News Flash

प्रतिजैविके – वेळ निघून चाललीय..

पेनिसिलीनचा हा मनुष्यातील पहिला प्रयोग प्रचंड यशस्वी झाला.

(जगातील पहिले अँटिबायोटिक, पेनिसिलीनचा शोध लावणारे नोबेल विजेते शास्त्रज्ञ सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांचे पेनिसिलीन ते सद्य:स्थितीवर भाष्य करणारे, वास्तवाची जन्मकथेपासून दाहकता जाणवून देणारे हे काल्पनिक मनोगत.)

१९२८ सालातील सप्टेंबरचा पहिला आठवडा. काही दिवस बाहेरगावी जाऊन मी नुकताच लंडनला परतलो होतो. जिवाणूंसंबंधीचे आमचे संशोधन काही काळापासून चालू होते. त्यासाठी जिवाणूंच्या वसाहती आम्ही छोटय़ा पेट्रिडिशमध्ये तयार करायचो. गावाहून आल्यावर प्रयोगशाळेत चक्कर मारताना एका डिशने माझे लक्ष वेधून घेतले. या डिशमध्ये जिवाणूंची वाढ झाली नव्हती. सर्व स्वच्छ दिसत होते. पण तिथे बुरशी मात्र वाढली होती. चला त्या डिशला बुरशी लागली, ती फुकट गेली, या विचाराने मी ती डिश फेकूनच देणार होतो. तितक्यात माझ्या मनात एक वीज चमकली. बाकी सर्व डिशेसमध्ये जिवाणूंच्या वसाहती तयार झाल्या होत्या. पण ही एक डिश सोडून, जिथे बुरशी आली होती. म्हणजे असे तर नाही की या बुरशीमध्ये बॅक्टेरियांना मारणारे काही द्रव्य होते? हा विचार फारच, खरे तर अचाट, न पटणारा होता. कारण आजपर्यंत एका सूक्ष्म जीवांना मारण्यासाठी दुसऱ्या सूक्ष्म जीवांमध्ये (बुरशी) काही असेल (जिवाणू) असे आम्हाला यत्किंचितही कधी वाटले नव्हते. पूर्वीच्या काळी इजिप्तमध्ये जंतुप्रादुर्भाव झालेल्या जखमांवर बुरशी आलेला ब्रेड लावायचे असे वाचल्याचे तेव्हा मला अंधूकसे आठवले. झाले, मी ती डिश फेकली नाही. त्यातील बुरशीचा अभ्यास करायचे ठरवले. अजून काही प्रयोग चालू केले. या बुरशीविषयी म्हणजे पेनिसिलिअम नोटॅटमविषयी मी शोधनिबंधही लिहिला. त्यामुळे साऱ्यांचे लक्ष याकडे वेधले गेले. आजपर्यंत अजिंक्य असलेल्या जिवाणूंविरुद्ध एक मोठा धागा अचानकपणे अपघाताने आमच्या हाती गवसला होता. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातील डॉ. फ्लोरी व डॉ. चेन या संशोधकांनी पेनिसिलिअम या बुरशीचा पाठपुरावा करीत त्यातील जिवाणूंना मारणारे द्रव्य वेगळे केले. त्याचे पेनिसिलीन असे नामकरण झाले. १९४१ मध्ये अल्बर्ट अलेक्झांडर नावाच्या एका पोलीस शिपायाला एक किरकोळ जखम झाली. पण त्यात तीव्र जंतुसंसर्ग झाला. ताप आला, सूज आली. त्याचा मृत्यू अटळ होता. डॉ. फ्लोरीने या पेनिसिलीनचा प्रयोग त्याच्यावर करण्याचे ठरवले आणि खरेच पेनिसिलीन दिल्यावर त्याची सूज उतरली. ताप गेला. पेनिसिलीनचा हा मनुष्यातील पहिला प्रयोग प्रचंड यशस्वी झाला. आमची उमेद वाढली. पण पेनिसिलीन बुरशीतून वेगळे करणे जिकिरीचे होते. अल्बर्टला बरेच दिवस पेनिसिलीन द्यावे लागणार होते.

