जगातल्या सर्वच्या सर्व माणसांचे आचार-विचार, मतं, चालीरीती, खाण्यापिण्याच्या आवडी आणि सवयी, पोशाख वगरे यच्चयावत गोष्टी जुळत नाहीत तोवर सहिष्णुता लागणारच. असं सगळं आलबेल होणं शक्य नाही आणि म्हणून समूहात जगण्यासाठी सहिष्णुता हे एक प्राथमिक मूल्य म्हणून स्वीकारण्याला पर्याय नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जन्माला घातलेल्या पुढच्या पिढीलाही ते ठामपणे सांगावं लागणार.
इन्टॉलरन्स.. असहिष्णुता. सध्याचा अगदी परवलीचा शब्द आणि खूप प्रसिद्धही. काळाचे काही तुकडे असे असतात की, त्या काळात ठरावीक शब्द अतिशय ढोबळपणे एकाच अर्थानं वापरले जातात. शब्दाचा परिप्रेक्ष्य बऱ्याच प्रमाणात गळून पडतो. खोलात शिरलं जात नाही. त्या शब्दाचं ‘शस्त्र’ होतं. प्रत्येक समूहानं आपल्याला हवं तसं वापरावं असं हत्यार होतं आणि शब्दांची शस्त्रं फार विचित्र असतात. हवा तसा आकार बदलतात, धार बदलतात, कल्पनेपलीकडे िहस्र होतात. सगळ्यात धोकादायक म्हणजे हे शब्द विचार थांबवू शकतात.
आणि जेव्हा जेव्हा असं होतं त्या त्या वेळी एक विराम घेऊन, एक पॉज घेऊन मग त्या शब्दाकडे, खरं तर त्या शब्दानं उद्धृत होणाऱ्या संकल्पनेकडे पुन्हा नव्याने पाहणं गरजेचं असतं. पूर्वी नाही का सूर्यास्तानंतर युद्ध थांबवायचं? तसं.
विरामानं विवेक येण्याची शक्यता असते आणि अशा शक्यतेला अवसर द्यायला हवा.
‘असहिष्णुता’.. ‘इन्टॉलरन्स’ हा शब्द आता थोडासा विराम घेऊन मगच परत वापरायला सुरुवात करायला हवी, असं मला फार प्रकर्षांनं वाटतं.
एक प्राथमिक अट म्हणून ‘असहिष्णुता’ हा शब्द, संकल्पना फक्त ‘धर्म’ या गोष्टीशी निगडित नाही याची नव्याने आठवण करून घेऊ या. असहिष्णुता आपल्याला रोज दिसते. रस्त्यावर दिसते, आपण राहत असलेल्या सोसायटीत दिसते. ऑफिसेसमध्ये दिसते, प्रसंगी आपल्या स्वत:च्या घरातच दिसते.
टॉलरन्सचा एक अर्थ capacity for endurancel असा आहे. ‘सहन’ करण्याची ताकद.
सहिष्णुतेमध्ये एक प्रकारची लवचीकता अपेक्षित असते. मतांची, विचारांची, मनाची. एखाद्या विषयाबद्दल दुसऱ्याचं आपल्यापेक्षा अगदी भिन्न मत असू शकतं. ते मत आपल्याला पटलं नाही तरीदेखील ते बरोबर असण्याची शक्यता मान्य करणं अपेक्षित असतं. दुसरी बाजू समजावून घेणं; निदान शांतपणे ऐकून तरी घेणं अपेक्षित असतं. बरं, ते मत शंभर टक्के अमान्य असायला पाहिजे असं नाही. त्यातलं काही पटतं, तर काही नाही पटत. जे पटलं ते मान्य केलं आणि न पटलेल्यावर वाद घातला असंही होऊ शकतं. थोडक्यात, मतभिन्नतेला सकारात्मक जागा देणं म्हणजे सहिष्णू असणं.
