एखादा विचार रुजवण्यासाठी लागणारी सामाजिक अनुकूलता तयार करण्याची जबाबदारी त्या विचारांची मांडणी करणाऱ्यांवर असते. मोदींच्या वाराणसी आगमनामुळे ही जबाबदारी बनारस हिंदू विद्यापीठाकडे आली आहे. ‘डावी किंवा उजवी विचारसरणी हवीच’ असे मानणाऱ्या दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने आजवर जे वैचारिक नेतृत्व दिले, त्याप्रमाणे आता ‘बीएचयू’ला महत्त्व आल्यास आश्चर्य वाटू नये, असे सांगणारा विशेष वृत्तलेख..
मतदानोत्तर चाचण्यांचे सर्व निष्कर्ष प्रमाण मानल्यास, नरेंद्र मोदी देशाचे भावी पंतप्रधान असतील. मोदींचा राष्ट्रीय राजकारणातील भक्कम उदय भाजपचा जनाधार वाढवणारा आहे. राजकारणात प्रभावी नेतृत्व असून चालत नाही, त्याला समांतर असा राजकीय विचार मांडणाऱ्यांचीदेखील गरज असते. राष्ट्रीय स्तरावरील ही गरज आतापर्यंत भागवण्याचे काम दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने इमानेइतबारे केले. राजकीय अभ्यासकांच्या वर्तुळात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे महत्त्व अबाधित आहे. या वैचारिक वर्चस्वाला मोदींनी छेद दिला. डाव्या विचारसरणीचा झेंडा खांद्यावर घेऊन मिरवणाऱ्या जेएनयूतील राजकीय अभ्यासक, बुद्धिजीवींना समांतर अशा कट्टर उजव्या विचारसरणीचे अभ्यासक बनारस हिंदू विद्यापीठात संघटित होत आहेत. भारतीय राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी ही घटना आहे.
बनारस हिंदू  विद्यापीठाच्या लंका प्रवेशद्वारासमोर संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांचा मोठा पुतळा आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रशासनाविरोधातील आंदोलन, मोदींनी त्यांच्या दुसऱ्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यास जाताना केलेला ‘रोड शो’ याच प्रवेशद्वारापासून सुरू झाला. याउलट समाजवादी पक्ष, काँग्रेस, आम आदमी पक्षाच्या आंदोलनाचा, ‘रोड शो’चा समारोप या प्रवेशद्वारापाशी झाला. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा प्रवास कुठून सुरू होईल व कोणत्या दिशेने जाईल, याची प्रचीती येते. मोदींच्या वाराणसीप्रेमामागे बनारस हिंदू विद्यापीठाचे ‘स्थानमाहात्म्य’ आहे. हिंदू समुदायासाठी सर्वाधिक महत्त्व असलेल्या वाराणसीत मोदींचे पाऊल पडल्याने हिंदुत्ववादी विचारांची मांडणी करणाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. वाराणसीच्या प्रतिष्ठित व समाजमान्यता असलेल्या निवडक दीडशे जणांना मोदींसमवेत चर्चेसाठी भाजपने निमंत्रित केले होते. परंतु प्रशासन व भाजपच्या संघर्षांत ही चर्चा बारगळली. या दीडशे जणांमध्ये बीएचयूमधील किमान पाच-सहा जण होते. ज्याप्रमाणे डाव्यांनी योजनापूर्वक जेएनयूवर वर्चस्व ठेवले, त्याचप्रमाणे भाजपने आपला मोर्चा बीएचयूकडे वळवला आहे.
वर्षभरापूर्वी दिल्लीच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये मोदींचे भाषण होते. त्याविरोधात जेएनयूमध्ये निदर्शने झाली. मोदींच्या राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याच्या वृत्तानंतर जेएनयूमध्ये डाव्या विचारांचे समर्थक विद्यार्थी, प्राध्यापकांनी एकत्रितपणे भारताच्या सार्वभौमत्वाला, धर्मनिरपेक्षतेला धोका.. वगैरे मांडणी करण्यास प्रारंभ केला. त्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. मोदींच्या नव्हे तर भारतीय जनता पक्षाविरोधात वैचारिक खाद्य पुरवणाऱ्यांची जेएनयू ‘पंढरी’ मानली जाते. चे गव्हेरा, कार्ल मार्क्‍स, फिडेल कॅस्ट्रो ही जेएनयूत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची आराध्य दैवते. त्यासाठी एसएफआयसारखी संघटना विद्यार्थ्यांची तयारी करवून घेते. यातूनच पुढे प्रकाश करात यांच्यासारखे नेते तयार होतात.
