देशातील नव्हे तर जगभरातील कारागृहांची कहाणी साधारण  सारखीच आहे. क्षमतेपेक्षा तिप्पट-चौपट कैद्यांचा भरणा, तुरुंगातील अपुरे मनुष्यबळ, कैद्यांमध्ये होणारे संघर्ष, निकृष्ट दर्जाचे जेवण, कैद्यांना विविध ‘सोयीसुविधा’ पुरवण्यासाठी होणारे अर्थपूर्ण व्यवहार, क्षुल्लकचुकीसाठी वर्षांनुवर्षे खितपत पडलेले कच्चे कैदी, न्यायालयांतील प्रलंबित खटल्यांच्या वाढत्या संख्येमुळे निकाल लागण्यास होणारा विलंब, कैद्यांच्या आरोग्याची हेळसांड.. आणि बरेच काही. ही स्थिती अनेक वर्षांत बदललेली नाही. गेल्या आठवडय़ात भायखळा तुरुंगात मंजुळा शेटय़े या महिला कैद्याचा अमानुष मारहाणीत मृत्यू झाल्याने तुरुंगातील कैद्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. याप्रकरणी कारागृहातील सहा महिला कर्मचाऱ्यांना अटक झाली तर स्वाती साठे या वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर टीका सुरू झाली. या पाश्र्वभूमीवर उंच दगडी भिंतींआड दडलेल्या कारागृहातील वास्तवाचा लेखाजोखा..

५०० कैदी.. दोन पोलीस!

एकेका बरॅकमध्ये आठशेपर्यंत कैदी खचाखच भरलेले. मारहाणीपासून, फसवणूक, खून, दरोडा, बलात्कार.. अशा एकापेक्षा एक गंभीर गुन्ह्य़ांमध्ये अटक झालेल्या आरोपींची, त्यांच्यातल्या गुन्हेगारी प्रवृत्तीची सरमिसळच. पण कारागृहातल्या बराकींत ठासून भरलेल्या कैद्यांना काबूत ठेवण्याची जबाबदारी फक्त तिघा जणांवर. दोन रक्षक (गार्ड) आणि एक अधिकारी यांच्यावर. प्रसंगी स्वसंरक्षण करायला या तिघांकडे ना पिस्तुल, ना रायफल. फक्त काठी..

मुंबईतल्या आर्थर रोड या मध्यवर्ती कारागृहातली ही परिस्थिती.

एरव्ही मुंबईच्या रस्त्यावर एवढा जमाव गोळा झाला, एखादा मोर्चा निघाला तर बंदोबस्तासाठी पन्नासेक पोलिसांचा बंदोबस्त असतो. या मोर्चात एखादी अतिमहत्त्वाची व्यक्ती असेल तर बंदोबस्त आणखी वाढतो. एखाद-दुसरा वरिष्ठ अधिकारी हमखास दिसतो. पण मुंबईत गुन्हे केलेल्या आरोपींच्या जमावासमोर तीनच पोलीस. नियमांनुसार दर सहा कैद्यांमागे एक रक्षक असं प्रमाण आहे. पण आज आर्थररोड कारागृहात एका रक्षकावर किमान ४००-५०० कैद्यांची जबाबदारी असते.

ब्रिटिश राजवटीत बांधलेलं हे कारागृह. ब्रिटिशांनीच घालून दिलेल्या नियमांप्रमाणे आजही पहाटे पाचच्या सुमाराला जागं होतं. संध्याकाळी सातनंतर हळूहळू झोपी जातं. सकाळी ११ आणि संध्याकाळी सातला जेवणाचा थाळा कैद्यांसमोर येतो. त्याआधी नाश्ता, फळं आणि दूध. दोन्ही वेळी साधारण दोन ते तीन तास कैद्यांना कोठडीतून बाहेर मधल्या आवारात मोकळं सोडलं जातं. नंतर ‘गिनती’ करून त्यांना कोठडीत बंद केलं जातं. याला ‘बंदी झाली’, ‘बंदी उठली’ असं म्हणतात. बंदी उठल्यावर कैद्यांना कॅरम, बुद्धिबळ या बैठय़ा तर फुटबॉल, व्हॉलीबॉल या मैदानी खेळांची मुभा आहे. प्रत्येक कोठडीत टीव्ही आहे, पण त्यावर फक्त सरकारी वाहिन्या. कारागृहात एफएम रेडीओही चालवला जातो. कैद्यांपैकीच एक जॉकी, त्यांच्यातलेच कलाकार आणि तेच श्रोते. विपश्यना, योगसाधना, व्यायामाचे तासही नियमित चालतात. अधूनमधून बाहेरच्या कलाकारांना बोलावून मनोरंजनाचे कार्यक्रमही केले जातात.