उपचाराच्या सुरुवातीला जरी त्याची स्थिती सुधारली होती, तरी पूर्ण इन्फेक्शन नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक, पुरेसे पेनिसिलीन आमच्याकडे नव्हते व अल्बर्टचा मृत्यू झाला. हा मृत्यू आम्हाला चटका लावून गेला. एकीकडे जिवाणूंविरुद्ध एक अस्त्र हाती गवसल्याचा आनंद होता, पण दुसरीकडे जर आम्ही या पेनिसिलीन अस्त्राला मोठय़ा प्रमाणावर बनवू शकलो नाही तर सारे मुसळ केरात जाणार होते. दुसरे महायुद्ध चालू झाले होते. युद्धग्रस्त ब्रिटनमध्ये हे कमर्शिअल उत्पादन करणे कठीण आहे हे जाणून फ्लोरी व चेनने दूरवरील अमेरिकेत प्रयाण केले. तिथल्या काही फार्मास्युटिकल कंपन्यांना भेटून मोठय़ा जिकिरीने पेनिसिलीनचे उत्पादन चालू केले व ते इंग्लंडला परतले. या उत्पादित पेनिसिलीनचा वापर महायुद्धातील अनेक जखमी सैनिकांवर केला. सैनिकांचे प्राण वाचले. आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही. जिवाणूंच्या अनेक शतकांच्या घोडदौडीचा अश्वमेध रोखण्यात आम्ही यशस्वी झालो होतो. मला राहून राहून मनात येत होते, मी जर ती बुरशीयुक्त पेट्रिडिश फेकून दिली असती तर? पण विधिलिखित वेगळे होते. मानवजातीची सेवा माझ्याकडून घडायची होती. पहिलेवहिले अँटिबायोटिक, पेनिसिलीन, जगाला लाभले होते. वैद्यकीय क्षेत्रातील व मानवी इतिहासातील ही मोठी क्रांती होती. या सूक्ष्म जीवांसमोर आजपर्यंत हतबल असलेल्या मानवाच्या हाती एक प्रभावी अस्त्र अँटिबायोटिकच्या रूपाने आले होते. जिवाणूंची सद्दी आता संपणार होती. आमच्या संशोधनाचे जगभर प्रचंड कौतुक झाले. १९४५ साली आम्हा तिघांनाही या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले. अँटिबायोटिक युगाचा जनक म्हणून मला गौरवण्यात आले.

मला स्वर्गात आज हे सर्व आठवण्याचे कारण? पृथ्वीवरून आलेल्या अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या बातम्या. १९४० सालापूर्वी जसे जिवाणूंचे साम्राज्य होते, तशीच काहीशी स्थिती परत येऊ घातली आहे. पेनिसिलीननंतर शेकडय़ाने अँटिबायोटिक्स विकसित करण्यात आली. टेट्रासायक्लिन्स, क्लोरॅमफेनिकॉल, सल्फा, स्ट्रेप्टोमायसिन,  सिप्रोफ्लोक्सासिन.. मोठी लांब यादी. पण मानवाच्या बेदरकार वापरामुळे यातली बरीचशी आता निष्प्रभ आहेत. एवढेच काय, पण सर्वाधिक प्रभावी समजली जाणारी, हाय एण्ड अँटिबायोटिक्स कार्बापिनिमनाही जिवाणू पुरून उरत आहेत. हे सर्व ऐकून किती वेदना होत आहेत मला म्हणून सांगू? अरे, माझ्या पृथ्वीवरील मित्रांनो, आम्ही तुम्हाला अँटिबायोटिकरूपी एक वरदान दिले, पण तुम्ही त्याची पार हेळसांड केलीत. अरे, अँटिबायोटिक्सचे वेगळेपण तुम्ही कुणीच लक्षात घेतले नाहीत. फक्त जिवाणूजन्य इन्फेक्शन्ससाठी ती वापरायची, तेही विशिष्ट कालावधी, विशिष्ट डोसमध्ये. प्रत्येक इन्फेक्शन किंवा आजाराला अँटिबायोटिक्स हा काही उपाय नाही. एक जालीम झटपट शॉर्टकट तुम्हाला अँटिबायोटिक वाटले आणि तुम्ही त्याचा गरज नसताना वापर चालू केलात. जेव्हा गरज तेव्हा मात्र ते पूर्ण क्षमतेने नाही वापरलेत. सर्दी, पडसेसारख्या विषाणूजन्य जंतुप्रादुर्भावात अँटिबायोटिक घेत राहिलात. टीबीसाठी तब्बल ६-८ महिने घ्यायचे तेव्हा मात्र अर्धवट कोर्स केलेत आणि ड्रग रेसिस्टंट टीबीचा भस्मासुर उभा केलात. अतार्किक वापर करण्यात डॉक्टर्स, रुग्ण, फार्मासिस्ट, फार्मा कंपन्या सारेच आघाडीवर. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन्समध्ये अँटिबायोटिक्सचा भरणा, रुग्णाने स्वमनाने अँटिबायोटिक घेणे, फार्मासिस्टने विनाप्रिस्क्रिप्शन अँटिबायोटिक विकणे, अनेक अँटिबायोटिक्सना एकत्र करून अतार्किक, अशास्त्रीय औषधे मिश्रणे फार्मा कंपन्यांनी बनवणे, हे सारे काय करताय तुम्ही? रुग्णालयात इन्फेक्शन कंट्रोल नाही, तिथे बंडखोर जंतूचे साम्राज्य.

