केवळ तंत्राधारित उत्पादनाचा विचार करत, कायदे झुगारून देत, नैसर्गिक संसाधने नासवत, लोकशाहीला तुडवत एकांगी तंत्राधारित विकास प्रक्रिया सध्या आपल्याकडे राबवली जात असून ते चुकीचे आहे. या उलट आपण गडचिरोलीतल्या मेंढा (लेखा) सारख्या गावाकडून स्फूर्ती घेतली पाहिजे. कारण, विज्ञानाची कास धरून, निसर्गाच्या कलाने व लोकांच्या साथीनेच भारताचा र्सवकष विकास होऊ शकेल..
पावगडा, कर्नाटक-तेलंगण सीमेवरचा कमी पावसाचा, वैराण, डोंगराळ तालुका. इथे शेषगिरी नावाच्या उमद्या शेतकऱ्याच्या जमिनीवर एक हिरवेगार ओअ‍ॅसिस बहरले आहे. शेषगिरी शेतकरी कुटुंबात जन्मला, बंगळुरूच्या शेतकी विद्यापीठात शिकला. काय शिकला? खोल खोल खणत कूपनलिकांतले पाणी खेचत, चिक्कार रासायनिक खते, कीटकनाशके ओतत कुठले तरी एकसुरी पीक अधिकाधिक काढायचे हीच विज्ञानाधिष्ठित शेती – हाच प्रगतीचा मार्ग. अशा पिकाला झाडांची सावली हा मोठा अडसर असतो, तेव्हा सगळी झाडे तोडून टाकावी. पदवीधर झाल्यावर शेषगिरीचा बाप म्हणाला, आता तू शेती हातात घे, कृषिपंडित बन. शेषगिरी म्हणाला, उत्तम. पहिले म्हणजे आपल्या शेतातली सावट टाकणारी ही मोठमोठी जांभळाची सगळी झाडे तोडतो. बाप हबकला, विनवण्या करू लागला, बाकी काही कर, पण ही झाडे तोडू नको. पण शेषगिरीनी सगळे सफाचट केले, जुनी नाचणी – जोंधळा – तूर मिश्र शेती बाजूला सारून भरपूर पसा ओतत भुईमुगाची लागवड सुरू केली.
शेषगिरीला विज्ञानात रस होता, तेव्हा शेतीबरोबरच त्याने आमच्या बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये परिसर विज्ञानात संशोधन सुरू केले. मी शहरात वाढलो तरी आमचीही शेती होती, तिथे लांब-लांब सुट्टय़ा घालवल्या होत्या. परंपरा – आधुनिकता, रासायनिक शेती – सेंद्रिय शेती अशा विषयांबद्दल आम्ही खूप चर्चा करायचो. मी विंदा करंदीकरांच्या शब्दांत मांडणी करायचो : ‘विज्ञान ज्ञान देई, घडवी कितीक किमया। देई न प्रेम शांती, त्याला इलाज नाही!’ विज्ञानातून मानवाचे निसर्गाबद्दलचे ज्ञान प्रचंड वाढले आहे, पण म्हणून सगळीच विज्ञानाधारित तंत्रे स्वीकारार्ह असतील असे बिलकूल नाही. त्यांची फलनिष्पत्ती काय हे तावून, सुलाखून पाहून मगच ती स्वीकारावी. प्रत्येक गोष्ट पडताळणे हाच विज्ञानाचा गाभा आहे. शेषगिरी म्हणायचा कबूल, पण मी व्यवहारी कास्तकार आहे. शहरात रस्त्यांकाठची झाडे तोडायची, मग शेतकऱ्यांनी मात्र झाडे का तोडायची नाहीत? शेतकरीही साहजिकच पसे कमावू इच्छितात.
 संशोधन करता करता शेषगिरी खूप काही शिकला. विचार करायला, प्रयोग करून पाहायला, संगणकांचा वापर करत गणितीय प्रारूपे मांडायला. जोडीने शेतकी विद्यापीठात शिकवलेली आधुनिक भुईमुगाची शेती करत राहिला. अनुभवले की शेतकी विद्यापीठात शिकलेली अतिशय खर्चीक शेती गोत्यात आणत होती. चारांतले एखादे साल चांगला पाऊस पडायचा, भरपूर पसा सुटायचा, बाकीची तीन वष्रे जबरदस्त नुकसान व्हायचे. शेषगिरीनी ठरवले, विशिष्ट दिवसांतल्या पावसावर अवलंबून राहणारी कृषिप्रणालीच चुकीची आहे. पाणी जमिनीच्या पोटात साठवले पाहिजे, त्यावर हंगामी नाही, वार्षकि- बहुवार्षकि पिके काढली पाहिजेत. पाणी साठवायला जमिनीचे चढ-उतार नीट पाहून, मातीची व्यवस्थित परीक्षा करून बांध – ताली बांधायला पाहिजेत, भरपूर पाला वाढवून तो जमिनीत गाडला पाहिजे, शेताच्या वेगवेगळ्या तुकडय़ांत जे फरक आहेत त्यांना अनुरूप अशी नानाविध जातींची काळजीपूर्वक निवड करून लागवड केली पाहिजे. या सगळ्यासाठी परिसरानुरूप शास्त्रीय ज्ञान स्वत:हूनच विकसित केले पाहिजे.   
