14 August 2020

News Flash

दलितांच्या संघर्षांचे सहप्रवासी

जॉन लुइस हे काही नुसते भाषण करायलाच प्रभावी होते, असं नाही. त्यांनी नेतृत्वसुद्धा केलं

सूरज येंगडे

काळे आणि गोरे यांना निरनिराळंच ठेवणारा १९६०च्या आधीचा काळ ते आताचा सगळे सांस्कृतिक रंग असलेला काळ, यांच्या दरम्यानचा इतिहास घडवण्यासाठी तरुणपणीच नेतृत्व देणारे जॉन लुइस, वयानं ज्येष्ठ झाल्यावरही काळाशी सुसंगत राहिले. एकाच पिढीला एवढे बदल पाहण्याची संधी फार कमी मिळत असेल, जेवढी जॉन लुइस यांना मिळाली. त्यांच्या देशाचे रंग, देशाचा मूड आणि देशाचा स्वभावच बदलताना पाहिलेल्या जॉन लुइस यांचे अलीकडेच निधन झाले. जिवंतपणी जणू दंतकथा ठरलेल्या अशा उत्तुंग माणसाशी चर्चा करण्याची संधी मिळालेल्या एका भारतीय विद्यार्थ्यांने त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला साक्षेपी वेध..

अमेरिकेला येण्याआधीपासून मला विकिपीडियातून म्हणा, त्यांची पुस्तकं वाचून म्हणा, तिथल्या काही व्यक्तींबद्दल का कुणास ठाऊक पण आदर होता. त्यापैकी तीन नावं महत्त्वाची : एक कॉर्नेल वेस्ट यांचं,  दुसरं नाव  हेन्री लुइस गेट्स आणि तिसरं होतं जॉन लुइस यांचं नाव. यात बराक ओबामाही अर्थातच होते. या सर्वाना मी त्यांच्या छायाचित्रांतून तरी ओळखत होतो. कदाचित मित्रानं मला त्यांच्याबद्दल आधी सांगितलं असेल, त्यांच्या ‘प्रोफाइल्स’ पाठवल्या असतील वगैरे.

पण सुमारे पाच वर्षांपूर्वीपासून मी या तीन व्यक्तींकडे अभ्यासपूर्वक, जरा गांभीर्यानं पाहू लागलो. या तिघांचे चरित्र-तपशील माझ्यासाठी महत्त्वाचे वाटू लागले आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे हे तिघेही ज्या आफ्रिकन-अमेरिकन विश्वातले होते, त्याचा इतिहासही माझ्या अभ्यासाचा विषय झाला. फक्त अमेरिकेतलेच नाहीत, तर दक्षिण आफ्रिकेतले कृष्णवर्णीय समाज मला जणू खुणावत होते. मीही त्यांच्यात अभ्यासक म्हणून इंटरेस्ट घेऊ लागलो होतो. त्या अभ्यासानंच या दोन्ही देशांमध्ये मला नेलं.

या तिघांत जॉन लुइस जरा निराळे होते, कारण ते राजकारणी- निवडून येणारे लोकप्रतिनिधीच होते. ते लोकांचे संघटक होते. खूप वर्षांचा अनुभव तर त्यांच्याकडे होताच. अमेरिकन काँग्रेसच्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज’ या सभागृहामधले ते सर्वात ज्येष्ठ प्रतिनिधी होते. त्यांचा मतदारसंघ म्हणजे अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातला, अ‍ॅटलांटा शहर जिथं आहे तो ‘फिफ्थ काँग्रेशनल डिस्ट्रिक्ट’. या मतदारसंघातून ते १९८७ पासून निवडून यायचे. गेल्या आठवडय़ात, १७ जुलै रोजी त्यांचं निधन झालं, तोपर्यंत ते इथले लोकप्रतिनिधी होते.

