26 October 2020

News Flash

लढा आदिवासी स्त्रीच्या आत्मसन्मानाचा!

छत्तीसगडमधील राजनादगाव जिल्ह्य़ातील जंतर गावातला कुमारीबाईंचा जन्म.

 कुमारीबाई जमकातन.

डोईवरचा पदर थेट हनुवटीपर्यंत असण्याची सवय असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्य़ातील क वर आदिवासी समाजात कुमारीबाई जमकातन यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आणि लढाई सुरू केली ती अन्याय्य प्रथांविरोधात. ग्रामसभेत स्त्रियांचा सहभाग असावा, जातपंचायतीत स्त्रीचे म्हणणे ऐकून घेतले जावे यासाठी त्यांना ठामपणे भूमिका घ्यावी लागली. २००५ला कोरची ग्रामपंचायतीतील कागदपत्रात घरमालक म्हणून पत्नीचेही नाव पतीबरोबर नोंदवण्यात आले, ही त्यांची महत्त्वाची कामगिरी. गेली १९ वर्षे येथील आदिवासी स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी लढणाऱ्या आमच्या दुर्गा आहेत कुमारीबाई जमकातन.

राखी चव्हाण

‘ती’ कँवर आदिवासी समाजातील एक स्त्री! जिथे स्त्रियांच्या चेहऱ्यावर हनुवटीपर्यंत कायम पदर आणि घरातील पुरुषांच्या परवानगीशिवाय दाराबाहेर पाऊल टाकण्याचीसुद्धा परवानगी नाही अशा समाजातील ही स्त्री पुरुषप्रधान संस्कृतीविरुद्ध बंड करून उठते. त्यासाठी पदवीधर होते आणि समाजातील इतर स्त्रियांना न्याय हक्क मिळवून देते, ती गडचिरोली जिल्ह्य़ातील कोरची गावची कुमारीबाई जमकातन, स्त्री सक्षमीकरणासाठी आज भारतभर फिरून व्यासपीठ गाजवत आहे.

छत्तीसगडमधील राजनादगाव जिल्ह्य़ातील जंतर गावातला कुमारीबाईंचा जन्म. आईचा लवकर मृत्यू झाला. वडिलांनी दुसरे लग्न केल्यामुळे यांची वाताहतच झाली. कधी आत्याकडे तर कधी दुसऱ्या नातेवाईकांकडे असे करत आठवीपर्यंत शिकल्या आणि मग समाजातील प्रथेप्रमाणे वयाच्या पंधराव्या वर्षी लग्नाच्या बंधनात अडकल्या. लग्न करून त्या गडचिरोली जिल्ह्य़ातील कोरची गावात आल्या. नवरा चौथी शिकलेला आणि मजुरी करून घर चालवणारा. आधीच समाज मागासलेला आणि त्यातही पुरुषप्रधान संस्कृती, गावातील स्त्रियांची होत असलेली कुचंबणा, त्यांच्यावर सतत होणारा अन्याय यावर काय करता येईल हा विचार चालू असतानाच ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांना काम करण्याची संधी मिळाली.

स्त्रियांच्या बचत गटांपासून महिला सक्षमीकरणाच्या कामाची सुरुवात झाली. दिवसभर मजुरी करायला जावं लागत असल्याने बचत गटाच्या बैठका रात्रीच होतात. जिथे दिवसाच घराबाहेर पडताना परवानगी मिळताना मारामार तिथे रात्री बैठकांसाठी जाणे म्हणजे अशक्य कोटीतली गोष्ट. मात्र कुमारीबाईंनी घरचा विरोध पत्करून ते धाडस केले आणि इतरांना करायला लावलं. पण त्याचमुळे आज अनेक जणी स्वत:च्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत. मात्र हे काम करत असताना शिक्षणाशिवाय पर्याय नाही हेही त्यांना तीव्रतेने जाणवले. त्यासाठी आधी बारावी, नंतर मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, स्त्रियांसाठी असणाऱ्या कायद्याचा अभ्यास सुरू केला आणि मग गावातील स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कायदेशीर बिगूल फुंकले.

