ज्ञानार्जन होते अशा आश्रमांच्या वनांवरही राजाचा हक्क नाकारणाऱ्या या संस्कृतीने समानी व आकूतिअसे समष्टीचिंतन मांडून पाश्चात्त्य राष्ट्रवादातील कोतेपणा उघड केलेला आहेच.. तेव्हा शिक्षणात स्वदेशीकरणहवे अशा आवाहनांचे स्वागतच करताना, स्वदेशीकरण म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे की नाही हे तपासायलाच हवे. अशा आत्मपरीक्षणातूनच तर आत्मभान जागे होत असते, म्हणून हे चिंतन..

दिल्ली विद्यापीठात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्थांनी अलीकडेच आयोजिलेल्या एका कार्यशाळेत ५० कुलगुरूंसह एकंदर ७०० हून अधिक विद्यापीठस्तरीय अध्यापकांनी राष्ट्र आणि शिक्षण यांच्याप्रति आपली अमीट वचनबद्धता दाखवून दिली. देशातील शिक्षणात आज ‘भारतीयतेचा अभाव’ असल्याबद्दल चर्चा घडवून आणणे आणि भारतकेंद्री स्वायत्त विचारांना चालना देणे हा हेतू या कार्यशाळेतून दिसला. यातून शिक्षणाचे स्वदेशीकरण होणार असेल, तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. कारण खरोखरीचे स्वदेशीकरण जर आपल्याला हवेच असेल तर पुढील बदल घडू शकतात:

पहिली बाब : आपण आपल्या सर्व उच्चशिक्षण संस्था पुन्हा पूर्वी होत्या तशा स्वायत्त करू. गुरुकुलापुढे राजाचे काही चालत नसे, यास स्मरू. (राजाला आश्रमाभोवतीच्या, ऋ षिवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनात शिकार करण्याचीही अनुमती नसे, हे आठवते ना?) ज्ञानार्जनाच्या संस्थांवर सार्वभौम सत्तेचाही हुकूम चालणार नाही; या संस्थांत लिहिले/ बोलले जाणाऱ्या विचारांना  कुंपणे नराजकीय चढेलपणाचे येथे काहीही काम नाही. ‘झेंडे फडकावण्याचा ज्ञानार्जनाच्या जागांशी संबंधच काय?’ असा सवाल कोणतीही स्वायत्त ज्ञानसंस्था करू शकेल, असे स्वदेशीकरण या देशात पुनस्र्थापित व्हायला हवे.

दुसरी बाब : ज्ञानार्जन हे मारक राष्ट्रवादापासून आपण मुक्त ठेवू शकू. जरा विचार करून पाहा, राष्ट्रवादाचे तत्त्वज्ञानच किती अ-भारतीय आहे. जी (भारतीय) संस्कृती अहंकार आणि ‘स्व’ यांच्या मर्यादा ओलांडण्याचीच शिकवण देणारी आहे, तिच्यात अहंकाराऐवजी सामूहिक आत्मरततावाद आणि ‘स्व’ऐवजी ‘(राष्ट्रापुरताच) समूह’ असा तकलुपी फेरफार करण्यात काहीही अर्थ नाही. हे अगदी खरे की, राजकीय आणि नागरिकशास्त्रीय हेतूंसाठी काहीएक स्वरूपात समूहनिष्ठा हवीच. पण राष्ट्रवादात जो अहंकार अनुस्यूत आहे, जो व्यक्तित्व आणि बहुविधता यांना बेमुर्वतपणे गिळंकृत करतो, जो अखेर राष्ट्राची प्रज्ञाक्षितिजेच बंदिस्त करतो, तो आपल्या ध्येयांचे (ऋ ग्वेदात या‘ध्येयां’साठी एक उत्तम शब्द आहे : आपणा सर्वाच्या ‘आकूति’) क्षुद्रीकरणच करणारा होय.

तिसरी बाब : शिक्षणाच्या वा ज्ञानार्जन-ग्रंथाध्ययनाच्या ‘भारतीय परिसर्गा’त खोलवर रुजलेल्या तिरस्कारमूलकतेशी लढून, तिला आपण तिलांजली देऊ शकू. या तिरस्कारमूलकतेचे दोन स्रोत आहेत. अत्यंत मूलगामी प्रबुद्धतेच्या (पाश्चात्त्य परंपरेतील इंग्रजीत प्रबुद्धतेला ‘इंटलेक्च्युअलिझम’ एवढेच म्हणतात) आपल्या गतपरंपरांची सांगड जन्माधारित जातिव्यवस्थेसारख्या – सामाजिक उतरंडीच्या सर्वात दुष्टबुद्धीच्या व्यवस्थेशी बसलीच कशी? हा प्रश्न आपण निडरपणे सोडवू शकू. होय, एके काळी (चातुर्वण्र्यकाळात) ही उतरंड प्रवाही होती, कप्पेबंदीला नेहमीच आव्हाने दिली गेली. परंतु जन्माधारित जातिव्यवस्थेच्या कप्पेबंदीमुळे- त्यातून पुढे आलेल्या अनिवार्य अस्मितांच्या दबावामुळे आणि जातिसमूहांच्या जाचा-काचापुढे लोक इतके दबले की, आपल्याला आपली ती मुक्त व मूलगामी प्रबुद्धता पुन्हा प्रस्थापित करणे आजही जड जाते आहे.