अमेरिकी वंशभेद आणि त्यामागचा गौरवर्णीय वर्चस्वभाव मुळापासून हलवणाऱ्या चळवळी जेव्हा झाल्या, तो काळा जॉन लुइस यांनीही घडवला होता. त्यांचा जन्म अलाबामा राज्यातला, २१ फेब्रुवारी १९४०चा. आईवडील खंडानं शेती करणारे- म्हणजे भूमीहीन शेतकरी होते. जिम क्रोचे कायदे तेव्हा अमेरिकेच्या दक्षिणेकडल्या राज्यांत लागू होते. म्हणजे, वर्णभेदामुळे काळ्यांनी गोऱ्यांच्यात कधीही मिसळू नये, असे कायदे होते. ही विषमता लुइस यांनी जन्मभर या ना त्या स्वरूपात अनुभवली. वंशभेद आणि त्यातून होणारे अन्याय, कृष्णवर्णीयांना मिळणारी दुय्यम वागणूक असह्य़ झाल्यामुळे जॉन लुइस हे त्या वेळच्या नागरी हक्क चळवळीत सामील झाले. या चळवळीचे नेते होते डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर. ‘डॉ. किंग हे माझे प्रेरणास्थान होते,’ असा उल्लेख जॉन लुइस यांनी केला आहे. लुइस त्या वेळी तरुण होते, वयाची विशी नुकती ओलांडलेली होती. पण नागरी हक्कांच्या चळवळीत महत्त्वाच्या नेत्यांमध्ये त्यांचं नाव तेव्हाच घेतलं  जाऊ लागलं. या चळवळीतले ते वयानं सर्वात लहान नेते ठरले. ‘आय हॅव अ ड्रीम ’ हे डॉ. किंग यांचं प्रसिद्ध भाषण २८ ऑगस्ट १९६३ रोजी वॉशिंग्टन शहरातल्या ज्या प्रचंड नागरी हक्क मोर्चासमोर झालं, त्या वेळी जॉन लुइस हे त्याच व्यासपीठावर होते. त्यांचाही आवाज डॉ. किंग यांच्या त्या भाषणाआधी दुमदुमला होता. प्रभावी वक्ते म्हणून लोकांनीही जॉन लुइस यांची नोंद घेतलीच होती.

जॉन लुइस हे काही नुसते भाषण करायलाच प्रभावी होते, असं नाही. त्यांनी नेतृत्वसुद्धा केलं. अहिंसक लढे उभारले. त्यात महत्त्वाचा ठरला तो ‘एसएनसीसी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘स्टुडंट नॉनव्हायोलंट कोऑर्डिनेटिंग कमिटी’तर्फे अलाबामातल्या सेल्मा इथल्या ‘एडमंड पोटस ब्रिज’वर त्यांनी काढलेला मोठा मोर्चा. ७ मार्च १९६५ या दिवशी निघालेल्या या मोर्चाची महत्त्वाची मागणी एकच होती :  गोऱ्यांप्रमाणेच आम्हालाही मतदानाचा हक्क द्या. नागरी हक्कांमध्ये वर्णभेद आणू नका. या मोर्चावर पोलिसांनी हिंसक अत्याचार केले. इतके की, तो दिवस अमेरिकेत ‘ब्लडी सण्डे’ म्हणूनच ओळखला जातो. पोलिसांच्या या निर्घृण मारहाणीत जॉन लुइस यांच्या डोक्याला मार बसला, कवटीला तडा गेला. त्या वर्णभेदाच्या अत्याचारांची ही खूण त्यांना जन्मभर वागवावी लागली.

