‘गांधी भवन’ हे काँग्रेसचं मुंबईतील एकमेव कार्यालय नाही. मध्य मुंबईत ‘टिळक भवन’ नावाचं आणखी एक कार्यालय आहेच. शिवाय, आझाद मैदानाजवळ मुंबई काँग्रेसचंही एक कार्यालय आहे. सामान्य माणसाचं या सर्व कार्यालयांशी फारसं जवळचं नातं नसतं.. पण राजकारणात मुरलेल्या काँग्रेसी कार्यकर्त्यांला मात्र, कोणत्या कामासाठी, कोणत्या दिवशी कोणत्या कार्यालयात जायचं, याची पक्की माहिती असते.
निवडणुका तोंडावर आल्या की, राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये इच्छुकांची आणि त्यांच्या पाठीराख्यांची वर्दळ सुरू होतेच. त्यातही सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयात हा ओघ आणखीनच मोठा असतो. सत्ताधारी काँग्रेसच्या कार्यालयात अजून असा गर्दीचा ओघ सुरू झालेला नसला, तरी चाचपणीचे प्रयोग मात्र सुरू झाल्याचे जाणवते.. ते न्याहाळायचं असेल, तर त्रयस्थपणाने कधीतरी या पक्षाच्या कार्यालयात जावं, बाहेरच्या खुच्र्याच्या रांगेतील एक कोपऱ्याची खुर्ची पकडावी आणि एखादं वर्तमानपत्र हाती धरून तासभर वेळ घालवावा. डोळे आणि कान उघडे असले की, या छुप्या हालचाली सहज टिपता येतात. काँग्रेसचं मुंबईत एकच कार्यालय नाही, पण मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावरच्या ‘गांधी भवना’चं महत्त्व त्यात खूप मोठं.. याची कारणं दोन. एक तर, राज्याच्या कुठल्याही कोपऱ्यातून सरकारी, निमसरकारी किंवा अगदी खासगी स्वरूपाच्या कामासाठीदेखील, मंत्रालयाचे खेटे घालणारा माणूस काँग्रेसचा कार्यकर्ता असेल, तर मंत्रालयात शिरण्यापूर्वी किंवा मंत्रालयातून बाहेर पडल्यानंतर त्याची पावलं हमखास ‘गांधी भवना’कडेच वळतात. दुसरं म्हणजे, काहीही काम नसतानादेखील, मुंबईत असताना, केवळ पक्षनिष्ठेचं दर्शन घडवावं, आपला चेहरा नेत्यांना दिसावा यापायी चारदोन दिवसांतून एकदा तरी या कार्यालयाची पायरी चढलीच पाहिजे, असंही अनेकजण मानतात. केवळ डोळे उघडे ठेवून गांधी भवनात पाहिलं, तरी अशा भावनेनं बसलेले चारदोन कार्यकर्ते दिसतातच..
मंत्रालयाच्या ‘आऊट गेट’मधून बाहेर पडलं, की समोरच्या सिग्नलला खेटून असलेल्या वाहतूक बेटात ‘हुतात्मा राजगुरू चौक’ अशी एक पाटी दिसते. त्या पाटीला उजवीकडे ठेवून फूटपाथवरून नाकासमोर दोनचार मिनिटं चाललं की, गांधी भवनाची चाहूल लागण्यास सुरुवात होते. रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या या पक्ष कार्यालयाबाहेर प्रदेश काँग्रेस कमिटीचा मोठा फलक आहे. आवारात आजूबाजूला, सरकारच्या अभिनंदनाचे, सरकारी योजनांचे मोठमोठे फलकही दिसतात. पण गेटातून आत गेल्यावरच ते नजरेस पडतात. फूटपाथवर उभं राहिलं, तर नवख्या माणसाला गांधी भवन लगेचच लक्षात येत नाही. पण तरीही, पत्ता विचारायची गरजच भासत नाही. दोनचार मिनिटं त्याच