‘‘त्याला अशा पद्धतीने खेचत नेणे योग्य नव्हते. मी ७४ आणि तो ४७ वर्षांचा आहे. पण, मी त्याच्यापेक्षा चांगला दिसतो. त्याला असे पाहणे अतिशय धक्कादायक आहे’’, जॉन शिप्टन हताशपणे माध्यमांशी बोलत होते. अमेरिकेसह अनेक देशांची गुपिते फोडणारा सायबरयोद्धा ज्युलियन असांजचे ते वडील. परदेशात अटकेत असलेला आपला मुलगा मायदेशी परतावा, अशी कोणत्याही पित्याप्रमाणे त्यांचीही इच्छा. तशी मागणीही त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याकडे केली. मात्र, अद्याप तरी त्यांनी तसे आश्वासन दिले नाही. कारण असांजचे काय होणार, हे कोणालाही छातीठोकपणे सांगता येणे अवघड बनले आहे.

गेल्या आठवडय़ात इक्वेडोरच्या ब्रिटनमधील दूतावासातून असांजला अटक करण्यात आल्यानंतर या साऱ्या घडामोडींचे माध्यमांनी वेगवेगळे अन्वयार्थ लावले आहेत. इक्वेडोरने आपल्या लंडनमधील दूतावासात असांजला सात वर्षे आश्रय दिला. मग, आता आश्रय संपुष्टात आणण्यामागे नेमके काय कारण असेल, असा प्रश्न कोणालाही पडणे स्वाभाविकच. ‘व्हाय डीड इक्वेडोर गिव्ह अप असांज आफ्टर सेव्हन इयर्स’ या शीर्षकाच्या लेखात ‘सीएनएन’ने काही उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात निवासाच्या नियमभंगाबरोबरच अनेक कारणांचा उल्लेख आहे. ‘कॅटलान स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देऊन असांजने इक्वेडोरचा रोष ओढवून घेतला होता. स्पेनसह इतर देशांसोबतचे संबंध बिघडतील, असे वर्तन न करण्याची ताकीद इक्वेडोरने दिली होती. त्यातच २५ मार्च रोजी ‘विकिलीक्स’ने इक्वेडोरचे अध्यक्ष लेनिन मोरेने यांच्याविरोधातील भ्रष्टाचार प्रकरणाबाबत ट्वीट केले. दूतावासात इक्वेडोरकडून असांजवर हेरगिरी करण्यात येत असल्याचा दावा ‘विकिलीक्स’ने केला आणि हे संबंध विकोपाला गेले’, असे या लेखात म्हटले आहे.

माध्यम स्वातंत्र्याचा नायक म्हणून ज्युलियन असांजचे जगभर समर्थक आहेत. मात्र, असांज हा माध्यम स्वातंत्र्याचा नायक नाही, असे मत ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मधील एका लेखात नोंदवण्यात आले आहे. ‘न्यू यॉर्क टाइम्स’मधील लेखात मात्र वेगळा सूर लावण्यात आला आहे. ‘असांज हा पारंपरिक दृष्टिकोनातून पत्रकार नाही. मात्र, जनहितासाठी गुप्त माहिती फोडण्याचे ‘न्यू यॉर्क टाइम्स’सारखी वृत्तपत्रे करत असलेले काम आणि ‘विकिलीक्स’चे काम यांना कायदेशीरदृष्टय़ा वेगळी मोजपट्टी लावणे कठीण आहे’, याकडे हा लेख लक्ष वेधतो.

दुसरीकडे काही अमेरिकी माध्यमे असांजला रशियाशी जोडू पाहतात. असांजसोबत जे व्हायला हवे होते तेच झाले, असे ‘द अटलांटिक’च्या संकेतस्थळावरील एका लेखात म्हटले आहे. ‘असांजचे रशियाच्या हॅकरशी आणि तेथील गुप्तचर संस्थेशी संबंध आहेत. असांजला इक्वेडोरच्या दूतावासातून बाहेर काढून रशियात आश्रय देण्याचा कट रचण्यात येत होता’, असा दावाही या लेखात करण्यात आला आहे. असांजच्या अटकेची चित्रफीत रशियाशी संबंधित वृत्तसंस्थेलाच कशी मिळाली, असा सवालही केला जाऊ लागला आहे.

असांजला अमेरिकेकडे प्रत्यार्पण करण्याच्या खटल्याला सामोरे जावे लागणार आहे. मात्र, ही प्रक्रिया मोठी आणि किचकट आहे, असे ‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या एका लेखात म्हटले आहे. ‘इराक आणि अफगाणिस्तानातील अत्याचाराचे पुरावे उघड करणाऱ्या असांजचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण ब्रिटन सरकारने रोखले पाहिजे’, या ब्रिटनच्या मजूर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांच्या ट्वीटचा दाखला देत या लेखात प्रत्यार्पणातील अडथळे दाखवण्यात आले आहेत. हा खटला लढण्यासाठी असांजने ब्रिटनसह अमेरिकेतील नावाजलेल्या वकिलांचे एक पथक नेमले असून, त्यासाठी कोटय़वधी पौंड खर्च करण्यात येणार असल्याचे वृत्त ब्रिटनच्या ‘डेली मेल’ने दिले आहे. असांजविरोधातील प्रत्यार्पणाचा खटला किमान दोन वर्षे चालेल, असा अंदाज वर्तवत ‘सिडनी मॉर्निग हेराल्ड’ने ‘व्हॉट हॅपन्स नेक्स्ट’ या शीर्षकाखाली या प्रकरणाचा सविस्तर घटनाक्रम दिला आहे.

असांजने स्वीडनमध्ये दोन तरुणींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मात्र, राजकीय खेळात महिलांच्या हक्कांना नेहमीच दुय्यम स्थान मिळते, असे निरीक्षण ‘द गार्डियन’च्या एका लेखात नोंदवण्यात आले आहे. ‘असांजचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन देताना ब्रिटनच्या काही लोकप्रतिनिधींनी स्वीडनचा उल्लेखही केला नाही. असांजला अटक करण्याच्या कारवाईआधी स्वीडनला माहितीही देण्यात आलेली नाही, याकडे हा लेख लक्ष वेधतो.

संकलन : सुनील कांबळी