लुइस हे खरोखरीचे लोकशाहीवादी होते; सनदशीर आणि अहिंसक मार्गावर त्यांचा विश्वास होता. अहिंसक संघर्ष उभारल्याबद्दल त्यांना ४० वेळा अटक झाली होती. त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली ती अ‍ॅटलांटा नगरपालिकेचे सदस्य म्हणून ते निवडून आले, तेव्हापासून. त्यानंतर १९८७ मध्ये अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज या सभागृहावर त्यांची निवड झाली. ही खासदारकी मिळण्याआधी आणि नंतरही, त्यांनी वर्णभेद , अन्याय अणि गरिबी निपटून काढण्यासाठी काम सुरूच ठेवलं. हेच राजकीय काम आहे, अशी त्यांची भूमिका होती. हे डोंगराएवढं काम केल्यामुळे लोकांकडून त्यांना आदर मिळाला आणि सरकारकडून, त्यांच्या अतुलनीय कामगिरीला दाद देणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना मिळाला! ‘प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम’ म्हणून ओळखला जाणारा हा पुरस्कार, अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते लुइस यांना प्रदान झाला. अर्थात, लुइस यांच्यासारख्या अनेकांनी सातत्यानं प्रयत्न केले म्हणून तर ओबामांच्या निवडीचा मार्ग आणखी बुलंद झाला. पण नागरी हक्क चळवळीतले बरेच आघाडीचे लोक हा क्षण पाहायला उरले नव्हते. लुइस यांनी संघर्षांच्या इतिहासाची ही पुढली यशस्वी वळणंसुद्धा पाहिली. अगदी अखेरच्या क्षणापर्यंत सार्वजनिक जीवनात लुइस कार्यरत राहिले. अखेरच्या सहा महिन्यांत ते कॅन्सरशी झुंज देत होते.

वर सांगितलेले तपशील बऱ्याच जणांना माहीत असतील. पण इथं मला लुइस कसे दिसले, हेही सांगायचं आहे.

लुइस यांचा स्वभाव शांत. त्यांच्या चेहऱ्यावर सम्यक भाव असत. पण दुरावा न वाटता ते आजोबांसारखे वाटत. या आदरणीय संसदपटूला भेटण्याची संधी मला दोनदा मिळाली. पहिली भेट झाली ती हार्वर्ड युनिव्हर्सिटीत क्लास ऑफ २०१८च्या ग्रॅज्युएशन सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून आले होते तेव्हा. दुसरी भेट, मी वॉशिंग्टन डी.सी.ला अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये जाऊन त्यांना भेटलो तेव्हा झाली. या दोन्ही भेटी एकाच व्यक्तीनं जुळवून आणल्या  होत्या. ती म्हणजे हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये माझ्याबरोबर शिकणारी ब्रेन्डा जोन्स. ब्रेन्डा आधी कोलंबिया विद्यापीठात शिकली, ती आफ्रिकन-अमेरिकन पत्रकार तर आहेच, पण कम्युनिकेशन एक्स्पर्ट म्हणूनही काम करते. जॉन लुइस यांच्या माध्यमसंपर्काचं काम ब्रेन्डाच गेल्या १६ वर्षांत पाहायची.

ब्रेन्डाशी मैत्री होण्याचं कारण म्हणजे हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये शिकताना आमच्या खूप गप्पा व्हायच्या एकमेकांशी आणि विषय वर्णभेद-जातिभेद हाच असायचा. जात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गांधी या विषयांवर मी बोलू लागलो की ब्रेन्डा दलितांचे आणि आफ्रिकन-अमेरिकनांचे प्रश्न सारखेच कसे ठरतात, अशा अर्थाची प्रतिक्रिया द्यायची. ती शिकत जरी असली, तरी सार्वजनिक जीवनात तिला एका खासदाराची संपर्क संचालक असा हुद्दा होता. अमेरिकेत अशा सहायकांनाही लोकसेवक समजलं जातं. त्यामुळे ती शब्द जपून वापरायची. म्हणूनच, भारतामधल्या दलितांचे आणि आफ्रिकन-अमेरिकनांचे प्रश्न सारखे आहेत असं ती उघडपणे न म्हणता सूचकपणेच म्हणायची. आमच्या पहिल्याच डीनरच्या वेळी तिनं सुचवलं की, मी तिच्या वरिष्ठांना भेटून दलितांच्या स्थितीची माहिती त्यांना द्यायला हवी. मग हार्वर्डमध्ये जॉन लुइस येणारच होते तेव्हा त्यांचा एक तास आम्हा तिघांसाठी – मी आणि आणखी दोघे आफ्रिकन-अमेरिकन विद्यार्थी यांच्यासाठी – ब्रेन्डानं राखून ठेवला. अगदी खास आम्हालाच ते तासभर भेटणार होते. त्यांच्याशी कसं वागायचं, उभं कसं राहायचं, मुद्देसूदच बोलायचं, हे आम्हाला सांगण्यात आलं होतं.

