डॉ. शरद बाविस्कर

फ्रान्समध्ये १६ ऑक्टोबर रोजी सॅम्युएल पाटी नामे शिक्षकाचा झालेला शिरच्छेद, त्यानंतर २९ ऑक्टोबरला नीस शहरातील एका चर्चमध्ये झालेली तिघांची हत्या ही कृत्ये इस्लामवादी दहशतवाद्यांनीच केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या अस्वस्थतेला ‘फ्रेंच प्रजासत्ताक विरुद्ध मूलतत्त्ववादी इस्लाम’ असे वळण देण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु ही मांडणी किती व्यवहार्य आहे.. फ्रान्ससाठी आणि लोकशाहीवाद्यांसाठीही?

फ्रान्समध्ये १६ आणि २९ ऑक्टोबर रोजी दहशतवादी हल्ले झाले. पहिल्या हल्ल्यात सॅम्युएल पाटी नावाच्या शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला; कारण त्याने त्याच्या वर्गात अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा विषय शिकवताना इतर व्यंगचित्रांबरोबर प्रेषित मुहम्मद यांचे व्यंगचित्र दाखवले. दुसऱ्या हल्ल्यात नीस शहरातील एका चर्चमध्ये तीन व्यक्तींची चाकूने निर्घृण हत्या करण्यात आली. या दहशतवादी हल्ल्यांचे फ्रान्समध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. हे दहशतवादी हल्ले म्हणजे फ्रेंच समाजाची ओळख आणि अस्तित्वाविरुद्ध पुकारलेले युद्ध मानले जात आहे. इस्लामवादी दहशतवादाला सडेतोड उत्तर म्हणून सॅम्युएल पाटीला फ्रेंच सरकारने ‘लिजन ऑफ ऑनर’ हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचे ठरवले आहे. पॅरिसमधील ऐतिहासिक सोबरेन विद्यापीठाच्या प्रांगणात सॅम्युएल पाटीला आदरांजली वाहताना फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमान्युएल मॅक्रॉन म्हणाले, ‘‘प्रोफेसर, आम्ही थांबणार नाही. आम्ही हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा लढा चालूच ठेवणार. यापुढे तुम्ही या लढय़ाचा चेहरा असणार आहात. फ्रान्समध्ये प्रबोधनाचा प्रकाश कधीच विझणार नाही.’’

एक पाऊल पुढे जाऊन, ज्या व्यंगचित्रामुळे दहशतवाद्यांनी हल्ले केले ते सार्वजनिक इमारतींवर झळकवण्यात आले. एकीकडे जगभरातून दहशतवादी हल्ल्यांचा निषेध झाला, तर दुसरीकडे प्रेषित मुहम्मद यांचे व्यंगचित्र दाखवल्यामुळे मुस्लीम जगतातून फ्रान्सवर तीव्र टीका होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, बऱ्याच धर्मनिरपेक्ष समजल्या जाणाऱ्या देशांनासुद्धा फ्रान्समध्ये अस्तित्वात असलेली धर्मनिरपेक्षता आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याची संकल्पना अनाकलनीय वाटत आहे. ढोबळमानाने पाहता, या वादाचा अन्वयार्थ लावताना तीन प्रकारच्या मांडणी होत आहेत.

एक, टर्की आणि पाकिस्तानसारख्या देशांमध्ये फ्रान्सचा निषेध आणि फ्रेंच वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात येत आहे. त्याबरोबरच मध्ययुगीन धर्मयुद्धांच्या आठवणी जागवल्या जात आहेत. खरे तर फ्रान्समधील वाद ‘ख्रिश्चन विरुद्ध मुस्लीम’ असा नाही; कारण तो वाद तसा असता तर तिथल्या असंख्य कृष्णवर्णीय ख्रिश्चन जनतेला फ्रेंच ओळख जाचक वाटली नसती. याचा अर्थ असा मुळीच नाही की, या वादाला फ्रान्समध्ये धार्मिक रंग देऊ पाहणारे अजिबात नाहीत. निकोलस सार्कोझी यांच्या सरकारात मंत्रिपद भूषविलेल्या एका मंत्र्याने या वादाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला.

