|| वि. वि. करमरकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एशियाडचे विदारक वास्तव: भारताची स्पर्धा चीनशी की चिनी तैपेईशी

भारत सुरुवातीला पाचवा तरी असायचा. सुरुवातीस भारताला दोनदा पाकने मागे सारलं. एकदा इस्रायलनं, मग इराण सर्रास अन् थायलंड बऱ्याचदा भारतापुढे गेलं. कझाकस्तान व उझबेकिस्तान यांनी १९९४ च्या पदार्पणापासून गेल्या सात एशियाडमध्ये सहा-सहादा भारतावर मोठी आघाडी घेतली. चीन, जपान, कोरिया यांच्या आसपासही भारत पोचू शकत नाही. कारण? कारण त्यांना मागे ठेवण्याचं स्वप्नच भारत बघत नाही! भारत कशाचाच ध्यास घेत नाही.

तेच ते आकडे पुन:पुन्हा डोळ्यापुढे येत राहिले अन् मला समजेनासे झाले. कॅलेंडरची पानं तर फटाफट पुढे जात होती. महिनेच काय, वर्षेही भराभर सरत होती. खरं तीन दशकं आली अन् गेली; पण काय अजब प्रकार! तेच ते आकडे डोळ्यांपुढे येत होते. त्यात बदल असलेच तर होते अगदी किरकोळ.

मला दाट शंका आली. म्हटलं, नजर तपासून बघावी. तातडीने नेत्रवैद्यांकडे धाव घेतली. नेत्रवैद्य बदलून पाहिले, चश्मे बदलून बघितले, मग शंका आली टीव्हीच पक्षपाती झाला असावा. चीन, जपान, कोरिया, इराण यांच्यापेक्षा चिनी तैपेईचा टीव्ही आणण्याचं ठरवलं. चाणाक्ष लोकांनी सल्ला दिला- पाकिस्तानी, श्रीलंकन, बांगलादेशी मॉडेल घेऊ नका. तिथेही लोकांना अस्सेच अनुभव येत आहेत. कुणी सुचवलं, मायबोली मराठीचा अभिमान सोडा, इंग्रजी वर्तमानपत्रं वाचायला लागा; पण पुन्हा तेच ते आकडे! टाळ्या वाजवणारे लोक तरीही टाळ्या वाजवतच होते. ‘माझा भारत महान’ असे नारे देतच होते. तिरंगी झेंडे फडकवतच होते. मग मी चॅनेल बदलून क्रिकेटकडे वळलो. पाहतो तो विराट कोहलीचा संघ मार खात होता; पण मध्येच दुर्मीळ चौकाराचं स्वागत तिरंगी झेंडे फडकवीत होत होतंच.

पुन्हा चॅनेल बदलले. जकार्ता-एशियाडचं चित्रण दिसू लागलं. भारतानं आठव्या पायरीवर पथारी पसरली होती. ती जागा स्वत:साठी आरक्षित, रिझव्‍‌र्ह करून ठेवली होती. चार वर्षांपूर्वीच्या एशियाडमध्येही तीच होती भारताची पायरी. तेव्हा एकंदर १४५४ पैकी ५७ पदकं अन् यंदा १५५२ पैकी ६९ अशी सव्वाचार टक्के अन् तेव्हा ४३९ पैकी ११ सुवर्ण पदकं व यंदा ४६५ पैकी १५ अशी साडेतीन टक्के. आशियातील सुमारे तीस टक्के माणसांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भारताची कमाई तीन-चार टक्के. ती तीन-चार टक्केच म्हणजेच तेच ते नि तेच ते!

मी अधिक मागे मागे गेलो. चीनने प्रथमच एशियाड भरवलं १९९० मध्ये. तिथं रंगल्या विविध खेळांच्या ३१० स्पर्धा-शर्यती. तिथं भारताच्या हाती लागलं एकमेव सुवर्ण पदक. (अर्थात कबड्डीचं) नाही म्हणायला आठ रौप्य व चौदा ब्राँझमुळे अकराव्या पायरीखाली घसरलो नाही, हेच थोर नशीब! या कमाईची टक्केवारी तीन शतांश ते पाव टक्का! पण त्यातही थोर देशभक्तांनी समाधान शोधलं. प्रचार करू लागले, आपण यापेक्षा खाली घसरूच शकणार नाही! केवढी दिव्यदृष्टी!

