|| रसिका मुळ्ये

प्राण्यांकडे पाहण्याच्या माणसाच्या जाणिवा या कमालीच्या संकुचित आहेत. त्यामुळेच प्राण्यांचं अस्तित्व मान्य करण्याची आणि त्यांच्या बरोबरीने जगण्याची मानसिकता असल्याचे दिसत नाही. समोर प्राणी आला तर इजाच करणार आणि तो मारलाच पाहिजे अशीच सार्वत्रिक धारणा दिसून येते.

why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

सर्वेपी सुखीन: सन्तु म्हणताना प्रत्यक्षात फक्त स्वत:च्याच विकासाचा अट्टहास बाळगण्याची दांभिक मानसिकता अनेक वन्यजीवांच्या मुळावर उठली आहे. या दांभिकपणाचा लवलेशही नसलेले जीव माणसाच्या हौशीचे बळी ठरले आहेत. गेल्या काही वर्षांत ४० टक्के वन्यजीवांचे अस्तित्व पूर्णपणे नष्ट झाले आहे. तरीही वन्यजीव – मानव ‘संघर्ष’ हा माणसाला इजा झाली तरच मानला जातो. त्यामुळेच वाघ, बिबटय़ाचे हल्ले, कधीकधी दिसणाऱ्या मगरी, साप, दक्षिण कोकणात हत्तींशी होणारी भेट ही संघर्षांचे रूप घेऊन समोर येते. क्वचित प्रसंगी माणसाला इजा करू शकणाऱ्या, माणसाला घाबरवू शकणाऱ्या ठरावीक प्रजातींपलीकडे अनेक प्रजातींचा माणसाशी संघर्ष सुरू आहे. मात्र येथे इजा होणारा घटक प्राणी असल्यामुळे त्याचा गाजावाजा होत नाही. हा विरोधाभास लक्षणीय आहे.

फुलपाखरांसारखे नाजूक जीव, अनेक पक्षी हे माणसाच्या जीवनशैलीचे बळी ठरले आहेत. साप, सरडे, पाली यांचा आणि माणसाचा संघर्ष हा ग्रामीण, शहरी अशा सर्व भागांत आहे. सांगलीमध्ये कृष्णेच्या काठावर दिसणाऱ्या मगरी या माणसाच्या भयामुळे अधूनमधून आरोपीच्या पिंजऱ्यात असतात. पश्चिम महाराष्ट्रात रानगवे शिरण्याच्या घटना, मोर, हरणे यांना विष देऊन मारणे अशा अनेक घटना राज्यभर घडत असतात. मूळ जंगलात राहणारे आणि आता अधिवासात माणसाने घुसखोरी केल्यामुळे शहरात घरांच्या खिडक्यांपर्यंत पोहोचलेली घुबडे, शहरात इमारतींवर लटकणारी मधमाशांची पोळी ही देखील या संघर्षांचीच उदाहरणे. खिडकीजवळच्या झाडांवर किंवा अलीकडे काही वेळा इमारतींच्या पाइपमध्ये असलेले घुबडाचे घर हे केवळ पिल्ले ओरडतात म्हणून काढून टाकले जाते. ग्रामीण भागांत शेतातील रसायनांच्या वापरामुळे इमारतींचा आधार घ्यावा लागलेल्या मधमाशांना भीतीपोटी मारून टाकले जाते. मेलेल्या जनावरांवर गुजराण करणारी गिधाडे ही डायक्लोफिनकच्या वापरामुळे अनेक भागातून नष्ट झाली आहेत. दुर्मीळ झालेल्या खवल्या मांजराची शिकार अजूनही थांबलेली नाही. खोकड, हरणे, साळिंदर, माऊस डिअर, घोरपड, उदमांजर यांच्या शिकारी, तस्करी सर्रास सुरू आहेत. मात्र या सगळ्याची नोंद ‘संघर्षांचे बळी’ म्हणून होत नाही किंवा या साऱ्याचा सहानुभूतीने विचारही होताना दिसत नाही. वन्यजीवांसाठी काम करणारे कार्यकर्ते अशा संघर्षांची अनेक उदाहरणे देतात.

