भारत-पाकिस्तान संबंधांमधील सर्वात दुखरी नस असलेला काश्मीर प्रश्न स्वातंत्र्यानंतर सहा दशकांनंतरही चिघळत आहे. जम्मू-काश्मीरचे भारतातील सामीलीकरण पाकिस्तान अद्याप मान्य करायला तयार नाही आणि ते कायमचे बळकावण्यासाठी सतत काही ना काही कुरापती काढत आहे. तर १९४७ साली पाकिस्तानने बळकावलेला जम्मू-काश्मीरचा भूभाग, जो आज आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणून आळखतो, तो मुक्त करायचा राहून गेल्याची सल आपल्याकडील राष्ट्रवाद्यांना अजूनही टोचत आहे. ज्या लढाईने उरलेले काश्मीर पाकिस्तानच्या हातात पडण्यापासून वाचवले त्याची ही कहाणी, त्या लढाईतील कर्नल हरवंत सिंग (निवृत्त) या वीर योद्धय़ाचे नुकतेच निधन झाल्याच्या निमित्ताने..
दुसऱ्या महायुद्धातील पराक्रमाबद्दल ब्रिटिशांतर्फे ‘मिलिटरी क्रॉस’ या शौर्यपदकाने गौरविले गेलेले कर्नल हरवंत सिंग (निवृत्त) यांचे ४ ऑगस्ट २०१५ रोजी पंजाबमधील पतियाळा येथे वयाच्या ९५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. जम्मू-काश्मीरवर ताबा मिळवण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९४७-४८ साली झालेल्या युद्धात त्या वेळी मेजर असलेल्या हरवंत सिंग यांच्या तुकडीने (शीख रेजिमेंटच्या पहिल्या बटालियनमधील ‘डी’ कंपनी) जो पराक्रम गाजवला त्यामुळे श्रीनगर पाकिस्तानच्या हाती पडण्यापासून वाचले. त्यांच्या निधनाने या धगधगत्या इतिहासाचा नुसता साक्षीदार असलेला नव्हे तर त्याचा शिल्पकार ठरलेला एक दुवा निखळला आहे.
भारताला ऑगस्ट १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून ऑक्टोबर १९४७ पर्यंत जम्मू-काश्मीर संस्थान स्वतंत्र होते. पाकिस्तानी सैन्याने टोळीवाल्यांच्या मदतीने २२ ऑक्टोबर १९४७ रोजी जम्मू-काश्मीरवर हल्ला केला. सीमेजवळील मुझफ्फराबाद, उरी, डोमेल आणि बारामुल्ला ही ठिकाणे अक्षरश: लुटत आणि जाळत हल्लेखोर वेगाने राजधानी श्रीनगरच्या रोखाने आगेकूच करत होते. अशा परिस्थितीत महाराजा हरिसिंह यांनी तातडीने २६ ऑक्टोबर १९४७ रोजी भारतात सामीलीकरणाच्या करारावर स्वाक्षरी केली. तोपर्यंत टोळीवाले श्रीनगरच्या खूप जवळ पोहोचले होते. काही तासांचा विलंब झाला असता तर श्रीनगर पाकिस्तानच्या हाती पडले असते. अशा वेळी अतिशय घाईगर्दीत भारताने २७ ऑक्टोबरला मिळेल त्या विमानांनिशी श्रीनगर विमानतळावर सैन्य उतरवले आणि टोळीवाल्यांना रोखले. त्यापैकी पहिल्या तुकडय़ांत वन शीख रेजिमेंटचा आणि त्या वेळी मेजर असलेले हरवंत सिंग यांचा समावेश होता. मेजर हरवंत सिंग यांनी तुकडीचे नेतृत्व करून श्रीनगरपासून १७ मैलांवर असलेल्या पट्टण येथील लढाईत पाकिस्तानी हल्लेखोरांना ४८ तास रोखून धरले. त्यामुळे श्रीनगर विमानतळ आणि जम्मू-काश्मीर वाचले.
