05 August 2020

News Flash

व्यक्तिस्वातंत्र्याचा खंदा शिपाई

कादंबरीकार किरण नगरकर यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या निकटतम मित्राने जागवलेल्या या आठवणी..

(संग्रहित छायाचित्र)

अच्युत वझे

किरण नगरकरला मी पहिल्यांदा भेटलो ते त्याच्या पहिल्या कादंबरीच्या छोटेखानी वाचनाच्या कार्यक्रमाला.. डॉ. श्रीराम लागू यांच्या घरी. कादंबरीचं नाव होतं ‘सात सक्कं त्रेचाळीस’! भन्नाट प्रकार होता. त्याला कादंबरी म्हणायची की नाही, इथपासूनच चर्चा सुरू झाली. आम्ही सात-आठ मंडळीच होतो, पण चर्चा भरपूर रंगली. मला आठवतं, शांता गोखले, रेखा सबनीस, दीपा श्रीराम आदी मंडळीही उपस्थित होती. शांता भक्कमपणे लेखकाच्या बाजूनं बोलली. माझं ‘चल रे भोपळ्या’ हे नाटक तेव्हा बऱ्यापैकी चर्चेत होतं व मीही काही बोलावं अशी अपेक्षा होती. पण ‘सात सक्कं त्रेचाळीस’सारखा वेगळाच प्रकार मी पहिल्यांदाच ऐकला होता आणि माझ्या तोंडातून एक अक्षरही बाहेर आलं नाही, एवढं मला नक्कीच आठवतं. नंतर मी ती कादंबरी दोनदा वाचली, पण तिच्याभोवतीचं एक अद्भुत आकर्षक असं कवच कायमच राहिलं.

नाटकवाल्यांची एक जुनी खोड होती. नाटककाराला नाटक वाचायला प्रेमानं बोलवायचं आणि नाटक  वाचून झाल्यानंतर त्याच्यावर तुटून पडायचं. त्यावेळी प्रायोगिक नाटय़संस्थांमध्ये जातीभाव नसायचा. मी ‘उन्मेष’चा, मी ‘आविष्कार’चा, मी ‘अभिव्यक्ती’चा असं फारसं नसायचं. एकदा असंच किरण नगरकरनं ‘बेडटाइम स्टोरी’चं नाटय़वाचन केलं. ज्यांना ते नाटक पचलं नाही ते मध्येच उठून गेले. पण ज्यांना भावलं, त्यांनी ते डोक्यावर घेतलं. नाटकात अर्जुन, द्रौपदी, कृष्णासह महाभारतातील पात्रं होती. पण सर्व पात्रांचा आणि कथानकाचा लावलेला अर्थ हा खास किरणचा होता. उपहासपूर्ण, अश्रद्ध (irreverent) आणि बिनधास्त. सरकारी सेन्सॉर बोर्ड तर सोडाच; पण सर्व तथाकथित धर्मनिष्ठ पक्ष आणि यंत्रणा एकत्र येऊन ‘या नाटकाचे प्रयोग आम्ही होऊच देणार नाही’ अशी भूमिका घेऊन उभ्या राहिल्या. आणि या नाटकाचे प्रयोग व्हायलाच पाहिजेत, अशी आम्हा सर्वाची भूमिका. पुढाकार रेखा सबनीस, पाठिंबा डॉ. श्रीराम लागू, प्रस्तुतकर्ते ‘उन्मेष’ आणि ‘अभिव्यक्ती’.. अशी मंडळी एकत्र येऊन या नाटकाच्या अभिवाचनाचे प्रयोग करायचं ठरलं. डॉ. लागूंसह वेगवेगळ्या अभिनेत्यांनी नाटकातल्या वेगवेगळ्या भूमिका ‘वाचल्या’! असे पंधरा-वीस वाचनाचे प्रयोग आम्ही करू शकलो. या सर्व प्रकारात किरणची भूमिका फक्त लेखकाची नव्हती, तर चळवळीत उत्साहानं वाहून घेतलेल्या एका कार्यकर्त्यांसारखी होती.

किरणचं मला सगळ्यात भावलेलं पुस्तक म्हणजे- ‘रावण अ‍ॅण्ड एडी’! किरणच्या लिखाणातली सूक्ष्म धार आणि त्याबरोबरच एक वेगळ्याच प्रकारचा विनोद या कादंबरीत जागोजागी आढळतो. मराठी वाचकाला आणि प्रेक्षकाला ‘चाळ’ ही संस्कृती जवळून माहितीय. तरीही ‘रावण अ‍ॅण्ड एडी’मध्ये येणारी चाळ, त्या चाळीतली पात्रं आणि त्यांची नाती आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. किरणच्या मूळ इंग्रजी अवतारात किंवा रेखा सबनीसनं केलेल्या मराठी अवतारात दोन्हीकडे असाच अनुभव येतो.

