इस्रायल व गाझापट्टी हा टापू १४ ते २१ नोव्हेंबर या आठवडाभरात अशांत होता. बॉम्बफेक आणि रॉकेटहल्ले, प्राणहानी आणि मालमत्तेचे नुकसान यानंतर अखेर शस्त्रसंधी लागू झाला. या ताज्या संघर्षांबाबत मुंबईतील इस्रायली वाणिज्य दूतावासातर्फे इस्रायलची बाजू मांडणारा आणि देशहिताची जपणूक आम्ही करणारच, असे ठासून सांगणारा हा लेख..
दि. १४ नोव्हेंबर रोजी इस्रायलने गाझापट्टीतील हमास आणि अन्य दहशतवादी संघटनांकडून होणाऱ्या हल्ल्यांचा बिमोड करण्यासाठी ‘पिलर ऑफ डिफेन्स’ ही लष्करी मोहीम उघडली. गेल्या काही महिन्यांत गाझातून इस्रायलवर डागण्यात येणारया रॉकेट्स-मिसाईलच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाल्याने आमच्या सरकारला ही कारवाई करावी लागली. युद्धखोर इस्रायलने कुरापत काढण्यासाठी गाझावर हल्लाबोल केला असून यामध्ये सामान्य नागरिकांना मारण्यासही इस्रायल कचरत नाही अशा प्रकारचा गरसमज झपाटय़ाने पसरवण्यात येत असून त्याचे मी खंडन करू इच्छिते.
आपण लक्षात घेतले पाहिजे की, इस्रायलची ही कारवाई आपल्या जनतेप्रति काळजी असणाऱ्या सार्वभौम राजवटीविरुद्ध नव्हती. हमास ही एक दहशतवादी संघटना असून तिने २००७ साली पॅलेस्टिनिअन ऑथोरिटीचे सरकार यादवी युद्धात क्रूरपणे उलथवून टाकून गाझावर कब्जा केला आहे. भविष्यात इस्रायल आणि पॅलेस्टाईन हे दोन देश शेजारी नांदावेत ही भूमिका हमासला अमान्य असून इस्रायलचा विनाश करण्यासाठी हमास कटिबद्ध आहे. गाझामध्ये सत्ता बळकावल्यानंतर हमासने आपल्या दहशतवाद्यांचे निशस्त्रीकरण करण्यास नकार दिला. तसेच इस्रायलमधील सामान्य नागरिकांना आपल्या हल्ल्यांत लक्ष्य करण्याचे धोरणही कायम ठेवले. अशा परिस्थितीत जगातील अन्य कोणत्याही राष्ट्राप्रमाणेच इस्रायलही आपल्या विनाशाचे आडाखे बांधणाऱ्या दहशतवादी संघटनेशी शांततेसाठी थेट वाटाघाटी करू शकत नाही.
अतिशय दाटीवाटीने वसलेली गाझापट्टी ही लष्करी कारवाईच्या दृष्टीने अतिशय कठीण जागा आहे. गाझामधील दहशतवादी तळांना नेमकेपणाने हुडकून तेथील सामान्य माणसांना क्षती पोहचू नये यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न इस्रायल करत असताना, हमास आणि अन्य दहशतवादी संघटना या लोकांचा ढालीसारखा वापर करतात. शाळा, निवासी इमारती इतकेच काय तर हॉस्पिटल आणि प्रार्थनास्थळांमध्ये लपून ते इस्रायलवर रॉकेट हल्ले करतात. असे हल्ले करताना जाणीवपूर्वक इस्रायलमधील नागरी वस्त्यांना लक्ष्य केले जाते.
सुमारे ८ वर्षांपूर्वी इस्रायलने गाझापट्टीतून संपूर्णत: माघार घेतल्यानंतर शांततेत नांदण्याऐवजी हमासने इस्रायलवरील रॉकेटहल्ले आणखी तीव्र केले. या कालावधीत इस्रायलवर ८०००हून अधिक रॉकेट्सचा मारा झाला आहे. इराणच्या सक्रिय मदतीने हमासने या रॉकेटच्या पल्ल्यात आणि विनाशक क्षमतेत मोठय़ा प्रमाणावर सुधारणा घडवून आणल्या आहेत. पूर्वी ५-१० किमी अंतराचा पल्ला गाठणाऱ्या या रॉकेटमुळे इस्रायलची १० लाख जनता हल्ल्यांच्या टप्प्यात होती. आज हमासकडे ७५ किमीचा पल्ला गाठणारी रॉकेट्स असून ती इस्रायलची राजधानी जेरुसलेम तसेच व्यापारी राजधानी तेल-अवीवला लक्ष्य करू शकतात. आज इस्रायलची अध्र्याहून अधिक जनता रॉकेटहल्ल्यांच्या सावटाखाली जगत आहे.
या रॉकेटहल्ल्यांमुळे इस्रायलला मोठय़ा प्रमाणावर नुकसान सहन करावे लागते. गाझामधून रॉकेट डागल्यापासून केवळ १५-४५ सेकंदांत लोकांना बॉम्ब-प्रतिरोधक तळघरांत किंवा सुरक्षागृहांत आसरा घ्यावा लागतो. असे हल्ले रात्रंदिवस कधीही होत असल्यामुळे खासकरून लहान मुलं, वृद्धं आणि विकलांगांची एवढय़ा कमी अवधीत तळघरांत लपण्यात मोठी तारांबळ उडते. गेले दोन आठवडे दक्षिण इस्रायलमधील शाळा बंद होत्या. रॉकेट हल्ल्यांमुळे आबालवृद्धांना सतत मानसिक तणावाखाली जगावे लागते. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतात जे टीव्हीवरील युद्धाच्या प्रक्षेपणात दिसू शकत नाहीत.
