येत्या दोन महिन्यांत राजकारण ढवळून निघेल. लोकसभेच्या निवडणुकांचे सावट राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवरच नव्हे, तर कार्यालयांवरही दिसू लागेल. राजकीय पक्षांची कार्यालये हा राजकारणाचा अस्सल खलबतखाना.. इथे राजकारण शिजते, रुजते आणि पाझरते.. या कार्यालयाच्या प्रत्येक कोपऱ्याला आणि भिंतीला राजकारणाचा स्पर्श झाल्याने इथल्या वातावरणाला वेगळेपणाचा वास असतो. बैठका, चिंतन, मनन, मंथन, सारं काही इथे होतं आणि इथूनच बाहेर पडतं.. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी. साहजिकच, अनेक राजकीय पक्षांची केंद्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक कार्यालये इथे एकवटली आहेत. निवडणुकांचे वारे वाहू लागले असताना या कार्यालयांना येऊ घातलेल्या नव्या लकाकीचा हा त्रयस्थ मागोवा.. दर रविवारी!
‘लंच टाइम’ असल्यानं, भाजपचे दिवंगत नेते वसंतराव भागवत यांचं नाव असलेल्या चौकात ‘योगक्षेम’समोरच्या रस्त्याला ‘खाऊ गल्ली’चं रूप आलेलं असतं. तेथीलच ‘जनता दल (सेक्युलर)’च्या प्रदेश कार्यालयाभोवती गजबजाट असतो. गेटच्या आतही गर्दी असते. मग कुतूहल वाढतं. गेटमधून आत डोकावणंच भाग पडतं आणि गर्दीचं रहस्य उलगडतं..
कार्यालयाच्या आवारातच चहाचा एक खासगी स्टॉल असतो, बाहेर रस्त्यावर ‘जनता दल- सेक्युलर’ची नाश्त्याची गाडी असते आणि आतमध्ये चहा-नाश्ता घेत, निवांत टाइमपास करणारी गर्दी असते. थोडासा गलबलाही सुरू असतो.
आसपास टॅक्सीगाडय़ांची रहदारी, समोरून फुरफुरत जाणाऱ्या बेस्टच्या बसगाडय़ा, बाजूच्या एमटीडीसीच्या गेटातून ये-जा करणारी चकाचक गर्दी, शेजारीच भाजपच्या चकचकीत प्रदेश कार्यालयासमोरची इम्पोर्टेड गाडय़ांची रांग, सार्वजनिक स्वच्छतागृहाची सोय आणि बस थांब्यांची मोफतची सावली असल्यामुळे आजूबाजूच्या फुटपाथवर पथारी पसरलेल्या कुटुंबांची इकडेतिकडे भटकणारी मुलं आणि नरिमन पॉइंटचा गजबजलेला परिसर.. या साऱ्यात दबल्यासारखं, एकलकोंडं वाटणारं ते कार्यालय, चहा-नाश्त्याच्या निमित्तानं होणाऱ्या गर्दीमुळे थोडय़ा वेळासाठी का होईना, माणसात आलेलं असतं.
‘धर्मनिरपेक्ष जनता दल’ असा फलक प्रवेशद्वाराशीच आहे. या फलकाशेजारीच ‘पुर खुलूस मुबारक’ असा शुभेच्छा फलक गेल्या अनेक दिवसांपासून आहे. म्हणून हे राजकीय पक्षाचं कार्यालय आहे हे लक्षात येतं. अन्यथा, राजकीय पक्षांच्या कार्यालयात आढळणाऱ्या हालचालींचा तिथे मागमूसही नसतो..
असं असलं तरी पत्र्याच्या छपरावर साचलेल्या पालापाचोळ्याच्या थराचे ओझे पेलणारी आणि कित्येक वर्षांत रंगांचा हातदेखील न फिरल्यानं कळकट झालेली पक्ष कार्यालयाची ती इमारत एकटी असूनही स्वत:च्याच खुशीत असावी, असंही उगीचच वाटू लागतं..
