|| शरद पांडुरंग काळे

२०१८ वर्षीच्या फिजिओलॉजी आणि मेडिसिन या विषयाचे नोबेल पारितोषिक अमेरिकेच्या टेक्सास विद्यापीठातील प्रा. जेम्स एलिसन आणि जपानमधील क्योटो विद्यापीठातील प्रा. टसुकु होन्जो यांना संयुक्तपणे जाहीर झाले आहे. या दोघांनी स्वतंत्रपणे मानवी शरीरात जी रोगप्रतिकारक प्रणाली असते तिचाच वापर कर्करोगात औषधोपचारासाठी कसा करता येईल याचा जो अभ्यास केला आहे त्यासाठी देण्यात येत आहे, असे नोबेल समितीने म्हटले आहे. त्यांच्या या पायाभूत अभ्यासामुळे कर्करोगावर उपचार करण्यासाठी ही रोगप्रतिकारक औषधोपचार प्रणाली एक प्रभावी पद्धत म्हणून आता वैद्यकीय क्षेत्रात रूढ होत आहे.

दरवर्षी लक्षावधी लोक कर्करोगाला बळी पडतात. मानवजातीसमोर कर्करोगाचे मोठेच आव्हान गेल्या काही दशकांमध्ये उभे ठाकले आहे. आपल्याच शरीरातील असलेल्या जन्मजात प्रतिकारक्षमतेचा वापर करून कर्करोगाच्या गाठींमधील पेशींचा विनाश कसा करता येईल यासंबंधी केलेल्या अभ्यासातून या वर्षीच्या नोबेल पारितोषिक विजेत्यांनी एक चांगली औषधोपचार नवप्रणाली विकसित केली आहे. टेक्सास विद्यापीठातील प्राध्यापक जेम्स एलिसन यांनी त्यासाठी रोगप्रतिकारक प्रणालीतील एका माहितीच्या नियंत्रक आणि रोधक प्रथिनावर संशोधन केले. हे नियंत्रक प्रथिन ज्या पद्धतीने आपल्या रोगप्रतिकारक प्रणालीवर नियंत्रण ठेवते ते नियंत्रण जर दूर करता आले तर आपल्या रोगप्रतिकारक पेशी कर्करोगाच्या गाठीमधील पेशींवर जोरदार हल्ले करू लागतात. यासाठी त्यांनी उपचारपद्धतीत क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. त्यांना औषध कंपन्यांकडून विरोधही सहन करावा लागला. त्याच कालावधीत प्राध्यापक टसुकू होन्जो यांनीदेखील आपल्या रोगप्रतिकारक पेशींवरील अशाच एका नियंत्रक प्रथिनाचा वेध घेतला. हेदेखील आपल्या रोगप्रतिकारक प्रणालीवर नियंत्रक किंवा रोधक म्हणून कार्य करीत असते. त्या प्रथिनाची कार्यपद्धती डॉ. जेम्स एलिसन यांनी शोधलेल्या प्रथिनाच्या कार्यपद्धतीपेक्षा खूपच वेगळी होती. या दोन्ही प्रथिनांवर आधारित जी उपचार प्रणाली विकसित झाली ती कर्करोगाच्या असंख्य रुग्णांना दिलासा देणारी आहे यात शंकाच नाही.

