डॉ. गुरुनाथ थोन्टे

कृषी संशोधन करताना त्यामध्ये जमीन, पाणी, हवा, सूर्यप्रकाश या पर्यावरणीय घटकांना महत्त्व असणे आवश्यक आहे.  पीक उत्पादनात घट येऊ न देता, या नव्या तंत्रज्ञानात पर्यावरणीय अनुकूल असा विचार ठेवणे हे कृषी शिक्षण तज्ज्ञ व संशोधकांसमोरील मोठे आव्हान आहे.

loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
ajay kumar sood on country economic growth
स्वदेशी विज्ञान-तंत्रज्ञानाविना देशाचा विकास अशक्य!
anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
scholarship
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणातील संशोधनात्मक पद्धती

पहिल्या हरितक्रांतीमध्ये तत्कालीन कृषी शिक्षण व संशोधन यांचा मोठा वाटा असला तरी पूर्वजांनी जोपासलेले जमीन, पाणी, हवेचे पर्यावरणीय अनुकूलनामुळेच हरितक्रांती यशस्वी झाली, असे म्हणणे धाडसाचे ठरणार नाही. तत्कालीन कृषी शिक्षण व संशोधनात आजमितीस पर्यावरणास अनुकूल असा बदल झालेला नसल्यामुळे ते वरदान ठरण्याऐवजी शाप ठरलेले आहे. याचाच अर्थ असा, की पीक उत्पादनात घट न येऊ देता, या नव्या तंत्रज्ञानात पर्यावरणीय अनुकूल असा विचार ठेवणे हे कृषी शिक्षण तज्ज्ञ व संशोधकासमोरील मोठे आव्हान आहे.

दर्जेदार पीक उत्पादनासाठी सूर्यप्रकाश, जमीन, जमिनीतील जिवाणू, हवा आणि ओलावा या पाच पायाभूत घटकांचा प्रत्येकी २० टक्के वाटा असतो. आजपर्यंतच्या कृषी शिक्षण व संशोधनाचा केन्द्रिबदू हे पाच घटक असणे गरजेचे असताना फक्त जमीन व ओलावा या दोन घटकांवर आणि संकरीत वाण, रासायनिक खते व औषधे यांवरच अधिक लक्ष केंद्रित केले गेले, परिणामी विषारी अन्न उत्पादन तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात केले. म्हणजे जमिनीतील जिवाणू, सूर्यप्रकाश व जमिनीतील हवेचे व्यवस्थापनाद्वारे फुकट मिळणारे अधिकच्या उत्पादनांपासून सर्व शेतकरी वंचित राहिले. यामुळे याबाबतीतले संशोधन-कृषी शिक्षण-कृषी विस्तार ही साखळी आपण निर्माण करू शकलो नाही आणि आज आधुनिक कृषी तंत्रज्ञान या गोंडस नावाखाली विषारी अन्नाचे उत्पादन केले आणि ते खाऊन स्वत:ची प्रतिकारशक्ती कमी करून घेतली. एवढेच नाहीतर दुसऱ्या हरितक्रांतीसाठी जमीन, पाणी, हवेची पर्यावरणीय अनुकूलता गमावून बसलो. फक्त ‘जीएम’ तंत्रज्ञानाचा वापर करून दुसरी हरितक्रांती कधीही होणार नाही, त्यासाठी आपणास प्रथम या पायाभूत घटकास पूर्वस्थितीत आणावे लागेल, त्यासाठी भविष्यातील कृषी शिक्षण व संशोधन या पायाभूत घटकावर लक्ष केंद्रित करावे लागेल म्हणजे वाढत्या लोकसंख्येस अवशेषमुक्त अन्नधान्य, फळे भाजीपाला उत्पादन आहार शास्त्रज्ञांच्या प्रती माणसी निकषाप्रमाणे करणे शक्य होईल.

आजपावेतो जमीन या घटकांतर्गत कृषी शिक्षण व संशोधनातून ज्या बाबींवर प्रकाश टाकणे गरजेचे होते त्यावर प्रकाश टाकला गेला नाही. त्यात जमीन ही ज्या खडकापासून बनलेली आहे ते सुध्दा वेगवेगळ्या मिनरलचे एकत्रित रुप आहे आणि हे मिनरलसुद्धा पिकासाठी लागणाऱ्या मूलद्रव्याचे मूळ स्रोत आहे. याचाच अर्थ जमीन ही सुध्दा पिकासाठी लागणाऱ्या अद्रव्यांचे मोठे भांडार आहे. फक्त त्या मूलद्रव्यांच्या उपलब्धतेसाठी अनुकूलता निर्माण करणारे मार्ग यावर संशोधन होणे अपेक्षित होते. मात्र पिकाने घेतलेल्या अन्नद्रव्याचे पुनर्भरण करण्यासाठी रासायनिक खते व सेंद्रिय खते वापरण्यावर कृषी शिक्षण व संशोधनात अधिक भर दिला गेला.

