नवभारत अशी एकामागे एक येणारी नित्याची नियतकालिके, पत्रव्यवहार यांचे गठ्ठे साचत राहतात. परतेपर्यंत नेमका हवा असलेला दिवाळी अंक आयडियल वा मॅजेस्टिकमध्ये संपलेला असतो. किती किती कार्यक्रमांची आमंत्रणं शिळी होऊन गेलेली असतात. सांस्कृतिकतेपासून आपण पार तुटलो आहोत असे होते खरे. पण गेली अनेक वर्षे इथे घरात छान मराठी पुस्तके अगदी गाथा ज्ञानेश्वरीपासून जीए, प्रकाश नारायण संत असे सगळे कपाटात आहेत. त्यामुळे त्यांचं पारायण होऊन परसदारी मोठी जागा असल्याने बागकामात वेळ जातो. अ‍ॅपलचं झाड आहे. त्याचा नुसता सडा पडतो. त्यामुळे रोज न्यूटनची आठवण येते. (मला नेहमी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला म्हणून न्यूटनचे आभार मानावेसे वाटतात. नाहीतर ही फळं काही आपल्या हाती लागली नसती.) नात जिजाला ‘आबाचा पापड मोडला’ म्हणजे नक्की काय, ते समजतं आणि धाकटा अद्वैत ‘आबा, गुडघ्याची काळजी घे. तिथं मेंदू असतो,’ असे म्हणाला तेव्हा मी धन्यच झालो. त्यांचे संध्याकाळी देवासमोर डोळे मिटून ‘चांगली बुद्धी दे, वाईट बुद्धी देऊ नकोस’ ऐकायला बरे वाटते. अर्थात हे फक्त अपवाद म्हणूनच. अन्यथा तिथे काय अन् इथे काय, पुढच्या पिढीला मराठी समजणं अवघडच!

इस्रायलमध्ये इतकी हजारो आडनावांची मराठी माणसं आहेत. उत्तम मराठी बोलतात. अगदी भरली वांगी, वालाचं बिरडंदेखील मी शाकाहारी म्हणून बनवलं होतं! त्यांच्या पुढच्या पिढीला मराठी समजतं, पण बोलता येत नाही. आपल्याकडेही हळूहळू तीच परिस्थिती येत चाललीय. त्यामुळे हळूहळू साहित्य संमेलनाच्या मंडपाचा खर्च मात्र कमी कमी होत जाणार!

अस्मितेच्या पोटी मात्र मराठी विदेशात टिकेलशी वाटते. तिगस्ता अमेरिकेत बीएमएमचं कन्व्हेन्शन बघितलं. आणि कॅनडापासून जगभरातून आलेली साडेतीन हजार मंडळी, त्यांचे तीन दिवसांचे भरगच्च कार्यक्रम बघून थक्क झालो. (अमेरिकेत सर्वच भव्य! साधी सुई मागितली तरी दाभण देतात.) गेली तीन-चार वर्षे लंडनच्या महाराष्ट्र मंडळाचा गणपती उत्सव बघतोय. दरवर्षी गर्दी वाढतानाच दिसतेय. नवी नवी तरुण मंडळी दिसायलीत. ढोलताशांच्या गजरात विसर्जनाची भव्य मिरवणूक बघून आश्चर्यच वाटत राहतं. कुठून कुठून लांबलांबहून कामावरून येऊन, मुलांना बरोबर घेऊन येणारी तरुण जोडपी बघायला मिळतात तेव्हा हायसंही वाटतं.

असं काही बघितलं की आशादायी चित्र निर्माण होतं खरं! पण हे धुकं विरळ झाल्यावर स्वच्छ दिसायला लागतं. ही सर्व डॉक्टर, आयटी इंजिनीअर अशी उच्चशिक्षित मंडळी आहेत. परवा डॉलीस हिलच्या महाराष्ट्र मंडळात १५ ऑगस्टला झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला. त्याला दीड-दोन तासांचा ड्राइव्ह करून जॅग्वार कंपनीतली कोव्हेंटरीहून पुण्याकडची तरुण मंडळी आली होती. त्यांना आपण घरापासून, देशापासून तुटल्याची चेहऱ्यावर एक खंतही होती आणि इतक्या हजारो मैलांवर ‘जनगणमन’ म्हणतोय याचा अभिमानही होता. अगदी ‘जयोऽस्तुते’पासून अनेक देशभक्तीपर गीते आणि अभ्यासपूर्ण, रसाळ, प्रवाही निवेदन यामुळे खरोखरच सार्थक वाटलं.