प्राण्यांकडे पाहण्याच्या माणसाच्या जाणिवा या कमालीच्या संकुचित आहेत. त्यामुळेच प्राण्यांचं अस्तित्व मान्य करण्याची आणि त्यांच्या बरोबरीने जगण्याची मानसिकता असल्याचे दिसत नाही. समोर प्राणी आला तर इजाच करणार आणि तो मारलाच पाहिजे अशीच सार्वत्रिक धारणा दिसून येते. दुसरा भाग अज्ञानाचा. वन्यजीव समोर आल्यानंतर काय करावं याबाबतचं अज्ञान या संघर्षांसाठी कारणीभूत आहे. याचं एक उदाहरण सांगलीच्या परिसरात साधारण एक- दीड वर्षांपूर्वी घडले. गावात एक सांबर शिरले. घाबरून बसलेले हे सांबर पाहण्यासाठी शेकडो लोकांनी गर्दी केली. त्याला खडे मारणे, फोटो काढणे असे प्रकार सुरू होते. वन विभागालाही त्या सांबराला पकडता आले नाही, अखेर दमून आणि भीतीने त्याचा मृत्यू झाला. अशीच काहीशी उलट घटना याच भागात गव्याबरोबर घडली. गावात शिरलेला रानगवा पाहण्यासाठी उसळलेल्या गर्दीने गवा चिडला असता तर अपघातही होऊ  शकला असता. घरात अडकून पडलेला बिबटय़ा पाहण्यासाठी जमलेली बेशिस्त गर्दी ही समाजमाध्यमांना दिवसभर खाद्य पुरवते. साधारण दोन वर्षांपूर्वी पुण्यात एका माकडाने धुमाकूळ घातला होता. पिल्लू असताना खिडक्यांतून घरात शिरणाऱ्या माकडाला नागरिकांनी खाणे द्यायला सुरुवात केली. नंतर हळूहळू सवकलेल्या माकडाचा त्रास होऊ  लागला आणि त्याला पकडण्याची मागणी होऊ  लागली. माणसाने प्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण केल्यामुळे आता वारंवार माणूस आणि प्राणी समोरासमोर येण्याचे प्रसंग घडणे हे अपरिहार्य आहे. हे प्रसंग टाळता येण्यापेक्षाही त्याला सामोरे जाण्याची मानसिकता आणि प्रशिक्षण नागरिकांना द्यायला हवे, असे मत वन्यजीव अभ्यासक व्यक्त करतात. ‘माणसाने प्राण्याबरोबरचे सहजीवन शिकणे गरजेचे आहे. काही भागात ते सहज दिसून येते. जंगलात वर्षांनुवर्षे राहणारी माणसे आहेत. त्यांनी प्राण्यांचे अस्तित्व स्वीकारले आहे. तेथे अशा संघर्षांची वेळ कमी येते,’ असे निरीक्षण वन्यजीव अभ्यासक दीपक सावंत यांनी नोंदवले.

प्राणिप्रेमींचाही दोष

पुरेशी माहिती नसताना प्राणिप्रेमी म्हणून ओळख सांगणारे अनेक या संघर्षांत भर घालत असल्याची टिप्पणी एका तज्ज्ञांनी केली. ‘हौशी प्राणिप्रेमींवर सध्या नियंत्रणच राहिलेले नाही. त्यामुळे असंरक्षित जंगलात फिरायला जायचे. तेथून फोटो काढण्यासाठी प्राणी उचलून आणायचे आणि नंतर त्यांचा जीव जाईपर्यंत त्यांना कोंडून ठेवायचे किंवा मनुष्यवस्तीजवळ सोडून द्यायचे, असे प्रकार मोठय़ा प्रमाणावर वाढले आहेत. शक्यतो प्राण्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासातून उचलून आणू नये. अगदीच अपवादात्मक स्थितीत प्राण्याला आणावे लागले तर त्याला पुन्हा वेळेवर त्याच्या मूळ अधिवासात नेऊन सोडावे. प्राण्याला चुकीच्या ठिकाणी सोडले तर संघर्ष वाढतो. प्रत्येक भागातील नैसर्गिक साखळीवर त्याचा परिणाम होतो. काही वेळा प्राणी पुन्हा मनुष्यवस्तीकडे येतात. अनेकदा या प्राण्यांचे अपघात होतात. ही परिस्थिती टाळता येऊ  शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