कालांतराने शेतमजूर जो शेती उत्पादनातील महत्त्वाचा दुवा आहे त्याच्या बाबतीत मतपेटी केंद्रीत धोरणे राजकीय पक्षाने अमलात आणली. परिणामी त्याची क्रयशक्ती कमी झाली आणि शेतकऱ्यांचा ऱ्हास टप्याटप्याने सुरू झाला. रासायनिक किंवा सेंद्रिय खते कोणतीही वनस्पती किंवा पीक मूळ स्वरुपात शोषण करू शकत नाही. त्यासाठी जमिनीतील जिवाणू कार्यक्षम असणे गरजेचे आहे आणि ज्या जमिनीत मोठय़ा प्रमाणावर सूक्ष्म जिवाणू कार्यक्षम असतात त्या ठिकाणी वनस्पतीच्या अन्नद्रव्याचा जमिनीतून पुरवठा करण्याची क्षमता आपोआप वाढते. याबाबतचे कृषी शिक्षण व संशोधनतून तसेच कृषी विस्ताराच्या माध्यमातून ही बाब शेतकऱ्यांच्या मनावर बिंबवली गेली नाही. एवढेच काय उच्च शिक्षित कृषी तज्ज्ञांचाही यावर विश्वास नाही हे खेदाने या ठिकाणी नमूद करावेसे वाटते. मजुराअभावी सेंद्रिय खत निर्मितीवर परिणामी वापरावर मर्यादा आल्या आणि शेतकऱ्यांचे रासायनिक खतावरील अवलंबित्व वाढत गेले. परिणाम व्हायचा तोच झाला. जमिनीतील सेंद्रिय कर्ब पातळी ४ टक्क्यापासून ०.२ ते ०.५ टक्यांपर्यंत खाली आली. मृद शास्त्रज्ञांच्या मतानुसार सेंद्रिय कर्ब पातळी कमीत कमी १ टक्का असणे गरजेचे आहे. रासायनिक खतातील अन्नद्रव्य उपलब्ध स्थितीत आणण्यासाठी सूक्ष्म जिवाणूस ३० पट अधिक ऊर्जा लागते व ती ऊर्जा पुरविणारे सेंद्रिय पदार्थ / खताचा पुरवठा जमिनीस शेतकरी करू शकला नाही. वास्तविक शेणखतास पर्यायावर कृषी शिक्षण व संशोधनात भर दिला गेला असता तर आजच्याएवढी जमिनीची भौतिक / रासायनिक व जैविक दुरवस्था झाली नसती. वास्तविक १९८० च्या दशकात म्हणजे हरितक्रांतीनंतर १०-१५ वर्षांनी भात, गहू या पीक पद्धतीत शून्य मशागतीत पेरणी करणारे ट्रॅक्टर चलीत सीड ड्रील यंत्र जे.बी. पंतनगर युनिव्हर्सिटीने विकसित केलेले होते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठात खरीप ज्वारी, गहू, मूग किंवा कापूस, भुईमूग या पीक फेरपालटीत शून्य मशागतीत पेरणी करणारे यंत्र त्या-त्या भागात संशोधीत करून पीक प्रात्यक्षिकाद्वारे त्याचा प्रचार व प्रसार केला असता तर पूर्वमशागतीवरील खर्चात खूप मोठी कपात झाली असती आणि पूर्वीच्या पिकाचे बुडखे जमिनीतच कुजविल्यामुळे शेणखतास पर्याय सापडला असता. मात्र दुर्दैवाने नांगरणी आणि पाळी उभी / आडवी घालणे, मोगडणे इत्यादी शिफारसी शास्त्रज्ञ वारंवार कृषी मेळाव्यात करत राहिले. एकीकडे शेणखताचे दुर्भिक्ष्य व दुसरीकडे मोठय़ा प्रमाणावर शेत जमीन उघडी करण्याचे व रासायनिक खते वापरण्याचे शास्त्रज्ञांच्या शिफारसीमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब पातळी ०.२ ते ०.५ टक्केपर्यंत धोक्याच्या पातळीपाशी आली. परिणामी आज रासायनिक खते व सूक्ष्म मूलद्रव्यांची एकत्रित कार्यक्षमता सरासरी १८-२० टक्केपर्यंत खाली आली. भविष्यात शेणखतास पर्याय म्हणून पिकाचे जमिनीतील बुडखे, तणाचे बुडखे जमिनीतच कुजविणे यावर कृषी शिक्षण व संशोधनात प्रथम प्राधान्य द्यावे लागेल तरच जमीन, जमिनीतील जिवाणू, जमिनीतील हवेचे व्यवस्थापन या पायाभूत घटकाचे सशक्तीकरण होईल आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च ४० टक्यांपर्यंत कमी होण्यास मदत होईल.