आज शेषगिरीच्या शेतीचा कायापालट झाला आहे. बापाचे न ऐकता जांभळीची झाडे तोडली, त्यांची भरपाई केली आहे. शेतभर विविधोपयोगी अशी तीस-एक जातींची झाडे, पंधरा-वीस जातींची झुडपे, काही वेली आणि निवडक चाऱ्याची पिके फोफावली आहेत. मेंढय़ा चरताहेत. जमिनीत सेंद्रिय अंश खूप वाढला आहे, त्यातून पाण्याचा साठा होतो व वनस्पतींना पोषक अंश पुरवला जातो. शेषगिरी तत्त्वाने नाही, पण त्यातूनच भरपूर आíथक फायदा आहे म्हणून प्रयोग करत करत सेन्द्रिय शेतीकडे वळला. बीटी कॉटन पेरणाऱ्या त्याच्या आसपासच्या अत्याधुनिक पण गतानुगतिक शेतकऱ्यांहून तो सालोसाल खूप जास्त पसे कमावतो. अवर्षणात फटका खात नाही. आता एका शेतकऱ्याच्या प्रयोग परिवाराबरोबर स्वयंस्फूर्तीने काम करत आपली निसर्गपोषक, विज्ञानाधिष्ठित आणि भरपूर पसा मिळवून देणारी कृषिप्रणाली फैलावत आहे. शेतकी शिक्षण कोळून प्यायलेला शेषगिरी म्हणतो, शेतकी विद्यापीठे, शासकीय विभाग केवळ  खत – कीटकनाशके – बियाणे कंपन्यांचे हितसंबंध जपतात, शेतकऱ्यांच्या फायद्याचे काहीही शिकवत नाहीत.
या परिस्थितीवर आपल्याला मात करायची आहे. सरकारवर, सरकारी कृपाछत्राखाली संतुष्ट असणाऱ्या तज्ज्ञांवर व त्यांच्या संशोधनावर भिस्त ठेवून चालणार नाही. लोकांनीच पुढाकार घेऊन आपल्या समाजाला, अर्थव्यवस्थेला, शासनाला, विज्ञानालाही रुळावर आणले पाहिजे. आपण स्फूर्ती घेतली पाहिजे गडचिरोलीतल्या मेंढा (लेखा) सारख्या गोंड गावाकडून. इथे शिरल्या- शिरल्या दिसतो एक फलक : ‘दिल्ली-मुंबईत आमचे सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार!’ मेंढावासी अराजकवादी बिलकूल नाहीत, नक्षलवाद्यांप्रमाणे सरकार तोडले पाहिजे असे म्हणत नाहीत. उलट म्हणतात, आम्ही सारे भारताच्या शासनाचे घटक आहोत. कस्तुरीच्या एका कणालाही जसा साऱ्या कस्तुरीचा परिमळ असतो, तसेच आम्हीही भारताचे शासक आहोत. अनेकदा शासकीय यंत्रणा सचोटीने काम करत नाही. तेव्हा आमची सर्वाचीच जबाबदारी आहे देशात र्सवकष सुधारणा आणण्याची. केवळ आíथक नाही. आपण राजकीय, शासकीय, सामाजिक, वैज्ञानिक सुधारणांसाठी झटायला पाहिजे. भारतात लोकांपर्यंत सत्ता पोहोचवणारे पंचायत राज, आदिवासी स्वशासन, जैवविविधता, माहिती हक्क, वनाधिकार असे अनेक चांगले कायदे आहेत. यांची योग्य तऱ्हेने अंमलबजावणी होत नाही म्हणून हताश होऊन हात चोळत बसण्यात अर्थ नाही. संघर्ष करू या, पण ते अंतिम उद्दिष्ट नाही. मनापासून रचनात्मक कामासाठीही झटत राहू या.
