कोणालाही थांगपत्ता लागू न देता पाण्याखालून शत्रूच्या युद्ध नौकांच्या हालचालींवर नजर ठेवण्याची आणि प्रसंगी अकस्मात हल्ला चढविण्याची क्षमता राखणारे अतिशय महत्त्वाचे आयुध म्हणून पाणबुडीकडे पाहिले जाते. भारतीय नौदलाच्या भात्यात समाविष्ट  होणाऱ्या स्कॉर्पिन वर्गातील पाणबुडय़ांशी संबंधित दस्तावेज फुटले आणि काहीशा तशाच अनपेक्षित हल्ल्यास तिची बांधणी करणाऱ्या भारत व फ्रान्सला सामोरे जावे लागले. युद्ध केवळ रणभूमीवर लढले जात नाही तर असे आडवळणाचे बरेच मार्ग असतात. त्यात फ्रान्सची कंपनी लक्ष्य असल्याचे मानले तरी आपल्या पाणबुडय़ांची माहिती फुटणे भारतासाठी ‘विकतचे दुखणे’ ठरले आहे.

पाणबुडी बांधणी प्रकल्प

भारतीय नौदलाने १९९९ मध्ये आखलेल्या आराखडय़ानुसार २०१२ पर्यंत नव्याने १२ पाणबुडय़ा आणि २०२९ पर्यंत त्यांची संख्या दुप्पट म्हणजे २४ वर नेण्याचे नियोजन आहे. त्या अनुषंगाने फ्रान्सच्या ‘डीसीएनएस’ कंपनीच्या सहकार्याने भारत देशांतर्गत सहा स्कॉर्पिनवर्गीय पाणबुडय़ांची बांधणी करत आहे. भारतीय नौदलाच्या ‘७५ आय’ प्रकल्पांतर्गत २००५ मध्ये त्यासाठी उभय देशात करार झाला. साडेतीन अब्ज डॉलरचा हा करार आहे. प्रारंभीची काही वर्षे रखडलेल्या कामाने पुढे गती घेतली.

गेल्या मे महिन्यात देशांतर्गत बांधणी झालेल्या पहिल्या पाणबुडीचे चाचणीसाठी जलावतरण झाले. विविध चाचण्या यशस्वीपणे पार पडल्यानंतर या वर्षीच ती नौदलात समाविष्ट  होईल. या करारात ‘तंत्रज्ञान हस्तांतरण’ हा निकष समाविष्ट आहे. त्यामुळे आधुनिक स्वरूपाच्या पारंपरिक पाणबुडय़ांची स्थानिक पातळीवर बांधणी करण्याची भारताची क्षमता वृद्धिंगत होण्यास हातभार लागेल.

स्कॉर्पिनची वैशिष्टय़े

शत्रूला आपला सुगावा लागू नये याकरिता या पाणबुडीच्या आकृतीपासून ते इंजिनाच्या कंपनींपर्यंत अशा सर्व पातळीवर विचार करण्यात आला आहे. पाण्याखाली अतिशय गुप्तपणे संचार करणारी ही पाणबुडी अचूक लक्ष्यभेदाची क्षमता राखते. खोल पाण्यातून अथवा पृष्ठभागावरून जहाज विरोधी क्षेपणास्त्र डागण्यासाठी तिच्यात दोन स्वतंत्र व्यवस्था आहे. पृष्ठभागावर कारवाई, पाणबुडीविरोधात कारवाई, पाण्याखाली लपून शत्रूच्या प्रमुख जहाजांची माहिती काढणे, पाण सुरुंगांची पेरणी, विशिष्ट भागात टेहळणी आदी कामे करण्यास ती सक्षम आहे. उच्च दर्जाच्या युद्ध व्यवस्थापन यंत्रणेने तिचे सामथ्र्य वाढविले आहे. शस्त्र सहजपणे डागण्यास सज्ज करता येईल, हेदेखील तिचे वेगळेपण.

दस्तावेज फुटल्याने काय होईल?

‘स्कॉर्पिन’शी संबंधित २२ हजार ४०० पाने माहिती फुटल्याचे सांगितले जाते. ही बाब फ्रान्सच्या युद्धसाहित्य महासंचालकांसमोर मांडली गेली. पाणबुडीशी संबंधित माहिती फुटण्याच्या घटनेत भीती बाळगण्यासारखे काही नसल्याचा दावा करत संरक्षण मंत्रालयाने काही गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. दुसरीकडे फ्रेंच कंपनीने ही माहिती चोरीला गेल्याचा पवित्रा घेतला. या फुटीमागे स्पर्धक कंपन्यांचा हात असल्याची साशंकता व्यक्त केली जाते. कारण काहीही असले तरी दोन राष्ट्रांमधील महत्त्वाच्या करारातील संवेदनशील लष्करी सामग्रीचा तांत्रिक तपशील, युद्धात्मक क्षमता, विशिष्ट वेगात आवाजाची तीव्रता, खोली गाठण्याची क्षमता आणि मारक क्षमतेचा तपशील सार्वजनिक होणे चांगले लक्षण नाही. या प्रकल्पावर प्रचंड निधी ओतून तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यातही येत आहे. माहिती किती प्रमाणात फुटली याची स्पष्टता होईपर्यंत तंत्रज्ञानाविषयी संदिग्धता राहील. सद्य:स्थितीत हा प्रकल्प अशा टप्प्यावर आहे की, या करारातून माघारी फिरणेही भारताला कदाचित महागात पडू शकते. बांधणी प्रक्रियेत असणाऱ्या पाणबुडय़ांमध्ये काही बदल करून खबरदारीचे उपाय योजण्यावर भर दिला जाईल. दोन वर्षांत ‘झपाटय़ाने विस्तारलेले आंतरराष्ट्रीय संबंध’ जपण्यासाठी हाच पर्याय स्वीकारला जाण्याची शक्यता आहे.

 

संकलन- अनिकेत साठे