नगर जिल्ह्य़ाच्या राहुरी तालुक्यातील तांदूळनेरच्या खंडोबाच्या माळावर स्वातंत्र्यदिनी सांगता झालेल्या  हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने सामाजिकतेच्या सप्तरंगांचे जणू इंद्रधनुष्यच उमटले. शेकडो एकर पसरलेल्या या माळावर केवळ भक्तिरसाचा महापूर तर असतोच, पण परमार्थ साधण्यासाठी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या ऐहिकाचाही विचार यानिमित्ताने होतो.  या शिवाय श्रद्धा, भक्तीच्या या अनोख्या दर्शनसोहळ्याला अनेक लोकोपयोगी उपक्रमांचीही जोड लाभली होती. त्या विषयी..

अहमदनगर जिल्ह्य़ाच्या प्रवरानगरपासून हाकेच्या अंतरावर भगव्या पताकांनी सजलेल्या तांदूळनेरच्या माळावर फुललेले माणसांचे शेत भजनाच्या तालावर डोलत असते. नजर पोहोचेल तिथपर्यंत माणसांचा सागर पसरलेला असतो. एका भव्य मंडपात शेकडो भाविक अखंड हरिनाम जपात रंगून गेलेले असतात. टाळ-चिपळ्यांच्या तालावर पावलांचा ठेका धरून भजनाची धून गाताना, लहानथोरांचे भान हरपलेले असते.. आकाशात तुरळकपणे दिसणारे पावसाळी ढग एवढीच श्रावण महिन्याची जाणीव करून देणारी खूण.. लांबवरच्या एका भव्य शामियान्यात प्रवचन सुरू असते. एका बाजूच्या मदानावर महाप्रसादाच्या पंगती सुरू असतात. भगवा ध्वज खांद्यावर घेतलेला एक स्वयंसेवक एका संथ लयीत पुढे सरकू लागतो आणि त्याच्या डाव्या-उजव्या बाजूला माणसांच्या रांगा बसू लागतात. बघता बघता हजार-दोन हजार माणसांची पंगत लागते. मग उजवीकडच्या मोकळ्या जागेत ट्रॅक्टर, ट्रॉल्या दाखल होतात. प्रसादाने भरलेले प्लास्टिकचे क्रेट भराभरा उतरविले जातात. कोणता स्वयंसेवक कोणत्या रांगेसमोर जाणार हे अगोदरच ठरलेले असते. एक- एक स्वयंसेवक रांगेतील भाविकांच्या हाती प्लास्टिकच्या थाळ्या सोपवितो आणि पाठोपाठ प्रसाद वाढला जाऊ लागतो. हरिनामाचा एक उत्साही गजर पंगतीत घुमतो आणि भाविकतेने त्या दिवशीचा महाप्रसाद चाखताना भाविकाच्या श्रद्धेला भरते येते..

रविवार, १४ ऑगस्ट. वेळ, दुपारी सुमारे अडीच वाजताची. त्या दिवशी एकादशी असल्याने, महाप्रसादासाठी साबुदाण्याच्या खिचडीचा बेत असतो. माळावरच उभारण्यात आलेल्या भव्य भटारखान्यात शेकडो कर्मचारी राबत असतात. दहा-बारा ट्रॅक्टर रांगेत उभे असतात. प्रत्येक ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतच साबुदाणा भिजवून खिचडीसाठी सज्ज असतो. शेकडो चुली धगधगत असतात. मंडपाबाहेर रॉकेलचे टँकर उभे असतात. त्यातून प्रत्येक चुलीला पाइपद्वारे रॉकेल पुरविलेले असते. बाहेर एका कोपऱ्यात, शेतात वापरतात त्या मळणी यंत्रात दोनचार क्विंटल शेंगदाणे कुटण्याचे काम सुरू असते. दुसरीकडे एक काँक्रीटचा मिक्सर कामाची वाट पाहात ताटकळलेला असतो. भटारखान्याच्या एका बाजूला तयार पदार्थाचे ढीग दुसऱ्या दिवशीच्या महाप्रसादाकरिता सज्ज असतात. त्या दिवशी जवळपास अडीच लाख भाविक खिचडीचा महाप्रसाद घेऊन तृप्त होऊन जातात. दुपारच्या पंगती आटोपतात, तोवर संध्याकाळचे चार-साडेचार वाजलेले असतात..

इकडे भटारखान्यात रात्रीच्या महाप्रसादासाठी शेकडो चुलींवरील विशाल कढयांमध्ये भगर तयार होत असते. रात्री पुन्हा दोन-अडीच लाख भाविक प्रसाद सेवन करतील या अंदाजाने रात्रीच्या पंगतीच्या वेळेवर काही क्विंटल भगर तयार झालेली असते..