गेल्या अनेक वर्षांपासून असलेले जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील राजकीय विचारांचे केंद्र मोदींमुळे बनारस हिंदू विद्यापीठाच्या दिशेने सरकले आहे. पंडित मदनमोहन मालवीय यांच्या पुढाकाराने स्थापन झालेले हे विद्यापीठ नेहमीच हिंदुत्ववादी विचारांचे केंद्र राहिले. परंतु या विद्यापीठाला ‘ग्लॅमर’ मिळवून देण्यात हिंदुत्ववादी संघटनांना म्हणावे तितके यश आले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक व वैचारिक जडणघडणीचे प्रवर्तक माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य गुरुजी बीएचयूमध्ये शिकत होते व काही काळ शिकवतदेखील होते. त्यामुळे संघपरिवाराचा या विद्यापीठाशी वेगळा अनुबंध आहे.
अध्ययन व अध्यापनासोबत बीएचयूमध्ये हिंदुत्व विचार आकार घेत होता. परंतु हिंदुत्ववादी विचारांची मांडणी करण्यासाठी लागणारे स्वातंत्र्य व राजाश्रय भारतीय जनता पक्षाने बीएचयूला दिला नाही. मोदींच्या नेतृत्वामुळे आपल्याला राजाश्रय मिळेल अशी आशा या विद्यापीठातील विद्यार्थी-शिक्षकांना आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारसरणीचे समर्थक असलेले बीएचयूमधील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. कौशल किशोर मिश्रा यंदा नरेंद्र मोदींच्या प्रचारात खुलेपणाने सक्रिय झाले.  गंगा तीरावर असलेल्या अस्सी भागातील एका बूथवर मिश्रा ‘पंडितजी’ ठाण मांडून बसले होते. वाराणसीतील जातीय समीकरणे, त्यावर वरचढ झालेले मोदीनाम, उजव्या विचारसरणीचे अभ्यासकांना सुगीचे दिवस येणार असल्याचे ते ठामपणे सांगत होते. स्वातंत्र्योत्तर काळात देशाला वैचारिक खाद्य पुरवण्याचे काम ज्याप्रमाणे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने दिले, ते नेतृत्व मोदींमुळे बनारस हिंदू विद्यापीठाकडे येणार, हे जवळजवळ निश्चित झाले आहे. या वैचारिक स्थित्यंतराकडे डोळसपणे पाहावयास हवे. या दोन्ही विद्यापीठांना असलेल्या नावांमधूनच अनेक गोष्टी ध्वनित होतात. जेएनयूमध्ये शिकणारा विद्यार्थी एक तर डाव्या अथवा उजव्या विचारसरणीचा पुरस्कर्ता असतो. ‘मी कोणत्याही पक्षाचा, विचारसरणीचा नाही’ अशी भंपक मध्यममार्गी भूमिका या विद्यापीठात घेता येत नाही. जेएनयूमध्ये राहून हिंदुत्ववादी विचार जपणाऱ्यांना संघपरिवारात मानाचे स्थान आहे. संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’चे विद्यमान संपादक प्रफुल्ल केतकर हे जेएनयूचे विद्यार्थी.
जेएनयू कॅम्पसवर राहून हिंदुत्ववादी विचारसरणीचा पुरस्कार करणे सोपे नाही. अफजल गुरूला फासावर लटकवल्यानंतर जेएनयूमध्ये निदर्शने झालीत. त्याचा निषेध करण्यासाठी पुन्हा अभाविपची निदर्शने झाली. हा संघर्ष सातत्याने सुरू आहे. या संघर्षांतून उजव्या विचारसरणीच्या हाती फारसे काही लागलेले नाही. गेल्या ८० वर्षांपेक्षाही जास्त काळापासून हिंदुत्ववादी विचारांसाठी काम करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघालादेखील प्रखर उजवा विचार मांडणाऱ्यांची वानवा भासत होती. मोदीलाटेमुळे हे समीकरणदेखील बदलले आहे.  