किरणला अनेक प्रकारच्या ‘अ‍ॅलर्जी’ होत्या. त्यामुळे त्याच्या अनेकदा इस्पितळाच्या वाऱ्या होत असत. पण तरीही तो मित्रांबरोबर गप्पा मारायला आणि पार्टी करायला एका पायावर तयार असे. त्यानं आपल्या तब्येतीचा कधीच बाऊ केला नाही. एकदा आम्ही किरण इस्पितळात असताना ‘इरॉस’मध्ये सिनेमा पाहायला गेलो होतो. मध्यांतरात आम्हाला तो थिएटरमध्ये दिसला! आम्ही विचारलं, ‘तू हॉस्पिटलमध्ये होतास ना? इथं कसा काय?’ तर त्यावर त्याचं उत्तर.. ‘काही नाही रे. कंटाळा आला. पळून आलो!’

किरणनं ‘ककल्ड’ या त्याच्या गाजलेल्या कादंबरीनंतरही बरीच पुस्तकं लिहिली. त्यांचं मूल्यमापन मी करू शकत नाही. पण एक मात्र म्हणावंसं वाटतं- एवढा निर्भीडपणे, कुणाची आणि कशाचाही पर्वा न करता स्वत:ला जे भावलं, पटलं आणि सांगावंसं वाटलं, ते हिमतीनं सांगणारा.. आणि तेही एका झकास विनोदाच्या फोडणीसह.. असा लेखक विरळाच!

जे किरणनं साहित्यात मांडलं, ते प्रत्यक्ष आयुष्यातही तितक्याच आग्रहानं मांडलं. कुठंही त्याला दांभिकता दिसली किंवा धर्माधतेचा वास जरी आला तरी आपल्या खास शैलीत उपहासगर्भ टिप्पणी करायला किरण कधीच मागं राहिला नाही. आणि या भूमिकेमागं कुठलाही राजकीय किंवा सामाजिक आव नव्हता. त्याचा प्रत्येक विचार, प्रत्येक टिप्पणी नेहमीच उत्स्फूर्त आणि खरी असायची.

दुर्दैवानं त्याला ‘#मी टू’च्या वावटळीत अडकवलं गेलं. खरं-खोटं त्याला आणि त्या वावटळीत अडकलेल्या इतरांनाच माहीत. माझा त्यावर कधीच विश्वास बसला नाही. पण ते महत्त्वाचं नाही. मला दु:ख याचं वाटतं, की काही नावाजलेल्या विचारवंतांनी त्याच्या अलीकडच्या साहित्याला या ‘#मी टू’च्या वावटळीत सापडल्यामुळे वाचायलाही नकार दिला, याचा. कलाकृती आणि कलाकारांवर असलेले वैयक्तिक आरोप यांत आपण अजूनही फरक करीत नाही. जाँ जेनेटसारखा गुन्हा सिद्ध झालेला गुन्हेगार जगभर साहित्यिक म्हणून मानला जाऊ शकतो; पण आपण फक्त आरोप झाले म्हणूनही त्या लेखकालाच नाही, पण लेखकाच्या साहित्यालाही निषिद्ध मानतो, हे सपशेल चुकीचं आहे. मात्र, एक संवेदनशील साहित्यिक आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा खंदा शिपाई वा एक ‘लिबरल फंडामेंटालिस्ट’ म्हणून आज आपण किरणचं कौतुक तरी करू शकतो.

आता एक मित्र म्हणून आपण त्याची केवळ आठवणच काढू शकतो. किरण, तुलसी आणि बरोबर इतर मित्रमंडळी अशा रंगलेल्या बैठकीच्या आठवणी हा खरंच आमच्या सर्वाचाच एक आवडता ठेवा आहे. स्वत:च्या तब्येतीच्या बाबी बाजूला ठेवून, मुंबईतील अंतरं, ट्रॅफिक आणि प्रदूषण यांचा विचार न करता प्रेमानं आणि आग्रहानं किरण व तुलसी  आमच्याकडे येत राहिले. अगदी शेवटच्या हॉस्पिटलच्या वारीच्या आदल्या दिवसापर्यंत! आणि किरणला ‘जनरेशन गॅप’ची अडचण कधीच पडली नाही. त्यानं आमच्या चिनूला काय किंवा अरुण-मीना (नाईक)च्या शारीवा-मनवाला काय, जितकं प्रेम दिलं, तेवढंच त्यांनीही किरणवर केलं!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2019 1:55 am

Web Title: individual liberty author and novelist kiran nagarkar memoires article abn 97
Next Stories
1 चाँदनी चौकातून : दिल्लीवाला
2 सर्वकार्येषु सर्वदा २०१९ : मृत जलस्रोतांना संजीवनी
3 सर्वकार्येषु सर्वदा २०१९ : इथे सापडतात नव्या वाटा..
Just Now!
X