त्यांचा पहिला लढा होता तो प्रत्येक संपत्तीवर स्त्रियांचं नाव असण्यासंदर्भातला. ग्रामसभेत जेव्हा अशा काही मुद्दय़ांवरून निर्णय व्हायचे तेव्हा स्त्रियांना त्यात प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे जे काही निर्णय लागायचे ते पुरुषांच्या बाजूनेच असायचे. कुमारीबाईंनी मग स्त्रियांना प्रवेश नसलेल्या ग्रामसभेत काही स्त्रियांना सोबत घेऊन पाऊल ठेवले तेव्हा ग्रामसेवकांनी त्यांना त्यांच्या कृतीचा जाब विचारला. येथे फक्त पुरुषच येऊ शकतात, स्त्रिया नाही, असे त्या ग्रामसेवकाने ठणकावून सांगितले. तेव्हा कायद्याचा अभ्यास करणाऱ्या कुमारीबाईंनी स्त्रियांना मतदानाचा हक्क आहे तर ग्रामसभेत येण्याचासुद्धा, असे म्हणून ग्रामसभेत जबरदस्तीने पाऊल ठेवण्यास सुरुवात केली. हाच प्रश्न जातपंचायतीच्या वेळी देखील उभा राहिला. आदिवासी कंवर जातपंचायत व्यवस्थेत सर्व प्रकारच्या घटनांना सोबत घेऊन पंचायत बोलावली जाते. त्यात दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून निकाल दिला जातो, पण हे फक्त म्हणण्यापुरतेच असते. कारण स्त्रियांना वेगळे बसवून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाते आणि निकाल मात्र पुरुषांच्या बाजूनेच दिले जातात. त्यामुळे आदिवासी स्वशासन कायद्यांतर्गत कुमारीबाईंनी स्त्रियांचा जातपंचायतीतील सहभाग वाढवण्यासाठी कार्यनियोजन तयार केले. आणि अखेर कोरची गावातील घराच्या पावतीवर पती-पत्नीचे नाव घालण्यास तसेच मुलाच्या नावामागे आईचे नाव हवे, असा विषय त्यांनी ग्रामसभेत मांडला. मात्र ग्रामसेवकांनी त्याला विरोध केला. त्यावर कुमारीबाईंसोबतच्या स्त्रियांनी ठामपणे सांगितले, ‘‘आम्ही घराकरिता कष्ट करतो, मग संपत्तीतला वाटा नावावर का नको? मागणी मान्य झाली नाही तर जिल्हा पातळीवर तक्रार करू,’’ त्यांनी थेट धमकीच त्या ग्रामसेवकाला दिली आणि त्याचा योग्य तो परिणाम झालाच. ८ डिसेंबर २००५ला कोरची ग्रामपंचायतीतील कागदपत्रात घरमालक म्हणून पत्नीचेही नाव पतीबरोबर नोंदवण्यात आले. कुमारीबाई जमकातन या यादीतील पहिल्या स्त्री होत्या. त्यानंतर हे काम पूर्ण व्हावे म्हणून ग्रामसेवकाला पूर्ण स्त्रियांची यादी त्यांनी तयार करून दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या दहा टक्के निधी महिला व बालकल्याणासाठी मिळवला. हा लढा कुमारीबाईंसाठी सोपा नव्हता, पण आज ग्रामपंचायतीत स्त्रियांना आवर्जून बोलावले जाते, हे मिळालेले यश मोलाचे आहे.

‘स्त्रियांचे संघटन मजबूत झाले की प्रश्नही आपल्यासमोर गुडघे टेकतात म्हणून संघटन मजबूत करा,’ असा सल्ला त्या नेहमी देत असतात. कामाची सुरुवात करताना गावातील स्त्रियांच्या काय समस्या आहेत, स्त्रियांना कोणत्या ठिकाणी कमी दर्जा दिला जातो, कोणत्या ठिकाणी अन्याय- अत्याचार होतो, या सर्वाचा अभ्यास करून  काम सुरू केले. ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेसोबत बचतगटाच्या कामापासून सुरुवात करणाऱ्या कुमारीबाई महिला सक्षमीकरणाचे काम आज समर्थपणे करत आहेत. त्यांचे ‘सामूहिक महिला बचत गट परिसर संघ कोरची,’ फेडरेशन आहे.  वयाच्या १८व्या वर्षांच्या आधी मुलींचे लग्न करायचे नाही, ही गोष्ट त्यांनी समाजात ठसवली. त्याची फळे समाजात दिसू लागली आहेत. तसेच समाजातल्या मुली आज शिक्षण घेताना दिसू लागल्या आहेत.

आत्तापर्यंत फेडरेशनच्या माध्यमातून हिमाचलप्रदेश, कोलकाता, दिल्ली, हैदराबाद, मुंबई, पुणे येथे स्त्री सक्षमीकरणासंदर्भात प्रशिक्षण द्यायला तसेच माहिती द्यायलाही त्या जात असतात.

कंवर समाजात आज त्यांना चांगला मान दिला जातो. कुमारीबाईंचा सर्व विषयांचा, कायद्यांचा चांगला अभ्यास आहे. समाजातील प्रथा, परंपरांशी लढा देत पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा दूर सारून स्त्रियांना सक्षम करणाऱ्या कुमारीबाई जमकातन आदिवासी समाजातच नव्हे तर इतरांसाठीही आदर्श ठरत आहेत.

संपर्कासाठी पत्ता –

कुमारीबाई जमकातन

०९४२१७३४०५७ 

मु. पो.तालुका कोरची, जिल्हा गडचिरोली – ४४१२०९

kumari.arogyasathi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 2:44 am

Web Title: kumaribai jamkatan loksatta durga 2018 amhi amicha arogyasathi
Next Stories
1 आरोग्यनिधीला दिरंगाईचा रोग
2 स्त्रीभ्रूणहत्येचे वास्तव
3 सत्पात्री दानाचा आनंद
Just Now!
X