‘मोदीमाहात्म्य’ इतके आहे की, वर्षांनुवर्षे बीएचयूमध्ये उजव्या विचारसरणीचे समर्थक असलेल्या प्राध्यापकांची सक्रियता अलीकडच्या काळात वाढली आहे. हे वैचारिक ध्रुवीकरण मानावे लागेल. मोदींचे बनारस आगमन हे उजव्या विचारांच्या समर्थक अभ्यासकांसाठी उत्साहवर्धक ठरले. एरवी बीएचयूमध्ये सतरा टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होत नाही. यंदा हे प्रमाण पंचवीस टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. प्रा. मिश्रा यांनी दावा केला की,  मतदानाची वाढलेली टक्केवारी केवळ नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची मोहिनी आहे. उजव्या विचारसरणीच्या समर्थकांना मोदी-आश्रय मिळेल, असा विश्वास वाटतो. आतापर्यंत एकदाही मतदान न केलेल्या बीएचयूच्या वैद्यकीय शिक्षण विभागात असलेल्या प्रा. मंजिरी द्विवेदी यांनी पहिल्यांदाच मतदान केले, कारण त्यांना मोदींच्या नेतृत्वावर विश्वास वाटतो.
विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेले अरुण जेटली, रविशंकर प्रसाद, शाहनवाज हुसैन, निर्मला सीतारमन यांच्या हाती भारतीय जनता पक्षाची धुरा आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने भारतीय जनता पक्षाला नेहमीच कार्यकर्ते, नेते पुरवले, परंतु अभाविपमधून आलेले व प्रभावी वैचारिक मांडणी करू शकणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतपत आहे. त्याउलट जेएनयूतील डाव्या चळवळीने नेते-कार्यकर्ते व अभ्यासक विचारवंतदेखील दिले.
यंदाच्या निवडणुकीत संघपरिवारातील सर्वच संघटना मैदानात उतरल्या होत्या. त्यामुळे मोदींचा मार्ग सोपा झाला. निवडणुकीचा प्रचार, मतदान व आता निकाल या साऱ्या स्तरांवर सातत्याने हिंदुत्ववादी विचार वेगवेगळ्या व्यासपीठांवरून मांडला गेला. त्याची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली होती. बंगळुरू, अहमदाबाद, दिल्ली व कोलकाता या चार प्रमुख शहरांमध्ये गतवर्षी संघाच्या पुढाकाराने विविध विषयांवर वेगवेगळ्या दिवशी दोनदिवसीय कार्यशाळा भरवल्या गेल्या होत्या. त्यात प्रामुख्याने जम्मू-काश्मीर समस्या, अनुसूचित जाती संवर्गातील नवीन प्रवाह, इस्लाम समस्या आदी विषयांवरील चर्चा संघविचारांकडे वळवण्यात आली.
कार्यशाळेत या विषयांवर काम करणारे, लिहिणारे पण संघ समर्थक असलेल्यांना निमंत्रित केले होते. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत या कार्यशाळांमध्ये उपस्थित होते. एका इंग्रजी मासिकानुसार या कार्यशाळेत भागवत म्हणाले, ‘संघ विचारधारेशी एकरूप झालेले नरेंद्र मोदी एकमेव व्यक्ती आहेत.’  हिंदुत्व ही एक जीवनशैली आहे, हा संघाचा पारंपरिक विचार मोदींमुळे भक्कमपणे संघपरिवाराला मांडता येईल. एखादा विचार रुजवण्यासाठी लागणारी सामाजिक अनुकूलता तयार करण्याची जबाबदारी त्या विचारांची मांडणी करणाऱ्यांवर असते. मोदींच्या वाराणसी आगमनामुळे ही जबाबदारी बनारस हिंदू विद्यापीठाकडे आली आहे.
या पाश्र्वभूमीमुळे आणि मोदींनी बनारसशी जवळीक राखल्यास देशातील वैचारिक क्षेत्रात यापुढे जेएनयूसोबत बनारस हिंदू विद्यापीठाचेदेखील नाव अग्रक्रमाने घेतले जाईल, अशी शक्यता आहे.
*उद्याच्या अंकात राजेश्वरी देशपांडे यांचे ‘ समासा’तल्या नोंदी हे सदर.

arguments with the team
ताणाची उलगड : वादाला महत्त्व किती?
High Court
अपंगांसाठीचे कायदे पुस्तकापुरते मर्यादित ठेवू नका, दृष्टीहीन महिलेला रेल्वेतील नोकरीबाबत दिलासा देताना उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
land reform
UPSC-MPSC : भारतामध्ये जमीन सुधारणांची गरज का पडली? त्यासाठी सरकारकडून कोणते प्रयत्न करण्यात आले?
Science Day is Not just to celebrate but to practice it
विज्ञान दिन साजरा करण्यासाठी नव्हे, आचरणात आणण्यासाठी…