खरेदीवर इतक्या मोठय़ा सवलती कशा?

ऑनलाइन खरेदीची संकेतस्थळे म्हणजे लाखो विक्रेत्यांचे सामायिक व घरोघरी पोहोचलेले विक्री दालनच असते. फ्लिपकार्ट, स्नॅपडील, अ‍ॅमेझॉन वगैरे म्हणजे खरे तर विक्रेते व ग्राहक यांच्यातील दुवा आहेत. जसे ई-पेठेत दोन दशके बस्तान असलेल्या अ‍ॅमेझॉनशी सुमारे ५०,००० विक्रेते, तर तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या स्नॅपडीलशी दोन लाख विक्रेते संलग्न आहेत. फ्लिपकार्टवरील ८० टक्केउत्पादने ही ‘डब्ल्यूएस रिटेल’ या तिच्या उपकंपनीकडून येत असतात.
ई-पेठेतील अन्य संकेतस्थळांवर उपलब्ध वस्तूंच्या किमती पाहून अ‍ॅमेझॉन व स्नॅपडील आपल्या विक्रेत्यांशी किमतीत सवलतीसाठी वाटाघाटी करते अथवा किमतीबाबत आपले प्रस्ताव समोर ठेवते.

सणवारात सवलतीत विक्रीचे काही खास दिवस (बिग बिलियन डे धाटणीचे) ऑनलाइन विक्रेते जाहीर करतात. स्नॅपडीलने गेल्या वेळी अशा दिवसांत सेकंदाला ३०० वस्तू या दराने विक्री केली आहे. इतकी भरमसाट विक्री आणि दिवसाला कोटय़वधींनी व्यवसाय होत असल्याने कैक विक्रेते हा किंमत प्रस्ताव मान्यही करतात. थेट ५० टक्के सूट अथवा एक घेतल्यास दुसरे मोफत असे हातखंडे वापरतात.

अर्थात विक्रेत्यांना पसंत पडो वा ना पडो, अधिकाधिक ग्राहक मिळविण्याच्या चढाओढीत अधिकाधिक सवलती देणे संकेतस्थळांना भाग ठरते. विक्रेत्याने निश्चित केलेली किमत आणि प्रत्यक्ष सवलत किमत यातील तफावत अर्थात मागाहून अ‍ॅमेझॉन, स्नॅपडीलकडून भरून काढली जाते.

ऑनलाइन विक्रेत्यांना सूट-सवलतींच्या खैरातीपायी जवळपास १,००० कोटी रुपयांचा तोटा सोसावा लागल्याचे प्राइसवॉटर हाऊस कूपर्सच्या अहवालाचा हवाला आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास प्रत्येक १०० रुपयांच्या पुस्तक विक्रीवर ऑनलाइन विक्रेत्याला २४ रुपयांचा तोटा होतो.
ग्राहक मात्र जोवर सवलतीसह नमूद किमतीवर माल मिळवीत आहे, तोवर त्याने ही सवलत अस्सलच मानायला हवी. पण काही प्रसंगी विक्री किंमतच मुळात फुगवून सांगायची आणि त्यावर ६५ टक्क्यांची सवलत, असले प्रकारही होत असतात. विशेषत: फर्निचर, गृहसजावटीचे सामान, कपडे, पादत्राणांबाबत असे घडते.

ब्रॅण्डेड उत्पादनांबाबत सवलतीची मात्रा काहीशी स्पर्धेतून आणि मोठय़ा विक्रीच्या अपेक्षेने निर्मात्यांकडून काहीशी अशा तऱ्हेने ग्राहकांपर्यंत पोहोचते. मात्र ५,००० रुपयांत आयफोन ५एस देत असल्याची जर कुणी ऑनलाइन विक्रेता जाहिरात करीत असेल तर मात्र निश्चितच काळेबेरे आहे हे लक्षात घ्या. लोभस सवलतींचा माग ठीक पण अशक्य कोटीतील गोष्टींचा हव्यास टाळलेलाच बरा!

