News Flash

नगरपालिकेची पहिली ‘आयएसओ’ शाळा

‘नित्य नव्या’ शाळांची आणि तेथील शिक्षकांची माहिती करून देणारे हे साप्ताहिक सदर..

जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेची भव्य वास्तू

गडचिरोली जिल्हा म्हटले की नक्षलवाद, हिंसाचार, चकमकी, जाळपोळ आणि निष्पाप आदिवासींचे हत्यासत्र ही काळी बाजू चटकन डोळ्यासमोर उभी राहते. पण या वातावरणातही ‘जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा’ ही शाळा हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविते आहे. गडचिरोली नगरपालिकेची ही शाळा नुकतीच ‘आयएसओ’ प्रमाणित झाली आहे. यामुळे नगरपालिका संचालित पहिली ‘आयएसओ’ प्रमाणित शाळा अशी नवीच ओळख तिला मिळाली आहे.
शालेय शिक्षणाविषयी ‘आनंदीआनंद’ आहे,
असा सर्वसाधारण सूर असला तरी ‘दीपस्तंभ’ म्हणाव्या अशा काही मराठी शाळा राज्याच्या विविध भागांत पाय रोवून उभ्या आहेत.
अशाच वेगळ्या ‘नित्य नव्या’ शाळांची आणि तेथील शिक्षकांची माहिती करून देणारे हे साप्ताहिक सदर..
राज्याच्या शेवटच्या टोकावर गडचिरोली हा आदिवासी जिल्हा वसलेला आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसाचारामुळे या परिसरावर कायम भीतीचे सावट असते. त्यामुळे मोठय़ांबरोबरच इथल्या छोटय़ांची मनेही सुन्न झालेली. इथल्या मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांसोबतच सरकारी आश्रमशाळांचीही अवस्था अतिशय भग्न आहे. मराठीबरोबरच बहुतांश शाळांमध्ये गोंडी, माडिया या भाषा वापरल्या जातात. त्यातच इंग्रजी शाळांच्या गारुडामुळे जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या शाळा म्हणजे अतिशय वाईट, असा एक ग्रह झाला आहे. त्यामुळे हलाखीची परिस्थिती असलेला पालकही या शाळांकडे ढुंकून पाहत नाहीत.
सर्वत्र अशी परिस्थिती असताना ‘जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा’ मात्र गडचिरोली जिल्ह्य़ाचा मानबिंदू ठरली आहे. शहरातील एखाद्या झकपक शाळेलाही लाजवेल, अशा अत्याधुनिक सुविधा या शाळेत आहेत. या सुविधांबरोबरच लाभलेले निसर्गरम्य वातावरण शाळेला परिपूर्णतेचे कोंदण मिळवून देते. शाळेत पाऊल ठेवताच पदोपदी त्याचा अनुभव येतो.
गडचिरोली नगर परिषदेने १९९२ मध्ये ही शाळा सुरू केली. तेव्हा या शाळेत केवळ ९२ विद्यार्थी शिक्षण घेत होते. आता पहिली ते आठवीपर्यंतच्या या शाळेत ३२७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इथले मुख्याध्यापक सुधीर गोहणे यांच्याबरोबरच इथले विद्यार्थीही प्रसन्न चेहऱ्याने पाहुण्यांच्या स्वागताला तत्पर असतात.
शाळा सुरू झाली तेव्हा तिची इमारत अतिशय जीर्ण होती. २६ सप्टेंबर २००१ मध्ये गोहणे यांची शाळेचे मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली आणि शाळेचे चित्र पालटायला लागले. अर्थात बदलाचे हे वारे सुरुवातीला इतरांना मानवले नाही. स्पर्धेत टिकायचे असेल तर बदल आवश्यक आहे, हे त्यांनी सहकाऱ्यांना पटवून दिले. कालांतराने सहकारी शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थ्यांची साथ मिळत गेली आणि शाळेचे रूप पालटायला लागले.
आधी पाया..
पहिल्यांदा नियमित अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांना काय शिकायला आवडेल याचा विचार करून वेगवेगळ्या विषयांचा समावेश शाळेने करून घेतला. त्यामुळे पहिल्याच वर्षी विद्यार्थी संख्या १५० च्या घरात गेली. यानंतर सर्व शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्यास सुरुवात केली. त्यामुळे शाळेचा निकालही १०० टक्के लागत गेला. शाळेने शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना श्रमदानाची सवय लावली. शाळेची संपूर्ण संरक्षण भिंत विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून उभारण्यात आली आहे. यानंतर तीन हजार चौरस मीटरच्या भूखंडावर शाळेच्या दोन भव्य वास्तूंचे बांधकाम करण्यात आले. विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी वॉटर प्युरिफायर मशीन बसविण्यात आली. प्रत्येक शौचालय व स्नानगृहात पाण्याचा अखंड पुरवठा राहील याची तजवीज करण्यात आली. शाळेची भौतिक पायभरणी होत असतानाच दुसरीकडे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व फुलविणारे विविध शिक्षण व शिक्षणबाह्य़ उपक्रम शाळेत आकाराला येत होते.