तिथून सुरुवात झाली प्रगतीची : १९९४ हिरोशिमा एशियाडमध्ये क्रमांक ११ वरून ८. त्यानंतर चार वर्षांनी ९. मग २००२ च्या बुसान-एशियाडमध्ये कमालच – चक्क सातवं स्थान. २००६ ला आठवं, तर २०१० ला सहावं. मग दोनदा आठवं. अगदी तेच तेच नि तेच ते. जणू आठ या आसपासचा क्रमांकाच्या पायरीचं पारंपरिक रिझव्‍‌र्हेशन!

सोनेरी पदकांचा महिमा काय वर्णावा? १९६४; ३३९ पैकी चार वा पाऊण टक्क्य़ावर. ९८ मध्ये ३७८ पैकी सात वा दोन टक्के. २००२ ला ४२७ मधली अकरा, तसेच त्यानंतर चार वर्षांनी ४२८ पैकी दहा, म्हणजे सुमारे अडीच टक्के. २०१० च्या ग्वांगजो एशियाडमध्ये सुवर्णाची संख्या वाढत १४ वर गेली; पण तेथील स्पर्धा-शर्यतीही वाढत ४७७ वर गेली. त्या तिथली टक्केवारी आणि २०१४ व २०१८ मधील सोनेरी कमाई ११ व १५ पदकांची. ती भरते अडीच ते सव्वातीन टक्के. म्हणजेच तीस टक्के जनसमूहाची कर्तबगारी तीच ती नि तीच ती. दोन-तीन टक्क्य़ांची. सुवर्ण, रौप्य व ब्राँझ अशा एकत्रित पदकांतही भारताचा हिस्सा त्यापेक्षा अध्र्या टक्क्य़ाने जादा, तेच ते नि तेच ते! भारतीय शासकीय वर्गात व समाजात दखलपात्र नसलेले ते स्थिरावलेलं चित्र तेच ते नि तेच ते.

गमतीची गोष्ट, की एशियाडच्या या उमद्या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली या भारतानंच. जर्मनी-जपान-इटली यांच्या सैतानी फॅसिस्ट आक्रमकांविरुद्ध भीषण युद्धाचा डोंब उफाळला होता, तेव्हा या महायुद्धापासून दूरवर असलेल्या भारतातील काही क्रीडा संघटकांच्या मनात हे विचार येत होते! महायुद्ध संपलं, फॅसिस्टांचा पाडाव झाला, भारत स्वतंत्र झाला अन् या एशियाडचं स्वप्न काही भारतीय बघू लागले. अँथनी डिमेलो, प्रा. सोंधी, पटियालाचे महाराज, टाटा समूहाशी संबंधित क्रीडाशौकिन यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना गळ घातली. नेहरूंचा दृष्टिकोन व्यापक व विश्वशांतीचा. सरकारी तिजोरीवर फारसं दडपण येत नसल्यास ते राजी झाले.

१९५१ मध्ये नवी दिल्लीत भरलेलं ते एशियाड निव्वळ प्रतीकात्मक होतं. भारत, जपान, इराण, सिंगापूर, फिलिपिन्स, श्रीलंका (सिलोन), इंडोनेशिया व बर्मा (म्यानमार) या अवघ्या ८ देशांत फक्त ५७ शर्यती उरकल्या होत्या. नेहरूंनी तरीही आपल्या संदेशात या उपक्रमाचं आगळेपण विशद केलं, ‘मित्रत्वाची स्पर्धा वाढवण्यास खेळांचे योगदान लाभेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर स्नेहसंबंध व सहकार्य वृद्धिंगत करण्यास एशियाडला काहीसा हातभार लागेल. आंतरराष्ट्रीय सामंजस्य व सहकार्य बळकट करण्याची प्रत्येक संधी आपण साधली पाहिजे.’ त्यांच्या संस्मरणीय भाषणानंतर संघटकांनी एशियाडचे उद्दिष्ट म्हणून नेहरूंचे बोल आदराने स्वीकारले. ‘प्ले गेम इज द स्पिरिट ऑफ गेम : अटीतटीने खेळा, पण खिलाडूवृत्तीनं, उमदेपणानं, भलेपणानं खेळा.’