अमेरिकी विचारवंत (‘द क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स..’चे लेखक) सॅम्युएल हटिंग्टन यांच्या म्हणण्यानुसार, या वादाला ‘इस्लाम विरुद्ध पाश्चात्त्य सभ्यता’ अशा पद्धतीने मांडणाऱ्यांची संख्या त्या मानाने जास्त आहे. अशी मांडणी करणारे- पाश्चात्त्य सभ्यतेत ख्रिस्तीपूर्व ग्रीक-रोमन इतिहासाचा समावेश करून त्यास लोकशाहीपूरक मूल्यांचा एकमेव स्रोत मानतात.

मात्र, सध्या सर्वाधिक पाठिंबा मिळताना दिसतो आहे तो फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमान्युएल मॅक्रॉन यांनी सॅम्युएल पाटीला आदरांजली वाहताना केलेल्या मांडणीला.. म्हणजे ‘फ्रेंच प्रजासत्ताक विरुद्ध मूलतत्त्ववादी इस्लाम’! या मांडणीला पाठिंबा मिळण्याचे कारण असे की, फ्रेंच जनतेच्या दृष्टीने ‘फ्रेंच रिपब्लिक’ हे बऱ्याच रक्तरंजित क्रांत्यांनंतर कमावलेले संचित आहे; आणि ते वाचविण्यासाठी फ्रेंच जनताकुठल्याही थराला जाऊ शकते, हा संदेश देण्याचे मॅक्रॉन यांना गरजेचे वाटले. फ्रान्समधील अलीकडच्या काळातील हा वाद समजून घेण्यासाठी या तिसऱ्या मांडणीचे कारण आणि राजकारण यांचा अन्वयार्थ लावणे गरजेचे आहे. तसेच या मांडणीचा वरील दोन मांडणींशी असलेला संबंध अधोरेखित करण्याचीही आवश्यकता आहे. दहशतवादी हल्ल्यांकडे फ्रेंच समाजाच्या क्रांतिकारी आणि पुरोगामी संचितावर होणार हल्ला म्हणून का पाहिले जात आहे? फ्रेंच समाजातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता यांसारख्या आधुनिक मूल्यांमध्ये कुठल्या प्रकारची अपवादात्मकता आढळून येते? की फ्रान्स या मानवतावादी मूल्यांचा वापर करून अल्पसंख्याकांची गळचेपी करीत आहे?

या प्रश्नांची उत्तरे शोधताना आधी फ्रेंच समाज आणि फ्रेंच राज्यसंस्था (राष्ट्रव्यवस्था) यांतील फरक स्पष्ट करावा लागेल. कारण ज्या क्रांतिकारी-पुरोगामी संचिताचा दाखला राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी दिला आहे, ते राज्यसंस्थेने कमावलेले नसून तेथील समाजाने प्रतिगामी आणि वर्चस्ववादी राज्यसंस्थेच्या विरोधात जाऊन अर्जित केलेले संचित आहे. इतर कुठल्याही राज्यसंस्थेप्रमाणे फ्रेंच राज्यसंस्था समग्र समाजाचे प्रतिबिंब नसून तेथील सत्ताधारी, वर्चस्ववादी वर्गाचे हत्यार राहिले आहे. म्हणून जेव्हा आपण फ्रेंच समाजाच्या क्रांतिकारी इतिहासाचे दाखले देत असतो, तेव्हा हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, फ्रेंच राज्यसंस्थेने त्याच मानवतावादी परंपरेचा दुरुपयोग साम्राज्यवादाच्या आणि वसाहतवादाच्या समर्थनार्थ केला आहे.