युकेमध्ये तरी मी गेली अनेक वर्षे गुजराती समाज बघतोय. पंजाबी समाज आणि तमिळ मंडळीही बघतोय. बांधकाम व्यवसायाशी निगडित सर्व कामांत ही मंडळी आघाडीवर आहेत. बहुतेक भारतीय किराणा, मिठाया वगैरे खरं तर इथल्या मराठी लोकांना त्यांच्यामुळेच मिळतं. ६०-७० च्या दशकांत आफ्रिकेतून आलेली ही गुजराती मंडळी आहेत. खरं तर घर साफ करणं, ठेपले-चपात्या बनवणं ही कामं गुजराती महिला सर्रास घरोघरी करताना दिसतात. तासाचे आठ-दहा पौंड मेहनतानाची अशी कामं करत लाख-दीड लाख रुपये ही मंडळी घरी पाठवतात. आज्जी-आजोबांकडे लहान मुलांना सोपवून येणारी अशी अनेक मंडळी मी बघितलीयत. अगदी लहान वयात असा मुबलक पैसा बघायला मिळाल्याने ही मुलं भारतात मोटारसायकली उडवतात, मौजमजा करतात. मात्र, विदेशातून आई-बाप कायमचे घरी परतल्यावर हा खुराक बंद पडतो. गेल्या १५ वर्षांत मला अशी कामं करणारी मराठी मंडळी मात्र दिसली नाहीत. अपवाद फक्त मोठय़ा स्टोअर्स (मॉल) अथवा रेस्टॉरंटमध्ये आठवडय़ाचे वीसेक तास काम करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांचा! (इथे मला नेहमी सातारला छत्रपती शिवाजी कॉलेजात असताना कर्मवीरांची ‘कमवा आणि शिका’ ही योजना आठवते. त्या गोष्टीला आता ४०-५० वर्षे होऊन गेलीत.) असो.

मागे एकदा अगदी तिशीतल्या एका महिलेची कथा ऐकली. अशी घरकामे करताना त्यांना कुठलाही संकोच वाटत नाही. ‘हूँ पटेल छू। मारा घरे बंगलो छे। फोर व्हीलर छे।’ म्हणणारी, काचा-खिडक्या साफ करणारी ती बाई जाताना पाचशे पौंडाचे अ‍ॅपलचे घडय़ाळ घेऊन गेली. मला वाटतं, हा इतर भारतीय आणि मराठी समाज यांच्यातला फरक आहे. अपवाद म्हणून तुरळक मराठी मंडळींच्या ‘श्रीकृष्ण वडापाव’ अथवा ‘साई वडा’ अशा पाटय़ा दिसतात. पण हा अपवाद. किंवा मग आपल्या समाजाला जाग येतेयसं वाटत राहतं. आपल्याकडे मुंबईतही मराठी पदार्थ खायचे झाले तर उपनगरातून बहुतेक वेळा दादरला यावं लागतं, तर मग लंडनबद्दल काय सांगावं?