म्हणून मग मी एक प्रेझेंटेशनच तयार केलं, ‘द कास्ट सिस्टीम’ नावाचं. ही भेट झाली २३ मार्च २०१८ या तारखेला, त्यामुळे तिथपर्यंतचे सगळे संदर्भ मी तयार ठेवले होते. प्रेझेंटेशन फक्त १५ मिनिटांचंच करायचंय, असं मला आधीच सांगण्यात आलं होतं.  पण जॉन लुइस यांनी नंतर विचारलेले प्रश्न अगदी मार्मिक होते आणि त्यावरली चर्चा ४० मिनिटं चालली. आणखी दोघे जे विद्यार्थी माझ्याबरोबर होते, तेसुद्धा या चर्चेत भाग घेत होते. लुइस यांनी प्रश्न खूप विचारले. त्यांनी अमेरिकेत स्थायिक झालेले जे भारतीय सध्या अमेरिकेतल्या रिपब्लिकन पक्षात आहेत, त्यांच्याबद्दलचं माझं मत काय असंही विचारलं. भारतातल्या जातिभेदाचा इतिहास आणि आजची स्थिती, अत्याचाराच्या बातम्या अशी सगळी माहिती घेतल्यानंतर ते म्हणाले की, कदाचित या जातिव्यवस्थेचा परिणाम म्हणून भारतातून इथे आलेल्या आणि राजकारणात असलेल्यांना रिपब्लिकन पक्षाची मूल्यं जवळची वाटत असतील.

प्रेझेंटेशन सुरू असताना मात्र जॉन लुइस अगदी शांत होते, लक्षपूर्वक ऐकत होते. त्यांनी डोळे माझ्यावरच रोखले होते. भुवया ताणून बघत ऐकण्याची त्यांची लकब मला प्रत्यक्षच दिसत होती. ते एवढं लक्ष देऊन ऐकतायत हे पाहून माझा हुरूप वाढलाच होता. जातिव्यवस्था म्हणजे काय, इथपासून ते भारतातील दलितांची सद्य:स्थिती अशा स्लाइड मी बनवलेल्या पीपीटी प्रेझेंटेशनमध्ये होत्या. प्रेझेंटेशन संपल्यानंतर जॉन लुइस यांनी आधी प्रतिसादवजा टिप्पणी केली. ‘भारतातल्या आमच्या दलित भावाबहिणींना आमची पूर्ण साथ आहेच,’ असं ते म्हणाले. जातव्यवस्थेची माहिती आधीपासून होती, पण या प्रेझेंटेशनमध्ये जे अनुभवाधारित वास्तव आहे तितक्या पातळीवर माहिती त्यांना नव्हती, असंही त्यांनी सांगून टाकलं. मग म्हणाले की, मी भारतात अमेरिकी शिष्टमंडळातला सहभागी म्हणून आलो होतो, तेव्हा गांधी स्मृतिस्थळाला भेट दिली होती.

आता ‘दलितांचा भारत’ पाहा, असं निमंत्रण मी त्यांना दिलं. ते जरासे थबकले आणि मग म्हणतात, ‘हो, हो, आवडेल की’.. त्यांनी त्यांच्या यंत्रणेतल्या प्रमुखांचं लक्ष वेधण्यासाठी हात हलवला आणि ‘नोंद करा याची.. पाठपुरावा करण्यासाठी’ अशी सूचना दिली. आफ्रिकन-अमेरिकन आणि दलित यांच्यातली ऐक्यभावना हा या चर्चेतला महत्त्वाचा विषय होता. दलित आणि आफ्रिकन-अमेरिकन विद्यार्थ्यांना एकमेकांच्या देशांत जाऊन अभ्यास करता यावा, यासाठी आणखी शिष्यवृत्त्या किंवा आदानप्रदान उपक्रम असं काही करता येईल का, असा विषय मी काढला. यावर त्यांनी होकार देऊन, तयारी दाखवली. आम्ही बोलत होतो, काही वेळा स्पष्ट शब्द न वापरताही एकमेकांचं एकमेकांना समजत होतं. या सर्व संभाषणाच्या नोट्स काढण्याचं काम लुइस यांच्या यंत्रणेतली माणसं मन लावून, क्षणही न दवडता करत होती. भारतभेटीसाठी अमेरिकी काँग्रेसच्या परराष्ट्रविषयक समितीला विनंती करू, असं त्यांनी या माणसांना सांगितलं आणि यावर काही तारखाबिरखा ठरल्या तर तुला नक्की सांगतो, तोवर तू संपर्कात राहाच, ब्रेन्डा आहेच, असं मला म्हणाले.