आणि हीच ती गमतीची गोष्ट. पंतप्रधान नेहरूंसाठी खेळ हे आंतरराष्ट्रीय सामंजस्य व सहकार्य वाढवण्यापुरती एक छोटीशी बाब होती. यापलीकडे त्यात खेळाविषयी कोणताही दृष्टिकोन नव्हता. देशापुढे फाळणीमुळे, आर्थिक मागासलेपणामुळे, भाषिक अस्मितेमुळे बिकट समस्या उभ्या राहिल्या होत्या. देश एकसंध ठेवणं, त्याचं फेडरल व समतावादी स्वरूप जोपासणं, अमेरिका-रशिया या महासत्तांपासून वेगळा अलिप्ततावादी गट स्थापने, अन्न ते पोलाद ते तेल यांबाबत स्वावलंबी होणे, हे प्रश्न अर्थातच जिव्हाळ्याचे होते. त्यांच्याच कारकीर्दीत भारतीय हॉकीपटूंनी ऑलिम्पिकमधील दुसरी सोनेरी हॅट्ट्रिक पुरी केली; पण तीन गोल त्यांच्या लेखी मर्यादित होते. ऑलिम्पिक-एशियाडमधील भारताचं नगण्य स्थान त्यांना दु:खी करत असेल, तर ते काही क्षणांपुरतेच.

एशियाड-ऑलिम्पिक हा नेहरूच्या जिव्हाळ्याचा विषय नव्हता. महत्त्वाच्या प्रश्नात अग्रक्रमाच्या बाबींपैकी नव्हता; पण जी गोष्ट नेहरूंची व सत्ताधारी काँग्रेस पक्षाची, तीच सरसकट साऱ्या विरोधी पक्षांची. समाजवादी, जनसंघ, कम्युनिस्ट तसेच प्रादेशिक पक्षांची. सोव्हिएत रशियाने दुसऱ्या महायुद्धानंतर खेळांना अनन्यसाधारण स्थान दिलं, अगदी अमेरिका-युरोप-जपानसारखं; पण भारतातील कम्युनिस्टांनी हा विषय कधी अजेंडय़ावर घेतलाच नाही. विशेष खटकणारी बाब म्हणजे भारतातील कोणत्याही युवा-विद्यार्थी, महिला, श्रमिक, कामगार वा स्वयंसेवक संघांनी या विषयात रस घेतलाच नाही. एशियाड, ऑलिम्पिक हे त्यामुळे देव्हाऱ्यात ठेवले गेले. सणासुदीला, म्हणजे ऑलिम्पिक-एशियाडला दर चार वर्षांतून पूजा तेवढी केली जाते!

नेहरू व त्यांचे तमाम विरोधक यांना कधी क्रीडा-धोरण आखावे व राबवावे असं वाटलं नाही. म्हणायला इंदिरा गांधी यांनी १९८२ च्या दिल्ली-एशियाडचे भपकेबाज संयोजन करून, आशियाची वाहवा मिळवली; पण तेव्हाही एशियाडच्या स्टेडियम आदी बांधकामात, राजधानी दिल्लीसारख्या मध्यवर्ती नगरीत व दिवसाढवळ्या अंदाजे अनामिक शे-दीडशे बांधकाम कामगार दगावले, त्याची त्यांना व बहुसंख्य विरोधकांना काळजी नव्हती. त्यासंबंधी ‘एशियाडचा पांढरा हत्ती’ पथनाटय़ दिल्लीत गाजलं, न्यायालयात हे प्रकरण गेलं. ‘सात प्रमुख कायदे धाब्यावर बसवले गेले. राजरोस, राजधानीत व दिवसाढवळ्या’. यावर न्यायमूर्तीनी ताशेरे ओढले; पण दिवंगत कामगार अनामिक; त्यांची नोंदणी धड नाही. त्यांना न्याय कसा न कुठला मिळणार?