इथं यूकेमध्ये घराची दुरुस्ती करायचीय, एक्स्टेंशन वगैरेची कामं करायचीत, तर अजूनही ती पंजाबी शिखांच्याच हाती आहेत. अगदी खिडक्या, दारे बनवण्यापासून ते सर्व इमारती सामान- यांत गुजराती, पंजाबी मंडळी आहेत. अलीकडे मात्र ईस्ट युरोपियन पोलंड-रुमानिया इथल्या लोकांनी हे मार्केट काबीज केलंय. नुकतंच कंपाऊंडचं लोखंडी गेट आणि माशांच्या पॉन्डवरची भक्कम जाळी बनवायची होती. त्याकरता एकाही इंग्लिश किंवा भारतीय माणसाने प्रतिसाद दिला नाही. मात्र, एका पोलिश माणसाने आठ-पंधरा दिवसांत हे काम सुंदर करून दिलं. एका हाताने वजनदार गेट आणि दुसऱ्या हाताने जाळी असा शंभर-सव्वाशे किलोचा ऐवज त्याने टेम्पोतून उतरवून चुरमुऱ्याचं पोतं आणावं तसा रस्त्यावरून उचलून आणला तेव्हा मी अवाक् च झालो.

व्हिसा प्रोसेसिंगची स्वत:ची कंपनी असलेला अगदी जवळचा एक मित्र सांगत होता. अथक परिश्रम करून अलीकडे काही मराठी मुलांना त्याने व्हिसा मिळवून दिले. त्यांची राहण्या-जेवणापासून सगळी व्यवस्था करून दिली. त्यांना त्याने जिथे नोकरी मिळवून दिली होती तिथे व्यवसायाच्या दृष्टीने त्यांना उज्ज्वल भविष्यकाळ होता. पण ही मंडळी तीन-चार महिन्यांत सगळा गाशा गुंडाळून, लंडनची मौजमजा करून रातोरात निघून गेली. त्यांच्यावर त्या कंपनीने खर्च केलेला प्रचंड पैसा पाण्यात गेला. मुलाबाळांना सोडून आलेल्यांना तिथे सारखी भारताचीच ओढ असते. थोडे दिवस का होईना, विदेशातला काम केल्याचा शिक्का बसला की तो पुढे उपयोगी पडतो. एक काळ यूएस काय, युके काय, येणं इतकंसं अवघड नव्हतं. त्यावेळी इथली दारे बऱ्याच प्रमाणात खुली होती. पण आता अपवादात्मक कौशल्याच्या नोकऱ्या सोडल्या तर रोजगाराच्या जागा स्थानिक माणसांनीच भरल्या पाहिजेत, हा नियम जगभर सगळीकडेच अस्तित्वात येतोय.

२००४ पासून मी इथे यूकेत येतोय. पण पूर्वी कधीही फारशी चौकशी इमिग्रेशन काऊंटरवर होत नसे. अलीकडे मात्र कशासाठी आलात, तुमच्या मुली काय करतात, तुम्ही किती दिवस राहणार, इतकेच नाही, तर परतीचे तिकीट दाखवा, अशा नाना प्रश्नांनी भंडावून सोडतात. तुमच्याकडे दहा वर्षांचा व्हिसा असला तरी बाहेर पडेपर्यंत एक धास्ती असतेच! आता तर काही दिवसांत ब्रेक्झिटमुळेदेखील काय काय बदल होतात, ते बघायचे.

मराठी कवितेचं, साहित्याचं छान वातावरण असलेल्या इथल्या एका मित्राकडे अलीकडेच गप्पागोष्टी झाल्या. तो इथे खूपच मोठय़ा पदावर आहे. सात-आठ वर्षे झालीयत. तो ‘पीआर’ म्हणजे ‘पर्मनन्ट रेसिडन्ट’ झालाय. मात्र, अजूनही ब्रिटिश पासपोर्ट घ्यायला मन धजावत नाही म्हणाला. एकदा तुमचा भारतीय पासपोर्ट परत केलात की तुमची मायभूमीशी नाळ तुटलीच! जिवावर येतं, असं कळवळून म्हणाला.