त्यानंतर सुमारे वर्षभरानं, १ एप्रिल २०१९ रोजी वॉशिंग्टन डी.सी.मधल्या ‘अमेरिकन युनिव्हर्सिटी’त होणाऱ्या एका कॉन्फरन्समध्ये माझं बीजभाषण (कीनोट अ‍ॅड्रेस) होणार होतं, त्या प्रवासाची आखणी करतानाच मी जॉन लुइस यांना भेटण्याची वेळ ठरवली. इथंही ब्रेन्डानंच मदत केली. ही भेट त्यांच्या कार्यालयात होणार होती. त्यांना भेटायला माझ्याबरोबर, अमेरिकेतले ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते डॉ. लक्ष्मी बेरवा यांना घेऊन गेलो. या डॉक्टर बेरवा यांनी इंदिरा गांधी आणि मोरारजी देसाई या पंतप्रधानांच्या निषेधार्थ अमेरिकेच्या व्हाइट हाऊससमोर निदर्शनं केली होती. आता पंचाहत्तरीचे  झालेले डॉ. बेरवा, जॉन लुइस यांच्याशी प्रत्यक्ष समोरासमोर भेट होणार म्हणून अगदी आनंदात, उत्साहात होते. त्यांना हात लावून कुरवाळतो रे, असं म्हणत होते. प्रत्यक्षात या दोघांच्या गप्पा काही वेळ झाल्या आणि मग माझ्याकडे वळले.  दलित आणि आफ्रिकन-अमेरिकन यांच्याविषयीच्या आधीच्या संभाषणाचं सूत्र पुढे सुरू राहिलं. आधी जे ठरवलं होतं त्याचा पाठपुरावा पुढे गेला पाहिजे, असं ब्रेन्डाला त्यांनी सांगितलं.

त्यांच्याकडून निघाल्यावर मीही ब्रेन्डाकडे चौकशी केली. काहीएक प्राथमिक आखणी केली आहे, पण ती आता काँग्रेसच्या प्रोसिजर्स कमिटीपुढे आहे, असं ब्रेन्डा म्हणाली.  जॉन लुइस यांना भेटणं हाच काँग्रेसभेटीचा मुख्य हेतू असला तरी ही इमारत बघायची होतीच. मार्गदर्शकासोबत आम्ही निघालो. आजवरच्या राष्ट्राध्यक्षांची तैलचित्रं पाहिली, या इमारतीत ओबामांच्या कारकीर्दीमध्ये रोझा पार्क्‍स (वर्णभेदाच्या विरोधातल्या पहिल्या अमेरिकी सत्याग्रही) यांचंही चित्र लावण्यात आलंय. उंच घुमटाचं छत असलेल्या काँग्रेसच्या दालनाची भव्यता  पाहात असताना सध्याच्या सर्वात तरुण (२८व्या वर्षी काँग्रेसवूमन झालेल्या) न्यू यॉर्कच्या लोकप्रतिनिधी अलेक्झांड्रिया ओकासिओ-कोर्टेझ दिसल्या..  हातातल्या फायली सांभाळत, एका सभागृहातून  दुसरीकडे चाललेल्या.

