News Flash

किंमत मोजली, पण हाती काय आले?

जेव्हा सरसकट, पूर्ण टाळेबंदी जाहीर करण्यात आली तेव्हा अनेक निरीक्षकांनी चिंता व्यक्त केली होती.

कौशिक बसू

करोनाबाधितांच्या संख्येत रशियाला मागे टाकून भारत जगात तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. उदयोन्मुख अर्थव्यवस्था असणाऱ्या राष्ट्रांमध्ये सर्वात प्रथम आणि जगातील सर्वात कठोर स्वरूपाची टाळेबंदी जाहीर करूनदेखील ही अवस्था का झाली?

करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. जगातील वेगवेगळ्या देशांतील करोनाबाधितांची संख्या पाहिली तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आपल्यापेक्षा आता फक्त अमेरिका व ब्राझील हेच देश बाधितांच्या संख्येत पुढे आहेत. याच आठवडय़ात आपण रशियालाही मागे टाकले.

आता कोविड-१९ रुग्णांची ज्या पद्धतीने मोजदाद केली जात आहे, त्यात त्रुटींना बराच वाव आहे; त्यामुळे केवळ करोनाबळींचा विचार केला, तर लोकसंख्येच्या दृष्टीने आफ्रिका व आशियातील भारत, चीनसह सर्व देशांची चांगली आहे असे चित्र समोरे येते. मात्र, केवळ आफ्रिका आणि आशियातील राष्ट्रांशी तुलना केली तर भारताची साथनियंत्रणातील कामगिरी बरीच खराब आहे. दहा लाख लोकसंख्येमागे करोनाबळींची संख्या पाहता, म्हणजे करोना मृत्यूदराचा निकष लावून पाहिला तर भारतातील स्थिती चीन, इंडोनेशिया, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, मलेशिया, एवढेच काय आफ्रिकेतील अनेक देशांपेक्षाही वाईट आहे.

उदयोन्मुख अर्थव्यवस्था असणाऱ्या राष्ट्रांपैकी टाळेबंदी जाहीर करणारे भारत हे पहिले राष्ट्र. तरीही ही अवस्था का झाली, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जेव्हा सरसकट, पूर्ण टाळेबंदी जाहीर करण्यात आली तेव्हा अनेक निरीक्षकांनी चिंता व्यक्त केली होती. कोविड-१९ मृत्यूदर आशिया व आफ्रिकेत कमी असल्याने आपण युरोप व उत्तर अमेरिकी देशांची नक्कल करण्याची गरज नाही, असे टाळेबंदीबाबत मत व्यक्त झाले. टाळेबंदी लागू करायला हरकत नव्हती, पण ती विशिष्ट लक्ष्य ठेवून आणि आपल्या देशातील स्थितीचा विचार करून काळजीपूर्वक राबवायला हवी होती. म्हणजेच टाळेबंदीची तीव्रता फार नसावी असे खरे तर अपेक्षित होते.

कोविड-१९ साथ आटोक्यात ठेवण्यासाठी टाळेबंदीच्या माध्यमातून देशाने किती आर्थिक किंमत मोजायची, हा प्रश्न आहे. यापूर्वीच्या काही लेखांमध्ये मी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर सरकारने लवकर कृती करण्याची अपेक्षाही व्यक्त केली होती. परंतु नंतर जे घडले ते दुहेरी धक्का देणारे होते. एकीकडे भारताची अर्थव्यवस्था घसरत गेलीच, शिवाय दुसरीकडे करोना प्रादुर्भावही वाढत गेला. लेखासोबत दिलेल्या आलेख पाहिला, तर ही बाब ध्यानात येईल. जे घडते आहे ते निराशाजनक आहे. २४ मार्चला टाळेबंदी जाहीर झाली; पण तेव्हापासून करोना साथ आटोक्यात येण्याऐवजी पसरतच गेली. ही पहिली टाळेबंदी जाहीर झाल्याच्या दोन आठवडय़ांनंतर संसर्गाचा दर आणखी वाढला आणि त्यानंतर त्याचा आलेख आणखी उंच जात राहिला.

असे का घडले, याचा विचार आपण करायला हवा. भारताने लागू केलेली टाळेबंदी ही जगातील सर्वात कठोर स्वरूपाची टाळेबंदी होती. घोषणेनंतर केवळ चार तासांची मुदत देऊन टाळेबंदी लागू करण्यात आली; पण तेव्हा अशी स्वाभाविक अपेक्षा होती की, टाळेबंदीमुळे उद्भवणारी स्थिती काळजीपूर्वक हाताळण्याकरिता सरकारकडे काहीएक नियोजन-आराखडा असेल. अशा टाळेबंदीने एकदम सारी काम ठप्प होणार आणि लोकांचे चलनवलनही थांबणार तसेच पुरवठा साखळ्या खंडित होणार, हे अपेक्षित होतेच; पण या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी काही पूरक कृती सरकारने केल्या नाहीत. सरकारने काही उपाययोजना केल्या असतील तर त्याची पुरेशी माहिती माझ्याकडे नाही; पण त्या केल्या असत्या तर असे विदारक चित्र दिसले नसते हे नक्की. चाचण्या वाढवणे, वैद्यकीय क्षेत्राचा विस्तार, परिस्थितीच्या रेटय़ात अडलेल्या लाखो गरीब कामगारांना मदत यादृष्टीने साहाय्यक ठरतील अशी पावले उचलली गेली नाहीत; त्यामुळे या काळात सरकारचा स्वत:च लागू केलेल्या टाळेबंदीच्या परिणामांना असलेला प्रतिसाद गोंधळलेला होता, हे दिसले. सरकारमधील काही मंडळींनी- नोकरशहा आणि काही राजकारण्यांनीही- पंतप्रधानांकडून घोषित झालेल्या टाळेबंदीला जणू हाणून पाडण्याचे ठरवले होते; कारण ही मंडळी काहीही न करता ते स्वस्थ बसून राहिली. आपल्यासारख्याच कठोर टाळेबंदीला सामोऱ्या गेलेल्या दक्षिण आफ्रिकेत टाळेबंदीची घोषणा केल्यानंतर तिथे तातडीने रुग्णालय व्यवस्था, चाचणी केंद्रे सज्ज करण्यासाठी पावले उचलण्यात आली. भारतात असे चित्र दिसले नाही. अनेक देशांत टाळेबंदीनंतर वाहतूक काही प्रमाणात सुरू होती, त्यामुळे लोक घरी परतू शकले. भारतात मात्र स्थलांतरित कामगारांना घरी परतण्याची संधीच दिली गेली नाही, त्यामुळे टाळेबंदीच्या काळात त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.