संकेतस्थळावरून खरेदीचा प्रवास आता हळूहळू मोबाइलकडे वळू लागला आहे. यासाठी अनेक ई-कॉमर्स कंपन्यांनी आपले मोबाइल अ‍ॅप विकसित केले असून त्यामध्ये ते संकेतस्थळापेक्षा जास्त सवलत देऊ करतात. . हे लक्षात घेऊन अनेक ग्राहकही ऑनलाइन शॉपिंगसाठी मोबाइलला पसंती देत आहेत.
ऑनलाइन खरेदी करताना घ्यावयाची काळजी

ऑनलाइन खरेदी करताना आपण थोडे सजग राहणे केव्हाही चांगले. सर्वप्रथम आपण ज्या संकेतस्थळावरून खरेदी करत आहोत ते संकेतस्थळ कोणाचे आहे याची माहिती करून घ्या. यासाठी संकेतस्थळावरील ‘अबाऊट अस’ या पर्यायामध्ये जा आणि तेथे उपलब्ध माहिती वाचून ती टिपून ठेवा. शक्यतो माहितीतल्या संकेतस्थळांवरूनच खरेदी करा.

जर तुम्ही वाय-फाय वापरत असाल तर ते वाय-फाय सुरक्षित आहे ना याची खात्री करून घ्या.

’वस्तू खरेदी करत असताना त्या वस्तू संदर्भातील माहिती तपासून घ्या. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या कंपनीचा फोन विकत घेणार असाल तर त्या कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन संबंधित फोनची माहिती पडताळून पाहा.
’संकेतस्थळावर उत्पादनाच्या खाली देण्यात आलेल्या ग्राहक अभिप्राय-प्रतिक्रियांना भुलू नका. त्या अनेकदा फसव्या असू शकतात. उत्पादन खरेदी करताना वॉरंटी अथवा गॅरंटीची माहितीही तपासून घ्या.
’ऑनलाइन शॉपिंग करताना शक्यतो ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ हा पर्याय निवडा.
’अगदीच तुम्हाला जर ऑनलाइन पेमेंट करावयाचे असेल किंवा ऑनलाइन पेमेंटमुळे तुम्हाला कॅशबॅकसारख्या ऑफर्सचा फायदा होत असेल तर ते करत असताना पेमेंट गेटवेबाबत खात्री करून घ्या. त्या संकेतस्थळावर विविध पेमेंट गेटवे उपलब्ध असतात. त्यातील सर्वात सुरक्षित (शक्य तो ज्या बँकेत बचत खाते आहे ते) पर्याय निवडून मगच कार्डची माहिती भरा.
’अनेकदा तुमच्याकडून अवाजवी माहिती मागविली जाते. उदाहणार्थ तुम्ही एक मोबाइल क्रमांक दिला तरी दुसरा पर्यायी क्रमांक मागितला जातो. तर अशी अनावश्यक माहिती देणे टाळा.
’ऑनलाइन पेमेंट करताना किंवा कोणतीही माहिती भरताना संकेतस्थळाच्या नावाच्या आधी ँ३३स्र्२:// आहे की नाही हे तपासून घ्या.

