गेल्या रविवारची सकाळ ही नेहमीसारखी प्रसन्न नव्हती. साडेदहाच्या सुमारास एक फोन आला, ‘इंग्लिश बातम्यांत कुणा कलबुर्गी नावाच्या कन्नड लेखकाची गोळी घालून हत्या झाल्याचं सांगताहेत. धारवाडमध्ये..’ दाभोलकर-पानसरेंच्या हत्येची तीव्रपणे आठवण करून देणारा हा प्रकार होता. फरक करायचाच झाला तर, दाभोलकर-पानसरे सामाजिक कार्यकर्ते होते आणि कलबुर्गी हे संशोधक-अभ्यासक होते! आणि साम्य असं की, संशोधनातून सामोरं येणारं सत्य कुठलाही मुलाहिजा न ठेवता स्पष्टपणे मांडण्याचं धैर्य! त्यांच्या नावावर शंभरावर संशोधन-संपादन केलेले ग्रंथ आहेत. कर्नाटकातील राज्योत्सव पुरस्कार, पंप पुरस्कार, नाडोज पुरस्कार यांसारखे मानाचे सगळे पुरस्कार त्यांच्या नावावर होते. त्यांच्या ‘मार्ग ४’ या संशोधन निबंधाच्या संग्रहाला साहित्य अकादमीनंही सन्मानित केलं होतं.
कन्नड भाषेला वाहिलेल्या ‘हम्पी विद्यापीठा’चे कुलगुरू म्हणून निवृत्त झाल्यानंतर, या शतकाच्या सुरुवातीच्या एक-दोन वर्षांत कलबुर्गी त्यांच्या मुलाकडे, विजयकडे पुण्यात राहायला आले होते. आमचे एक ज्येष्ठ स्नेही कै. प्रा. श्री.रं. भिडे यांचे हे विजापूरमधले विद्यार्थी. भिडेंनी आमची त्यांच्याशी ओळख करून दिली. पहिल्याच भेटीत कलबुर्गीनी भिडेंविषयी सांगितलं, ‘‘सरांकडून मी शिस्त शिकलो. ही शिस्त मला माझ्या जीवनात उपयोगाला आली; त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे माझ्या संशोधनात उपयोगाला आली!’’
हम्पी येथे कुलगुरू म्हणून काम करताना त्यांनी कन्नड भाषेला संपन्न करणारे शेकडो ग्रंथ प्रकाशित होतील असं पाहिलं होतं. अमेरिकन संशोधक डॉ. डी.एन. लॉरेन्जन यांचा ‘कापालिकास अ‍ॅन्ड काळामुखास : टू लॉस्ट शैवाईट सेक्ट्स’ हा संशोधनपर ग्रंथ त्यांना कन्नडमध्ये अनुवादित करून हवा होता, कारण अनेक कन्नड संशोधकांची ती तातडीची गरज होती. अनेक अनुवादकांनी हार मानल्यावर त्यांनी ही जबाबदारी माझे पती विरुपाक्षांवर टाकली. सुमारे दोन र्वष हे तो अनुवाद करत होते. अनुवाद करताना येणाऱ्या सगळय़ा अडचणींच्या वेळी कलबुर्गी यांनी मदत केली आणि अखेर त्यांनीच जबाबदारीनं हा अनुवाद प्रकाशित व्हायची काळजीही घेतली. अजूनही कर्नाटकातील संशोधक भेटले की, या अनुवादाचा त्यांना किती उपयोग होतो ते मनापासून सांगतात. कलबुर्गीनी त्यांची गरज मुळापासून समजून घेतली होती.
कलबुर्गींनी कन्नड शिलालेख, जुनी हस्तलिखितं आणि जुनं काव्य यांच्या परिष्करण-संपादन-प्रकाशनाचं काम फार मोठय़ा प्रमाणात केलं आहे. सुमारे १०० एवढी त्यांची अशा प्रकारची विद्वत्तापूर्ण ग्रंथसंपदा आहे. त्यापैकी ४१ जुन्या ग्रंथांची परिष्करणं आहेत. मराठीत त्यापैकी ‘खरं-खरं संग्या-बाळ्या’ हे कलबुर्गीनी संपादित केलेलं नाटक अनुवाद स्वरूपात उपलब्ध आहे. हे १९व्या शतकात कुणा पत्तार मास्तरांनी रचलेलं नाटक. लिखित स्वरूपात नसल्यामुळे आपल्याकडच्या तमाशांप्रमाणे याचे फक्त खेळ व्हायचे. हळूहळू त्याचं स्वरूप अश्लील म्हणावं इतकं बदलत गेलं. त्याचं एक परिष्करण डॉ. चंद्रशेखर कम्बारांनीही आधुनिक नाटकाच्या रूपात सादर केलं. तरीही ‘खरं-खरं संग्या-बाळ्या’ कसं असावं यावर भरपूर परिश्रम घेऊन कलबुर्गीनी हे नाटक प्रकाशित केलं.
संशोधनात अपरिमित कष्ट घ्यायची त्यांची तयारी असे. गरज पडली तेव्हा त्यासाठी ते केम्ब्रिजलाही भेट देऊन यायचे. कलबुर्गी यांनी संशोधनाची विद्या केवळ स्वत:पुरती मर्यादित ठेवली नाही. त्यांचा फार मोठा विद्यार्थी-परिवार आजही या काहीशा मागं पडलेल्या क्षेत्रात कार्यरत आहे. कर्नाटकाच्या सर्व भागांत ते विद्यार्थी पसरले आहेत. हुबळी येथील डॉ. हनुमाक्षी गोगी या त्यांच्या विद्यार्थिनी. त्यांच्याशी त्याच वेळी झालेला एक संवाद मला आजही लक्षात आहे. एकदा गप्पा मारताना ते म्हणाले, ‘‘मला एका विषयाचं कुतूहल आहे. अजूनही मला याचं उत्तर मिळालेलं नाही.’’