मग सुरू होते, दुसऱ्या दिवशीच्या महाप्रसादाची तयारी.. १५ ऑगस्टला सप्ताहाचा समारोप होणार असतो. या दिवशी महाराजांचे काल्याचे कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांचा महापूर लोटणार, हे ठरलेलेच असते, कारण गेल्या १६८ हरिनाम सप्ताहांत, दर वर्षी वाढत्या संख्येने भाविकांची हजेरी लागते, हा अनुभव गाठीशी असल्याने, अखेरच्या दिवशी सहा-सात लाख भाविक येणार, हे महाप्रसादाची व्यवस्था पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना माहीतच असते. अखेरच्या दिवशीसाठी बुंदी आणि चिवडय़ाचा महाप्रसाद तयार होत असतो. भटारखान्यातील काही खोल्यांमध्ये तयार बुंदीचे ढिगारे रचलेले असतात. शेकडो पोत्यांमध्येही बुंदी भरून वाटपासाठी तयार असते. सिमेंट काँक्रीटच्या मिक्समध्ये चिवडय़ाचे मिश्रण घोळविण्यास सुरुवात होते आणि बघता बघता शेकडो किलो चिवडादेखील तयार होऊन जातो..

राहुरी तालुक्यातील तांदूळनेर शिवारात १५ ऑगस्टपर्यंत चाललेल्या गंगागिरी महाराजांच्या १६९  व्या हरिनाम सप्ताहाच्या उत्साहाचे वारे नगर जिल्ह्य़ात सर्वत्र जाणवत होते. संगमनेरकडून प्रवरानगरकडे जाताना जागोजागी उभारलेल्या कमानी, भाविकांची लगबग, भगवे झेंडे लावून जाणारी लहानमोठी वाहने, कपाळावर भगवे टिळे लावून गळ्यातील टाळांचा तालबद्ध गजर करीत चालणाऱ्या भाविकांच्या रांगा आणि त्यांच्या मुखातून वाहणारी हरिनामाची अखंड ओघवती गंगा.. शहराकडून ग्रामीण भागाकडे जाताना जाणवणारा हा भक्तिरसाचा अनोखा उत्साह काही वेगळ्याच संस्कृतीची ओळख करून देत असतो. यंदा पाऊसपाणी बऱ्यापकी असल्याने प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर त्या समाधानाची छटा अगोदरच उमटलेली असते. आता शेतीची कामे आटोपल्यावर हरिनामाची, देवाच्या सेवेची लाभलेली अनोखी संधी साधण्याची उत्सुकता त्या लयदार वाहतुकीतून स्पष्टपणे उमटत असते.

स्वातंत्र्यदिनी सांगता झालेल्या या हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने सामाजिकतेच्या सप्तरंगांचे जणू इंद्रधनुष्यच तांदूळनेरच्या खंडोबाच्या माळावर उमटले. शेकडो एकर पसरलेल्या या माळावर केवळ भक्तिरसाचा महापूर तर असतोच, पण परमार्थ साधण्यासाठी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या ऐहिकाचाही विचार यानिमित्ताने होतो. नगर आणि औरंगाबादच्या सीमेवरील सराला बेट हे या वारकरी संप्रदायाचे एक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. गंगागिरी नावाच्या एका तपस्वी साधकाने या बेटावर आश्रम उभारला आणि भक्तिमार्गातून सन्मार्गी जीवनाचा मंत्र जनतेला दिला. हरिनाम सप्ताह ही या गंगागिरी महाराजांची परंपरा. खंडोबाच्या माळावरच्या या हरिनाम सप्ताहाआधी, असे १६८ सप्ताह साजरे झाले आणि सप्ताहात हजेरी लावून सेवेच्या संधीसाठी आसुसलेल्या हजारो भाविकांची दर वर्षी त्यात भरच पडत गेली. तांदूळनेरच्या माळावर सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी सुमारे आठ लाख भाविकांचा जनसागर लोटला होता आणि सप्ताहभरात दररोज किमान पाच लाख भाविकांनी हजेरी लावली होती. एवढय़ा मोठय़ा संख्येने जमा होणारा हा जनसागर ही व्यावसायिकतेचीदेखील एक संधी असते. त्या माळरानावर शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त औजारांची, बियाणांची आणि पिकांच्या नव्या वाणांची प्रात्यक्षिकांसह माहिती देणारी प्रदर्शनांची दालनेही भक्तिरसाने ओसंडणाऱ्या मंडपांइतकीच उत्साहाने फुलून गेलेली होती. या प्रदर्शनांमध्ये मळणी यंत्रे होती, शेतीच्या वेगवेगळ्या कामांसाठी उपयोगी ठरणारे लहानमोठे ट्रॅक्टर होते, ट्रॉल्या होत्या आणि वाहतुकीसाठी उपयुक्त ठरू शकतील अशी बहुपोयोगी वाहनेदेखील होती. नगर जिल्ह्य़ाच्या बहुतांश भागाला संपन्नतेचे वरदान आहे. नगदी पिकांमुळे बहुतांश शेतकरीवर्ग आíथकदृष्टय़ा बऱ्यापकी समाधानीही आहे. याचे प्रतििबब या प्रदर्शन मंडपातच पाहावयास मिळत होते. सप्ताहभरात किमान शेपाचशे कोटींची उलाढाल व्हावी या हिशेबाने नामवंत उत्पादकांनी आपली सारी दर्जेदार उत्पादने या भक्तिसागराच्या किनारी आणून ठेवली होती आणि प्रदर्शनाच्या प्रत्येक दालनातील विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर योग्य वेळ साधल्याचे समाधानही दिसत होते. २७ लाखांची देखणी मोटारसायकल हे या प्रदर्शनातील एक भव्य आकर्षण तर होतेच, पण शेतकऱ्याच्या घरातील तरुणाईच्या पिढीचा हल्रे डेव्हिडसन आणि रॉयल एन्फिल्डच्या दालनासमोर घुटमळणारा घोळका प्रदर्शनातील कोटय़वधींच्या उलाढालीचा आधार ठरत होता..

