मेहता यांनी ‘द संडे ऑब्झव्र्हर’, ‘द इंडिपेंडंट’ व ‘द पायोनियर’ (दिल्ली आवृत्ती) व ‘द इंडियन पोस्ट’ ही वर्तमानपत्रे सुरू केली होती. त्यांनी मीनाकुमारी व संजय गांधी यांची जीवनचरित्रे लिहिली होती. त्यांनी ‘लखनौ बॉय अ मेमॉयर’ हे आत्मचरित्रही लिहिले होते. त्यांच्या लेखांचा संग्रह ‘मि. एडिटर, हाऊ क्लोज आर यू टू द पीएम’ या नावाने प्रसिद्ध झाला आहे. मेहता हे वयाच्या तिसऱ्या वर्षी फाळणीनंतर कुटुंबाबरोबर भारतात आले व लखनौ येथे स्थायिक झाले. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण तेथेच झाले. बीएला तिसऱ्या वर्गात उत्तीर्ण होऊन त्यांनी घर सोडले व नोक ऱ्या बघायला सुरुवात केली. निव्वळ पुरुषांच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘डेबोनेर’ मासिकात त्यांना १९७४ मध्ये नोकरी मिळाली. नंतर ते दिल्लीत आले. तेथे त्यांनी ‘द पायोनियर’ची दिल्ली आवृत्ती सुरू केली. त्यांचा विवाह पत्रकार सुमिता पॉल यांच्याशी झाला होता; त्या ‘पायोनियर’ व ‘द संडे टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये काम करीत होत्या. त्यांना मुले नव्हती.
त्यांनी ‘लखनौ बॉय’ या पुस्तकात मात्र जुन्या प्रकरणातून एक मुलगी झाल्याचे म्हटले होते; त्यात पुढे असेही म्हटले होते की, आपल्या पत्नीशिवाय कुणालाही ते माहीत नव्हते, पण आता या पुस्तकातून आपण ते जाहीर करीत आहोत. आपल्या पत्नीनेच या लेखनाला उत्तेजन दिले, असे ते सांगत असत. १९७४ मध्ये जाहिरात व्यवसायातून मेहता पत्रकारितेत आले होते. ‘डेबोनेर’ या पुरुषांसाठीच्या नियतकालिकाचे ते पहिले संपादक होते. ‘द संडे ऑब्झव्र्हर’ हे पहिले साप्ताहिक वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. त्यांनी १९९० पासून द पायोनियरचे संपादकपद सांभाळले. आऊटलुकमध्ये त्यांनी १७ वर्षे काम केले. ते ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’चे अध्यक्षही होते. काही काळ त्यांनी बीबीसी रेडिओच्या चॅनेल ४ वर सादरकर्ते म्हणून काम केले. ‘लेटर फ्रॉम इंडिया’ हा कार्यक्रम ते करीत असत. क्रिकेटचे त्यांना भारी वेड होते व आउटलुकच्या शेवटच्या पानावर ते गॉसिपवर आधारित स्तंभलेखन करीत असत. पत्रकारितेतील लेखन जडजंबाळ न करता ते सोपे करण्याचा त्यांचा कटाक्ष होता.