|| रवींद्र माधव साठे

२१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे आणखी एक विशेष म्हणजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा तो स्मृतिदिन आहे. रा. स्व. संघाचे नाव आज केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही परिचित झाले आहे. समाजाच्या सर्व क्षेत्रांत संघाचा विचार घेऊन अनेक संस्था देशभर कार्यरत आहेत. राजकीय क्षेत्रातही संघाचा विचार केंद्रस्थानी पोहोचला आहे.

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र

हिंदू समाजाचे संघटन करून राष्ट्राला परमवैभवावर नेण्याचे ध्येय डॉ. हेडगेवारांनी समोर ठेवले होते. येथील हिंदू समाज इमारतीच्या आधारशीलेसारखा आहे, अशी त्यांना अनुभूती झाली होती. संघाचे काम प्रतिक्रियात्मक वा कोणाच्या विरोधासाठी त्यांनी निर्माण केले नाही. हे विधायक कार्य आहे असे ते संघाबद्दल म्हणत. जो-जो या देशाला पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतो त्याला ते राष्ट्रीय म्हणत. त्यामुळे त्यांनी संघाचे नाव ‘हिंदू स्वयंसेवक संघ’ असे न ठेवता ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ असे ठेवले. हिंदुराष्ट्र हे वादातीत सत्य असून, भारतात एक जरी हिंदू शिल्लक राहिला तरी हे हिंदुराष्ट्र राहील, अशी त्यांची धारणा होती.

डॉ. हेडगेवारांच्या ‘हिंदुराष्ट्र’ संकल्पनेत एक महत्त्वाचा पैलू अध्याहृत होता. तो म्हणजे- ‘विचारसृष्टीतील स्वराज्य’! ही कल्पना मूळ मांडली ती श्रेष्ठ तत्त्वचिंतक कृष्णचंद्र भट्टाचार्य यांनी. सन १९३१ मध्ये भट्टाचार्य यांनी चंद्रनगर येथील भाषणात विचारसृष्टीतही स्वराज्य हवे या भूमिकेचे निरुपण केले. वस्तुत: त्यापूर्वीच्या आदल्याच दशकात डॉ. हेडगेवार व स्वा. सावरकर यांनी या भूमिकेला साकार केले होते. राजकीय क्षेत्रात एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीवर जे वर्चस्व असते ते प्रकर्षाने जाणवते. परंतु एक संस्कृती दुसऱ्या संस्कृतीवर विचारसृष्टीच्या क्षेत्रातही वर्चस्व गाजवत असते आणि हे वर्चस्व अधिक परिणामकारक असते. मात्र ते आपल्याला जाणवत नाही. राजकीय क्षेत्रातील वर्चस्वाचा परिणाम मनुष्यमात्राच्या बहिर्जीवनावर होत असतो. परंतु विचारसृष्टीतल्या क्षेत्रातले एका संस्कृतीचे दुसऱ्या संस्कृतीवर होत असलेले आक्रमण मनुष्याच्या आंतर्जीवनावर होत असते, म्हणून ते जाणवत नाही. ब्रिटिशांनी हिंदूंचे जे अराष्ट्रीयीकरण केले ते डॉ. हेडगेवारांनी ओळखले होते. म्हणून रा. स्व. संघाच्या माध्यमातून भारतीयांची आपल्या देश, संस्कृती व इतिहासाशी नाळ जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जातपात, भाषा, प्रांत यांवर उठून भारतीयांचा देहस्वभाव बदलून एक-राष्ट्रीयत्वाची भावना त्यांना विकसित करावयाची होती.

म्हणून १९२५ साली नागपुरात डॉ. हेडगेवार यांनी रा. स्व. संघाची सुरुवात केली आणि बघता बघता संघ कामास व्यापक स्वरूप येत गेले. ही अद्भुत किमया व विशाल असे संघटन डॉक्टरांनी सुरू केलेल्या दैनंदिन शाखारूपी कार्यपद्धतीचाच आविष्कार आहे. संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस- ‘संघाची कार्यपद्धती म्हणजे डॉ. हेडगेवारांच्या अलौकिक प्रतिभेची देणगी,’ असे नेहमी वर्णन करीत. डॉ. हेडगेवारांनी लोकसंघटनेचा महान मंत्र स्वयंसेवकांना दिला. आपल्या अनुपम अशा संघटन कौशल्याच्या व लोकसंग्रहाच्या आधारावर सरसंघचालकपदाच्या १५ वर्षांच्या कालावधीत देशव्यापी संघटन त्यांनी उभे केले.