व्यवस्था कमी पडते

माणूस आणि प्राण्यांचा संघर्ष टाळण्यात व्यवस्थेचा मोठा वाटा असणे आवश्यक आहे. योजनांची आखणी केली जाते, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मनुष्यबळ नाही, अशी वन विभागाची परिस्थिती आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी विभागातील कर्मचारी पुरेसे ठरत नाहीत. अनेकदा प्रजाती, तिचा अधिवास यांची माहिती कर्मचाऱ्यांना नसते, अशी टीका कार्यकर्त्यांनी केली. वन विभाग अधिक सक्षम झाल्यास संघर्ष टाळता येणे शक्य आहे, असे मत कोकणातील वन्यजीव अभ्यासक गणेश मेहेंदळे यांनी व्यक्त केले. मात्र मुळात आपल्याबरोबर प्राणीही याच भूमीवरचे रहिवासी आहेत हे माणसांनी स्वीकारणे गरजेचे आहे.

वन्यजीव- माणसाचा संघर्ष टाळण्यासाठी परदेशात अनेक मॉडेल्स उभी करण्यात आली आहेत. प्राण्यांची अचूक गणना करून प्रत्येक प्रजातीच्या प्राण्यांची संख्या नियंत्रित करण्यात येते. काही ठिकाणी कुंपण घालण्याचा प्रयोग केला आहे. हे सगळे प्रयोग आपल्याकडे थोडय़ाफार फरकाने, काही प्रमाणात शक्य आहेत. मात्र पुन्हा माणसांची मानसिकता हाच मुद्दा उभा राहतो. सांगलीतील मगरींच्या प्रश्नावर उंच भागात टाकी बांधून त्याचा वापर करण्याचा तोडगा सुचवण्यात आला होता, जेणेकरून लोक नदीवर कमी जातील आणि नदीचेच पाणी टाकीत साठवून ते वापरले जाईल. मात्र त्याला स्थानिकांकडून विरोध झाला. परदेशी मॉडेल्सबाबत सांगलीतील अरविंद सोमण यांनी सांगितले, ‘एखादी परिसंस्था अगदी दोन दिवसांत नष्ट होऊ  शकते, पण ती उभी करण्यासाठी अनेक वर्षे लागतात. वन्यजीव आणि प्राण्यांच्या संघर्षांचा विचार हा फक्त माणसाच्या बाजूने होणे योग्य नाही. त्यासाठी उपाय करताना संपूर्ण परिसंस्थेचा विचार होणे गरजेचे आहे. अन्यथा उपाय तात्पुरते ठरतील. ‘एखाद्या पायाभूत सुविधेची उभारणी करताना त्यात तेथील प्राण्यांच्या वावराचा विचार होत नाही. तो झाला तर संघर्ष टाळता येईल. नवे रस्ते बांधताना प्राण्यांसाठी भुयारे करणे, उद्योग उभे करताना प्राण्यांच्या कॉरिडॉरचा विचार करणे गरजेचे आहे. वन्यजीव- माणूस संघर्ष होतो याचाच अर्थ अजून त्या भागात प्राणी टिकून आहेत. त्यामुळे तेथे वेळेवर विचार होणे गरजेचे आहे,’ असे मेहेंदळे यांनी सांगितले.