सामीलीकरणाच्या करारावर सह्य़ा झाल्यानंतर काश्मीर वाचवण्यासाठी फार तातडीने काम करणे गरजेचे होते. त्या वेळी भारत-पाकिस्तान यांची नुकतीच फाळणी झाली असल्याने दोन्ही देशांत सैन्याची आणि लष्करी सामग्रीची विभागणी करण्याचे काम सुरू होते. भारताचे सर्वोच्च लष्करी नेतृत्व अजूनही ब्रिटिशच होते. त्यांनी एकही ब्रिटिश अधिकारी युद्धात भाग घेणार नाही असे जाहीर केले. त्यामुळे मनुष्यबळ आणि साधनसामग्री यांच्या आधीच असलेल्या तुटवडय़ात आणखी भर पडली. काश्मीरपासून जवळ दिल्ली आणि परिसरात जे काही सैन्य उपलब्ध होते ते तातडीने काश्मीरमध्ये पोहोचवण्यास हवाई दलाकडे पुरेशी विमानेही नव्हती. नागरी विमान वाहतुकीसाठी वापरली जाणारीही विमाने वापरून सैन्य श्रीनगर विमानतळावर उतरवण्याचे ठरले.त्या वेळी वन शीख रेजिमेंट दिल्लीजवळ गुरगाव परिसरात तैनात होती. या तुकडीचा इतिहास चांगलाच गौरवशाली होता. त्यामुळे त्यांना काश्मीरमध्ये पाठवण्यास प्राधान्य देण्यात आले. २६ ऑक्टोबरच्या रात्री वन शीख रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल दिवाण रणजित राय यांनी तुकडीची जुळवाजुळव करून तयारी पूर्ण केली. २७ ऑक्टोबरच्या पहाटे ५.२० वाजता दिल्लीच्या पालम विमानतळावरून डकोटा विमानांनी उड्डाण केले आणि ९.२० वाजता पहिल्या तुकडय़ा श्रीनगर विमानतळावर उतरल्या. त्यात वन  शीख रेजिमेंट, ५० पॅरा ब्रिगेड आणि काही उखळी तोफांचे दस्ते होते. कर्नल राय यांनी सुभेदार गुरचरण सिंग यांच्या नेतृत्वाखाली काही सैन्य आणि उखळी तोफा श्रीनगर विमानतळाच्या रक्षणासाठी मागे ठेवल्या. कॅप्टन कमलजित सिंग यांच्या नेतृत्वाखालील वन शीख रेजिमेंटच्या सी कंपनीला बारामुल्लाच्या रोखाने धाडले. तर मेजर हरवंत सिंग यांच्या नेतृत्वाखालील डी कंपनीला सोपोर येथील झेलम नदीवरील पुलाच्या रक्षणासाठी पाठवले.तोवर हल्लेखोर बारामुल्लावरून पुढे श्रीनगरकडे निघाले होते. कर्नल राय यांची अटकळ होती की हल्लेखोरांना श्रीनगरकडे येण्यास दोन मार्ग सोयीचे होते. एक होता डोमेल-उरी- पुढे झेलम खोऱ्यातून बारामुल्लापासून श्रीनगरकडे आणि दुसरा म्हणजे मुझफ्फराबाद-टिथवाल-नस्ता चुन खिंड-हंदवारा ते सोपोर आणि पुढे श्रीनगरकडे. या दोन्ही मार्गाचे वेगवेगळे रक्षण करण्यास सैन्य अपुरे होते. त्यामुळे राय यांनी दोन्ही मार्गानी आलेले हल्लेखोर जेथे मिळू शकतात त्या सोपोर येथे झेलम नदीवरील पुलावर त्यांना अडवण्याचे ठरवले. वेळप्रसंगी हा पूल उडवून दिल्यास हल्लेखोरांची आगेकूच थोपवता येणार होती.