डॉ. हेडगेवारांचा मूळ स्वभाव लोकसंग्रह करण्याचा होता. त्यामुळे विविध प्रकारची माणसे त्यांनी संघकामास जोडली. स्वयंसेवकांना उद्देशून ते नेहमी म्हणत, ‘संघ केवळ स्वयंसेवकांपुरता नाही, तर संघाबाहेरील लोकांसाठीही असून आपला प्रत्येक मित्र स्वयंसेवक असला पाहिजे आणि प्रत्येक स्वयंसेवक हा मित्र झाला पाहिजे.’ डॉक्टरांच्या संपर्कात आलेली व्यक्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे प्रभावित होत असे. डॉक्टरांचे केवळ संघातच नव्हे, तर संघबाह््य वर्तुळातही अनेकांशी घनिष्ठ संबंध होते.

नि:स्वार्थी व निरपेक्ष प्रेम, अकृत्रिम स्नेह, आत्मीयता व वाणीचे माधुर्य यांच्या आधारावरच डॉ. हेडगेवारांनी अनेकांची हृदये जिंकली. डॉक्टरांचा व्यवहार हा अतिशय स्नेहपूर्ण होता. ते नेहमी म्हणत की, ‘आपण सर्वजण एकाच संघटनेचे घटक आहोत. त्यामुळे कोणत्याही कारणाने आपण परस्परांवर रागावू शकत नाही. रागावणे हा शब्दच संघाच्या कोशात सापडता नये. या संघटनेतील जबाबदार व्यक्तींना एकमेकांशी आत्यंतिक प्रेमाने व आदराने वागता आलेच पाहिजे, हा संघाच्या संघटनेतील मूलभूत सिद्धान्त आहे.’ डॉक्टर या सिद्धान्ताप्रमाणे आयुष्यभर वागले. वास्तविक पाहता, हेडगेवार घराणे हे अतिशय कोपिष्ट व रागीट म्हणून प्रसिद्ध होते. परंतु लोकसंघटनेच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा डॉ. हेडगेवारांनी जाणीवपूर्वक त्याग केला. आपल्या प्रत्यक्ष वागण्यात तसे परिवर्तन आणले. गोळवलकर गुरुजींनी डॉक्टरांच्या अनुपम संघटन कौशल्याबद्दल म्हटले होते की, ‘असंख्य माणसे गोळा करणे व त्यांच्यामधून उत्कृष्ट कार्यकर्ता तयार करत अशा प्रचंड कार्याची निर्मिती करताना डॉक्टरांना अनेक यातनांना तोंड द्यावे लागले; पण याचे दर्शन डॉक्टरांच्या व्यवहारात कधीच दिसत नसे.’ व्यक्तिगत स्नेहाला मतभिन्नतेचे ग्रहण लागू न देण्याची अद्भुत कला डॉक्टरांकडे होती. मतभेदातही प्रेम कमी न होऊ देण्याची शिकवण डॉक्टरांनी दिली आणि मतभेदातही कटुता न येऊ देणे याकडे त्यांचे सदैव लक्ष असे. डॉक्टरांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत त्यांच्यावर अनेक अपमानास्पद प्रसंग, भाषणे/लेख येऊनसुद्धा डॉक्टरांनी आपल्या मनाचा समतोलपणा कधीच ढळू दिला नाही आणि म्हणूनच भिन्न स्वभावाच्या व्यक्तींना एका विचारात व एका सूत्रात गुंफण्याची किमया ते करू शकले. प्रत्येकाशी वागण्याची डॉक्टरांची समान पद्धत होती, कारण ‘सर्व समाज माझा’ या भूमिकेतून डॉक्टर काम करीत होते.

संपर्कात आलेल्या प्रत्येक स्वयंसेवकास डॉ. हेडगेवार समजून घेत असत व त्याच्या सुख-दु:खांशी समरस होत असत. त्याची विचारपूस करत असत. प्रत्येक स्वयंसेवक त्यांना प्रिय होता व प्रत्येकासच ते तळहातावरील फोडाप्रमाणे जपत. कोणीही कार्यकर्ता संघकामापासून तुटू नये याकडे त्यांचा कटाक्ष असे. गरजूंना त्यांनी आवाक्याबाहेर जाऊन अडचणीत मदत केली, स्वयंसेवकांना मानसिक आधार दिला.