‘‘हे वाचत असताना यात काय नवीन? माहीतच आहे. काही तरी ‘आदर्श’ असं बोलून काय फायदा? ‘ती’ लोकं वागतात का तशी? त्यांना सांगा आधी.’’
असे विचार मनात येणं साहजिक आहे, पण मी म्हटलं तसं काही वेळेला विराम आणि उजळणी आवश्यक असते. तेवढी काही मिनिटं मला द्या. न्यूट्रल होऊन द्या! थॅँक यू !!
सहिष्णुतेचं मूळ ‘अनाग्रही’ असण्यात आहे. म्हणजे असं की, एखाद्या गोष्टीबद्दल आपण जितके जास्त आग्रही असू तितकी त्या गोष्टीत आपण समोरच्याच्या विचाराला कमी जागा देऊ. आता हा टोकाचा आग्रह असा अचानक निर्माण होत नाही. तो काही ना काही निमित्तानं समाजमनात वाढत गेलेला असतो. अनेक र्वष हे होत असतं. भारताच्या बाबतीत हे असं अतिआग्रही असणं गेली अनेक दशकं होतं आहे.
असायलाच हवं, मिळवायलाच हवं, केलंच पाहिजे, झालंच पाहिजे, अमुक असताच कामा नये, तमुक होताच कामा नये वगरे, वगरे. हा जोडला जाणारा ‘च’ करण्यातली सहजपणा घालवून त्या जागी टोकाचा आग्रह आणतो.
आपण नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की, हा आग्रहीपणा आपल्या शालेय जीवनापासूनच सुरू होतो. मार्क्‍स उत्तमच मिळायला हवेत, शक्यतो पहिलाच नंबर आला पाहिजे, कुठल्याही गोष्टीत ‘जिंकणं’ अतिशय महत्त्वाचं वगरे. असं सगळं जो मिळवतो तोच ‘श्रेष्ठ’ ठरतो. मार्क्‍स न मिळवणारा, कशातही ‘पहिला’ न येणारा, शाळेत, समाजात, नातेवाईकांमध्ये ‘कमी’ ठरतो. इथेच संपत नाही. यशस्वी मुला-मुलींना यश टिकवण्याचा आग्रह केला जातो आणि अयशस्वी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याचा आग्रह. गेल्या अनेक पिढय़ा आपल्याकडे हे चालू आहे. पालक स्वत: मूल असताना ज्या वातावरणात वाढवले गेले त्याहूनही जास्त ‘तणाव’पूर्ण वातावरणात त्यांची मुलं वाढताहेत. याची अनेक कारणं आहेत आणि त्या कारणांची चर्चा स्वतंत्रपणे होऊ शकते, पण आपल्या विषयापुरतं बोलायचं तर, या ताणतणाव आणि टोकाच्या आग्रहामुळे लहानपणापासूनच जी मानसिकता तयार होते आहे आणि गेल्या काही वर्षांत प्रकर्षांनं जोपासली जाते आहे ती समजावून घेणं गरजेचं आहे. त्याचे सर्व क्षेत्रांत आणि तेही अतिशय दूरगामी परिणाम होताहेत हे ओळखलं पाहिजे.
जे शाळेत, तेच नोकरी आणि व्यवसायात. टार्गेट्स पूर्ण झालीच पाहिजेत, परफॉर्म केलंच पाहिजे याचा सतत आग्रह, ताण. या वातावरणानं काही संकल्पनांना, शब्दांना अयोग्य महत्त्व दिलंय. ‘competition, passion, aggression, kyou have to be the ’ वगरे. माझं भलं होण्याला सगळ्यात जास्त महत्त्व. माझं भलं करून घेत असताना, त्या ‘ कॉम्पिटिशन’मध्ये मी बरोबरच्याचा विचार केला नाही, दखल घेतली नाही तरी ते क्षम्यच असतं, हा विचार सर्वमान्य होतो आहे; किंबहुना त्याला प्रतिष्ठा आहे. पर्यायानं आपण स्वार्थी नागरिक तयार करतो आहोत आणि स्वार्थी असण्यात काहीच चूक नाही, अशी आमची समजूत होत चालली आहे. ‘‘असं वागलं नाही तर या जगात जगणंच शक्य नाही,’’ असं आम्ही स्वत:ला पटवतो आहोत. या धांदलीत आपल्या हेही लक्षात येत नाही की, आपण प्रसंगी स्वत:शीच टोकाचे असहिष्णूपणे वागतो, स्वत:वरच चिडतो, स्वत:ला कमी लेखतो, मानसिक आरोग्य घालवून बसतो. सोबत आजूबाजूंच्या गोष्टींची दाखल, सह-अनुभूती, दुसऱ्याचा विचार या गोष्टी दैनंदिन आयुष्यात गौण ठरायला लागल्या आहेत.