आपली आध्यात्मिक धारणा सहिष्णूच राहाते आणि समाजधारणेतील असहिष्णुता मात्र आपली ‘गरज’ म्हणून कायम राहत जाते, हे कसे काय आणि का घडले, याचा विचार आपण केला पाहिजे. (निषादाचे) क्रौर्य दिसले, म्हणून रामायणासारखे आदिकाव्य उमटले. पण आपल्याच समाजरचनेकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्यातील क्रौर्य आपल्याला कसे काय दिसत नाही, हे गूढ भारतीय (स्वदेशी) शिक्षणाने उलगडू शकेल. (जातिव्यवस्थेत अनुस्यूत असलेल्या क्रौर्याकडे काणाडोळा हा शिक्षणातील तिरस्कारमूलकतेचा पहिला स्रोत).

दुसरा स्रोत काहीसा व्यामिश्र आहे. वसाहतवादाने इथल्या अनेक विद्यांचे दमनच केले, त्यांना जणू अविद्याच ठरविले आणि ज्ञानलक्ष्यी टीकेऐवजी डाव्या विचारधारेतच वाहावलेल्या काही जणांनी विद्यादमनाच्या या चुकीची भलामणच केली. पण हा आपल्या ज्ञानदुर्दशेचा निव्वळ एक लहानसा भाग, असे हजारीप्रसाद द्विवेदी नेहमी सांगत, तेही खरेच. मग सत्य हे की, (वसाहतवादाने)आपण आतूनच पोकळ होत गेलो होतो आणि त्यामुळेच निव्वळ सनातनविश्वासांच्या घोकंपट्टीत समाधान मानून, एक प्रकारे कर्दमस्नानी झालो होतो. आज हिंदुत्ववादी जाहीरपणे ऑक्सफर्ड किंवा हार्वर्डबद्दलचा त्यांचा साचलेला संताप व्यक्तही करतात. पण अशा संतापाचे स्वागत सावधचित्त राहूनच केलेले बरे. या ऑक्सफर्डी हार्वर्डी पीठांना पुरून उरेल, असे विश्वविद्यालय आपण १९ व्या शतकापासून आजतागायत का निर्माण करू शकलो नाही, हा अधिक खोलवरचा प्रश्न ओळखून तो विचारला जात नाही, हे मात्र ऑक्सफर्ड- हार्वर्डवर टीका करणारांचे अपयश म्हणावे लागेल.

त्या प्रश्नाचे एक सरळ उत्तर आहे. युरोपातील आणि अमेरिकेतील अनेक विद्यापीठे अगोदर धर्माधारित शिक्षणसंस्था म्हणूनच सुरू झाली; पण पुढील काळात त्यांनी आधुनिक ज्ञानाच्या खाणी असा लौकिक मिळवण्याइतपत स्वतचा कायापालटही केला. इथे थोडे थांबून ‘अगा जे घडलेचि नाही’ त्याविषयी चर्चा करू. कल्पना करा की समजा, शृंगेरी मठ किंवा तिरुपतीसारख्या अनेक धनाढय़ न्यासांनी गेल्या दोन शतकांमध्ये मुक्तता आणि उत्कृष्टता यांचा ध्यास घेणारी नवी ज्ञानकेंद्रे- जेथे ‘बाहेरच्यां’चेही स्वागतच आहे, जेथे ज्ञानाच्या आधुनिक प्रवाहांमुळे सामाजिक सनातनवादी धारणांची आणि ढुढ्ढाचार्यी विश्वासांची पुटे नाहीशी होतात अशी नवज्ञानसंपुटे उभारली असती, तर कदाचित भारतीय ज्ञाननिर्मितीचा इतिहासच बदलून गेला असता.