इतके कमी की काय म्हणून तुम्ही अन्नोत्पादक प्राण्यांमध्येही अँटिबायोटिक्सचा भरमसाट वापर केलात. कशासाठी, तर प्राण्यांच्या वाढीसाठी व जंतुप्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी. अरे, इन्फेक्शन झाल्यावर वापराना ही औषधे केवळ. तुमच्या या वागण्याने दूध, मांस, अंडी वगैरे अन्नातूनही मानवी शरीरात अँटिबायोटिक्सचा अंश जात राहिला. शिवाय पर्यावरणातून परत अन्नसाखळीत अँटिबायोटिक्स प्रवेशतात. या साऱ्या साऱ्या बेजबाबदार वागण्याची एकत्रित परिणती म्हणजे आजची अँटिबायोटिक रेझिस्टन्सची स्थिती.

मी नोबेल पारितोषिक स्वीकारले तेव्हाच भाषणात ‘जपून वापरा अँटिबायोटिक्सना’ असा इशारा दिला होता. पण तो कोणी गांभीर्याने घेतला नाही. अजून एक महत्त्वाची बाब एक डॉक्टर म्हणून, एक जिवाणूतज्ज्ञ म्हणून सांगावीशी वाटते. तुम्हाला अँटिबायोटिक्सची इतकी गरजच का लागते? इन्फेक्शन्स होऊ नये म्हणून का नाही तुम्ही प्रयत्न करीत? लसीकरण, सुरक्षित लैंगिक संबंध, खोकतानाची काळजी, हात धुणे अशी वैयक्तिक स्वच्छता व काळजी का नाही घेतली जात? १५ ऑक्टोबर हा म्हणे ‘जागतिक हात धुणे दिवस’ म्हणून पाळला जातो. अरे, नुसत्या स्वच्छ हात धुण्याने ५० टक्केहून अधिक पोटाची इन्फेक्शन्स कमी होऊ शकतात. या २१ व्या शतकातील आधुनिक मनुष्याने हे साधे प्राथमिक पथ्यसुद्धा पाळू नये व ‘हँड वॉशिंग डे’द्वारे यासाठी जनजागरण करण्याची पाळी जागतिक संघटनांवर यावी? आणि स्वत:ची प्रतिकार क्षमतासुद्धा तुम्ही मानवाने कमी करून घेतलीये. चुकीची जीवनशैली, वाईट व्यसने, चुकीचा आहार असे सर्व असल्यावर रोगप्रतिकार क्षमता कमी होणारच व मग अँटिबायोटिक्सची गरज वाढणारच. अर्थात, त्याच्या चुकीच्या वापराला हे अधिकच आमंत्रण.