सिग्नल किंवा वाहतुकीचे इतर नियम न पाळणं, रस्त्यावरची स्वच्छता, रांगा यांसारखे सार्वजनिक नियम न पाळणं, पर्यावरणाचा विचार न करणं ही सगळी या मानसिकतेचीच दृश्यरूपं आहेत.
वरच्या उदाहरणांचा थोडासा विचार केला, तर आपल्या लक्षात येईल की, सहिष्णू असणं, दुसऱ्या माणसाला स्पेस देणं, तो वेगळा आहे हे मान्य करणं, त्याला सामावून घेणं हे जनरलीच आपल्या रोजच्या आयुष्यातून कमी होत चाललं आहे. एक वैविध्यपूर्ण समूह म्हणून एकत्र राहायला ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या पातळ होत चालल्यात. खेडय़ांमध्ये, गावांमध्ये किंवा शहरं लहान असताना हे उत्तरदायित्व जरा जास्त होतं. समूह जितके मोठे होताहेत, आधुनिकतेमुळे एकमेकांवरचं अवलंबून असणं जितकं कमी होतं आहे तितके आपण असहिष्णू होतो आहोत. सगळ्याच बाबतीत. फक्त धर्म, जात किंवा भाषेच्या बाबतीत नाही. माणसांच्याच बाबतीत.
सुरुवातीला मी शब्द आणि संकल्पनांविषयी बोललो. आणखी एक शब्द आपण सध्या अगदी सर्रास ऐकतो, वापरतो. तो म्हणजे ‘कट्टर’.
याही शब्दाची, संकल्पनेची दाहकता, परिणाम आपण लक्षात घेतो का? मी िहदू आहे, मुसलमान आहे, मराठी आहे, कानडी आहे म्हणणं वेगळं आणि मी ‘कट्टर’ िहदू, मुसलमान, मराठी किंवा कानडी आहे हे म्हणणं वेगळं. या शब्दातच एक अ‍ॅग्रेशन आहे, टोकाचा आग्रह आहे. मी काय आहे याहीपेक्षा मी काय नाही हे सांगण्याचा प्रयत्न आहे. ‘इथे संवादाला जागा नाही’ असा इशारा त्या शब्दात आहे. आपल्या मनाशी हा शब्द एकदा उच्चारून पाहा. त्यात एक प्रकारचा इनबिल्ट व्हायोलन्स आहे.
कट्टरता प्रवाह थांबवते. लवचीकता घालवते. मध्यम मार्ग नाकारते. संवादाची दारं बंद करते. वैविध्यपूर्ण समूहापेक्षा विशिष्ट समूहाला प्राधान्य देते आणि ‘एकत्र’ राहण्यासाठी हे सगळं घातक आहे.
‘कट्टरता’ या संकल्पनेला इतकी प्रतिष्ठा, इतका सर्रासपणा कसा आणि का मिळालाय? गेल्या काही वर्षांमध्ये जगभरच्या बहुतेक सर्व राजकीय पक्ष, सर्व धर्म किंवा जातींवर आधारित समूह यांच्या प्रचाराचा पाया काय झालाय हे पाहू या. आपल्या असं लक्षात येईल की, आपल्याशी संबंधित समूहामध्ये असुरक्षितता निर्माण करणं, तुमचं अस्तित्वच धोक्यात आहे, असं सतत सांगत राहणं हा सगळ्यांच्याच प्रचाराचा गाभा झालाय.