अर्थात तुमची देशभक्ती खूप मोठी असली तरी मुलं मोठी होत जातात तसतशी त्यांची जीवनपद्धती आमूलाग्र बदलते. पहिल्या जगात वाढलेली मुले आणि आपली जीवनपद्धती यांतला आमूलाग्र फरक त्यांना पदोपदी जाणवतो. मारूनमुटकून त्यांना आपल्या जगण्याच्या शैलीत कोंबणं हा अत्याचारच असतो. त्यात ही मुलं जर खासगी शाळेत शिकत असतील तर आणखीनच अंतर पडत जातं. अर्थात आता आपल्याकडेही अशी इंटरनॅशनल स्कूल्स आली आहेतच. मुलांचा सर्वागीण विकास, विविध खेळ, विविध वाद्ये, वाक् पटुत्व, (LAMDA) लॅमडा आणि अगदी लहान वयातलं त्यांचं अवांतर वाचन.. हे सर्व पाहून थक्क व्हायला होतं. आपल्याकडे दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के वगैरे मार्क पडलेलं कानावर येतं तेव्हा मती गुंग होते. कदाचित आपल्या इथल्या तज्ज्ञांना कळतं तेवढं आपल्याला कळत नसेल!

सगळ्या आया नुसत्या धावतायत. एकाला शाळेत सोडायला जायचंय, त्याला सोडून आलं की दुसऱ्याला बसमध्ये बसवून द्यायचंय. ड्रायव्हिंग करता करता रिव्हिजन चाललीय. पाढे ऐकू येतायत. पुन्हा दुपारपासून त्यांचा परतीचा प्रवास, मग टय़ूशन, मग स्विमिंग, तर कधी व्हायोलिनचा क्लास. आणि पुन्हा एका विशिष्ट इयत्तेत गेलं की ‘इलेव्हन प्लस’ नावाची स्पर्धा परीक्षा. सगळ्या मुलांना या चक्रातून जावंच लागतं. या घाण्याला एकदा घरातली बाई जुंपली की तिची सुटका नाही. त्यातल्या काही डॉक्टर असतात, फायनान्सवाल्या आणि काही काही उच्चशिक्षित, इंजिनीअर वगैरेही असतात! कुणी एमबीए करून चपात्या बनवतात, तर कुणी मार्केटिंगची डिग्री घेऊन डोसे करून घालतात नवरोजींना! या सर्वाचं खरं तर हसू येतं.

इथे स्टॅनमोरमध्ये लंडनच्या उपनगरात जरा खाली हायस्ट्रीटच्या कोपऱ्यावर लॉइड्स बँकेची शाखा आहे. तिथे बाहेर लावलेली नोटीस वाचली.. ‘ही शाखा एक-दोन महिन्यांत बंद होणार आहे.’ सगळे व्यवहार ऑनलाइन होतायत म्हटल्यावर बँकेत जायची गरजच उरणार नाही. अनेक बँकांच्या अनेक शाखा हळूहळू बंद होणार आहेत. तुमच्या हातातल्या मोबाइलवर सगळे आर्थिक व्यवहार व्हायला लागले तर ‘आपुलकीनं वागणारी माणसं’ अशी एखाद्या बँकेची जाहिरात वाचून हसूच येईल! घरून लॅपटॉपवर आणि हेडफोन कानाला लावून काम करणारे लोक सर्वत्र आढळतायत. (पूर्वी गावाकडे नोकरी नसणाऱ्यांची ओळख ‘घरचं बघतो’ अशी करून देत असत! आता अनेक लोक घरीच असतात. त्यामुळे शंका यायला लागते.) तंत्रज्ञान अशा थराला जाईल की, धुणंभांडी, साफसफाई करणारेसुद्धा उद्या घरून काम करू लागतील!

