13 December 2019

News Flash

सावध ऐका, पुढल्या हाका!

‘‘आजचे आंदोलन खास आहे. जखमींनी जखमींसाठी केलेले.

‘‘आजचे आंदोलन खास आहे. जखमींनी जखमींसाठी केलेले. आम्ही वंचितांसाठी न्याय मागत होतो. पण, डोळा गमावून बसलो. सरकारला हे आंदोलन मोडीत काढता येणार नाही. आमच्या मागण्यांच्या पूर्ततेनंतरच आंदोलन संपेल.’’ जेरमी रॉड्रीग्ज पॅरिसमध्ये शनिवारी ‘मार्च ऑफ द वुन्डेड’मध्ये बोलत होते आणि उपस्थित आंदोलक त्यांच्या वाक्यागणिक टाळ्यांचा कडकडाट करत होते. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या ‘यलो व्हेस्ट’ चळवळकर्त्यांच्या निदर्शनांचा हा बारावा आठवडा. इंधनदरवाढीने १७ नोव्हेंबर २०१८ रोजी आंदोलनाची ठिगणी पडली आणि वाढती महागाई, जीवनमानाचा घसरलेला दर्जा, किमान वेतन आदी मुद्दय़ांवरून आंदोलकांनी अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. समाजमाध्यमांवरून सुरू झालेल्या अलीकडच्या अनेक चळवळींशी नाते सांगणारी ही चळवळ फ्रान्सच्या अनेक शहरांत हातपाय पसरू लागली आहे. २६ जानेवारीच्या शनिवारी पॅरिसमधील निदर्शनादरम्यान या चळवळीचा एक नेता असलेल्या रॉड्रीग्ज यांच्या डोळ्याला दुखापत झाली. रॉड्रीग्ज जखमी होणे ही बाब आंदोलक हिंसाचारासाठी समर्थनीय ठरवतील, अशी भीती ‘द लोकल’च्या ‘फ्रान्स यलो व्हेस्ट कॉन्फ्लिक्ट इज हिडिंग इन्टू कॅलॅमिटस न्यू टेरिटरी’ या शीर्षकाच्या लेखात वर्तवली आहे. आंदोलन आणखी चिघळल्यास त्याचे पर्यवसान नव्या संकटात होईल, असा इशारा या लेखात देण्यात आला आहे. आतापर्यंत या आंदोलनात १७ जणांच्या डोळ्यांना दुखापत झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत निदर्शनादम्यान १७०० आंदोलक आणि एक हजार पोलीस जखमी झाले आहेत. रबरगोळ्या वापरावर बंदीची घोषणा सरकारने करणे आवश्यक असल्याचेही या लेखात म्हटले आहे.

फ्रान्सच्या ‘लिबरेशन’ वृत्तपत्राने ‘यलो व्हेस्ट’ चळवळ वाढत असल्याचे नमूद करताना देशातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. केवळ इंधनदर कमी करणेच नव्हे तर वंचितांना न्याय आणि सन्मानाची हमी देण्याची चळवळीची मागणी आहे. मॅक्रॉन यांनी अनेक आश्वासने दिली असली तरी आंदोलन शमलेले नाही, याकडेही ‘लिबरेशन’ने लक्ष वेधले आहे. फ्रान्समध्ये जुलै ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत बेरोजगारीचा दर ९.१ टक्के इतका मोठा होता, यावरही माध्यमांनी बोट ठेवले आहे.

‘द  वॉशिंग्टन पोस्ट’ने ‘डझ फ्रान्स यलो व्हेस्ट्स हॅव अ फ्यूचर अ‍ॅज अ पोलिटिकल पार्टी? सम होप सो’ या शीर्षकाचा लेख प्रसिद्ध केला आहे. फ्रान्सच्या एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात १६ टक्के लोक स्वत:ला ‘यलो व्हेस्ट’ आंदोलक मानत असल्याचे आणि ४० टक्के लोकांनी आंदोलनाबद्दल सहानुभूती व्यक्त केल्याचा दाखला या लेखात देण्यात आला आहे. मात्र, ही चळवळ अद्याप विस्कळीत असून राजकारणात प्रवेश करावा की दबावगट म्हणून काम करावे, याबाबत आंदोलकांमध्येच मतभेद आहेत. इटलीच्या ‘फाईव्ह स्टार मूव्हमेंट’चा जन्मही समाजमाध्यमातून झाला. सत्ताधारी आणि धनवानांविरोधातील असंतोषाला या चळवळीने वाचा फोडली. २०१३ च्या निवडणुकीत ‘फाईव्ह स्टार मूव्हमेंट’ पक्ष दुसऱ्या स्थानावर आला. या पक्षाचे नेते लुईगी दी मैओ हे सध्या उपपंतप्रधान असून, त्यांनी ‘यलो व्हेस्ट’ला पाठिंबा दिला आहे, याकडे या लेखात लक्ष वेधण्यात आले आहे.

‘यलो व्हेस्ट’ चळवळीचे लोण फ्रान्सबाहेरही पसरले. ‘यलो व्हेस्ट आर डेंजरस अ‍ॅण्ड दे आर स्प्रेडिंग इन युरोप’ या शीर्षकाचा लेख ‘इंडिपेन्डन्ट’ने प्रसिद्ध केला आहे. ब्रसेल्समध्येही असे आंदोलन झाले. अशा आंदोनाद्वारे ब्रिटनमधील ब्रेग्झिटवादी जनतेला बळ मिळण्याची भीती या लेखात व्यक्त करण्यात आली आहे. ‘यलो व्हेस्ट’ला स्पेन, इटली आणि ब्रिटनमध्येही समर्थक असल्याचे या लेखात म्हटले आहे.

मॅक्रॉन यांनी डिसेंबरध्ये देशाला उद्देशून केलेल्या भाषणानंतर चळवळीची धार बोथट होईल, असे वाटत होते. खरे तर या भाषणानंतर त्यांच्या घसरलेल्या लोकप्रियतेत पुन्हा वाढ होत असल्याचे जनमत चाचण्यांत दिसू लागले आहे. त्यातच ‘यलो व्हेस्ट’च्या हिंसाचाराविरोधात आता ‘रेड स्काव्‍‌र्हस’ मैदानात उतरल्याने सरकारला अंशत: दिलासा मिळाला आहे. मात्र, आर्थिक विषमता आणि त्यातून रुंदावलेली सामाजिक दरी कमी करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे कायम आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ऑक्सफॅमच्या अहवालाचाही जगभरच्या सत्ताधाऱ्यांना हाच सांगावा आहे.

संकलन : सुनील कांबळी

First Published on February 4, 2019 12:17 am

Web Title: jeremy rodriguez march of the wounded
Just Now!
X