काही महिन्यांपूर्वीच (डिसेंबर २०१९) बातमी समजली की, ‘गांधी लीगसी बिल ’ हे विधेयक लुइस यांच्या कार्यालयातून काँग्रेसपुढे मांडलं गेलंय. अभ्यासू संशोधक वृत्ती व सामायिक मूल्यं यांच्या वाढीसाठी विद्यार्थी आदानप्रदानाचा हा प्रस्ताव आहे, डॉ. किंग आणि गांधी यांचा उल्लेख त्यात आहे. हे वाचून मला आमचे संभाषण स्पष्ट आठवले. अमेरिकेत शिकण्यासाठी भारतीयांना शिष्यवृत्त्या आणि आदानप्रदान कार्यक्रम आजही आहेतच, पण त्यातून दलित विद्यार्थी फारच कमी प्रमाणात येतात, असं मी म्हणालो होतो. त्यावर, दलित प्रवर्गाचा उल्लेख करूनच नवा उपक्रम प्रस्तावित करायला हवा, असं त्यांनी सांगितल्याचंही आठवतंय.

जिवंतपणी जणू दंतकथा ठरलेल्या अशा उत्तुंग माणसाशी चर्चा करण्याची  आणि क्षणभर का होईना त्यांच्या खांद्याला खांदा भिडवून, त्यांच्या ऊर्जेचा स्पर्श होण्याची संधी मिळाल्यावर, इतिहासाचा झंझावात उरात भरून घेतल्यासारखं वाटतं. हा इतिहास आहे काळे आणि गोरे यांना निरनिराळंच ठेवणारा १९६०च्या आधीचा काळ ते २०१८ सालातला सगळे सांस्कृतिक रंग असलेला काळ, यांच्या दरम्यानचा. तो इतिहास घडवण्यासाठी तरुणपणीच नेतृत्व देणारे जॉन लुइस, वयानं ज्येष्ठ झाल्यावरही काळाशी सुसंगत राहणारे. एकाच पिढीला एवढे बदल पाहण्याची संधी फार कमी मिळत असेल, जेवढी जॉन लुइसना मिळाली. त्यांच्या देशाचे रंग, देशाचा मूड आणि देशाचा स्वभावच बदलताना त्यांनी पाहिलाय. इतक्या वर्षांनंतरचा, इतिहासातला पहिला ‘ब्लॅक’ अमेरिकी अध्यक्ष त्यांनी पाहिलाय. आणि या सगळ्या काळातल्या चांगल्यावाईटकुरूप सगळ्या गोष्टी त्यांनी अनुभवल्यात.

जॉन लुइस हे दलितांच्या संघर्षांचे सहप्रवासी होते. अमेरिकन काँग्रेसमध्ये दलितांच्या प्रश्नाची दखल घेतली जावी आणि चर्चा व्हावी, यासाठी प्रयत्न करणारे होते. दलित-‘ब्लॅक’ ऐक्यभावनेच्या हाकेला त्यांनी चटकन दिलेला सकारात्मक प्रतिसाद, भारतात येण्याची दाखवलेली तयारी हे सगळंच, दलितांविषयी आफ्रिकन-अमेरिकनांना असलेला जिव्हाळा व्यक्त करणारं होतं. दलित विश्वाचा एक प्रतिनिधी म्हणून, वाढत्या दलित-‘ब्लॅक’ ऐक्याच्या इतिहासात मीही काही थोडी भर घालू शकलो, हे यापुढेही जॉन लुइस यांची आठवण आल्यावर लक्षात येईल.

(लेखक हार्वर्ड विद्यापीठात संशोधक असून वंचित घटकांच्या समकालीन आंतरराष्ट्रीय चळवळींशी भारतातल्या दलित चळवळीचा सांधा जुळावा यासाठी प्रयत्नशील आहेत.)

suraj.yengde@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 3:00 am

Web Title: john lewis memorial indian student article on john lewis zws 70
Next Stories
1 हाताची घडी नि तोंडावर बोट..
2 ९५ टक्के शेतकऱ्यांचे करायचे काय?
3 अशा औदार्यावर अंकुश असावा!
Just Now!
X