आपल्या रोगप्रतिकारक प्रणालीमध्ये गतिरोधक आणि गतिवर्धक दोन्ही असतात. या प्रणालीचा एक मुख्य गुणधर्म म्हणजे आपले काय आणि आपले काय नाही यातील फरक ओळखून उपाययोजना करणे हा आहे. जिवाणू, विषाणू, अमिबा, प्लाझमोडियम आणि तत्सम एकपेशीय प्राणी यांचा हल्ला शरीरावर झाला तर या परकीय सन्यावर तुटून पडायचे आणि लढाई जिंकायची हे या प्रणालीचे मुख्य कार्य असते. आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक प्रणालीतील प्रमुख घटक टी पेशी या असतात. पांढऱ्या रक्तपेशींचे जे अनेक प्रकार आहेत त्यातील एक म्हणजे या टी लिफोसाइट्स किंवा टी पेशी. जंतूंना प्रत्यक्ष पकडून मारणाऱ्या ज्या पांढऱ्या पेशी रक्तात असतात त्यांना बी पेशी असे संबोधले जाते. टी पेशींना हे जे टी म्हणतात त्याचे कारण त्या थायमस या ग्रंथीमधील थायमोसाइट्स पेशींपकी काही पेशी त्यांच्या प्रौढावस्थेत रोगप्रतिकारक पेशी म्हणून रक्तात दाखल होतात. त्यांच्या बाहय़ पृष्ठभागावर टी संवेदनशील प्रथिन असते. या टी पेशींपकी मोठा गट अल्फा बीटा टी पेशी म्हणून ओळखला जातो त्यांच्या पृष्ठभागावरील टी संवेदनशील प्रथिनांतील अमिनो आम्लांच्या अल्फा आणि बीटा साखळ्या मूळ स्वरूपातील प्रथिनांपेक्षा पुनर्रचित स्वरूपाच्या असतात आणि या पेशी आवश्यकतेप्रमाणे शरीरासाठी संरक्षक म्हणून कार्य करतात. गॅमा डेल्टा टी पेशी या जन्मजात रोगप्रतिकारक प्रणालीचा भाग असून त्यांची संख्या कमी असते आणि त्यांच्या पृष्ठभागावर टी प्रथिन हे त्याच्या मूळ स्वरूपातच असते.

टी पेशींचे कार्याप्रमाणे जे प्रकार आहेत त्यात प्रभावी, मदतनीस, जंतूंना मारणाऱ्या म्हणजेच पेशीनाशक, स्मृती पेशी आणि नियंत्रक पेशी यांचा प्रामुख्याने समावेश होतो. त्याशिवाय छोटे गट आहेत पण आजच्या विषयाशी त्यांचा फारसा संबंध नसल्यामुळे त्यांचा उल्लेख येथे केला नाही. एलिसन आणि होन्जो या प्राध्यापक द्वयींनी स्वतंत्रपणे टी पेशी शरीरातील कर्करोगाच्या गाठींमधील पेशींवर कोणत्या प्रथिनांमुळे हल्ला करून त्यांचा नाश करीत नाहीत यावर संशोधन केले. १९९० च्या आसपास त्यांनी केलेले हे काम आता रोगप्रतिकारक प्रणालीच्याच वेगवेगळ्या कर्करोगांच्या उपचारपद्धतीत आता उपयोगी पडत आहे.

टी पेशींवर असलेले संवेदनशील प्रथिन शरीरातले आपले नसलेले पदार्थ ओळखतात आणि त्यांना बांधून ठेवतात. त्यात रोगजंतू, त्यांनी निर्माण केलेली विषे, अ‍ॅलर्जी प्रतिक्रिया देणारी प्रथिने इत्यादींचा समावेश होतो. या त्यांच्या कृतीमुळे आपली रोगप्रतिकारक प्रणाली रक्तातील अशा घटकांना बाहेर काढण्यासाठी सज्ज होते. पण संपूर्ण यंत्रणा लढण्यास सज्ज होण्यासाठी टी पेशींचा वेग आणि कार्यक्षमता वाढविण्यास लागणारी आणखी काही प्रथिनेदेखील आवश्यक असतात. या प्रणालीचा मूलभूत अभ्यास करण्यात अनेक वैज्ञानिक विविध प्रयोगशाळेत संशोधन करीत असतात. त्या संशोधनातून या अन्य प्रथिनांचे स्वरूप समजण्यासाठी मदत झाली आहे. याशिवाय टी पेशींच्या कार्यात अडथळा आणणारी किंवा त्यावर लगाम घालणारी प्रथिनेदेखील रक्तात असतात. त्या प्रथिनांवरदेखील संशोधन होऊन त्यांच्याबद्दल असलेले ज्ञान उपयोगी पडत आहे. टी पेशींची कार्यक्षमता वाढविणाऱ्या आणि त्यावर लगाम घालणाऱ्या अशा प्रथिनांमध्ये एक नाजूक आणि थोडासा क्लिष्ट असा समतोल असतो. त्याची गरज आपल्या प्रतिकारक प्रणालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी असते. शरीरात बाहेरून आलेले रोगजंतू किंवा इतर हानीकारक पदार्थाचा खातमा तर झाला पाहिजे, पण त्या उत्साहात त्यांची कार्यक्षमता हाताबाहेर जाऊन आपल्याच शरीरातील आपल्या असलेल्या पेशींचा, उतींचा किंवा प्रणालींचा नाश होता कामा नये किंवा त्यांच्या कार्यात अडथळे आणू नयेत यासाठी हा समतोल राहणे महत्त्वाचे असते. नाही तर हॉकी किंवा फुटबॉलच्या सामन्यात अतिउत्साही खेळाडूकडून आपल्याच जाळ्यात चेंडू मारून स्वतच्या संघावर गोल चढविणे किंवा क्रिकेटमध्ये भरात असलेला फलंदाज स्वयंचित होण्यासारखा तो प्रकार होईल!