मित्रा, मी अँटिबायोटिक युगाचा जनक आहे. त्या युगाचा ऱ्हास होतोय हे मला पाहावत नाही. मानवजातीचा संहार हा अणुयुद्ध वगैरेमध्ये नाही तर सूक्ष्म जंतुयुद्धात आहे, असे फार पूर्वी ऐकले होते. ते तसे होईल की काय अशी भीतीच आता मला वाटतेय. म्हणून तुला कळकळीची विनंती करतो, अँटिबायोटिक्सना जपा. वेळ झपाटय़ाने निघून चाललीये, पण अजून पूर्ण गेलेली नाही. सर्व घटकांनी, शासनापासून ते डॉक्टर, रुग्णांपर्यंत सर्वानीच विचार करा, मानसिकता बदला, त्वरित पावले उचला. यामुळे थोडय़ा तरी अँटिबायोटिक्सना तुम्ही वाचवू शकाल? तुमच्या पुढच्या पिढीसाठी तरी हे कराच. नाही तर भावी पिढय़ा तुम्हाला कदापि माफ करणार नाहीत. जास्त काही लिहवत नाही आता, पण पुन्हा एकदा सांगतो, ‘अँटिबायोटिक्स- हँडल विथ केअर’- वेळ निघून चाललीये..

अस्तित्वाची लढाई

अँटिबायोटिक्स ही इतर औषधांपेक्षा वेगळी औषधे आहेत. ती शरीरातील विशिष्ट पेशी वा अवयवांवर काम करीत नाहीत, तर शरीरातील उपद्रवी जिवाणूंचा नायनाट करणे हे त्याचे काम असते. जेव्हा अँटिबायोटिक्सचा कमी वा अति, चुकीचा वापर होतो, तेव्हा रुग्णाच्या शरीरातील जिवाणूंना अँटिबायोटिक्सची काम करण्याची पद्धत जोखण्याची मुबलक संधी मिळते. या संधीचा फायदा उठवण्यात मोठे स्मार्ट असतात हे सूक्ष्म जीव. अत्यंत चतुरपणे मग ते स्वत:ला बदलवतात. (म्युटेशन) व मग त्या अँटिबायोटिक्सला चकवा देणाऱ्या प्रजाती ते तयार करतात. थोडक्यात, त्यांच्या नवीन पिढय़ा या निर्ढावलेल्या, बंडखोर असतात. पूर्वी त्या जिवाणूंना लीलया नामोहरम करणारे अँटिबायोटिक्स मग या बंडखोर जंतूंपुढे केविलवाणे होऊन जाते व त्याची परिणामकारकता कमी होते, संपतेदेखील. यालाच म्हणतात प्रतिजैविक प्रतिरोध किंवा अँटिबायोटिक रेझिस्टन्स.

हे बंडखोर जंतू यथावकाश समाजात इतस्तत: संक्रमित होतात व प्रतिरोध ही समस्या वैयक्तिक नाही तर सामाजिक आरोग्याची बाब होते. अँटिबायोटिक्सच्या चुकीच्या वापरामुळे आज अनेक अँटिबायोटिक्स निष्प्रभ झाली आहेत. १०० हून अधिक अँटिबायोटिक्स आजमितीला असली तरी त्यातली ‘चालणारी’ (परिणामकारक) फारच थोडी उरली आहेत. कोणत्याच अँटिबायोटिक्सना दाद न देणारे सुपरबग्जही सापडत आहेत. अनेक रुग्णांचे त्यामुळे मृत्यू होत आहेत. युनो, जागतिक आरोग्य संघटना या साऱ्यांना बंडखोर जंतूंनी हादरवून टाकले आहे. अँटिबायोटिक्स रेझिस्टन्स ही मानवजातीसाठी एक जागतिक धोका आहे व परिस्थिती आणीबाणीची आहे हे जागतिक आरोग्य संघटनेने पूर्वीच जाहीर केले आहे. २०१५ पासून दरवर्षी १३-१९ नोव्हेंबर असा जागतिक अँटिबायोटिक जनजागरण सप्ताहच जागतिक आरोग्य संघटनेने या संबंधात साऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी चालू केला आहे. एखाद्या औषध प्रकाराला ‘वाचवण्यासाठी’ इतक्या उच्च स्तरावरून जागतिक व्याप्तीची मोहीम काढावी लागणे हे अभूतपूर्व आहे. ‘मूर्ती लहान, पण कीर्ती (दुष्कीर्ती) महान’ असेच या सूक्ष्म जीवांच्या बाबत दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.

