डॉ. जयंत नारळीकर, ज्येष्ठ वैज्ञानिक

भा रताच्या संदर्भात जेव्हा मी तीन गोष्टींचा विचार करतो तेव्हा मला खूप अभिमान वाटतो; पण त्याबाबत अजून समाधान वाटत नाही. यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे आपल्या देशातील लोकशाही.  जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशाकडे पाहिले जाते. याचा मला खूप अभिमान वाटतो. लोकशाही म्हणजे सत्ता आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टी ज्यांच्याकडे आहे ते सत्ताधारी आणि त्यांना विरोध करणारे विरोधक हे दोन्ही समतुल्य असणे आवश्यक आहे. केवळ विरोध म्हणून विरोध न करता विविध विषयांवर मोकळी चर्चा करून विरोध झाला तर देशातील लोकशाही अधिक समृद्ध होईल.

मला अभिमान वाटणारा दुसरा घटक म्हणजे देशातील धार्मिक सहिष्णुता. देशात विविध धर्मीय लोक एकत्र नांदतात. हे खरोखरीच अभिमानास्पद आहे; पण या सहिष्णुतेला तडे जाता कामा नये.

तिसरा घटक म्हणजे देशाच्या विकासातील वैज्ञानिक सहभाग. पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू यांनी देशाच्या विकासासाठी विज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल हे लक्षात घेऊन विज्ञान क्षेत्रात भरीव योगदान देत या क्षेत्राचा पाया भक्कम केला आहे. देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी देशाने स्वयंसिद्ध होणे आवश्यक होते. ते ओळखून विज्ञानाची कास धरली गेली. यामुळेच देशाची वैज्ञानिक प्रगती अभिमानास्पद आहे. गुरुत्वाकषर्ण लहरींचा वेध घेण्यात यश आले. या लहरी कशा प्रकारे ओळखता येतील याबाबतची पद्धत भारतीय वैज्ञानिक डॉ. संजीव धुरंधर यांनी विकसित केली. अशा गोष्टींमुळे देशातील वैज्ञानिक दृष्टीचा, संशोधनाचा मला अभिमान वाटतो; पण ही प्रगती समाधानकारक म्हणता येणार नाही. आपण आणखी खूप काही करणे अपेक्षित आहे. यासाठी सरकारने विज्ञानाला निधी उपलब्ध करून दिला पाहिजे.