चीनच्या कारवाया लक्षात घेऊन भारताने नौदलाच्या पश्चिम, पूर्व आणि दक्षिण मुख्यालयाच्या अखत्यारीत प्रत्येकी एक अशा एकूण तीन विमानवाहू युद्धनौकांचे समूह बांधण्याची योजना आखली आहे. ‘आयएनएस विक्रमादित्य’मुळे समुद्रात खोलवर कारवाईची भारतीय नौदलाची क्षमता वाढली असून झपाटय़ाने बदलणाऱ्या परिस्थितीत कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्जता राखणे अनिवार्य बनले आहे.
लष्करी अथवा सागरी सामथ्र्य वाढविणे म्हणजे थेट युद्धाची तयारी असा एक सर्वसाधारण समज आहे. त्यामुळे शस्त्रास्त्र स्पर्धेला चालना मिळते, असाही आक्षेप घेतला जातो. त्यात काहीसे तथ्य असले तरी संरक्षणाच्या दृष्टीने परिपूर्ण राहाणे हे कोणत्याही देशासाठी आवश्यकच झाले आहे. अशा सामथ्र्यवाढीमुळे दोन शत्रू राष्ट्रांत युद्ध होणारच, असा अर्थ काढणे वा निष्कर्षांप्रत येणे चुकीचे ठरेल. उलट अशा बळावर दादागिरी करू पाहणाऱ्या राष्ट्राला प्रत्यक्ष युद्ध न करताही चाप लावण्याचे काम जाणीवपूर्वक हे सामथ्र्य वाढविणाऱ्या दुसऱ्या राष्ट्राला करता येते. म्हणजे दुसऱ्या राष्ट्राचे हे सामथ्र्य शत्रुराष्ट्राला प्रतिहल्ल्याची जाणीव करून देण्याची भूमिका बजावते. सामर्थ्यांतील समतोलाने प्रत्यक्ष युद्धे टाळली जाऊ शकतात. देशाच्या सागरी सीमांचे संरक्षण करणाऱ्या भारतीय नौदलाच्या भात्यात समाविष्ट झालेली आयएनएस विक्रमादित्य विमानवाहू नौका प्ररोधनाची ही जबाबदारी पार पाडणार आहे. भारताच्या अवतीभवती नाविकतळ निर्माण करण्यात गुंतलेल्या चीनची भारतीय महासागराच्या क्षेत्रात प्रभाव टाकण्याची व्यूहरचना सुस्पष्ट आहे. यामुळे सागरी संरक्षणासाठी आधीच मांडलेल्या, परंतु दीर्घकाळ रखडलेल्या आधुनिकीकरणाच्या योजना जलद मार्गी लावण्याची आवश्यकता आहे.
आयएनएस विक्रमादित्यमुळे समुद्रात खोलवर कारवाईची नौदलाची क्षमता वृद्धिंगत झाली आहे. आधीपासून ताफ्यात असणारी आयएनएस विराट विमानवाहू नौका निवृत्तीच्या मार्गावर आहे. दुसरीकडे स्वदेशी बनावटीची आयएनएस विक्रांत ही पहिली विमानवाहू नौका समाविष्ट होण्यास अद्याप तीन ते चार वर्षांचा कालावधी आहे. यामुळे नौदलास किमान एका विमानवाहू नौकेची तातडीची असणारी निकड विक्रमादित्यने भरून निघाली. पण भविष्यातील धोके, दळणवळणाचे सागरी मार्ग आणि समुद्रातील खनिज संपत्ती यांच्या संरक्षणासाठी नौदलास शक्तिशाली करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. खरे तर भारतीय नौदलासाठी सध्याचे वर्ष विलक्षण विरोधाभासी ठरले. या काळात भारतीय बनावटीच्या आयएनएस विक्रांत या पहिल्या विमानवाहू नौकेचा बांधणीचा एक टप्पा पूर्ण होऊन दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू झाले. आयएनएस अरिहंत ही देशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी नौदलात दाखल होण्यास सज्ज झाली. पाठोपाठ आयएनएस विक्रमादित्य समाविष्टही झाली. परंतु, याच दरम्यान आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडीच्या भीषण दुर्घटनेलाही सामोरे जावे लागले. अशा विचित्र स्थितीतून नौदलाचे मार्गक्रमण होत आहे.