दरम्यान, शत्रू बारामुल्लाची राखरांगोळी करून श्रीनगरकडे निघाला होता. टोळीवाल्यांची संख्या सुमारे ४००० ते ५००० होती. २७ ऑक्टोबरला वन शीखच्या उरलेल्या तुकडय़ा श्रीनगरला पोहोचल्या नाहीत. मग वेळ न घालवता राय यांनी विमानतळाच्या पुढे जाऊन आपल्या तुकडय़ांना मिळण्याचे ठरवले. सोपोरच्या पुलाच्या रक्षणासाठी काही सैन्य ठेवून मेजर कुलवंत सिंग, बारामुल्लाच्या रक्षणार्थ पुढे गेलेले कॅप्टन कमलजित सिंग आणि कर्नल राय यांचे सैन्य बारामुल्ला-श्रीनगर मार्गावर मैलाचा दगड ३२ (माइल ३२) च्या परिसरात एकत्र जमले आणि शत्रूचा प्रतिकार करण्यास सज्ज झाले. सुमारे ५००० हल्लेखोर आणि श्रीनगरच्या मध्ये हे केवळ १५० जवान छातीचा कोट करून उभे होते. या ठिकाणी लढाईला तोंड फुटले. भारतीय सैन्य प्राणपणाने लढत होते. पण संख्येने अधिक असलेल्या हल्लेखोरांनी त्यांना घेरण्यास सुरुवात केली. त्या वेळी कर्नल राय यांनी ‘माइल ३२’ पासून थोडी सुरक्षित स्थळी माघार घेऊन लढाई सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. पण या धामधुमीत कर्नल राय यांना गोळी लागून वीरमरण आले. (त्यांना मरणोत्तर महावीर चक्र देऊन गौरवण्यात आले.) शीख रेजिमेंटचा नेता कामी आला असतानाही धीर खचू न देता मेजर हरवंत सिंग यांनी नेतृत्व स्वीकारले आणि माघार घेण्याऐवजी थोडे पुढे जाऊन पट्टण येथे शत्रूचा मुकाबला करून त्याला ४८ तास थोपवून धरले.  त्याचदरम्यान ब्रिगेडियर राजिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने उरी येथील नाल्यावरील पूल उडवून देऊन शत्रूची आगेकूच रोखली होती. त्यानंतर श्रीनगरजवळ शालाटेंग येथे झालेल्या लढाईत शत्रूची आगेकूच पूर्ण थांबवण्यात आली आणि काश्मीर खोरे बळकावण्याचे मनसुभे उधळून लावले गेले. १९४७-४८ च्या युद्धातील या सुरुवातीच्या लढायांमुळेच श्रीनगर आणि काश्मीर खोरे वाचले. त्या विजयाच्या शिल्पकारांपैकी एक मोहरा आता भारताने गमावला आहे.
मात्र उरलेले काश्मीर बळकावण्याची पाकिस्तानची लालसा अद्याप संपलेली नाही. त्यानंतरच्या १९६५, १९७१ आणि कारगिल युद्धात पाकिस्तानचे ते स्वप्न पूर्ण झाले नाही. १९८९ पासून जम्मू काश्मीरमध्ये जे छुपे युद्ध चालवले आहे ते नुकत्याच झालेल्या उधमपूर हल्ल्यापर्यंत सुरूच आहे. समोरासमोरील युद्धात भारताने जेवढे अधिकारी आणि जवान गमावले नाहीत त्याहून अधिक या छुप्या युद्धात कामी आले आहेत. १९४७-४८ साली संपूर्ण जम्मू-काश्मीर सोडवण्यात आलेले अपयश आपल्याला अजून जाचत आहे.

What is space tourism Gopi Thotakura to be the first Indian space tourist
भारतीय व्यक्ती पहिल्यांदाच करणार अंतराळ पर्यटन; काय आहेत त्यामधील आव्हाने?
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
Navneet Rana nominated for Amravati Lok Sabha Constituency
नवनीत राणा हिंदुत्वाच्या राजकारणावर स्वार
india-pakistan
विश्लेषण : भारत-पाकिस्तान व्यापार पाच वर्षांनी सुरू होणार? जाणून घ्या तेव्हा व्यापार ठप्प होण्याची काय होती कारणं?