केवळ चार तासांचा अवधी देऊन एवढी मोठी घोषणा करण्याआधी त्यादृष्टीने वरिष्ठ नोकरशहांच्या चमूने धोरण तयार आखण्याची गरज होती. भारतातील नोकरशहा बुद्धिमान आहेत. ते नियोजनबद्ध धोरण तयार करू शकतात आणि अमलातही आणू शकतात. मात्र, टाळेबंदीनंतर भारतात जे काही घडले, त्याचे जगाने पाहिलेले चित्र फार निराशाजनक होते. लाखो गरीब भारतीय लोक शेकडो मैल चालत घराकडे निघाल्याची दृश्ये दु:खद होती. त्यामुळे जगात भारताची प्रतिमा खालावली; स्वातंत्र्यानंतर भारताची आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांतून इतकी नाचक्की कधीच झाली नव्हती. ‘द इकॉनॉमिस्ट’ (१३ जून) या नियतकालिकाने असे म्हटले आहे की, भारताने टाळेबंदीत पहिल्या दोन महिन्यांत किमान चार हजार वेगवेगळे नियम जाहीर केले; यातील अनेक नियम हे आधीच्या नियमांत दुरुस्त्या करून तयार केले होते.

ही धोरणात्मक शोकांतिका नेमकी कशी घडून आली, याचा पर्दाफाश यथावकाश होईलच. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की, ज्या पद्धतीने टाळेबंदी लागू करण्यात आली त्यातूनच विषाणू जास्त पसरला. टाळेबंदीत गोंधळलेले लोक ठिकठिकाणी जमत होते, स्वाभाविकपणे तिथे संसर्गही होत असेल, आणि तेच लोक शेकडो मैल पायपीट करत होते. त्यामुळे कोविड-१९ साथ आणखी पसरत गेली.

हा सगळा दुहेरी धक्क होता. आकडेवारी नीट पाहिली तर हे लक्षात यायला वेळ लागणार नाही. कोविड-१९ साथीच्या दोन वर्षे आधीच भारताची आर्थिक घसरण सुरू होती. आता ती आणखी वेगाने होत गेली. जागतिक नाणेनिधीने असे भाकित केले होते की, २०२० मध्ये भारताचा आर्थिक विकास दर ऋण ४.५ राहील- जो १९७९ नंतरच्या काळातील भारताचा सर्वात नीचांकी आर्थिक विकास दर असेल. कोविड-१९ साथीमुळे भांडवल चीनमधून बाहेर पडेल आणि त्याचा फायदा सरतेशेवटी भारताला होईल, असे वाटत होते. पण तसे काही झाले नाही. चीनमधील उद्योग विशेषत: व्हिएतनाम व इतर देशांत गेले. याशिवाय चीनने कोविड-१९ साथीच्या काळातही बरीच परकीय गुंतवणूक स्वदेशात राखण्यात यश मिळवले आहे. मे महिन्यात भारतातील बेरोजगारीचा दर हा २३.५ टक्के होता; याच काळात ब्राझीलमध्ये तो १२.६ टक्के, अमेरिकेत १३.३ टक्के, तर चीनमध्ये केवळ सहा टक्के होता. चीनची लपवाछपवीची वृत्ती पाहता, अधिकृत आकडेवारीवर काळजीपूर्वकच विचार करायला हवा हे खरे असले; तरी भारताची आर्थिक कामगिरी निराशाजनक आहे यावर कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. या सगळ्या विवेचनाचा अर्थ एकच की, भारताने आर्थिक किंमत मोजली, पण साध्य काहीच झाले नाही.

(लेखक कॉर्नेल विद्यापीठात प्राध्यापक असून जागतिक बँकेचे माजी मुख्य अर्थशास्त्रज्ञ व वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. सदर लेख ‘द इंडियन एक्सप्रेस’च्या ८ जुलैच्या अंकात ‘द व्हायरस अ‍ॅण्ड द लॉकडाऊन’ या शीर्षकाने प्रसिद्ध झाला आहे.)

अनुवाद : राजेंद्र येवलेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 4:03 am

Web Title: india overtakes russia to become the third country with highest coronavirus cases in the world zws 70
Next Stories
1 आरोग्य व्यवस्था ‘कंत्राट’बाधित!
2 निकृष्ट बियाण्यांची रडकथा
3 खरिपात भात, उन्हाळ्यात नाचणी!
Just Now!
X