त्यामुळे आज फ्रान्समध्ये विचार- आचार- उच्चारस्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षता यांसारख्या मूल्यांच्या समर्थनार्थ ज्या क्रांतिकारी वारशाचा उल्लेख केला जातो, त्याचा इतिहास थोडक्यात जाणून घेणे आवश्यक आहे. लक्षणीय बाब म्हणजे पंधराव्या शतकापर्यंत फ्रेंच समाजसुद्धा धार्मिक पगडा असलेल्या समाजासारखा जवळपास हजार वर्षे सेंट ऑगस्टिनने (इ.स. ३५४-४३०) घालून दिलेल्या नियमानुसार : ‘‘समजण्यासाठी श्रद्धा ठेवा’’ : जगत होता. धर्ममरतडांनी हे तत्त्व जनमानसात खोलवर बिंबवून मनुष्याला निसर्गाविषयी, समाज व स्वत:विषयी पडणाऱ्या प्रश्नांना पूर्णविराम दिला आणि चर्चने दिलेल्या उत्तरांवर समाधान मानण्यास भाग पाडले. जो कोणी स्वतंत्रपणे विचार करण्याचा प्रयत्न करत असे त्याचा ब्लास्फेमी (ईश्वरनिंदा) कायद्यांचा वापर करून समाचार घेतला जात असे. त्यासाठी ‘इन्क्विझिशन’ नावाची बलाढय़ संस्था निर्माण करून समाजावर वचक बसवला जात असे.

पंधराव्या शतकाच्या अखेरीस आणि सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला मात्र युरोपमध्ये आधुनिक युगाचे वारे वाहू लागले. मार्टिन ल्युथर (इ.स. १४८३-१५४६) यांच्या क्रांतीनंतर अनेक घडामोडी होऊन धर्मसंस्थेची पकड सैलावली. साहित्यातल्या विविध क्लृप्त्या वापरून फ्रेंच साहित्याचा जनक आणि मानवतावादी विचारवंत समजला जाणाऱ्या फ्रान्स्वां राबेल (मृत्यू : इ.स. १५५३) याने धर्मचिकित्सा आणि ईश्वरनिंदा करण्यास सुरुवात केली. ज्या काळी मनुष्याच्या हसण्यालाही धर्ममरतड ‘सैतानी’ मानत असत, त्या काळी फ्रान्स्वां राबेलने ‘‘कुठलीही गोष्ट हसण्यासाठी योग्य’’ या ब्रीदवाक्याचा पुरस्कार करून फ्रेंच उपहासाची सुरुवात केली.

पुढे पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा जनक म्हणून ओळखला जाणाऱ्या रेने देकार्त (इ.स. १५९६-१६५०) या फ्रेंच तत्त्वज्ञाने सेंट ऑगस्टिनच्या ‘‘समजण्यासाठी श्रद्धा ठेवा’’ या नियमाला बाजूला सारून ‘‘मी विचार करतो म्हणून मी आहे’’ या क्रांतिकारी तत्त्वावर आधुनिक तत्त्वज्ञानाची मांडणी केली. हे तत्त्व केवळ तत्त्वज्ञानापुरते मर्यादित न ठेवता  नैसर्गिक आणि मानवी जीवनाच्या सर्व पैलूंची शास्त्रीय चिकित्सा करण्यासाठी ते वापरण्यात आले. मनुष्याची विचार करण्याची क्षमता त्याच्या जीवनाचा एकमेव आधार बनल्यावर ‘‘मी विचार करतो म्हणून मी आहे’’ या तत्त्वाचे अनेक अर्थ निघू लागले. ‘मी चिकित्सा करतो म्हणून मी आहे’, ‘मी प्रश्न विचारतो म्हणून मी आहे’, इत्यादी.

