|| मंजूषा जाधव

राज्याच्या शिक्षण विभागाने अकरावी-बारावीच्या अभ्यासक्रमात ‘संगीतोपचारा’चा समावेश करण्याचे ठरवले आहे. हा प्रकार हास्यास्पद तर आहेच, पण महान संगीत कलेचा, साधकांचा तो अवमान आहे, अशी मांडणी करणारा पत्रलेख..

‘अकरावी-बारावीच्या अभ्यासक्रमात ‘संगीतोपचारा’चा समावेश’ ही बातमी (लोकसत्ता, ६ मे) वाचून हसावे की रडावे अशी अवस्था झाली. शिक्षण विभागाने ‘संगीता’चा समावेश म्हटले असते, तर गोष्ट वेगळी होती. काही वर्षांपूर्वी अनेक प्रथितयश भारतीय संगीतकारांनी शालेय अभ्यासक्रमात ‘संगीत’ विषय असणे स्वागतार्ह असल्याचे सुचविले होते. परंतु प्रत्यक्षात शालेय स्तरावर हे अमलात न येणेच स्वाभाविक आहे, कारण संपूर्ण राज्याचा विचार करता, संगीताचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेत सक्षम संगीत शिक्षक मिळणे ही आज दुरापास्त गोष्ट होऊन बसली आहे. मात्र, जीवनातील संगीताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे शालेय स्तरावर इतर अभ्यासाबरोबरच मुलांची संवेदनशीलता, तरलता जपायची असेल, तर संगीताचा स्पर्श हवाच. संगीताचे सूर विद्यार्थ्यांच्या कानावर पडणे हे महत्त्वाचे आहे आणि शाळेचे तसेच पालकांचे हे काम आहे.

संगीत शिक्षणाची सुरुवात अगदी बालपणापासून, किंबहुना मुलांच्या गर्भावस्थेपासूनच घडली पाहिजे. अकरावी-बारावीचे वय यासाठी फार मोठे आहे. वय जसजसे मोठे होते, तसे कोणतीही नवी गोष्ट आत्मसात करणे अवघड होत जाते. त्यातून शिक्षण विभागाच्या प्रस्तावात ‘संगीत उपचार’ असे म्हटले आहे. मानवी व्याधिनिवारणासाठी अनेक उपचार पद्धती विकसित झालेल्या आहेत. संगीतोपचार असले, तरी त्यांना अजून मान्यता मिळालेली नाही आणि ‘संगीत’ शिकल्याशिवाय थेट ‘संगीतोपचारा’स हात घालणे हे खरोखरच किती हास्यास्पद आहे! विशेष म्हणजे, संगीत ही एक कला आहे. कोणतीही कला ही व्यक्तीमध्ये जन्मजात असावी लागते. मुलांच्या सुप्त गुणांमधून ती शोधून काढावी लागते. संगीत कला प्रत्येकात असेलच, असे नाही. काही मुलांमध्ये चित्रकला असेल, तर काहींना शिल्पकलेची बुद्धिमत्ता अधिक असेल. काही जण संगीतातून अभिव्यक्ती करण्यासाठी एखादे वाद्य निवडतील, त्यातून आनंदनिर्मिती करतील, तर काही जण नृत्यकला आत्मसात करून आनंद मिळवतील. पंचेंद्रियांचा, बुद्धीचा सुयोग्य वापर करणे वैविध्यपूर्ण कलाकृतींमधून सप्तरंग, सप्तसूर, लय-ताल, अभिनय आणि शब्द यांद्वारे ते अभिव्यक्त करणे यासाठी मुलांना शाळांमधून वाव मिळणे जरुरीचे आहे.

असे असताना, महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने ‘संगीतोपचारा’चा आराखडा आणि तोही थेट अकरावी-बारावीच्या स्तरावर मांडणे हाच मुळी विनोद आहे. खरे म्हणजे संगीत हे निसर्गात इतकं भिनलेलं आहे, की माणसेच काय, पशुपक्षी, झाडेझुडपेही संगीताने डोलताना, आनंदित होताना दिसतात. संगीत हे निसर्गात आहेच. ते कान देऊन ऐकले तर सूर सापडतो. ज्या कलावंतांना हा सूर सापडला, त्यांनी त्या सुराचा ध्यास घेतला. तपश्चर्या केली. वर्षांनुवष्रे सप्तसुरांचा सखोल अभ्यास करून त्यांवर अथक मेहनत घेतली. नाना प्रकारची वाद्ये तयार केली गेली. सुरांचे, तालांचे शास्त्र निर्माण झाले. ते सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी शिष्यांमार्फत इतरांनाही शिकवले गेले. त्यातून संगीतातील घराणी निर्माण झाली. अधिक शिष्य घडवले गेले; संगीताचा प्रसार झाला. शास्त्रीय संगीत शिकून जे संगीतकार घडले, त्यांचे पिढीजात गायन, वादन, जलसा, आणि ध्वनिमुद्रण होऊन लोकांच्या कानावर पडत राहिल्याने ‘कानसेन’ निर्माण झाले. कानसेन आहेत, म्हणून संगीतकारांना महत्त्वाचे स्थान आहे. संगीतकार घडले, ते निसर्गातला नाद पकडून. झऱ्याची झुळझुळ, वाऱ्याची सळसळ, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, कोकिळेचा पंचम, पक्ष्यांचा कलरव, पावसाची रिमझिम, पैंजणांची रुमझुम यांतील ध्वनिमाधुर्य ही ऐकण्याची गोष्ट आहे. श्रवणाशिवाय संगीत होऊच शकत नाही. म्हणून श्रोते महत्त्वाचे. आधी श्रवण आणि मग गायन-वादन. आधी श्रवण करायला शिकले पाहिजे. संगीत ही गुरुमुखी विद्या आहे. गुरू शिष्याला आधी सूर ऐकायला शिकवतो. ‘संगीतोपचार’ आणि त्याचे शास्त्रीय शिक्षण हा सुरुवातीचा नसून अंतिम टप्पा होय. तसेच, संगीत हे ॐकारातून निर्माण झालेले स्वयंभू शास्त्र असून मानवाला व प्राणिमात्राला निसर्गत: सर्वतोपरी हितकारक असल्याने त्याचे श्रवण आणि सखोल साधनेने श्रोत्यांसमोर केलेले सादरीकरण यांद्वारे संगीताची सूक्ष्मता मानवमात्रापर्यंत पोहोचविणे हे कार्य घडणे अपेक्षित आहे. त्यातून संगीतोपचार नसíगकपणे होत असतात.