यापुढील फुकटात मिळणारा व पीक उत्पादनात २० टक्के वाटा असणारा तिसरा घटक म्हणजे सूर्यप्रकाश. सी-४ वनस्पती ज्यात गवतवर्गीय ज्वारी, गहू, मका, ऊस इत्यादी पिकांचा समावेश होतो, यात सूर्यप्रकाश वापरण्याची प्रचंड क्षमता असते. याच गुणधर्माच्या जीनचा, सी-४ तसेच सी-३ ज्यात आपल्याकडील गळीत धान्य व कडधान्याचा समावेश होतो, मध्ये मोडणाऱ्या पिकात संकराबाबत संशोधन झाले असते तर सी-४ व सी-३ मध्ये मोडणाऱ्या पिकाची सूर्यप्रकाशाचा वापर करण्याची क्षमता प्रचंड वाढली असती आणि उत्पादन खर्चात मोठी घट करता आली असती. कारण भारतात ३६५ दिवसांपैकी ३०० दिवस भरपूर सूर्यप्रकाश नैसर्गिकरीत्या उपलब्ध आहे.

तीव्र उष्णतेपासून संरक्षणासाठी निसर्गाने Chloroplast च्या संरक्षणासाठी Non Photo Chemical Quenching (NPQ) System दिलेली आहे. या System  चा वापर करून युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया येथील शास्त्रज्ञाने तंबाखूमध्ये २० टक्के उत्पादन वाढ NPQ System मधील जीन्सचा वापर करून शक्य असल्याचे निष्कर्ष प्रसिद्ध झाले आहे. या पध्दतीने गहू आणि भातामध्ये उत्पादन वाढ शक्य असल्याचे अंदाज व्यक्त केलेला आहे.

अशा प्रकारच्या प्रयोगावर भविष्यात कृषी संशोधन केंद्रित करावे लागेल व त्याचे निष्कर्ष कृषी शिक्षणातून व कृषी विस्तारातून प्रसारीत करावे लागतील आणि अशा प्रकारे उत्पादन खर्चात कपात करावी लागेल.

पीक उत्पादनात हवेचा वाटा हा २० टक्के आहे. हवेच्या व्यवस्थापनासाठी खुरपणी, कुळवणी, नांगरणी, मोगडणी इत्यादीवर आजपावेतो कृषी संशोधन व शिक्षणातून भर दिलेला आहे. वास्तविक आपला बराचसा भूभाग उष्ण कटिबंधीय व समशितोष्ण कटबंधीय प्रदेशात मोडत असल्यामुळे वरील मशागतीद्वारे जमीन उघडी पाडून जमिनीतील सेंद्रिय कर्ब उडून जातो. जो की, अन्नद्रव्य उपलब्धतेत वाढ, आम्ल विम्ल निर्देशांक नियंत्रित ठेवणे तसेच E.C. . नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त असतो. तसेच जमिनीतील सूक्ष्म जिवाणू, डोळ्याला दिसणारे गांडूळ व इतर प्राणी जे जमिनीतील हवेचे व्यवस्थापन करतात याचा नाश होतो. याऐवजी पिकाच्या दोन ओळीतील जागा सेंद्रिय पदार्थाने आच्छादित केली किंवा ऊस / केळीचा खोडवा पीक काढल्यानंतर कोणतीही पूर्वमशागत न करता आहे त्या ठिंबक सिंचन प्रणालीचा वापर करून किंवा खरिपात गरजेएवढा पाऊस झाल्यानंतर तूर, कापूस, एरंडी, फळभाज्या तसेच फळपिकाची लागवड शिफारशीत अंतरावर केल्यास पूर्वमशागतीवरील खर्चात मोठी बचत होऊन जमिनीतील हवेचे व्यवस्थापन आपोआप होते व त्याबरोबर सेंद्रिय कर्ब पातळीत वाढ होऊन कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता किफायतशीर व दर्जेदार उत्पादन  मिळते.

अशा प्रकारचे संशोधन व कृषी शिक्षण व नंतर त्याचा प्रसार करण्यासाठी कृषी विस्तार यंत्रणेचा वापर केला तरच असे संशोधन शेतकरी अभिमुख होईल अन्यथा कंपन्या उत्पादित निविष्ठावरील संशोधन व कृषी शिक्षण भविष्यात शेतकऱ्यास आणखी कंगाल करेल. एवढेच नाहीतर पुन्हा देशास अन्नधान्याच्या बाबतीत परावलंबी व्हावे लागेल. कारण सेंद्रिय कर्ब पातळी ० टक्यावर गेली तर गवताची काडी सुद्धा जमिनीत उगवणार नाही  आणि त्यावेळेस आपण लोकसंख्येत जगात नंबर एकवर असू व अन्नधान्य उत्पादनात शेवटच्या क्रमांकावर असू यात तीळमात्र शंका नाही.