आपल्या देशात आपले कायदे जमिनीवर उतरलेच पाहिजेत म्हणून लढत मेंढावासीयांनी वनाधिकार कायदा पुऱ्या गडचिरोली जिल्ह्य़ात लागू करवला आहे. शेकडो गावांचे सामूहिक वनसंपत्तीवरचे अधिकार मान्य झाले आहेत. या संसाधनांचा शाश्वत वापर करत आíथक लाभ करून घ्यायचा आणि जोडीने निसर्गाला अधिकाधिक समृद्ध करायचे मोठे आव्हान या गावांपुढे आहे. या संदर्भात एक परिसरशास्त्रज्ञ म्हणून गेली दोन वष्रे मेंढाच्या ग्रामवासीयांबरोबर व बायफ या सेवाभावी संस्थेच्या व इतर अनेक मित्रांच्या मदतीने मी राबतो आहे. तिथल्या परिस्थितीला अनुरूप अशी मृद् व जलसंधारणाची, वनराजी जोपासण्याची तंत्रे विकसित करायची, जमिनीवर उतरवायची व वनोपजाच्या मूल्यवर्धनाची, विक्रीची नीट व्यवस्था लावायची असे अनेक उपक्रम जोरात चालू आहेत. असे परिसरानुरूप विज्ञान हे प्रयोगशाळेत बीटी कॉटन निर्माण करण्याइतकेच कष्टाचे, तितकेच समाधान देणारे विज्ञान आहे. पण बीटी कॉटन रोजगार नष्ट करेल; शेषगिरीचे, मेंढाचे संशोधन निसर्गाला पोसत पोसत रोजगार निर्माण करेल. शिवाय एक निसर्गप्रेमी म्हणून मी खास उत्साहात आहे, कारण मेंढा ग्रामसभेने सामूहिक वनसंपत्ती क्षेत्रातल्या दहा टक्के क्षेत्रास देवरायांसारखे पूर्ण संरक्षण देण्याचा निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतला आहे.
देशाच्या विकासासाठी दोन सारख्याच महत्त्वाच्या विकास प्रक्रिया समांतर राबवल्या पाहिजेत. पहिली म्हणजे आधुनिक तंत्राधारित उत्पादनावर भर देणारी विकास प्रक्रिया. तांत्रिक विशेषत: स्वयंचलनाच्या प्रगतीतून आधुनिक क्षेत्रात श्रमाची उत्पादकता सतत वाढणे अपरिहार्य आहे आणि त्यातून रोजगार घटतीलच, वाढणार नाहीत. तेव्हा उर्वरित बहुसंख्य भारतीयांसाठी अत्यावश्यक आहे दुसरी, निसर्गाधारित, श्रमप्रधान उत्पादनावर भर देणारी विकास प्रक्रिया. पण आज काय चालले आहे? केवळ तंत्राधारित उत्पादनाचा विचार करत, कायदे झुगारून देत, नसíगक संसाधने नासवत, बेरोजगारी फुगवत, लोकशाहीला तुडवत, विज्ञानाचा अवमान करत एक एकांगी तंत्राधारित विकास प्रक्रिया राबवली जात आहे. मग लोकांचा असंतोष आवरण्यासाठी मनरेगा किंवा अन्नसुरक्षा कायदे करतो आहोत. हा खऱ्याखुऱ्या विकासाचा विपर्यास आहे. आपल्या जनतेकडे घटनेने बहाल केलेले सर्व अधिकार व्यवस्थित पोहोचवून, निसर्गसंपत्ती काळजीपूर्वक जोपासून, निसर्गाधारित, श्रमप्रधान उत्पादन भरभराटीस आणणे पूर्णपणे शक्य आहे. यासाठीही आधुनिक विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा आधार घ्यावाच लागेल. पण ही पाश्चात्त्य विज्ञानाची नक्कल नसेल. त्यासाठी आपल्यालाच मनापासून झटायला हवे, लोकांसोबत काम करायला हवे. विज्ञानाची कास धरून, निसर्गाच्या कलाने व लोकांच्या साथीनेच भारताचा र्सवकष विकास होऊ शकेल. बुद्धिजीवी वर्गाने अशा विकासात सहभागी होणे श्रेयस्कर आहे. अशा संतुलित विकास प्रक्रियेतूनच समाजात जो जे वांछील तो ते लाहो असे सुख-शांतिप्रद वातावरण नांदू लागेल.      (समाप्त)
* लेखक ज्येष्ठ परिसर्गतज्ज्ञ असून पश्चिम घाटविषयक तज्ज्ञ-समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे.
ईमेल : madhav.gadgil@gmail.com

mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips
MPSC मंत्र : भूगोल मूलभूत अभ्यास
Interpol
विश्लेषण : ‘इंटरपोल’च्या नोटिसांचा वापर राजकीय हेतूने केला जातो? या संस्थेचं नेमकं काम काय? जाणून घ्या…
UPSC Preparation Facing the Prelims Exam
यूपीएससीची तयारी: पूर्व परीक्षेला सामोरे जाताना..
Transport system plays a vital role in strengthening the economy
पहिली बाजू: दळणवळणातून विकासाला ‘गतिशक्ती’