आम्हाला काहीच समजलं नाही. ते पुढं म्हणाले, ‘‘जेव्हा शिकार करणं हा माणसाचा प्रमुख व्यवसाय होता, तेव्हा माणसानं आपला देव मल्हार बनवला. कुत्रा आणि घोडा हे त्याचे आवडते प्राणी आहेत, जे त्याला शिकारीसाठी उपयुक्त होते. तो जेव्हा शेती करू लागला तेव्हा त्यानं शंकराला आपला देव बनवला. नंदी हे त्याचं आवडतं वाहन झालं. बैल हा त्याला शेतीसाठी उपयुक्त प्राणी होता. जेव्हा माणूस समूह करून जगू लागला, तेव्हा समूह-प्रमुख आला, त्यातूनच राजा आला. तेव्हा माणसानं विष्णू हा देव निर्माण केला. या विष्णूचा सगळा थाट राजेशाही आहे. राजाला राजवाडा असतो म्हणून या विष्णूलाही देवळाच्या रूपानं मोठा महाल, त्याला द्वारपाल वगैरे थाट सुरू झाला. आता माणूस एकीकडे लोकशाहीच्या मार्गानं पुढं चाललाय आणि दुसरीकडे विज्ञानाच्या मार्गानं! आजचा समाज आपला देव यापैकी कशातून निर्माण करून घेणार आहे, हा निरीक्षणाचा आणि अभ्यासाचा विषय आहे! ते मला अजूनही समजलेलं नाही!’’
म्हणजे संशोधन करताना सर्वसामान्य माणसाच्या देवाच्या गरजेचं पुरेपूर भान असलेला हा संशोधक होता! ही चर्चा झाल्यापासून कॉम्प्युटरला गणपती मानून त्याच्यासमोरच्या ‘माऊस’चं अस्तित्व मानण्याच्या बातम्या ऐकून मीही फारशी खदखदून हसेनाशी झाले होते! कारण खरोखरच यानंतरचा देव कसा निर्माण झाला आहे हा मलाही उत्सुकतेचा विषय वाटू लागला! अलीकडे विजापूर येथे आदिलशाहीच्या संदर्भात झालेलं त्यांचं काम अभूतपूर्व म्हणावं लागेल. तिथल्या संशोधनात मिळालेल्या पर्शियन आणि उर्दू कागदपत्रांचा जाणकारांकडून कन्नड अनुवाद करवून घेऊन त्यांनी त्यावरील संशोधनावर आधारित ‘आदिलशाही’ हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. तसंच गेल्या काही वर्षांत त्यांनी कर्नल मॅकॅन्झे यांच्या लेखनातील स्थानिक इतिहासाच्या संबंधातील संदर्भ घेऊन ‘कन्नड कैफियत’ नावाचाही एक ग्रंथ तयार केला.
ते स्वत: वीरशैव असले आणि त्याविषयीच्या अनेक ऐतिहासिक गोष्टींवर उजेड पाडला असला तरी त्यांनी अनेक वेळा वीरशैव धर्मातील काही नकारात्मक गोष्टीही न डगमगता स्पष्टपणे मांडल्या आहेत. त्यामुळे तिथेही त्यांची काही विधाने वादग्रस्त ठरत. संशोधनात आढळणारं कुठलंही सत्य स्पष्टपणे मांडण्याइतका निडरपणा त्यांच्याकडे होता. त्यामुळे त्यांच्या एखाद्या विधानामुळे त्यांच्या घरावर दगड पडणे, धमकीचे फोन येणे या गोष्टी नेहमीच घडत. संशोधनाविषयीचं त्यांचं भान अगदी यथोचित होतं. ते म्हणत, ‘‘कुठलंही संशोधन हा स्वल्पविराम असतो; पूर्णविराम नसतो!..’’
नवं सत्य सामोरं आलं की, संशोधनाच्या क्षेत्रात नवी-नवी विधानं केली जातात. संशोधन क्षेत्र प्रवाही असल्यामुळे हे घडत असतं. जुनं खोडून नवं मांडणं, नवे शोध लागले की, तेही खोडून पुन्हा नव्यानं दिसलेलं सत्य मांडणं हेच या क्षेत्राचं बलस्थान आहे. या क्षेत्रात केलेल्या विधानाकडे समग्रपणे बघणं आवश्यक असतं. पूर्वीच्या काळीही विद्वान लेखातून आणि ग्रंथांतून आपलं संशोधन मांडायचे. त्याला विरोध करणारेही संपूर्ण ग्रंथ वाचून त्यातील एकेका मुद्दय़ाचा परामर्श घ्यायचे. आताच्या वेगवान जगात असं घडत नाही. काही राजकारणी मंडळी संपूर्ण संशोधनातील आपल्याला सोयीच्या काही ओळी किंवा शब्द उचलून धरतात. प्रसारमाध्यमे त्याच रेवडय़ा उडवत राहतात आणि याचाच परिणाम काही उष्ण रक्ताच्या मंडळींवर होऊन अशा घटना घडत असाव्यात. मग उडणाऱ्या गदारोळात कलबुर्गीसारख्यांचं ‘‘कुठलंही संशोधन हा स्वल्पविराम असतो, पूर्णविराम नाही..’’ यासारखं वाक्य कस्पटासारखं उडून जातं आणि कलबुर्गीची हत्या घडते..