फायदा-तोटय़ांचा हिशेब

’सवलती : ऑनलाइन खरेदीचा ग्राहकांच्या दृष्टीने सर्वात मोठा फायदा कोणता तर तो किंमत सवलतीचा. भरघोस सवलतींमुळे ग्राहकांना त्यांना पाहिजे ती वस्तू कमीत कमी पैशांत विकत घेणे शक्य होते. याचबरोबर आपण अमुक इतक्या रुपयांची खरेदी केल्यावर आपल्याला आणखी काही रुपयांचे कूपन्सही दिले जातात.
’सोयीस्करता : ऑनलाइन शॉपिंग म्हणजे वेळेची बचत असे एक सूत्र आहे. यामध्ये आपण एका क्लिकवर नेमकी हवी ती वस्तू सहज खरेदी करू शकतो. तीही घरबसल्या आणि दिवसाच्या चोवीस तासांत केव्हाही आपल्या सवडीप्रमाणे!
’बहुविधता : बाजारात एखाद्या दुकानात ५० वस्तू पाहिल्यानंतर त्या पसंत पडल्या नाहीत तर दुसऱ्या दुकानात जाऊन पुन्हा तेवढाच वेळ शोधाशोधीला द्यावा लागतो. पण ऑनलाइन शॉपिंगमध्ये आपल्याला स्क्रिनवर एकाच वेळी अनेक वस्तू पाहावयास मिळतात. इतकेच नव्हे तर आपल्याला जी वस्तू हवी आहे ती कोणकोणत्या ब्रॅण्डमध्ये किती किमतीला आणि कोणत्या सुविधांसह उपलब्ध आहे हे आपल्याला सत्वर कळते.
’रोकडरहितता : ऑनलाइन शॉपिंग करताना आपण डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने पैसे भरू शकतो. इतकेच नव्हे तर आपण कॅश ऑन डिलिव्हरीसारखे पर्यायही निवडू शकतो.
’सेवातत्परता : भेटवस्तू देण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग केव्हाही उपयुक्तच. आपल्याला एखाद्याला भेटवस्तू द्यावयाची असेल तर आपण ती थेट त्याच्या पत्त्यावर अगदी ती व्यक्ती परगावी-परदेशात असली तरी पाठवू शकतो.

’दुकानात जाऊन वस्तू पूर्णपणे चाचपून घेऊनच आपण खरेदी करतो. संकेतस्थळावरून खरेदी करताना मात्र आपल्याला हे शक्य होत नाही. विशेषत: कपडे खरेदी करताना आपल्या मापात ते आहेत का हे आपण ट्रायल करून पाहतो. ऑनलाइन खरेदीत आपल्याला कपडय़ाचे माप दिलेले असते, पण प्रत्येक निर्मात्या व ब्रॅण्डनुसार वेगवेगळे असते. असाच प्रकार चपलांच्या बाबतीतही होतो.
’आपण संकेतस्थळावरील छायाचित्रात एखादी वस्तू पाहिलेली असते ती आपल्याला खूप भावते, पण प्रत्यक्षात जेव्हा ती वस्तू आपल्यापर्यंत पोहोचते तेव्हा आपल्याला धक्काच बसतो, कारण आपण छायाचित्रात पाहिलेली वस्तू आणि आपल्याकडे आलेल्या वस्तूत फरक असू शकतो.
’संकेतस्थळावर एकच वस्तू विकणारे विविध ब्रॅण्ड्स असतात. त्यात आपण अनेकदा जे स्वस्त आहे ते पसंत करतो. यामुळे अनेकदा आपल्याला कमी दर्जाची वस्तू मिळण्याची दाट शक्यता असते.
’आपल्याला एखादी वस्तू पसंत पडली नाही तर ती परत बदलून घेण्याची सुविधा ऑनलाइन बाजारातही उपलब्ध आहे. मात्र ती वस्तू बदलायची असेल तर आपल्याला शिपिंगचे पैसे वेगळे मोजावे लागतात. यामुळे अनेकदा त्या वस्तूच्या मूळ किमतीपेक्षाही जास्त खर्च होण्याची शक्यता असते.
’अनेकदा आपण मागविलेल्या वस्तूंपेक्षा वेगळीच वस्तू किंवा अनेकदा मोबाइलऐवजी दगड पाठविल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यामध्ये अनेकदा कंपन्या आपली चूक मान्य करून ग्राहकाला त्याचे पैसे परत करतात किंवा ती वस्तू पाठवून देतात. मात्र या सर्व प्रकारात ग्राहकाला नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.
ही तर ‘कायद्यांची पायमल्ली’च!