परंतु संगीत म्हणजे काय आणि त्याची सूक्ष्मता लक्षात न घेता थेट ‘संगीतोपचार’ अकरावी-बारावीवर राबवणे, आराखडे बनविणे, अनभ्यस्तपणे ‘क्षमता विधाने’ करून विद्यार्थ्यांवर लादणे, सक्तीने लादलेल्या विषयांच्या परीक्षा घेऊन त्यांना बरे-वाईट ठरवणे, विद्यार्थ्यांच्या एकमेकांशी तुलना करणे हा प्रकार म्हणजे अक्षरश: क्रौर्य आहे. ‘संगीतातून रोगमुक्ती’ हा शब्दप्रयोग विद्यार्थी व शिक्षकांची दिशाभूल करणारा आहे. अशाने सर्वाचा डॉक्टरांवरील, वैद्यकशास्त्रावरील व विज्ञानावरील विश्वास डळमळीत होऊ शकतो.

वाद्यनिर्मितीचे कौशल्य असे आराखडय़ात म्हटले आहे. भारतीय संगीतातील आजवर निर्माण झालेली सूरवाद्ये, तालवाद्ये ही महान संगीतकारांच्या अथक साधनेतून शास्त्रीय पायावर विकसित झालेली आहेत. त्यापकी किती वाद्ये संगीत शिक्षक विशेष प्रावीण्याने वाजवू शकतात, हा प्रश्नच आहे. नवीन वाद्य सर्व विद्यार्थ्यांनी निर्माण करणे ही अपेक्षा अनाकलनीय आहे. एखादे नवीन वाद्य निर्माणही होऊ शकेल, पण ते निर्माण करणारा शंभर वर्षांत एखादाच निपजू शकेल.

जाहिरातींच्या जिंगल्स हा आणखी निराळा विषय आहे. मुलांनी जिंगल्स ऐकायला हरकत नाही, पण कोणी त्या संगीत म्हणून ऐकेल, तर कोणी जाहिरात म्हणून, कोणी त्यातील उत्पादनाचा ध्यास घेऊन पालकांना भंडावून सोडेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नव्या जिंगल्स तयार करण्याची अपेक्षाही फोल ठरण्याची शक्यता अधिक. नवनिर्मिती हा साधनेचा भाग आहे.

राष्ट्रभक्तीपर गीते मुलांना जरूर ऐकवावीत, शिकवावीत. त्यातून कोणती भावना वाढीस लागेल, ते शिकविणाऱ्याच्या मानसिकतेवर आणि मुलांच्या कौटुंबिक, सामाजिक पाश्र्वभूमीवर अवलंबून आहे. राज्याच्या सार्वत्रिक शिक्षणात ‘संगीतोपचारा’चा समावेश करण्याचा शिक्षण विभागाचा प्रस्ताव म्हणजे महान संगीत कलेचा, साधकांचा अवमान आणि स्वत:च्या फायद्यासाठी निसर्गदत्त संगीत ओरबाडून घेणे होय. संगीत हे सर्व सजीवांसाठी कल्याणकारी असून मानवाने स्वहितासाठी संगीताचा वापर करणे हा निव्वळ स्वार्थ आहे. निसर्गाला ओरबाडून मानवाने स्वत:चेच किती नुकसान करून घेतले आहे, ते आपण पाहातच आहोत. संगीताच्या बाबतीत सूर आणि ताल मुलांच्या कानावर नियमितपणे पडले, तर श्रवण होईल. संगीतश्रवणाने मेंदू तल्लख, तरतरीत आणि तरल राहतो. तो इतर विषयांचा अभ्यासही चटकन आत्मसात करू शकतो, हा अनुभव विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक व पालकांनाही येईल. ‘गाण्याने श्रम वाटतात हलके, हेही नसे थोडके’. तेव्हा उपचारांच्या मागे न लागता शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत, मराठी, िहदी वा इतर भारतीय भाषांतील बालगीते, भक्तिगीते, भावगीते, अभंग, भजने, नाटय़गीते असे गाण्याचे विविध प्रकार रोजच्या रोज अगदी बालवर्गापासून मुलांच्या कानावर पडतील आणि संगीतमय, आरोग्यदायी वातावरणात मुलांचे मानसिक आरोग्य जपले जाईल अशी व्यवस्था करणे ही शाळांनी व पालकांनी आपली जबाबदारी मानली तरी पुरेसे आहे आणि पुरेसेच पूर्णत्वाला जाऊ शकेल, हे निश्चित.

लेखिका शिक्षण क्षेत्राच्या अभ्यासक आहेत.