आतमध्येही डोकावून पाहावं, असं ठरवून आपण दरवाजातून आत पाऊल टाकतो.. आणि ‘टवटवीतपणाला प्रवेश बंद’ असा फलक कुठे लटकत असावा असं भासू लागतं.
समोरच्या भिंतीवर मृणालताई गोरे यांचा फोटो, एका बाजूच्या भिंतीवर पक्षाध्यक्ष देवेगौडा यांचा फोटो.. बाकी काही फोटो पक्षानं केलेल्या आंदोलनांचे वगैरे..
हॉलवजा खोलीतच समोरच्या टेबलावर वर्तमानपत्रांचा ढीग पडलेला असतो. दोघंतिघं पेपरात माना खुपसून टेबलाभोवती बसलेले असतात.
कुणीतरी आल्याची चाहूल लागते, म्हणून ते समोरचं वर्तमानपत्र बाजूला करतात.
‘कुणाला भेटायचंय?’ एकजण विचारतो. ‘आज कुणीच भेटणार नाही’ असंही लगेचच सांगून टाकतो.
..मग काहीच न बोलता आपण नुसतं उभं राहायचं, आसपास नजर फिरवत! एका मिनिटात सगळं कार्यालय डोळ्यांच्या टप्प्यात येतं.. उजवीकडे दोनतीन खोल्या. दरवाजे कुलूपबंद. चौकटीवर पदाधिकाऱ्यांच्या नावाच्या पाटय़ा. वर्षांनुवर्षांपासून तेच असावेत, असं वाटावं इतक्या जुनाट..
डावीकडे अध्यक्षांची केबिन. ती कधीतरी उघडत असावी. दरवाजा अनेकदा हाताळल्यावर कडीशेजारी येणारा मळकटपणा तेथे स्पष्ट उमटलेला असतो. चौकटीवर अध्यक्षांच्या नावाची पाटी आणि शेजारीच एका उघडय़ा खोलीत अंधूकसा आधुनिकपणा.. म्हणजे टेबलावर एक कॉम्प्युटर, त्याच्या शेजारी प्रिंटर.
या खोलीत काम करणारी तरुणी मात्र रोज सकाळी साडेदहा वाजता कार्यालयात येते. तसं दिवसभर पक्षाचं असं फारसं काम नसतं, पण कुणी पदाधिकारी त्यांची त्यांची कामं घेऊन इथेच येतो. कुणी फेरीवाला संघटनेचं पत्रक तयार करायला सांगतो, कुणी ‘आरटीआय’मध्ये ‘टाकण्यासाठी’ अर्ज टाइप करून घेतो, पदाधिकारी असलेला एखादा वकील पक्षकाराच्या नोटिसा आणि कोर्टाच्या कामकाजात लागणारी कागदपत्रंही टाइप करून घेतो.. मग कधीतरी, पक्षाच्या बैठकांची निमंत्रण पत्रं, नाहीतर पक्षाचं एखाददुसरं प्रसिद्धिपत्रक..
इतर वेळी ही मुलगी समोरच्या कॉम्प्युटरवर इंटरनेटच्या जाळ्यातच, नाहीतर टेबलावरची वर्तमानपत्र चाळण्यातच गुरफटलेली असते!.. संध्याकाळ झाली, साडेसहा वाजले की ती आवरून घरी जाते. ती या कार्यालयातली -बहुधा एकमेव- पगारी कर्मचारी. बाहेरच्या हॉलवजा ऐसपैस जागेतील खुच्र्यावर अधूनमधून चारदोन कार्यकर्ते येऊन बसतात. सकाळी झाडलोट करायला कुणीतरी येतो. झाडलोट झाली की पक्ष कार्यालय जनतेची वाट पाहत ताटकळू लागतं. कधीकधी असं ताटकळतच दिवस संपून जातो..
भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या ‘जनता दल सेक्युलर’ पक्षाचं हे प्रदेश कार्यालय. कधीकाळी देशात हा पक्षही सत्तेवर होता. पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष शरद पाटील हे आमदार आहेत. दुसरे एक पदाधिकारी प्रताप होगाडे, वीजग्राहक संघटनेचं काम करतात. त्यांच्या संघटनेचंही हेच मुख्यालय.. आणखी एक पदाधिकारी फेरीवाल्यांची संघटना चालवतो. आसपासचे वडापाव, चहावाले विक्रेते हे त्याच्या संघटनेचे सदस्य. त्यांच्या समस्या ते इथे येऊनच अधूनमधून मांडतात.. मग त्यासंबंधी पालिकेकडे करावयाचा पत्रव्यवहारही याच संगणकावरून होतो.. कधीकधी एखाददुसरा मोर्चा, आंदोलन किंवा बैठकीसाठी थोडेफार कार्यकर्ते राज्याच्या कानाकोपऱ्यातून येतात, त्या दिवशी बाहेरच्या गर्दीसारखाच गजबजाट आतमध्येही असतो.
गेल्या कितीतरी वर्षांपासून मात्र हा पक्ष सत्ता आणि संपत्तीपासून कितीतरी दूर आहे. त्यामुळे अशा राजकीय पक्षाच्या प्रदेश कार्यालयात असंच दिसणार, अशी मनाची समजूत काढतच ‘संगणक कक्षा’तील प्लास्टिकच्या स्टुलावर सांभाळून बसून त्या खोलीत चहूकडे पाहावं. बाजूच्या भिंतीला टेकून रचलेले कागदांचे ढिगारे, रंग उडालेल्या आणि गळतीमुळे पोपडे निघालेल्या भिंती, कोपऱ्यावरची कोळिष्टकं.. असं सगळं, उदासपणात आणखी भर घालणारं, त्या एकमेव जिवंत खोलीतही रचलेलं दिसतं..
बाहेर पेपर वाचणारा कार्यकर्ता अदबीनं शेजारी येऊन थांबतो, ‘चहा घेणार का’ असं नम्रपणे विचारतो.. ‘आता निवडणुका लागल्या की होईल गर्दी सुरू’.. न विचारताच तो स्वत:च बोलून जातो. ‘नेते मंडळी अधूनमधून येतात इथे.. दुपारनंतर कदाचित नारकर साहेब येतील.’.. आसपासच्या खोल्यांच्या -त्यांना कार्यालयीन भाषेत ‘केबिन’ म्हणतात, पण इथे मात्र तो शब्द काहीसा वेगळाच वाटू लागतो- कुलुपांवर खिळलेली आपली नजर बघूनच तो स्वत:च सांगतो..
‘या कार्यालयाचं रिनोवेशन जाऊ दे.. थोडीफार तरी रंगरंगोटी का करत नाही? शेजारचं पक्ष कार्यालय कसं फाइव्हस्टार आहे’ उगीचच ‘पिन मारल्या’सारखा प्रश्न मनातून तोंडात येतो.
‘साहेब, खरंय तुमचं, पण.. फंड नाही पक्षाकडे!’ तो उत्तरतो.
 मग आपणही ‘चहा नको’ म्हणत बाहेर पडतो.  
बाहेर पडून रस्त्यावरून चालताचालता वळून पाहिल्यावर, ती इमारत पुन्हा एकटीएकटी वाटू लागते.. बाजूच्या पक्ष कार्यालयात गर्दी सुरू झालेली असते. रस्तादेखील गजबजून वाहतच असतो..
आपण नुसतं उभं राहायचं, आसपास नजर फिरवत! एका मिनिटात सगळं कार्यालय डोळ्यांच्या टप्प्यात येतं.. उजवीकडे दोनतीन खोल्या. चौकटीवर पदाधिकाऱ्यांच्या नावाच्या पाटय़ा. वर्षांनुवर्षांपासून तेच असावेत, असं वाटावं इतक्या जुनाट.. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या  पक्षाचं हे प्रदेश कार्यालय.