थोडक्यात, कुठलीही गोष्ट चिकित्सातीत राहिली नाही. निसर्गाबरोबरच धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय असे सगळे पैलू चिकित्सेच्या कक्षेत आले. या आधुनिक ज्ञानचिकित्सेच्या तत्त्वाआधारे भौतिक जगाचे नवीन आकलन शक्य झाले. मध्ययुगीन राज्यसंस्था आणि तिला आधार देणारी धर्मसंस्था या ज्ञानचिकित्सा पद्धतीसमोर टिकाव धरू शकल्या नाहीत. पुढे १७८९ मध्ये फ्रेंच राज्यक्रांती घडवून आधीच जर्जर झालेल्या राज्यसंस्था आणि धर्मसंस्थेच्या भिंती उद्ध्वस्त करण्यात आल्या. त्या जागी स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता यांसारख्या आधुनिक मूल्यांवर आधारित नवीन सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. अ‍ॅलेक्सी द तोकव्हिल या फ्रेंच विचारवंताच्या मते, फ्रेंच राज्यक्रांती घडवून आणणारे कुणी गुंडमवाली नसून (चिकित्सेचा) कार्टेशियन वारसा आत्मसात केलेले कृतिशील विचारवंत होते. कालौघात धर्मसंस्थेची राज्यसंस्थेत होणारी लुडबुड समाजाच्या सर्वागीण विकासासाठी अडथळा आहे हे लक्षात आल्यावर, १९०५ साली धर्मसंस्थेची आणि राज्यसंस्थेची निर्णायक फारकत करणारा कायदा फ्रान्समध्ये पारीत करण्यात आला. हा आहे फ्रेंच समाजाच्या क्रांतिकारी आणि पुरोगामी संचिताचा इतिहास- ज्याविषयी कुठल्याही लोकशाहीवाद्याला साहजिक आदर वाटेल.

या क्रांतिकारी वारशाचा आदर करताना हे विसरून चालणार नाही की, फ्रेंच राज्यसंस्थेवर साम्राज्यवादाचा आणि वसाहतवादाचा गुन्हा आहे. विशेष म्हणजे, या अन्यायी व्यवस्था इतरांवर लादताना याच मानवतावादी संचिताचा गोंडस चेहरा पुढे करण्यात आला होता. आजही दुर्दैवाने ‘फ्रेंच प्रजासत्ताक विरुद्ध दहशतवादी इस्लाम’ या मांडणीचा वापर करून फ्रान्समधील बऱ्याच निरपराधी लोकांची गळचेपी होणार, हेसुद्धा तितकेच खरे.

पूर्वाश्रमीच्या फ्रेंच वसाहतींतून फ्रान्समध्ये स्थायिक झालेल्या स्थलांतरितांना फ्रेंच राज्यसंस्था त्यांच्या सांस्कृतिक वेगळेपणाचे अदृश्यीकरण करून फक्त उपयुक्त श्रम करणाऱ्या यंत्राप्रमाणे वागणूक देताना दिसत आहे. बऱ्याचदा धर्मनिरपेक्षतेसारख्या मानवतावादी मूल्याच्या आड कधी छुप्या पद्धतीने, तर कधी उघडपणे बहुसंख्य ख्रिश्चन जनतेच्या सांस्कृतिक ओळखीची जपवणूक केली जाते आणि अल्पसंख्याकांना अन्यायाची वागणूक देऊन परात्मतेत लोटले जाते. परिणामी अल्पसंख्याकांमध्ये पराकोटीची अन्यायाची आणि परात्मतेची भावना निर्माण होत आहे. मग इस्लामवादी कट्टरतावाद्यांच्या हाती अशी दुखावलेली मंडळी लागण्याची शक्यता जास्त असते.

ज्या प्रकारे फ्रेंच राज्यसंस्थेने फ्रेंच संस्कृतीला सार्वजनिक जीवनात मान्यता दिली आहे, त्याचप्रमाणे अल्पसंख्याकांच्या सांस्कृतिक ओळखीलाही न्याय्य स्थान देण्याची गरज आहे. थोडक्यात, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता यांसारख्या मूल्यांचा वापर फक्त सोयीनुसार केल्याने न्यायासारख्या सर्वात महत्त्वाच्या मूल्याचा बळी जाऊ शकतो.

(लेखक दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात फ्रेंच तत्त्वज्ञानाचे अध्यापन करतात.)

sharadcrosshuma@gmail.com