भारतीय महासागराच्या सभोवतालच्या परिस्थितीत काही वर्षांत धोकेदायक ठरणारे बदल होत आहेत. आशिया खंडात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भारताच्या शेजारी राष्ट्रांना आपल्या गटात समाविष्ट करत त्या प्रत्येक राष्ट्रात पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात चीन मग्न आहे. श्रीलंकेत हंबनतोता बंदराच्या विकासासाठी त्याने मोठी गुंतवणूक केली. या माध्यमातून खनिज तेलाचे सागरीमार्ग आणि मल्लाकाच्या सामुद्रधुनीवर लक्ष केंद्रित करण्याबरोबर चिनी नौदलाचे हिंदी महासागरात अस्तित्व निर्माण झाले. याच पद्धतीने पाकिस्तानात ग्वादार बंदराची उभारणी करून चीन भारतीय नौदलाच्या अरबी समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवत आहे. ग्वादारच्या माध्यमातून आपल्या खनिज तेलाचे सागरी मार्ग सुरक्षित करत चीनने भारतावर दबाव ठेवण्याची व्यूहरचना केली. दक्षिण चीन समुद्रात हैनान बेटावर मोठा नाविक तळ उभारला. या क्षेत्रातील खजिन संपत्तीच्या मुद्दय़ावरून त्याने वादही निर्माण केला आहे. भारतीय महासागरी प्रदेशातून जगातील सर्वाधिक माल वाहतूक होते. या क्षेत्रात विपुल प्रमाणात खनिज संपत्ती आहे. तेल उत्पादन आणि खनिज संशोधनासाठी भारताने कोटय़वधींची गुंतवणूक केली आहे. हे प्रकल्प आणि सागरी सीमा व व्यापारी मार्ग तसेच चीनच्या कारवाया लक्षात घेऊन भारताने नौदलाच्या पश्चिम, पूर्व आणि दक्षिण मुख्यालयाच्या अखत्यारीत प्रत्येकी एक अशा एकूण तीन विमानवाहू युद्धनौकांचे समूह बांधण्याची योजना आखली आहे. भारतीय महासागरी क्षेत्राच्या विशाल आकारमानाच्या तुलनेत ती योजनाही अपुरी ठरेल, असे या क्षेत्रातील काही तज्ज्ञांना वाटते, हा भाग वेगळा.
विक्रमादित्यच्या निमित्ताने मूळ योजनेतील पहिला टप्पा गाठला गेला. आता प्रतीक्षा पुढील दोन विमानवाहू नौकांची आहे. सागरी क्षेत्रात प्रभुत्व गाजविण्यासाठी विमानवाहू नौका आणि त्यांचा समूह अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो. या समूहात विमानवाहू नौका ही मुख्य नौका. तिला स्वत:च्या संरक्षणासाठी कोणतीही खास व्यवस्था नसते. सभोवतालचा युद्धनौकांचा समूह ही तिची संरक्षणात्मक फळी. नौदलाला हवाई कारवाईची क्षमता या नौकेवरील धावपट्टी उपलब्ध करून देते. शिवाय, या स्वरूपाच्या हवाई हल्ल्यांसाठी जमिनीवरील तळाशी तिला संलग्न राहावे लागत नाही. विक्रमादित्यचा विचार करता या नौकेची ३० विमाने पेलण्याची क्षमता आहे. तिच्यावर तैनात केलेल्या मिग २९ के विमानांमुळे ७०० सागरी मैलांपर्यंत हल्ला चढविण्याचे सामथ्र्य प्राप्त झाले. या विमानांमध्ये हवेतच इंधन भरल्यास ती १९०० सागरी मैलांपर्यंत धडक मारू शकतात. तसेच अत्याधुनिक कामोव्ह हेलिकॉप्टर, टेहेळणी व बचावात्मक कामांसाठी चिता, रात्रीही कारवाईची क्षमता राखणारे ध्रुव ही हेलिकॉप्टर नौकेवर तैनात राहणार आहेत. या वैशिष्टय़ांमुळे नौदलाच्या शक्तीत वाढ झाली आहे.
प्रचंड गुंतवणूक करून चीनने अवाढव्य लष्करी साम्राज्य उभारले आहे. त्या जोरावर त्याची अव्याहतपणे दादागिरी सुरू असते. आकारमानाच्या दृष्टीने चीनचे नौदल मोठे असले, तरी त्यांच्याकडे सागरी युद्धाचा अनुभव नाही. आकाराची विशालता हे जणू काही चीनचे वैशिष्टय़च ठरले आहे. त्याचा वास्तवात कितपत उपयोग होतो हे तेच जाणोत. त्यांच्या नौदलात विमानवाहू नौका, विनाशिका, अति वेगवान लढाऊ जहाजे, युद्धनौका, आण्विक शक्तीवरील पाणबुडय़ा, अण्वस्त्र व इतरही क्षेपणास्त्रांनी सज्ज पेट्रोलक्राफ्ट यांची संख्या २७० हून अधिक आहे. संख्याबळानुसार भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल समजले जाते. भारतीय नौदलाच्या खात्यावरही युद्धाचा प्रदीर्घ अनुभव आहे असे नव्हे. १९७१ मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धाचा भारतीय नौदलास अनुभव आहे. पाणबुडय़ा, विनाशिका, युद्धनौका, विमानवाहू नौका, लढाऊ जहाजे आदींची एकूण संख्या १६० हून अधिक आहे. सागरी सामथ्र्य अधिक बळकट करण्यासाठी सध्या युद्धनौका, विमानवाहू नौका, विनाशिका, पाणबुडय़ा बांधणीचे काम दिरंगाईने का होईना प्रगतिपथावर आहे. झपाटय़ाने बदलणाऱ्या परिस्थितीत कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्जता राखणे अनिवार्य ठरते. ही सज्जताच आगामी काळात प्ररोधनाचे काम करणार आहे.