अमेरिका आणि इराण यांच्यामधील तणाव क्रूड तेलाएवढाच ज्वलनशील पातळीवर पोहोचला आहे. ठिणगी पडण्याचा अवकाश.. एवढे त्यांच्यातील संबंध विकोपाला गेलेत. या आगीत रोजच तेल ओतले जात आहे. ट्रम्प यांनी लढाऊ विमाने आणि युद्धनौका पर्शियाच्या आखातात सज्ज ठेवल्या आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांनी, परिस्थिती चिंताजनक असली तरी युद्ध होणार नाही, परंतु आम्ही अमेरिकेशी वाटाघाटी करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. अमेरिकेने मात्र तेहरानमधील अत्यावश्यक अधिकारी-कर्मचारी वगळता इतरांना संयुक्त अरब अमिरातीमध्ये आश्रय घेण्यास सांगितले आहे. इराणला परकीय चलन मिळवून देणाऱ्या लोखंड, पोलाद, अ‍ॅल्युमिनियम व तांब्यावर र्निबध लादणारा आदेश अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढल्याने मध्य आशियावर युद्धाचे काळे ढग दाटले आहेत.

अशा तणावाच्या पाश्र्वभूमीवर  न्यूयॉर्क टाइम्सने छापलेली दोन प्रातिनिधिक वाचकपत्रे या परिस्थितीवर मार्मिक टिप्पणी करतात. त्यातला एक वाचक इराणी नागरिकांच्या संतापाचे अनुभव कथन करतो, तर दुसरा आपण भूतकाळातून धडा घेणार आहोत का? असा प्रश्न अमेरिकी प्रशासनाला विचारतो.

‘‘मी नुकताच इराणला जाऊन आलो. तेथील बुद्धिमान आणि उच्चविद्याविभूषित लोकांशी चर्चा केली. ही मंडळी अमेरिकेचे समर्थक होते, परंतु आज ते कट्टर विरोधक आहेत, हे कसे घडले? इराणी सरकारच्या धोरणांना विरोध करणारे एक ७० वर्षीय गृहस्थ मला म्हणाले, ‘अमेरिकेने आमच्यावर युद्ध लादलेच तर मी आणि माझा ४० वर्षांचा मुलगाही सैनिक म्हणून रणांगणावर जाऊ. इराण सरकार धुतल्या तांदळासारखे नाही, काही दोष आहेत, परंतु अणुकराराचे पालन केले जात असतानाही अमेरिकेची युद्धखोरी कशासाठी? माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या धोरणांना तिलांजली देणे, हा ट्रम्प यांचा हेतू आहे.’ मी सर्वसामान्य इराणी नागरिकांचा अमेरिका द्वेष समजू शकतो परंतु बुद्धिवंतही अमेरिकेच्या विरोधात बोलतात, हे माझ्यासाठी धक्कादायक आहे’’, असे अ‍ॅलन साडेगी या कॅलिफोर्नियातील वाचकाने लिहिले आहे. तर जॉन एन. कॉर्बिन हा नॉर्थ कॅरोलिनातील वाचक, आपण भूतकाळातून काही शिकणार आहोत की नाही, असा प्रश्न ट्रम्प प्रशासनाला विचारतो. ‘मध्य अमेरिकेतील हिंसाचार असो की उत्तर कोरियाचा प्रश्न, ट्रम्प प्रशासनाने केवळ ताकदीचे प्रदर्शन केले. ट्रम्प सहसा कुणाच्या मागे लागत नाहीत, परंतु त्यांचे सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या सल्ल्यामुळे ते बिथरतात. हा बोल्टन नावाचा ससाणा दशकभरापासून इराणच्या मागे हात धुवून लागला आहे. काही देशांनी थोडीशी आक्रमकता दाखवली की त्यांचा आर्थिक किंवा लष्करी मार्गानी बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करून त्यांना एकटे पाडणे हा त्यांचा कार्यक्रम आहे. इराणच्या बाबतीतही हेच पुन्हा घडणार आहे का?’ असा प्रश्न हा वाचक उपस्थित करतो.

आगीत तेल ओतून ती सतत पेटती ठेवण्याचा सल्ला ट्रम्प यांना देणारे त्याचे सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या युद्धखोरीची चिरफाड करणारा ज्युलियन बोर्जर यांचा लेख गार्डियनने प्रसिद्ध केला आहे. हे महाशयच अमेरिकेला युद्धाकडे कसे नेत आहेत, त्याचे विश्लेषण या लेखात आहे. उत्तर कोरिया, इराण आणि व्हेनेझुएला यांच्याबाबतीत तणाव निर्माण करण्याचे काम हेच बोल्टन करत असल्याचे हा लेख म्हणतो.

अमेरिका इराणवर युद्ध लादण्याच्या दिशेने कूच करत आहे का, असा प्रश्न उपस्थित करणारा लेख बीबीसीने ऑनलाइन आवृत्तीत प्रसिद्ध केला आहे. इराणच्या आर्थिक नाडय़ा आवळल्यामुळे अमेरिकेचे मध्य आशियातील मित्र इस्रायल आणि सौदी अरेबिया टाळ्या पिटत असले तरी अमेरिकेचे युरोपातील दोस्त मात्र जे काही घडत आहे त्याबद्दल नाखूश आहेत, असे निरीक्षणही या लेखात आहे. युद्ध करण्याबाबत ट्रम्प फारसे उत्साही नाहीत, परंतु अमेरिकेच्या सैन्यावर हल्ला झाल्यास ट्रम्प मागेपुढे पाहणार नाहीत. इराणला खरोखर मोठय़ा हल्ल्याचा धोका आहे का, या प्रश्नाचे उत्तर अनेक पंडित नाही, असे देतात, पण अमेरिकेच्या हितसंबंधांवर हल्ला झाल्यास धमकावणे हा राजकीय डावपेचांचा भाग असू शकतो, मात्र त्याचा अर्थ युद्धाकडे कूच असा होत नाही, असे मत हा लेख मांडतो. सध्याचा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी आपले चुकीचे आकलन आणि पूर्वग्रह खुंटीला टांगून सदसद्विवेकाने निर्णय घेणे आवश्यक आहे, असेही हा लेख सुचवतो.

(संकलन- सिद्धार्थ ताराबाई)