ऑनलाइन-ऑफलाइन या विक्रीच्या दोन अंगात सध्या भिंत पडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मुळात उभयतांत एक अस्पष्ट अशी सीमारेषा आहे, असे फार तर म्हणता येईल. ई-व्यापाराची आम्हालाही गरज आहेच. मात्र सध्या मोकाट असलेल्या या क्षेत्रावर नियमन हवे. त्यांच्याकडे येणाऱ्या पैशाचे माध्यम कोणते, निधी कसा येतो, कुणाकडून येतो व तो गुंतविला कसा जातो यावर सध्या कोणतीही देखरेख नाही. ई-व्यापाराशी समान पायावर बरोबरी साधताना आणखीही काही गोष्टी हव्यात. अत्यावश्यक जिन्नसांची अहोरात्र उपलब्धता, किरकोळ विक्री व्यवसायाकरिता परिमंडळे (झोन) स्थापन करणे आदी तरतुदी महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित किरकोळ विक्री धोरणात समाविष्ट आहेत. त्या प्रत्यक्षात आल्या तर सापत्नतेची ही दरी निश्चितच कमी होईल. भिन्न भौगोलिक स्तरावर पसरलेल्या व्यवसायामुळे त्या त्या ठिकाणच्या विविध स्तरीय करांचा सामना आम्हाला करावा लागतो. बहुप्रतिक्षित वस्तू व सेवा करामुळे हे सारे निकाली निघणार आहेच; पण तोपर्यंत कायदे तुडविलेले खपवून घ्यायचे काय? ई-व्यापारातील एफडीआय, प्रायव्हेट इक्विटी, व्हेंचर कॅपिटल वगैरे गुंतवणुकीबाबतही ‘कायद्यांची पायमल्ली’ असेच वर्णन करता येईल.
कुमार राजगोपालन, मुख्याधिकारी, रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया

‘ते’ तर आमचा कणा आहेत

मुळात ऑनलाइन-ऑफलाइन हा वाद नाहीच. उलट दोन्ही एकमेकांना पूरक क्षेत्र आहेत. आज माहिती तंत्रज्ञानामुळे आणि त्याचा अधिकतर अंगीकार करणाऱ्या युवा ग्राहकांमुळे ऑनलाइन रिटेलची वाढ वेगाने सुरू आहे. तथापि ऑफलाइन म्हणजेच पारंपरिक विक्रेतेच नसतील तर आम्हालाही व्यवसाय शक्यच नाही. आज ई-मंचावर एकेरी अथवा साखळी दुकाने असणारे विक्रेतेही उतरले आहेत. यातून अनेक छोटय़ा-मोठय़ा दुकानदार, व्यावसायिकांना व्यासपीठ मिळाले आहे. भारतातील आघाडीच्या अनेक ई-व्यापार कंपन्यांचे संकेतस्थळ, अ‍ॅपवर मिळणाऱ्या निम्म्यापेक्षा अधिक वस्तू या अनेकदा स्थानिक व्यापाऱ्यांकडील, लघु-उद्योगांकडून तयार झालेल्या असतात. आमच्या सर्वेक्षणात तयार कपडे, आरोग्याशी संबंधित उत्पादने, स्वयंपाकघरातील वस्तूंना (अनब्रॅण्डेड) ग्राहकांकडून अधिक मागणी मिळत आहे. त्या स्थानिक पातळीवरूनच पुरविल्या जात असतात. ई-व्यापाराचे भविष्यातील वाढीचे आकडे वेगवेगळे दिले जातात. मात्र एकूण विक्री बाजारपेठेचा तुलनेत त्यांचा हिस्सा तरी माफकच आहे. तेव्हा नव्या ई-पेठेतून पारंपरिक वाणसामानाचे गल्लीतील दुकान गुंडाळले जाणार अशा वावडय़ांमध्ये काहीही तथ्य नाही.
पंकज उके, संचालक (विक्रेता सेवा), ईबे इंडिया