एकीकडे अखंड हरिनामात रंगलेल्या हजारो वारकऱ्यांच्या नामस्मरणाने आणि टाळ-मृदंगांच्या गजराने वातावरण भारलेले असताना, दुसरीकडे सुरू असलेल्या या प्रदर्शन सोहळ्यांत शेतकरी कुटुंबांना आíथक भविष्याच्या नव्या पहाटेची किरणेच जणू खुणावत होती. असे सोहळे असले, की राजकारणालाही ते खुणावू लागतात.. खंडोबाच्या माळाकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर स्थानिक राजकीय नेत्यांची भव्य छायाचित्रे असलेल्या स्वागतकमानी त्याची जाणीव करून देत होत्या. हा परिसर म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार राधाकृष्ण विखेपाटील यांची कर्मभूमी! इथल्या कानाकोपऱ्यावर विखे पाटील या राजकीय घराण्याची छाप कायमच पडलेली आहे. हा सोहळा ही तर त्यातील एक नवी पर्वणी. आपल्या कर्मभूमीत होणाऱ्या या सोहळ्यात तसूभरही उणीव राहू नये, यासाठी सारे प्रायोजकत्व स्वत:हून स्वीकारण्यातील राजकीय संधी न सोडण्याचा परिपक्वपणा कोणाही राजकीय नेत्याने नक्कीच दाखविला असता. विखे पाटील यांच्यासारख्या राजकारणात मुरलेल्या घराण्याने तो तसा दाखवावा यात काहीच आश्चर्य नाही. म्हणूनच, आमदार राधाकृष्ण विखेपाटील यांनी जातीने संपूर्ण सप्ताहभर खंडोबाच्या माळावर हजेरी लावलीच आणि त्यांचे सारे कुटुंबदेखील व्यवस्थेत सहभागी झाले. विखेपाटील यांच्या नव्या पिढीचे प्रतिनिधी असलेले राधाकृष्ण विखेपाटील यांचे पुत्र डॉ. सुजय यांनी तर कार्यकर्त्यांची पूर्ण फौज स्वयंसेवक म्हणून सप्ताहाच्या आयोजनात उतरविली आणि ते आयोजनात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी भटारखान्यापासून कीर्तनमंडपापर्यंत सर्वत्र जातीने लक्षदेखील पुरविले.. मग साहजिकच, स्थानिक लोकसभा मतदारसंघातील भावी खासदारकीच्या राजकीय गणितांची गावागावांत चर्चा सुरू झाली आणि भक्तिरसाच्या मंडपातच नव्या राजकीय नेतृत्वावर शिक्कामोर्तबही झाले..