ही मंडळी म्हणतात त्याप्रमाणे आपल्या धर्माचं, जातीचं, भाषेचं अस्तित्व खरोखर धोक्यात आहे; हे ‘खरं’ की ‘खोटं’ असा ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट’ विचार करायला गेलो तर आपण कधीच निर्णयाप्रत पोहोचणार नाही, कारण पक्ष किंवा संघटना जे मुद्दे मांडत असतात त्यात थोडासा का होईना पण सत्याचा अंश असतो, पण फक्त अंशच असतो. ते पूर्ण सत्य नसतं आणि इथंच मेख आहे. आंशिक सत्य जर पूर्ण सत्य म्हणून लोकांच्या मनावर िबबवायचं असेल तर त्यांना भीती घालावी लागते. शत्रू खूप प्रबळ आहे, तुमचं अस्तित्वच धोक्यात आहे आणि केवळ आम्हीच तुमचे तारणहार आहोत हे सतत मनावर ठसवावं लागतं. लक्षात घ्या, ‘मनावर’ ठसवावं लागतं, बुद्धीवर नव्हे. आणि मनावर अधिराज्य गाजवायचं असेल तर सतत ‘भावनेला’ हात घालावा लागतो. लोक मेंदूऐवजी हृदयानं विचार कसे करतील हे पाहावं लागतं. सतत सातत्यानं ‘चेतवणारी’ आणि ‘भडकवणारी’ भाषा बोलावी लागते. आकडेवारी वेगळ्याच पद्धतीनं मांडून तिचं ‘भयानक’ स्वरूप समोर उभं करावं लागतं. हे सगळीकडेच होत आहे. आपल्याला धोका आहे, असं प्रत्येकच गट म्हणायला लागला आहे. (मग जगात कोण सुरक्षित आहे सध्या?) पक्षीय आणि संघटनात्मक राजकारणाचा, त्यांच्या अस्तित्वाचा तो भाग झाला आहे. स्वत:चं अस्तित्व टिकवणं हा त्यांच्या कामाचाच भाग आहे असं घटकाभर मानून त्यांना बाजूला ठेवलं तर शिल्लक राहतो आपल्यातला ‘सामान्य’ माणूस. स्वत:मधली वैचारिक किंवा राजकीय बांधीलकी, झुकाव बाजूला ठेवून ‘विचार’ करू शकणारा सामान्य माणूस. पक्ष किंवा संघटना जे विकू पाहताहेत ते ‘गिफ्ट हॅम्पर’सारखं सगळंच्या सगळं घरी घेऊन जायचं, की विचार करून आपल्याला पटेल तितकंच स्वीकारायचं, हे आपल्यातल्या सामान्य माणसालाच ठरवावं लागेल. मी ‘कट्टर’ अमुकतमुक आहे, असं म्हणताना आपण जी सदसद्विवेकबुद्धी घालवून बसतो ती ही. सहिष्णुता संपते ती अशी.