४०-५० वर्षे लंडनमध्ये राहिलेल्या मंडळींना आयुष्याच्या उत्तरार्धात पुण्याच्या आसपास जागा घेऊन निवांत राहावंसं वाटत राहतं. इथल्या केअर होम्सपेक्षाही आपल्याकडे स्वतंत्र राहणं त्यांना सुखाचं वाटतं. आपल्याकडे घरकाम करणाऱ्यांना योग्य पैसे दिलेत तर इथल्या मानाने माफक खर्चात आरामदायी आयुष्य जगता येतं. मनुष्यबळाची चंगळ असलेला देश म्हणजे भारत! पहाटेच्या दुधाच्या पिशवीपासून तुमच्या दारावर कुणी ना कुणी येत असतो. मुलांनी तुमच्या जवळ असावं, हे सुविचारामध्ये खूपच शोभून दिसतं; पण आपलं काही किराणा मालाचं दुकान नसतं- की मुलगा तिथे बसेल. नोएडाला असली काय आणि बंगळुरुला असली काय, मुले, सुना, नातवंडं इथून पुढे आपल्यापासून लांबच राहणार. ‘पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन’ हे वासुदेवशास्त्र्यांना शंभर वर्षे आधी कळलं होतं. आणि ‘विश्रांतिस्थळ केव्हा यायचे कळेना’ म्हणत रेंदाळकर निघून गेले तो माळ कोल्हापूरचा, आखातातला की कॅलिफोर्नियातला, हे ज्याचे त्याचे नशीब! इथं यूकेमध्ये गुजराती, मारवाडी, श्रीलंकन, तमिळ मंडळींनी सगळ्या देवांची देवळं उभारलीत. साईबाबा आहेत. इथे वेळात वेळ काढून नवग्रहांभोवती एक पौंड देऊन दिवा फिरवतात. दोन्ही कान धरून उठाबशा काढत डोकं ठेवणारे शरणागत दिसतात. लंगरमध्ये भरभरून प्रसाद मिळतो. शुक्रवारी दुपारी नमाजची वेळ झाली की झपाझप पावलांनी मशिदीकडे पावले वळताहेत. आणि डोक्यावर छोटा घेरा असलेली काळी टोपी घातलेले ज्यू निघालेत सिनेगॉगकडे. हे सर्व चक्र अव्याहतपणे चालू आहे.

टेस्को सेन्सबरी मॉरिसन अशा अवाढव्य मॉल्सचे अवाढव्य ट्रक माल घेऊन इकडून तिकडे धावतायत. कौन्सिलचे गणवेश घातलेले लोक कचऱ्याचा निळा डबा, हिरवा डबा, ब्राऊन डबा आणि छोटा काळा डबा मोठय़ा ट्रकमध्ये रिकामा करतायत. परमेश्वर सर्वत्र आहे; पण खड्डे सर्वत्र नाहीत. हवा सगळीकडे आहे; पण प्राणवायू मात्र काही ठिकाणीच आहे. थेम्सच्या काठावरून ‘लंडन आय’चे चक्र अविरत फिरतेय. संथपणे कुणी वर जातंय, तर कुणी खाली उतरतंय.

इंग्रज जिथे जिथे गेले, तिथली सर्व मंडळी आता इथे यूकेमध्ये गोळा झालीयत. सेंट्रल लंडनमध्ये मे फेअरमध्ये पायघोळ शुभ्र झगा घालून फेरारी, लिमोझिन, बेन्टली गाडय़ांमधून ती उतरतायत. लुई वितो, बर्बरी, मायकेल कोर्स अशा जागतिक ब्रँडच्या पिशव्या भरलेल्या आहेत उंची सामानाने. ऑक्स्फर्ड स्ट्रीट भरून गेलाय. या कोलाहलात इंग्लिश माणूसच दिसत नाहीए.

हे सर्व देखावे बघण्याचे वय निघून जात चाललेय! नुसते पायी चालणारे दिसतायत सर्वत्र! मंदी पायी चालणाऱ्यांमुळे आलीय की रस्त्यावर सगळे खरेदीसाठी पायी निघाल्याने आलीय, कळत नाहीए.

स्वप्नात अ‍ॅडमिनच्या नोकऱ्यांचे ढग सोसाटय़ाच्या वाऱ्याने निघून जातील क्षितिजापार! आणि असंख्य हात बांगलादेशातले, चीन, फिलिपिन्समधले जोडत असतील एकेक स्पेअर पार्ट्स.. ‘मेड इन’चे लेबल लावत. आणि आपण आयोजित करू बेरोजगारीवर परिसंवाद!

प्रभादेवी-वरळीच्या उंच उंच टॉवरमध्ये पथाऱ्या पडल्यात पायी दिंडी काढणाऱ्यांच्या. आणि-

‘तू माझी दाढी कर,

मी तुझी दाढी करतो’

म्हणत रोजगार निर्माण झालाय!