सन १९९० साली बर्कलीमधील कॅलिफोíनया विद्यापीठातील आपल्या प्रयोगशाळेत कार्य करीत असताना प्राध्यापक एलिसन यांनी सीटीएलए-४ या टी पेशींवर असलेल्या प्रथिनांचा सखोल अभ्यास केला. हे सीटीएलए-४ नावाचे विशिष्ट प्रथिन टी पेशींच्या कार्यावर लगाम घालण्याचे कार्य करते. या प्रथिनांचा रोगप्रतिकारक प्रणालीच्या स्व-नाशक रोगसदृश स्थितीत उपचारासाठी वापर करण्याचा प्रयत्न काही वैज्ञानिक गट करीतही होते. डॉक्टर एलिसन यांच्या मनात मात्र काही तरी वेगळेच विचार खेळत होते. त्यांनी सीटीएलए-४ या प्रथिनाला जखडून टाकणारी आणि त्यांचे कार्य थांबविणारी प्रतिद्रव्ये म्हणजे अँटीबॉडीज बनविण्यात यश मिळविले. या प्रतिद्रव्यांचा वापर करून टी पेशींच्या कार्यावरील लगाम काढून ती रोगप्रतिकारक प्रणाली पूर्ण कार्यक्षमतेने कर्करोगाच्या गाठींमधील पेशींवर तीव्र हल्ले चढवून त्यांचा संपूर्ण नायनाट करू शकतील, अशी डॉ. एलिसन यांची पक्की धारणा होती. त्या दृष्टीने त्यांनी सन १९९४ च्या अखेरीस आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने  एक प्रयोग केला आणि त्याचे निष्कर्ष इतके उत्साहवर्धक होते की ख्रिसमसच्या सुट्टीतच तो प्रयोग खात्री करून घेण्यासाठी परत एकदा करून पाहिला. त्याचेही निष्कर्ष पहिल्या प्रयोगाशी जुळत होते आणि उत्साहवर्धक होते. पण औषध कंपन्यांना मात्र त्यांच्या या प्रयोगात किंवा त्या निष्कर्षांवरून औषधोपचारासाठी त्यांचा वापर करण्यात अजिबात स्वारस्य नव्हते. आर्थर हॅली या प्रसिद्ध इंग्लिश कादंबरी लेखकाने स्ट्राँग मेडिसिन या नावाने औषध कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर टिप्पणी करणारी एक सुंदर कादंबरी लिहिली आहे. त्यातील लोट्रामायसिन या काविळीवर मात करण्यासाठी तयार केलेल्या औषधाची जी कथा लिहिली आहे त्यातून औषध कंपन्यांना नवीन काही करण्यात कसा रस नसतो हे चित्र व्यवस्थित रंगविले आहे. डॉक्टर एलिसन यांना प्रत्यक्ष जीवनात हा अनुभव आला होता!

