|| सुनील केदार, महाराष्ट्राचे क्रीडा व युवक-कल्याणमंत्री

पहिली बाजू

‘आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठा’च्या माध्यमातून क्रीडाक्षेत्राच्या दृष्टीने महाराष्ट्रात एका ऐतिहासिक प्रकल्पाची पायाभरणी महाविकास आघाडी सरकारकडून केली जात आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठाला साजेशा पायाभूत सुविधा निर्माण करून सर्व सोयींनी युक्त असे हे देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ येत्या शैक्षणिक वर्षांत बालेवाडीत (पुणे) आकारास येईल अन् राज्यातील खेळाडूंना, विद्यार्थ्यांना उत्तम संधी इथल्या मातीतच उपलब्ध होतील..

महाराष्ट्राची सर्वच क्षेत्रांत प्रगती झाली पाहिजे, या विचाराने नवनवीन प्रकल्पांना चालना दिली जात आहे. यातूनच ‘आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठा’च्या माध्यमातून क्रीडाक्षेत्राच्या दृष्टीने महाराष्ट्रात एका ऐतिहासिक प्रकल्पाची पायाभरणी केली जात आहे. विशेष म्हणजे, हे विद्यापीठ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर या देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ असणार आहे. म्हणूनच महाराष्ट्राला क्रीडाक्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कोरण्याची नामी संधी यामुळे लाभली आहे.
देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या विधेयकास विधिमंडळाने एकमताने मंजुरी दिली, ही बाब महत्त्वाची. ही एकमताने मिळालेली मंजुरी या विद्यापीठाच्या दृष्टीने भविष्यातही महत्त्वाची ठरेल. क्रीडाक्षेत्राबाबत आपल्याकडे उदासीनता आहे अशी ओरड नेहमी होते, त्यास हे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ समर्पक उत्तर आहे असे वाटते. महाराष्ट्रात आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती प्राप्त केलेले अनेक खेळाडू निर्माण झाले. महाराष्ट्रीय खेळाडूंनी ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली आहे. भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव हे महाराष्ट्राचेच सुपुत्र. अशा आपल्या महाराष्ट्रासह भारताचीही क्रीडाक्षेत्रात उज्ज्वल प्रगती व्हावी यादृष्टीने नुसत्या घोषणांवरच न थांबता, मजबूत पायाभरणी होणे गरजेचे आहे. आज जी प्रगत राष्ट्रे आपण पाहतो आहोत, त्यांच्या प्रगतीत कुठे ना कुठे क्रीडाक्षेत्राचेही स्थान असल्याचे दिसते. क्रीडाक्षेत्रात त्या देशांत संधी, उपक्रम निर्माण झाले, तसे आपल्याकडे त्या प्रमाणात होऊ शकलेले नाही. त्यामुळेच जागतिक स्तरावर यश मिळविलेल्या खेळाडूंना यशानंतर फक्त बक्षिसी देण्यात इतिश्री मानण्यापेक्षा, भविष्यात चांगले खेळाडू तयार होणे आणि त्यांच्यासाठी आपल्या मातीतच चांगल्या सोयीसुविधा आणि संधी निर्माण होणे आवश्यक आहे. या खेळाडूंना योग्य ते प्रशिक्षण इथेच मिळायला हवे. तसेच क्रीडाक्षेत्र आता मोठय़ा प्रमाणात विस्तारले असल्याने खेळाडूंबरोबरच क्रीडा व्यवस्थापन, माध्यम संवाद, तंत्रज्ञान, क्रीडा वैद्यकशास्त्र अशा अनेक संधी क्रीडाक्षेत्रात आहेत. त्यांचे योग्य ते प्रशिक्षण घेऊन इथल्या विद्यार्थ्यांनी त्या त्या कार्यक्षेत्रात आपले पाय भक्कम रोवले पाहिजेत, हा उदात्त दृष्टिकोन या राज्य सरकारच्या या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या निर्मितीमागे असणार आहे.
क्रीडाक्षेत्राशी संबंधित सर्वच बाबींचा विचार या विद्यापीठाच्या निर्मितीत केला जाईल. क्रीडा व्यवस्थापन (स्पोर्ट्स मॅनेजमेंट) असो वा क्रीडा पत्रकारिता (स्पोर्ट्स जर्नलिझम); असे क्रीडाविषयक विविध अभ्यासक्रम या विद्यापीठात राबवले जातील. इथून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावरही भर दिला जाणार आहे. प्रत्यक्ष कृती करण्यावर, विधायक व सकारात्मक परिणामांवर आमचा भर असल्याने येत्या शैक्षणिक वर्षांतच या विद्यापीठाला पुण्याच्या बालेवाडी इथे सुरुवात होत आहे.