टोकाच्या आग्रही आणि स्वार्थी वातावरणात शिकलेले, वाढलेले, नोकरी-व्यवसाय करणारे आपण; या ‘कट्टर’तेच्या संकल्पनेचा स्वीकार करण्यासाठी अगदी योग्य अशा मानसिकतेचे होऊन बसलेलो आहोत. हे आपल्यालाच बदलायला हवं. अन्यथा या असहिष्णू वातावरणाला अंत असणार नाही. सध्या धर्म या अर्थानं असहिष्णू हा शब्द जास्त प्रचलित आहे. घटकाभर असं धरून चालू की, काही वर्षांनी धर्म ही समस्याच उरली नाही. सगळे देश आपापल्या धर्माप्रमाणे कडेकोट वाटले गेले. (अशक्य आहे, पण एखादं प्रमेय सिद्ध करण्यापुरतं जसं एक गृहीतक मान्य करतात तसं हे घटकाभर मान्य करू.) असं झालं तर असहिष्णुतेची समस्या संपेल? भारतीय समाजरचना ही धर्मावर नाही तर जाती आणि पोटजातीवर आधारित आहे. जातिव्यवस्थेमुळे असलेली असमानता, अन्याय, भयानक चालीरीती हे आपल्या सामाजिक विणीचे धागेदोरेच आहेत. धार्मिक तणाव ही समस्या म्हणून कधी संपलीच तरी या जातिव्यवस्थेच्या समस्येचं आपण काय करणार आहोत? त्यातून निर्माण झालेले तणाव कसे हाताळणार आहोत? त्या वेळीही सहिष्णुता लागेलच ना? आत्ताही लागतेच ना? म्हणजे सहिष्णुतेच्या मूल्याला पर्याय नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. गेल्या काही वर्षांत सहिष्णुतेच्या संकल्पनेची खिल्ली उडवण्याची, तिला बुळं ठरवण्याची घोडचूक आपण केली आहे. हे फक्त राजकीय पातळीवर होऊन थांबलंय असं नाही, तर वैयक्तिक पातळीवर, मानसिक पातळीवरदेखील त्याचा नकारात्मक परिणाम झालाय असं आपल्या लक्षात येईल.
अ‍ॅग्रेशन, आक्रमण, अन्याय थोपवणं आवश्यकच आहे. आत्यंतिक गरजेचं आहे, पण दुष्टपणा थांबवणं वेगळं आणि त्याचं सार्वत्रिकीकरण करून स्वत: आक्रमक होणं वेगळं. आक्रमण थांबवणं आणि आक्रमक होणं यातला फरक लक्षात घेतला तर खूप आहे आणि दुर्लक्षायचा ठरवला तर मग काहीच नाही. हृदयाऐवजी मेंदूनं विचार केल्यानंच यातला फरक अधोरेखित होईल.
जगातल्या सर्वच्या सर्व माणसांचे आचार-विचार, मतं, चालीरीती, खाण्यापिण्याच्या आवडी आणि सवयी, पोशाख वगरे यच्चयावत गोष्टी जुळत नाहीत तोवर सहिष्णुता लागणारच. असं सगळं आलबेल होणं शक्य नाही आणि म्हणून समूहात जगण्यासाठी सहिष्णुता हे एक प्राथमिक मूल्य म्हणून स्वीकारण्याला पर्याय नाही. ते अंगी बाणवावं लागणार. त्याची नव्यानं सवय करून घ्यावी लागणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जन्माला घातलेल्या पुढच्या पिढीलाही ते ठामपणे सांगावं लागणार. हे सगळं फक्त धर्म किंवा जातीच्या पातळीवरच्या सहिष्णुतेबद्दल नाही. ते खूपच नंतर. प्रथम एक माणूस म्हणून समूहामध्ये समाधानानं जगायचं असेल तर सहिष्णुतेचं मूल्य जपणं आवश्यक आहे, कुटुंब म्हणून आवश्यक आहे. बिल्डिंग, सोसायटी, गल्ली, गाव, शहर, राज्य, देश म्हणून आवश्यक आहे. जग म्हणून त्याची गरज आहे.
atul@atulkulkarni.com

lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
israel iran war history
Iran-Israel War: एकेकाळी मित्र असणारे दोन देश एकमेकांचे कट्टर शत्रू कसे झाले?
israel hamas war
अग्रलेख : नरसंहाराची नशा!
Hamas Israel conflict
१३००० बालकांसह ३४५०० नागरिक मृत्यू,लाखो बेघर, संपूर्ण प्रदेश बेचिराख; गाझा युद्धाचे रक्तलांच्छित सहा महिने!