फूटपाथवर तसंच उभं राहिलं की, पांढरेशुभ्र परीटघडीचे कपडे, पांढऱ्या चप्पल किंवा पांढरे बूट घातलेली आणि ‘काँग्रेसी’ असल्याची पहिल्या नजरेतच खात्री पटावी अशा व्यक्तिमत्त्वाची माणसं आसपास दिसू लागतात. त्यांची पाठ धरून चालू लागावं, म्हणजे थेट गांधी भवनात दाखल होता येतं.. रस्त्यालगतच्या गेटजवळ उजवीकडे खाद्यपदार्थाचा अनेक वर्षांपासूनचा एक स्टॉल आहे. गेटातून आत शिरलं, की लगेचच उजवीकडे, झाडाखाली एका टेबलवर खादीच्या कापडाचे ढीग दिसतात. ही कापडं इथेच विकली जाणार, याची खात्री असलेला एक विक्रेता इथे बसलेला असतो. अचानक एखादी ‘स्कॉर्पिओ’ दिमाखात आत शिरते, झटक्यात रिव्हर्स घेऊन झाडाखाली विसावते, पांढरेशुभ्र कपडे घातलेली चारदोन माणसं गाडीतून उतरतात, स्वत:ला थोडंसं ठीकठाक करत केसांवरून कंगवा फिरवत संथ पावलांनी कार्यालयाच्या दिशेने चालू लागतात. पाठोपाठ दुसरी एखादी ‘क्वालिस’ किंवा ‘इनोव्हा’ येते, तशाच वेगात आत शिरते आणि आणखी पाचदहा जणांचा घोळका गाडीतून उतरून कडक इस्त्रीवाल्यांच्या मागोमाग नम्रपणे चालू लागतो.. राज्याच्या कुठल्याशा गावातून येणाऱ्या अशा पाचदहा गाडय़ा दररोजच या गेटातून आत शिरतात. गांधी भवनाला याची वर्षांनुवर्षांची सवयच आहे. आत शिरताच ‘काँग्रेसी संस्कृती’च्या अशा खाणाखुणा दिसू लागतात आणि मग समोरच्या फलकाकडे लक्ष जाते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं, म्हणजे राज्यातील सत्ताधारी काँग्रेसचं हे प्रदेश कार्यालय.. इथे राजकारण शिजतं. इथून पाझरत ते मंत्रालयात पोहोचतं. नंतर सरकारच्या माध्यमातून ते राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतं.. मग लगेचच, कार्यालयाच्या आसपास सरकारच्या अभिनंदनाचे, शुभेच्छांचे भव्य फलक लागतात.. समोरचा रस्ता कॉर्पोरेट संस्कृतीनं भारलेला असला, तरी राजकारणाचं हे रूप आता त्याच्याही सवयीचंच झालेलं आहे..
‘गांधी भवन’ हे काँग्रेसचं मुंबईतील एकमेव कार्यालय नाही. मध्य मुंबईत ‘टिळक भवन’ नावाचं आणखी एक कार्यालय आहेच. शिवाय, आझाद मैदानाजवळ मुंबई काँग्रेसचंही एक कार्यालय आहे. सामान्य माणसाचं या सर्व कार्यालयांशी फारसं जवळचं नातं नसतं.. पण राजकारणात मुरलेल्या काँग्रेसी कार्यकर्त्यांला मात्र, कोणत्या कामासाठी, कोणत्या दिवशी, कोणत्या कार्यालयात जायचं, याची पक्की माहिती असते. त्यामुळे, एखाद्या दिवशी गांधी भवनात भरपूर गर्दी दिसते, तर एखाद्या दिवशी गर्दीचा ओघ टिळक भवनाकडे लागलेला असतो. मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात मुंबईच्या काँग्रेसजनांची ये-जा सुरू असते. कारण, कोणता नेता कोणत्या दिवशी कोठे भेटणार, हे कार्यकर्त्यांला नेमकं माहीत असतं. मुंबईला निघण्यासाठी गाव सोडताना सगळी माहिती त्याने गोळा केलेली असते..