बांधकाम कामगार अनामिक व उपेक्षित; तितकंच क्रीडा क्षेत्र उपेक्षित व त्याअर्थी अग्रक्रमाच्या विषयात अनामिक! इंदिराजींनी एशियाडचा वापर विरोधकांची भरपूर जिरवण्यापुरता केला. दिल्ली एशियाड संपलं. तिथेच एशियाडचा विषय संपला. अलीकडच्या काळात तेव्हाचे क्रीडामंत्री अजय माखन यांनी दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धासाठी सढळ हस्ते तरतूद दोन वर्षे केली; पण हे सारं ‘इव्हेंट-मॅनेजमेंट’. ऑलिम्पिक वा एशियाडची तयारी, त्याआधीच्या वर्षांत नव्हे तर कायमस्वरूपी करायचे असते. लोक फिट, चपळ व सशक्त राहावेत याची आखणी स्थायी स्वरूपाची असावी लागते. हे हेरलं होतं जपानच्या फॅसिस्ट व त्यानंतरच्या लोकशाहीवादी राजवटींनी तसेच दक्षिण कोरियातील लष्करशहांनी व लोकशाही प्रतिनिधींनी. एरवीही जपानी-कोरियन समाज कष्टाळू, शिस्तप्रिय. एशियाडमधील त्यांची पदकांची लयलूट हा चमत्कार नव्हे. त्यांच्या जीवनशैलीत मिळालेलं ते फळ आहे आणि तेच वेगळेपण आहे, पूर्व आशियाचे!

पूर्व आशियातील चार देशांनी एशियाडच्या पदकांवर केवढा प्रचंड डल्ला मारलाय, तो बघा. चिनी तैपेई सातच स्पर्धात ३६५ पदकं, दक्षिण कोरिया १६ स्पर्धात २,०५६, तर जपान सतरा स्पर्धात २८४९ अन् चीन १५ स्पर्धात २९७६.

‘तेच ते नि तेच ते’ हे भारतासाठी व भरतखंडासाठी शोकगीत; पण पूर्व आशियासाठी, तेच स्फूर्तिगीत, तृप्तीगीत. पाठोपाठच्या एशियाडमध्ये चीनची सुवर्णाची कमा़ई बघा : १९७४ मध्ये (फक्त!) ३३. मग क्रमश: ५१ व नवी दिल्लीत ६१, मग ९४, मग बीजिंगमध्ये १८३, मग १२६, मग १२९, मग १५०, मग १६५, मग ग्वांगजोमध्ये तर १९९, मग इंचेऑनमध्ये १५१ व यंदा जकार्तात १३२.

एवढी लूटमार केल्यानंतरही चीन पदकांचा भुकेला आहे! आपल्या मायभूमीत होणाऱ्या १९९० व २०१० च्या एशियाडमध्ये चीनने आपल्यापुढे दोन-दोनशे सुवर्णासह ३५०-४०० पदकांचं अघोरी लक्ष्य ठेवले होते. त्यासाठी वुशू, ड्रॅगन बोट आदी आपले सहा-सात खास क्रीडा प्रकार एशियाड स्पर्धात घुसवले होते. त्यांच्या पावलांवर पावले टाकत यंदा व्हिएतनाम-इंडोनेशियानं वेनॅक सिलाट हा मार्शल आर्ट्सचा खेळ घुसवला. त्याच्या १६ स्पर्धात इंडोनेशियाने १४ सुवर्ण खिशात घातली. व्हिएतनामने कमावली दोन सोनेरी, सात रौप्य व तीन ब्राँझ अशी बारा पदकं.

ऑलिम्पिकखालोखाल एशियाडला महत्त्व देण्याची वृत्ती निर्णायक. चीनने क्रीडा-प्रबोधिनी, क्रीडा-वसतिगृहे यांची जाळी देशभर उभारली. अगदी थेट ग्रामीण भागापर्यंत! तिथे चार-पाच वर्षांच्या मुलांना श्रम-छावण्यात ठेवल्यासारखं राबवलं. जपानने टोकियोतील ऑलिम्पिक व्हॉलीबॉल सुवर्णासाठी अमानुष कष्ट खेळाडूंकडून करवून घेतले. कोरियाने तिरंदाजीवर खास भर दिला. यंदाही इराणने चापल्यासह ताकदीवर देणाऱ्या १५ क्रीडा स्पर्धा कशा गाजवल्या बघा.  इराणची सुवर्ण पदकं- कुस्ती ५, कुराश १, तैक्वांदो २, कराटे २, वेटलिफ्टिंग २, थाळीफेक १ व कबड्डी २, उझबेकिस्तानने कुराश या मार्शल आर्ट्सचा समावेश करवून घेतला अन् कुराशच्या सात स्पर्धात सहा सुवर्ण, दोन रौप्य व चार ब्राँझ अशा डझनभर पदकांचा जल्लोष साजरा केला.