संयुक्त राष्ट्रांच्या सनदेतील ५१व्या कलमाप्रमाणे स्वसंरक्षणाचा हक्क हा आंतरराष्ट्रीय कायद्याच्या मूलभूत तत्त्वांपकी एक आहे. किती मोठय़ा प्रमाणावर हल्ले झाल्यानंतर देशाने आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरावा याबाबत मतभिन्नता असली तरी आंतरराष्ट्रीय कायद्याचे बहुतांशी अभ्यासक/तज्ज्ञ मान्य करतात की, जर देशाच्या एका भागातील सामान्य नागरिकांवर होणाऱ्या रॉकेट हल्ल्यांमुळे तेथील सामाजिक जीवन प्रभावित होत असेल तर असे कृत्य कलम ५१मधील सशस्त्र हल्ल्याच्या व्याख्येत बसते. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी इस्रायलने केलेली लष्करी कारवाई न्याय्य ठरते.
लघु किंवा मध्यम पल्ल्याची रॉकेट हवेत अतिशय कमी काळ राहत असल्यामुळे त्यांना क्षेपणास्त्ररोधक यंत्रणेद्वारे रोखणे जगातील कोणत्याही देशास आजवर अशक्य होते. सततच्या रॉकेटहल्ल्यांवर उपाय म्हणून इस्रायलने २००७ साली आयर्न डोम यंत्रणेचा विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. आमच्या वैज्ञानिकांनी आणि तंत्रज्ञांनी अफाट मेहनत घेऊन केवळ ४ वर्षांत असे तंत्रज्ञान विकसित करून दाखवले आणि त्याचा सन्यात समावेशही केला. या यंत्रणेमुळे इस्रायली नागरिकांच्या सुरक्षेत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली तसेच सरकारला आजवर लष्करी कारवाईचा निर्णय टाळणे शक्य झाले. पण गेल्या काही आठवडय़ांत गाझामधून मोठय़ा संख्येने रॉकेटचा मारा होऊ लागल्याने मात्र आमचा नाइलाज झाला. २१ नोव्हेंबरला युद्धबंदी होईपर्यंतच्या एका आठवडय़ात गाझामधून १५००हून अधिक रॉकेट्सचा मारा करण्यात आला.  
इस्रायलने हाती घेतलेली कारवाई हे आत्मसंरक्षणाचे कृत्य आहे. गाझापट्टीतील सामान्य नागरिकांना या कारवाईत इजा व्हावी अशी आमची इच्छा नाही. त्यामुळे हमासवरील हल्ल्यांत अचूकता आणून सामान्य नागरिकांना या कारवाईचा कमीतकमी त्रास होईल यासाठी शक्य असलेले सर्व प्रयत्न आम्ही केले. या कालावधीत २००००हून अधिक दूरध्वनी करून तसेच हवेतून पत्रकं टाकून गाझामधील नागरिकांना कोणत्या भागात कारवाई होणार आहे याची पूर्वसूचना देण्यात आली तसेच सुरक्षिततेसाठी दहशतवादी किंवा त्यांच्या तळांपासून लांब राहण्याचे इशारेही देण्यात आले.
दुर्दैवाने गेली अनेक र्वष हमास गाझामधील सामान्य माणसांच्या आड लपून इस्रायलमधील नागरिकांवर हल्ले करत आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार हा दुहेरी युद्धगुन्हा आहे. काही दिवसांपूर्वीच हमासने गाझामधील ६ लोकांवर ते इस्रायलसाठी हेरगिरी करतात असा आरोप ठेवून कोणतीही कायदेशीर चौकशी न करता सर्वासमक्ष क्रूरपणाने देहदंड दिला तसेच लोकांवर जरब बसविण्यासाठी त्यांच्या मृतदेहांना भर रस्त्यात फरपटत नेऊन त्यांची विटंबना केली. यावरून हमासची त्यांच्या स्वत:च्या लोकांबद्दलची आत्मीयता दिसून येते.
आठवडय़ाभराच्या लष्करी संघर्षांनंतर इस्रायलने इजिप्त आणि अमेरिकेच्या पुढाकाराने सादर करण्यात आलेल्या युद्धबंदी प्रस्तावाला संधी देण्याचा निर्णय घेतला. हमास गाझापट्टीतून होणारा रॉकेटचा हल्ला संपूर्णपणे थांबवेल अशी आम्ही आशा करतो. ही युद्धबंदी आम्ही मान्य करीत असलो तरी हमासने त्याचे उल्लंघन केले तर इस्रायलही आत्मसंरक्षणाच्या आपल्या मूलभूत अधिकाराचा वापर करेल. आमच्या नागरिकांना सुखशांतीमध्ये सामान्यपणे जगता यावे यासाठी कूटनीती आणि मर्यादित लष्करी कारवाई यांचा योग्य समन्वय साधून इस्रायलने हा संघर्ष जबाबदारीने हाताळला असे माझे मत आहे.