महाराष्ट्रात काँग्रेसनं एक गोष्ट कटाक्षानं पाळली, असं जाणकार नेहमी सांगतात. मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर प्रदेशाध्यक्षाचा अंकुश असलाच पाहिजे, असा जणू ‘दिल्लीश्वरां’चा दंडकच होता. युतीची सत्ता जाऊन काँग्रेसची सत्ता आली, विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा प्रभा राव, वायलर रवी या नेत्यांचा पक्ष कार्यालयावर प्रभाव होता. विलासरावांचे या नेत्यांशी फारसे पटलेच नाही. त्यामुळे, पक्षाची सत्ता असलेल्या मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावरचे हे पक्ष कार्यालय मात्र उपेक्षितासारखे केविलवाणेच दिसत होते. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले आणि राज्याच्या विकासात लक्ष घालण्याआधी त्यांनी गांधी भवनच्या विकासाला प्राधान्य दिले. मग या इमारतीचे रूपडे पालटले. पक्षाचेच एक पदाधिकारी असलेले वास्तुविशारद अनंतराव गाडगीळ यांच्या देखरेखीखाली या वास्तूचा कायापालट सुरू झाला आणि सरकार चालविणाऱ्या पक्षाचे कार्यालय म्हणून त्यावर दिमाखही चढला..
गांधी भवन हे कार्यालय मंत्रालयाशेजारी असल्याने इथे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा साडेसहापर्यंत वर्दळ सुरूच असते. अनेक पक्षांच्या कार्यालयांत दिसतात, तशाच या पक्षाच्या प्रशस्त कार्यालयातही, पदाधिकारी, प्रवक्ते आणि काही नेत्यांच्या केबिन्स आहेतच.. दररोज या सगळ्या केबिन्स उघडलेल्या नसतात, पण एखाद्या केबिनमध्ये एखादा पदाधिकारी किंवा नेता नेहमीच असतो.. प्रदेशाध्यक्ष आत असले की, गांधी भवनचा माहोलही वेगळाच असतो. दररोजची किंचितशी मरगळ झटकून हे कार्यालय जणू सळसळू लागतं. चहाचे कप रिते होत असतात. एखाद्या केबिनमध्ये शेजारच्या स्टॉलवरल्या डोसा-इडलीच्या प्लेट रिचविणे सुरू असते.. अध्यक्ष नसतील तेव्हा नेहमीचीच माणसं, निष्ठेनं कार्यालयात दाखल झालेली असतात. एकमेकांना ‘नेते’ म्हणून संबोधण्याची सहज सवय या कार्यालयातील गर्दीच्या अंगवळणी पडली आहे. कुणीतरी शेजारी बसलेल्या एखाद्याची हसत हसत ‘काय नेते’ म्हणून विचारपूस करू लागतो आणि ‘आम्ही कसले नेते, नेते हे’.. म्हणत, बाजूच्या एखाद्यालाही सोबत घेतलं जातं.  आणि सगळेच जण नेते होऊन जातात.. मग गप्पांना रंग चढतो, गावागावाच्या राजकारणाची उजळणीही होते.
गर्दी नसली की वातावरण तसं काहीसं सुस्तावलेलंच असतं. मग उगीचच ती सुस्ती न्याहाळण्यात बसण्याचाही कंटाळा येतो.. या कार्यालयात काँग्रेसी संस्कृती पुरेपूर रुजली आहे, हे तोवर स्पष्टपणे लक्षात आलेलं असतं. एखाद्या केबिनमध्ये कुणी पदाधिकारी बसलेलाच असतो. थोडीशी ओळख असलेला किंवा कुठली तरी ओळख काढून त्याच्यापर्यंत पोहोचलेला एखादा घोळका, केबिनबाहेर ताटकळत असतो. आत महत्त्वाची बैठक, चर्चा सुरू असावी असं या घोळक्याला वाटत असावं, असं त्यांच्या देहबोलीवरूनच लक्षात येतं. बराच वेळ गेला, की केबिनमधून बेल वाजते. कुणीतरी कर्मचारी घाईघाईनं केबिनचा दरवाजा अर्धवट उघडतो आणि बाहेर ताटकळलेल्या घोळक्याला आत जाण्याची खूण करतो.. आत दुसरं कुणीच नसतं.. पण घोळक्याला त्याचं काहीच वाटत नाही.. आपल्याला ताटकळावं लागलं, याचं त्याला वाईटही वाटत नाही..
आपल्याला बाहेर ताटकळत ठेवणारा, वाट पाहायला लावणारा हा नेतादेखील ‘वर’ कुठेतरी, अशीच वाट पाहात, ताटकळलेला असतो, याची त्यांना खात्री असते. ही खास आपल्या राजकारणाची संस्कृती आहे, हेही त्याला पक्के माहिती असते..