ब्रिटिशांनी किंवा डाव्यांनी आपले किती नुकसान केले हा मुद्दा असू नये.. मुद्दा हा असावा की आपण आपले काय करून घेतले. थोडक्यात, आपल्याच दोन तऱ्हेच्या असुरक्षितांमुळे आपण वितंडवादी राष्ट्रवादाकडे कसे ढकलले गेलो, याचा निडरपणे विचार करण्याची आणि त्या दोन्ही असुरक्षितांशी लढून जिंकण्याची एक संधी स्वदेशीकरणामुळे मिळणार आहे. आपल्या समाजरचनेतील क्रौर्य मान्य करून दोषारोप स्वीकारण्यास  तसेच प्रबुद्धतेवर चढलेली मद्दडपणाची पुटे ओळखण्यातील अपयश मान्य करण्यास आपल्याला असुरक्षित वाटते, या आपल्या असुरक्षिततेच्या दोन तऱ्हा. जातिव्यवस्थेतून बाहेर पडण्यास आपण तयार तरी असतो, पण राष्ट्रवादाच्या संकल्पनेचे आपण स्वीकारलेले स्वरूप मूलत अभारतीय असूनही, आपल्याला आपले दोष दुसऱ्यांवर ढकलण्यासाठी तोच राष्ट्रवाद उपयोगी पडतो.  तिरस्कार पुढे चालू ठेवण्यासाठी आपण स्वीकारलेल्या ढोंगबाजीतून आपण जर मुक्त झालो, तर आणि तरच खरेखुरे स्वदेशीकरण रुजेल आणि तगेल.

दुसऱ्यांशी लढण्याइतकेच स्वतशीही लढलो, तर आपले स्वदेशीकरण बावनकशी ठरेल. जर स्वदेशीकरणाची आपली आवाहने कावेबाज असतील तर पुढील प्रश्न जरूर विचारले जावेत : काय म्हणजे भारतीय? त्याची व्याख्या कोणी करावी? पाश्चात्त्य संकल्पनांचे काय करायचे? या प्रश्नांना अरोबिंदो भिडले होते. त्यांचे म्हणणे असे की,  ‘आपल्या अस्तित्वाकडे आपण कसे पाहायचे हा आपला प्रश्न आहे. आपले दमन पाश्चात्त्यांनी केले, याला आपण महत्त्व देणार आणि एक प्रकारे पाश्चात्त्य भूमिकाच स्वीकारणार, की त्या भूमिकेपासून दूर जाऊन, ‘होय- पण त्यामुळे आपल्यात काही अपरिहार्य बदलही रुजवले गेले’ हे मान्य करणार (मान्य करून पुढे जाणार)? माणसाला कालचक्र उलटे तर फिरवता येणार नाही. ’ याच अरोबिंदो यांनी ‘इस्लामने भारताचे भरणपोषण केले आणि भारतानेही इस्लामचे भरणपोषण केले’ असे म्हटले होते, त्यातील सत्य आपण जाणणार आहोत का? की आपल्याला गोळवलकरांनी म्हटल्याप्रमाणे, ‘अहिंदूंनी एक तर देशाबाहेर जावे किंवा हिंदुराष्ट्रात दुय्यम नागरिक म्हणून राहावे’ एवढे  पुरेसे वाटते? स्वदेशीकरण खरोखरच करायचे तर अख्ख्या देशाचे करावे लागेल.. देशाच्या थोडय़ाथोडय़ा भागांचे नव्हे. तेव्हा जर या स्वदेशीकरणाने पाश्चात्त्य आणि इस्लाम, अघोरी आणि तांत्रिक, मार्क्‍सवादी आणि उदारमतवादी असे सारेजण भारतीय म्हणून स्वीकारले, तर ते खरे स्वदेशीकरण ठरेल.

असे स्वदेशीकरण झाल्यास त्याचा लाभ केवळ एकच नसून अनेक असतील. आज जे संस्कृतीचे स्वघोषित रखवालदार दिसतात, तसे नसणाऱ्यांचीही झुंडमर्दुमकी दिसते आणि समलिंगींसारख्या ‘इतरां’चा तिरस्कार तर दिसतोच दिसतो, त्या साऱ्यांनाच बरे करण्याचा गुण भारतीय संस्कृतीत आहे, तो उपचार भारतीय संस्कृतीची ओळख सखोलपणेच करून देणारे स्वदेशीकरण झाल्यास जरूर लागू पडेल.  आत्मभान जागे ठेवले, तर भारतीय ज्ञान- ‘भारतीय’ वैचारिकता म्हणजे काय हे ओळखता येईल. अर्थात, आज शिक्षणात राष्ट्रवाद आणू पाहणाऱ्या पहारेकऱ्यांना असे आत्मभानानंतरचे सत्य हाताळता येईल की नाही ते माहीत नाही.

 

– प्रताप भानू मेहता.

( लेखक दिल्लीस्थित सेंटर फॉर पॉलिसी रीसर्चचे अध्यक्ष असून इंडियन एक्स्प्रेसमध्ये त्यांचा मूळ इंग्रजी लेख २९ मार्च रोजी प्रकाशित झाला होता)