शासन, प्रशासन, डॉक्टर्स, फार्मा कंपन्या, रुग्ण, रुग्णालये, शेतकरी अन्नोत्पादक अशा अनेक घटकांनी या गंभीर समस्येसाठी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. या दृष्टीने अँटिबायोटिक धोरण वगैरे अस्तित्वात आले आहे, पण अधिक ठोस उपाय व त्याची परिणामकारक अंमलबजावणी आवश्यक आहे. नवीन अँटिबायोटिक्ससाठी जोमाने संशोधनाची गरज आहे. भारत हा अँटिबायोटिक्स वापरात जगात प्रथम क्रमांकावर आहे, इन्फेक्शनने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या इतर देशांच्या तुलनेने अधिक आहे. नवीन कोणतेही अँटिबायोटिक भारतात टाका, सहा महिन्यांत रेझिस्टन्स निर्माण होतो, असे आपल्याबद्दल बोलले जाते.

या साऱ्या पाश्र्वभूमीवर ग्राहक व रुग्णांची भूमिकाही महत्त्वाची आहे. त्याविषयी थोडक्यात महत्त्वाचे.

  • अँटिबायोटिक्स ही प्रिस्क्रिप्शनने व डॉक्टरांच्या सल्ल्याने घेण्याची औषधे आहेत, स्वमनाने घेण्याची नाही.
  • इतर औषधांप्रमाणेच अँटिबायोटिक्सच्या औषधांच्या लेबलवर डावीकडे तांबडी रेघ ढ७ ही खूण, शेडय़ुल एच किंवा एच१ असे चौकटीत लिहिलेले असते.
  • लवकर बरे व्हायचेय, स्ट्राँग औषध द्या, अँटिबायोटिक्स द्या, असा दबाव डॉक्टरांवर वा औषध दुकानात जाऊन फार्मासिस्टवर आणू नये. फार्मासिस्टनेही विनाप्रिस्क्रिप्शनने अँटिबायोटिक्स विकणे योग्य नाही व तशी मागणी करणाऱ्या रुग्णांना समुपदेश करणे अपेक्षित आहे. रुग्णांनीही याचे महत्त्व समजून घेऊन डॉक्टर्स व फार्मासिस्टना सहकार्य करणे आवश्यक आहे.
  • सर्दी-पडसे अशा किरकोळ विषाणूजन्य आजारांसाठी अँटिबायोटिक्स काही उपयोगाची नाहीत. किरकोळ पोट बिघडल्यास अँटिबायोटिक्स नव्हे तर ओरल रिहायड्रेशन सॉल्ट्स व तत्सम उपायांची गरज असते.
  • डॉक्टरांकडून निघताना प्रिस्क्रिप्शनमध्ये अँटिबायोटिक्स लिहिले आहे का, असल्यास ते कोणते, त्याचा कोर्स किती दिवसांचा हे जाणून घ्यावे, फार्मसीमध्ये फार्मासिस्टलाही याबाबत विचारावे व मार्गदर्शन घ्यावे.
  • अँटिबायोटिक्सचा सांगितलेला कोर्स जरी त्वरित बरे वाटू लागले तरी अर्धवट सोडू नये. ५, ७, १०, १५ दिवस वगैरे जो कालावधी सांगितला आहे तो पूर्ण करावा. टीबीसाठी कमीत कमी ६ ते ८ महिने औषधे घ्यावीच लागतात.
  • मुळात इन्फेक्शन्स होऊ नये यासाठी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयी पाळाव्यात. लसीकरण परिपूर्ण असावे.

symghar@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2017 12:32 am

Web Title: information about antibiotic medicine
Next Stories
1 फेरीवाल्यांवर नियंत्रण, मग पार्किंगचे काय?
2 समकालीनतेच्या ‘आदिम’ खुणा
3 सरकार सर्वसामान्यांचंच असायला हवं!
Just Now!
X