छोटय़ांची ‘मिनी बँक’
शाळेने विद्यार्थ्यांना पैशाचे महत्त्व कळावे आणि बॅँकेचे व्यावहारिक ज्ञान मिळावे म्हणून येथे ‘चिल्ड्रेन मिनी बॅँक’ सुरू केली. २२१ विद्यार्थ्यांच्या खात्यात सुमारे ४५ हजार रुपये जमा झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या गरजा पाहून या रकमेचा उपयोग करण्यात येतो.
वनौषधींची लागवड
विद्यार्थ्यांना औषधांसंबंधीचे ज्ञान व्हावे यासाठी परिसरात वनौषधींची लागवड करण्यात आली आहे. शाळा ‘डॉ. जगदीशचंद्र बोस वनौषधी प्रकल्प’ राबविते. या प्रकल्पातील औषधांची ‘गोंडवाना हर्बल प्रकल्पा’त विक्री केली जाते. त्यातून मिळणारा पैसा शाळेच्या विकास कार्यात लावला जातो.
प्रतापगड.. बालोद्यान.. गुलाबबाग
शाळेने आपल्या परिसरातच इतिहास आणि विज्ञान दोन्ही ‘घडविले’ आहे. शाळा परिसरात ४०० चौरस फूट जागेत प्रतापगडाची निर्मिती केली असून रोज एक तास या गडाजवळ चौथ्या वर्गाला शिकवण देण्यात येते. हवेचा प्रवास ओळखता यावा म्हणून वाहक दिशादर्शक यंत्र बसवण्यात आले आहे. बालसभा घेण्यासाठी बालोद्यानाची निर्मिती केली आहे. तेथे सावित्रीबाई फुलेंचा पुतळा उभारण्यात आला आहे. या ठिकाणी रोज एक तास बालसभा घेतली जाते. तसेच चाचा नेहरू गुलाबबाग तयार करण्यात आली आहे. यात नेहरूजींच्या चरित्रावर मार्गदर्शन करण्यात येते.
अशा प्रकारे इथल्या प्रत्येक उपक्रमातून शाळेची ‘अनुभवाधारित आणि ताणविरहित शिक्षण देणारी शाळा’ ही ओळख ठसठशीत होत जाते. हसतखेळत शिकत आम्ही उद्याच्या स्पर्धेला सामोरी जाणारी पिढी घडवितो, हे शाळा आत्मविश्वासाने सांगते. म्हणूनच आपल्या शाळेतल्या प्रत्येक मुलाचे भविष्य उज्ज्वलतेकडे नेण्याचे ध्येय बाळगून असलेल्या या शाळेविषयी लिहावे तितके थोडेच!
नगरपालिकेची पहिली ‘आयएसओ’ शाळा
येथील विद्यार्थी व शिक्षकांची वर्तणूक, त्यांच्यातील शिस्त आणि स्वच्छतेसंबंधी रुजलेला ध्यास, अशा विविध बाबींचा अभ्यास करून ‘इंटरनॅशनल अ‍ॅक्रिडेशन कौन्सिल ऑफ अ‍ॅक्रिडेशन बोर्डा’ने या शाळेला ३ फेब्रुवारी, २०१५ मध्ये ‘आयएसओ’ दर्जा बहाल केला आहे. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त, अतिदुर्गम आदिवासी जिल्ह्य़ातील शाळेने आयएसओचा दर्जा मिळवणे ही गौरवास्पद बाब ठरली आहे. ‘सर्वागीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमा’त नागपूर विभागात ही शाळा प्रथम ठरली आहे. सरकारतर्फे पुणे व औरंबागाद विभागासह राबविल्या जाणाऱ्या प्रगत शैक्षणिक कार्यक्रमात या शाळेचा समावेश आहे. इथल्या नामांकित ‘जवाहर नवोदय विद्यालया’त प्रवेश मिळविण्यात या शाळेचे विद्यार्थी आघाडीवर आहेत. शाळेला ‘डिजिटल स्कूल’चा दर्जाही मिळाला आहे.
‘बेटी बचाव अभियाना’तही ही शाळा सक्रिय आहे. याशिवाय विद्यार्थ्यांची संसद, शालेय पोषण आहार निरीक्षण समिती, विज्ञानाच्या माहितीसाठी विज्ञान विभाग, संगणक प्रयोगशाळा ही शाळेची आणखी काही वैशिष्टय़े. शाळेने गरीब कुटुंबातील पालकांच्या मागणीनुसार नर्सरीच्या शिक्षणाची सोयही अल्पदरात उपलब्ध करून दिली आहे.

–  रेश्मा शिवडेकर
reshma.murkar@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2016 4:20 am

Web Title: iso certification for municipal school board
Next Stories
1 मुक्तछंदाचा अनुभव.. अक्षरनंदन!
Just Now!
X