ही व्यवस्था असली तरी कैद्यांचं मन रमत नाही. बंद झाल्यानंतर बाहेरच्या जगाशी त्यांचा संबंध, संपर्क तुटतो. रक्ताच्या, जीवाभावाच्या माणसांना भेटण्याची ओढ असते. कुटुंबकबिल्याचा, खटल्याच्या निकालाचा विचार अस्वस्थ करून सोडतो. न केलेल्या गुन्ह्य़ात कारागृहात आलेल्यांची तर आणखीच वाईट अवस्था. माणूस चारही बाजूने बंदिस्त होतो. काही केल्या इथून त्याला सुटायचं असतं. मग खटल्याच्या तारखेला नियमितपणे जाता यावं, काही क्षणांसाठी का होईना पण मोकळ्या हवेत फिरता यावं, त्यानिमित्ताने न्यायालयात आलेल्या कुटुंबाला भेटता यावं यासाठी कैदी धडपडतो. आत दोन वेळचं चांगलं जेवण मिळावं ही त्याची इच्छा असते. या प्रमुख इच्छा, मागण्या जेव्हा पूर्ण होत नाहीत तेव्हा संघर्षांला सुरुवात होते.

कारागृहाचे अधीक्षक हर्षद अहिरराव सांगतात, मुळात कैद्याला राग असतो गुन्हा घडवणाऱ्या परिस्थितीचा, निष्कारण गुंतवणाऱ्याचा, अटक करणाऱ्या पोलिसांचा, खटल्याची सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीशाचा, आठवडय़ातून एकदाच एकाच नातेवाईकाची भेट हा नियम बनवणाऱ्याचा आणि आपल्या या परिस्थितीसाठी जबाबदार असलेल्या प्रत्येकाचा. तो सगळा राग कारागृहातल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निघतो.

क्षमतेनुसार पोलीस मनुष्यबळ आणि क्षमतेच्या चौपट कैदी आर्थररोडमध्ये आहेत. साप्ताहिक रजा, या ना त्या निमित्ताने सुटी घेणारे, सव्वाशे सीसीटीव्ही कॅमेरे, त्याचा नियंत्रण कक्ष, अतिसुरक्षित कोठडय़ा, टेलीमेडिसिन, संगणकीकरण, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग या सर्व उपक्रमांमध्ये कारागृहातलं जवळपास निम्मं मनुष्यबळ खर्ची पडतंय. प्रत्यक्षात उरलेल्या निम्म्या मनुष्यबळावरच साधारण तीन हजार कैद्यांचा भार आहे.  वॉर्डन मंजुळा शेटय़ेच्या हत्येनंतर भायखळा कारागृहात २५० महिला कैद्यांनी धुमाकूळ घातला. आर्थररोडमध्ये तर तीन हजार कैदी आहेत. तशीच परिस्थिती इथे निर्माण झाली, तर बरॅक बाहेर हातात काठी घेऊन उभ्या असलेल्या दोन शिपाई, एका अधिकाऱ्याची काय अवस्था होईल? वेळोवेळी कारागृह विभागाने मनुष्यबळ अपुरं पडतंय, वाढवा, अशा अर्ज-विनंत्या गृहविभागाकडे केल्या आहेत. पण त्याबाबत गृहविभाग फारसा गंभीर दिसत नाही. कारागृहातल्या प्रत्येक जबाबदारीवर मनुष्यबळ अपुरं असल्याने परिणाम होतो. उद्या काही उलटं सुलटं घडलंच तर पहिला बळी आमचा जाणार, पोटावर लाथ आमच्या बसणार, विभागीय चौकशी, निलंबनाची कारवाई आमच्यावर होणार, अशी प्रतिक्रिया इथल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमधून उमटते.