कुठलाही मोठा निर्णय घेताना, त्यास राजकारणाची हवा लागण्याची शक्यता असतेच. नाही म्हटले तरी, राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जातेच. क्रीडा विद्यापीठही त्यास अपवाद नाही. त्यामुळेच- हे विद्यापीठ पुण्यातच का, असे प्रश्न उपस्थित केले गेले आणि केले जात आहेत. पण आधीच नमूद केल्याप्रमाणे, निव्वळ घोषणा करून प्रकल्प पुढे ढकलणे हे महाविकास आघाडी सरकारच्या कार्यसंकल्पात बसणारे नाही. त्यामुळे नुसते कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मानण्याऐवजी, शक्य तितक्या लवकर या विद्यापीठाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीस चालना मिळावी याकरिता ते पुण्यात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण पुण्यात बालेवाडी इथे क्रीडा विद्यापीठाच्या दृष्टीने तयार, सज्ज जागा आहे. आवश्यक पायाभूत सुविधाही तिथे उपलब्ध आहेत. बालेवाडीचा उपयोग क्रीडाक्षेत्राबरोबरच इतरही क्षेत्रांसाठी होत असतो. किंबहुना क्रीडाबाह्य़ कारणांसाठीच उपयोग जास्त होतो असेही म्हणता येईल. त्यामुळे बालेवाडीची जागा फक्त क्रीडाक्षेत्रासाठीच असावी हा उद्देशही विद्यापीठाच्या माध्यमातून साध्य होईल. शिवाय अन्य ठिकाणी नव्याने सुरुवात करायची तर प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता अधिक. त्यात निधीपासून जागेपर्यंतचे प्रश्न निर्माण होत जातात व दिवसांवर दिवस पुढे जात राहतात. हाती लवकर काही ठोस असे लागत नाही. त्यामुळे या विद्यापीठाची उभारणी पुण्याच्या बालेवाडीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. पुण्यात असले तरी हे विद्यापीठ संबंध महाराष्ट्र आणि देशाचे असणार आहे.

या विद्यापीठाचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिकाधिक व्हावा हा हेतू आहेच; त्याबरोबरच पुढील काळात या विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्याचाही मानस आहे. सुरुवातीची तीन वर्षे विद्यापीठाची सुव्यवस्थित घडी बसण्यासाठी द्यावी लागतील. विद्यापीठ स्थापनेनंतर सुरुवातीला क्रीडा विज्ञान, क्रीडा तंत्रज्ञान आणि क्रीडा प्रशिक्षण हे तीन अभ्यासक्रम इथे सुरू केले जाणार आहेत. ज्यात प्रत्येकी ५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, त्यानंतर अभ्यासक्रमांची भर यात पडत जाईल. त्यानुसार नोकरीच्या संधीही निर्माण होऊ शकतील. इतर देशांतील क्रीडा विद्यापीठांतील नामांकित प्रशिक्षक या ठिकाणी येऊन प्रशिक्षण देतील, तसेच इथूनही प्रशिक्षक तसेच विद्यार्थी बाहेरील विद्यापीठांत जातील. ही शैक्षणिक देवाण-घेवाण आपल्या विद्यापीठाच्या माध्यमातून साध्य होणार आहे. तसेच आयआयटी आणि आयआयएम यांसारख्या नामांकित संस्थांबरोबरही सहकार्याच्या दृष्टीने राज्य सरकार प्रयत्नशील आहे. रोजगारसंधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात नामांकित कंपन्यांबरोबरही चर्चा सुरू आहे. आणखी महत्त्वाचे म्हणजे, कुठलाही भव्य प्रकल्प आकाराला आल्यानंतर त्यात खासगीकरण डोकावण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याचे चित्र तर खासगीकरणाला प्रोत्साहन देणारेच आपल्याला दिसते. पण हे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सरकारीच राहील हे ठामपणे सांगितले पाहिजे. म्हणून विद्यापीठ भव्यदिव्य असले तरी त्यातील शैक्षणिक शुल्क भव्यदिव्य असणार नाही, ते सर्वाना परवडणारेच असेल. जेणेकरून गरीब घटकांतील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थीही या ठिकाणी प्रवेश घेऊ शकतील. आपल्या तरुणांमधली ऊर्जा व्यर्थ जाऊ नये यासाठी आपल्या मातीत त्यांना उत्तम संधी निर्माण होणे गरजेचे होते. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या स्थापनेमुळे त्या संधींची पाऊलवाट निर्माण होऊ घातली आहे.

क्रीडा विद्यापीठाबाबतचे विधेयक एकमताने मंजूर झालेले असल्याने, सर्व सुरळीत पार पडेल असा विश्वास आहे. या विद्यापीठाचे वैशिष्टय़ म्हणजे क्रीडाक्षेत्रातील तांत्रिक मनुष्यबळही यामुळे मोठय़ा प्रमाणात निर्माण होणार आहे. आतापर्यंत देशात असे विद्यापीठ नाही, त्यामुळे महाराष्ट्रात होणारे हे पहिले विद्यापीठ इथल्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेला पुरेपूर वाव देईल. हेलसिंकी ऑलिम्पिक गाजवणाऱ्या खाशाबा जाधव यांच्यासारखे पुढचे अनेक ‘खाशाबा’ आणि अशा ‘खाशाबां’च्या मागचे प्रशिक्षक तसेच व्यवस्थापक मोठय़ा संख्येने महाराष्ट्रात घडतील याबाबत शंका नाही. प्रगतीसाठी वेगळी वाट निवडण्याची आवश्यकता असते, तशी प्रभावी वाट या विद्यापीठाच्या निमित्ताने निर्माण होणार आहे. म्हणूनच कोणत्याही आंतरराष्ट्रीय विद्यापीठाला साजेशा पायाभूत सुविधा निर्माण करून सर्व सोयींनी युक्त असे हे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्याच्या बालेवाडीत होईल आणि महाराष्ट्राच्या प्रगतीचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर रोवला जाईल, हे नक्की!