स्वयंसेवकांमधील गुणांची पारख करून डॉक्टर त्यास नेहमी प्रोत्साहन देत. १९३६ मध्ये फैजपूर येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनात ध्वजारोहणप्रसंगी तिरंगा ध्वज वर जाताना अडकला. धुळे जिल्ह्यातील शिरपूरच्या किसनसिंह राजपूतने चपळाई दाखवून अडकलेला ध्वज सोडविला. केवळ तो संघ स्वयंसेवक म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी किसनसिंहचे तोंडदेखले कौतुक केले. डॉक्टरांना ही घटना समजली. ते शिरपूरला गेले. तेथील स्थानिक शाखेत जाऊन सार्वजनिक कार्यक्रमात किसनसिंह राजपूतचा चांदीचा पेला देऊन सत्कार केला. संघकार्याची व्याप्ती जशी वाढली तसे डॉक्टरांचा कार्यकर्त्यांशी होणारा पत्रव्यवहारही वाढला. मोजक्या शब्दांत भरपूर आशय आणि नेमका अर्थ सांगणारी त्यांची पत्रे असत. पत्रलेखनातून संघटन करण्याचा त्यांचा स्वभाव होता. नाना पालकरांनी डॉक्टरांच्या पत्रव्यवहाराविषयी लिहिले आहे की, ‘भयानक विरोधाला तोंड देऊन थकलेला कार्यकर्ता थबकला, की डॉक्टरांचे पत्र त्यास धीर देऊन प्रोत्साहित करी आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास व उत्साह द्विगुणित होई. पत्रातूनही डॉक्टरांचा हात प्रेमाने व ममतेने फिरे. डॉक्टरांच्या प्रत्येक पत्रावर ध्येयासक्ती दिसते, तर वैयक्तिक जीवनासंबंधी विरक्ती दिसते (हेडगेवार चरित्र, पृष्ठ ४२५, प्रकाशक : भारतीय विचार साधना).’ डॉक्टरांनी कार्य करताना आपण काही जगावेगळे करीत आहोत असा आभास कधीही उत्पन्न केला नाही. ‘अलौकिक नोहे लोकांप्रति’ या उक्तीच्या आधारे त्यांनी आयुष्यभर काम केले. समर्थ रामदास स्वामींचा ‘दासबोध’ आणि लोकमान्य टिळकांचे ‘गीतारहस्य’ यांतील विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. या ग्रंथांचे ते बऱ्याचदा वाचन करीत. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे दैवत होते. भारताच्या इतिहासाबद्दल डॉ. हेडगेवार यांचे आकलन सावरकरांइतकेच सूक्ष्म होते.

समाजातील व्यक्ती-व्यक्तीवर सुसंस्कार करून गुणवान, चारित्र्यवान, देशभक्त व्यक्तींना एकत्र धरावे आणि त्यांचे संघटन बांधावे, असे ते म्हणत. डॉक्टरांना अशा व्यक्तींची संघटना अभिप्रेत होती, म्हणूनच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखे देशव्यापी संघटन उभे केले. डॉक्टरांनी स्वयंसेवकांना व्यक्तिनिष्ठ जीवन जगावयास न शिकवता तत्त्वनिष्ठ व संघानुकूल जीवन जगावयास शिकवले. सार्वजनिक जीवनात ज्याला काम करायचे आहे, त्याला डॉ. हेडगेवारांचे जीवन पथदर्शी आहे.

चार वर्षांनी- २०२५ साली संघ आपली शताब्दी साजरी करेल. केवळ भारतच नव्हे, तर संपूर्ण विश्वात रा. स्व. संघाइतके सर्वात मोठे स्वयंसेवी संघटन कोणतेही नाही. एखाद्या संघटनेची स्थापना होऊन संस्थापकाच्या मृत्यूनंतरही ती संघटना सतत वर्धिष्णू होत जाणे, याचे संघ हे एकमेव उदाहरण म्हणता येईल. राष्ट्रोत्थानासाठी एक देशव्यापी संघटना डॉ. हेडगेवारांनी आपल्या अद्भुत अशा लोकसंग्राहक वृत्ती व संघटन कौशल्याच्या आधारे साकार करून दाखविली, हे त्यांचे असामान्यत्व आहे.

(लेखक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक आहेत.)

ravisathe64@gmail.com