भारत सुरुवातीला पाचवा तरी असायचा. सुरुवातीस भारताला दोनदा पाकने मागे सारलं. एकदा इस्रायलनं, मग इराण सर्रास अन् थायलंड बऱ्याचदा भारतापुढे गेलं. कझाकस्तान व उझबेकिस्तान यांनी १९९४ च्या पदार्पणापासून गेल्या सात एशियाडमध्ये सहा-सहादा भारतावर मोठी आघाडी घेतली. चीन, जपान, कोरिया यांच्या आसपासही भारत पोचू शकत नाही. कारण? कारण त्यांना मागे ठेवण्याचं स्वप्नच भारत बघत नाही! भारत कशाचाच ध्यास घेत नाही. अमेरिकेला टप्प्याटप्प्यानं हरवण्याचा चंग चीननं बांधला, जोपासला ५० वर्षे व २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये तसं करून दाखवलं. हा लाँग मार्चच.

भारत आजपर्यंत चीनशी स्पर्धा करतोय की चिनी चैपेईशी?

चिनी चैपेई ऊर्फ तैपेई, ऊर्फ तैवान ऊर्फ फोर्मोसा या छोटय़ा बेटावर चीन जन्मसिद्ध हक्क सांगतो! अमेरिकी आरमार नसतं तर चीन केव्हाच फोर्मोसाचा तिबेट करून मोकळा झाला असताही!

यंदाच्या एशियाडमध्ये तैपेई सातवा व दोन रौप्य पदकांच्या फरकामुळे दुर्दैवी भारत आठवा. गेल्या स्पर्धात भारत आठवा, तैपेई नववा, २०१० मध्ये भारत सहावा, तैपेई सातवा. त्याआधी भारत आठवा, तैपेई दहावा. त्या आधी २००२ मध्ये भारत ७, तैपेई ८ (पण तैपेईकडे १६ पदकं जादा), १९९८ तैपेई ७७ पदकांसह सहावा, भारत ३५ पदकांसह नववा, १९९४ मध्ये हिरोशिमात तैपेई-भारत सातवे-आठवे, त्यात फरक तीन सुवर्णासह २१ पदकांचा.

भारत-चिनी तैपेई तुल्यबळ असावेत आणि चीन मिश्कीलपणे हसत असावा, हे आजवरच्या एशियाडचं आणि क्रीडा क्षेत्रातील भारतीय मानसिकतेचं विदारक वास्तव.

जाता जाता सांगावंसं वाटतं, लोकसंख्या-भारत १३२ कोटी, तैपेई २.३६ कोटी, क्षेत्रफळ भारत सुमारे तेहतीस लाख चौरस किलोमीटर, तैपेई तीस हजार किलोमीटर फक्त. दरडोई उत्पन्न भारत २१३४ डॉलर्स, तैपेई २३,४५६ डॉलर्स, तैपेईत चौरस किलोमीटर्समध्ये ६५० लोकांची गजबजलेली गर्दी.

भारताची खासियत असलेली एक गोष्ट उरतेच. भारतीय कामगिरी प्रभावी, चमकदार, भरारी मारणारी इत्यादी इत्यादी. सूर याही वेळा उमटतातच. सुरेश कलमाडींचे दीर्घकालीन चेले व अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला हे तर भारत अ‍ॅथलेट्क्सिमधील महासत्ता होण्याच्या शेख महमदी वल्गना करत आहेत. त्या प्रवृत्तींबाबतही म्हणावं लागतं, तेच ते नि तेच ते!

सरतेशेवटी जकार्तात पदक मिळवणाऱ्या व थोडक्यात पदक गमावणाऱ्या साऱ्या खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शकांना सलाम. त्यांच्या गुणवत्तेस साजेसे व आजवर न लाभलेले (कदाचित शूटिंग व बॅडमिंटन असे काही अपवाद) व्हिजनरी दूरदृष्टीचे संघटक व शासक भारताला लाभोत, हीच इच्छा, जेणेकरून भारतीय कामगिरीचा पदक तक्ता बघताना जुनेच आकडे नव्याने पुन्हा एकदा बघायची वेळ येत्येय, असे वाटू नये आणि ‘तेच ते नि तेच ते!’ अशा भावनांचा मारा एकदाचा कायम बंद व्हावा, हीच इच्छा.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India in asian games 018
First published on: 09-09-2018 at 01:34 IST