भक्ती, व्यावसायिकता, राजकारण, समाजकारण या साऱ्यांचा एक सुरेख संगम साधणारे साधन त्या सप्ताहभरात या परिसराला लाभले. इथे केवळ भक्तिरसाची गंगा नव्हती, तर विज्ञानाची, आधुनिक तंत्रज्ञानाची कवाडेदेखील खुली झाली होती. राजकारणाला तर यानिमित्ताने पर्वणीच साधता आली आणि सारी भौतिक दु:खे विसरून नामस्मरणाच्या आनंदात डुंबण्याची असंख्याची आसदेखील इथे पूर्ण झाली. वयाच्या बारा-तेराव्या वर्षीपासून प्रत्येक हरिनाम सप्ताहाला न चुकता हजेरी लावणारे काही भाविक आज साठीच्या घरात पोहोचले आहेत. तरीही, प्रत्येक हरिनाम सप्ताहात हजर राहून सेवेची संधी साधण्याची त्यांची आध्यात्मिक ओढ अचंबित करणारी असते. अवघ्या परिसरात, गंगागिरी महाराज संस्थानाच्या वतीने ठेवलेल्या दानपेटय़ांमध्ये भाविक आपल्या कमाईचा काही हिस्सा दानपेटीत अर्पण करतात आणि त्या रकमेतून नवे विकासाचेही संकल्प सोडले जातात.

गेल्या सोमवारी, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सप्ताहाची सांगता झाली, तेव्हा या हरिनाम सप्ताहाने काही विश्वविक्रमांचीही नोद केली. संपूर्ण सप्ताहभर सहभागी होणाऱ्या भाविकांच्या प्रसादाची सोय करण्यासाठी पंचक्रोशीतील प्रत्येक घर झपाटून कामाला लागले होते. घराघरांतून महाप्रसादाच्या बाजरीच्या भाकरी गोळा करण्यात येत होत्या. तब्बल २८ लाख भाकरींचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. भाकरी आणि आमटी हे सप्ताहभरातील प्रसादचिन्ह होते. या काळात भाविकांनी भाकरीसोबत तब्बल तीन लाख २७ हजार लिटर आमटीचेही प्रसाद म्हणून सेवन केले. एक लाख वीस हजार भाविक भजनसप्ताहात सहभागी झाले आणि या विक्रमांसोबतच, १६९ व्या हरिनाम सप्ताहाची विश्वविक्रमी सोहळा म्हणूनही नोंद झाली. सप्ताहाच्या समारोप सोहळ्यात साऱ्या राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत, तसे प्रमाणपत्र गंगागिरी महाराजांची सप्ताह परंपरा पुढे सुरू ठेवणारे विद्यमान महाराज महंत रामगिरी महाराज यांना प्रदान करण्यात आले, तेव्हा समोर उपस्थित असलेल्या जवळपास आठ लाख भाविकांचा ऊर श्रद्धेने भरून आला होता.. हरिनामाच्या गजरातच या विक्रमाच्या नोंदींचाही भाविकांनी स्वीकार केला आणि खंडोबाच्या माळावरच्या भगव्या झेंडय़ांच्या साथीने फडकलेल्या तिरंग्याला सलामी दिली गेली..

श्रद्धा, भक्तीच्या या अनोख्या दर्शनसोहळ्याला अनेक लोकोपयोगी उपक्रमांचीही जोड लाभली होती, हे त्याचे वेगळेपण. समाजातील अनिष्ट प्रथा बंद व्हाव्यात, यासाठी काम करण्याचे संकल्प या सोहळ्यात अनेकांनी सोडलेच, पण व्यसनमुक्तीच्या दिशेनेही अनेकांचे पहिले पाऊल येथूनच पडले. व्यसनमुक्तीचा संकल्प सोडून परतलेल्या अनेकांच्या घरांत त्यांच्यासोबत त्या दिवशी समाधानाचे वारेदेखील खेळू लागले होते.. सप्ताहात रोगनिदान, आरोग्यचिकित्सा शिबिरेही भरविली गेली होती, अनेकांनी नेत्रदानाचा संकल्प सोडला आणि आपल्या हातून काही तरी पुण्यकर्म घडले, या जाणिवेने भारावलेले लाखो भक्त सप्ताहाचे समाधान सोबत घेऊन घरोघरी परतले. नगर-औरंगाबाद जिल्ह्य़ाच्या सीमेवरील सराला बेट आता वारकरी संप्रदायाचे शक्तिपीठ म्हणून उदयाला आले आहे, असे समारोप सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा संदेशात म्हटले होते. आध्यात्मिक भावनेने एकत्र येणाऱ्या समाजाच्या हातून सत्कृत्ये घडतात, याची साक्ष देणारा एक सोहळा एका माळरानाच्या साक्षीने संपन्न होऊन गेला..

 

दिनेश गुणे

dinesh.gune@expressindia.com