क्योटो विद्यापीठातील डॉ. टसुकू होन्जो यांनी सन १९९२ मध्ये पीडी-१ नावाचे आणखी एक प्रथिन शोधले होते. या प्रथिनाचा दृश्य परिणाम टी पेशींच्या पृष्ठभागावर होत असल्याचे त्यांना आढळून आले म्हणून त्यांनी त्या दिशेने खोलवर अभ्यास सुरू केला. या प्रथिनाचे कार्य समजून घेण्यासाठी त्यांनी क्योटो विद्यापीठातील आपल्या प्रयोगशाळेत प्रयोगांची एक मालिकाच सुरू केली. त्यांना जे निष्कर्ष मिळाले त्यावरून प्राध्यापक एलिसन यांच्या सीटीएलए-४ प्रमाणेच पीडी-१ या प्रथिनाचे कार्य होते असे त्यांना आढळून आले. म्हणजेच टी पेशींच्या कार्यावर लगाम ठेवण्यासाठी निसर्गाने ज्या योजना केल्या आहेत त्यातीलच हा एक उपाय आहे असे त्यांच्या लक्षात आले. पण त्याची कार्यपद्धती मात्र सीटीएलए-४ या प्रथिनाच्या कार्यपद्धतीपेक्षा खूपच वेगळी आहे हे आता दोन्हींचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर लक्षात येते. त्यांनी जे प्राण्यांवर प्रयोग केले त्यातही पीडी-१ प्रथिनाचा वापर करून त्यांना कर्करोगावर मत करण्यात चांगले यश मिळाले. त्यामुळे हे प्रथिन औषधोपचारासाठी वापरण्याचा मार्ग मोकळा झाला. सन २०१२ साली एका महत्त्वाच्या प्रयोगात त्यांना या प्रथिनांचा वापर करून विविध प्रकारच्या कर्करोगांपासून त्रस्त झालेल्या रुग्णांवर आश्चर्यकारक परिणाम मिळाले. त्यातील अनेक रुग्ण खडखडीत बरेदेखील झाले. महत्त्वाचे म्हणजे यातील काही रुग्णांचा कर्करोग मेटॅस्टेटीस अवस्थेला म्हणजे या रोगाच्या अंतिम टप्प्यात आला होता! हा एक चमत्कारच होता यात शंका नाही.

या दोन्ही उपचारपद्धतींपकी पीडी-१ उपचारपद्धती अधिक परिणामकारक असून ती फुप्फुसे, मूत्रिपड, कातडी आणि लिफोमा (रक्तपेशींचा कर्करोग) या कर्करोगांच्या रुग्णांच्या बाबतीत यशस्वी ठरली आहे. या दोन्ही उपचारपद्धती एकत्रितपणे वापरल्या तर आणखी परिणामकारक होतात असे कातडीचा कर्करोग झालेल्या रुग्णांच्या बाबतीत आढळून आले आहे.

डॉक्टर एलिसन आणि डॉक्टर होन्जो या दोन धन्वंतरींच्या प्रयत्नांमधून स्फूर्ती घेऊन आपल्या रोगप्रतिकारक प्रणालीवर असलेला लगाम अधिक चांगला समजावून घेत मग कर्करोगाचा घोडा कितीही नाठाळ असेल तरी त्यावर मात करणे अधिक सोपे होत राहील. अर्थात उधळलेले घोडे आवरताना रस्ता भरकटू शकतो, पण म्हणून घोडय़ावर बसायचे सोडून देता येणार नाही. पर्यावरणातील वाढते प्रदूषण, मानवी जीवनात झालेले तंत्र बदल, वाढत्या महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे येणारे मानसिक ताण या सर्वामधून कर्करोगदेखील वेगाने त्याची परिणामकारकता वाढवीत चालला आहे. वैद्यकीय क्षेत्रात त्यावर मात करण्याची जिद्द वाढत चालली आहे. पण आपणच कुठे तरी थांबून सिंहावलोकनासाठी वेळ द्यायचा आहे. निसर्गनिर्मित शारीरिक रोगप्रतिकारक प्रणालीवर असलेले लगाम सल करता येतात आणि त्याचा उपयोग रोग बरा करण्यासाठी होतो हे कर्करोगाच्या रुग्णांना दिलासाजनक असले तरी एकूण मानवाच्या आरोग्यासाठी ही स्थिती निर्माण होणे चांगले नाही. आपण कुठे चुकतो आहोत, आपली जीवनपद्धती योग्य मार्गावर आहे का, याचा आढावा आपल्याला घ्यावा लागेल.