07 March 2021

News Flash

जागतिक शांतता, मानवताच दहशतवादाचे आव्हान परतवतील

इस्लामी देशातील तेलावर होणाऱ्या या सर्व देशांनी तेथील जनतेस मात्र गरीबच ठेवले

‘अनौरसांचे आव्हान’ या अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले विचार.

स्वत: साप पाळायचे आणि स्वत:ला सोडून त्यांनी फक्त शेजाऱ्यांचाच चावा घ्यावा, अशी समजूत करून घेणे मूर्खतेचे आहे, तरी पण साप पाळणे म्हणजे त्याहूनही जास्त मूर्ख असणे म्हणायला हवे. अमेरिका आणि पाश्चात्त्य देशांचे असेच झाल्याचे दिसून येत आहे. औपनिवेशवाद, साम्राज्यवाद आणि स्वार्थी-शोषक प्रवृत्तीच्या या देशांनी पूर्वीपासूनच आíथक संपन्नतेसाठी चुकीच्या आणि अनतिक मार्गाची कास तर धरलीच याशिवाय स्वत:चे लांगूलचालन करणाऱ्या नतद्रष्टांनादेखील पोसले. यातूनच पुढे अतिरेकी दहशतवाद आणि धर्माध भस्मासुरांचा उदय झाला. दहशतवादी हल्ले आणि सूडबुद्धीने निष्पापांची हत्या करण्याचे आधुनिक कालखंड सुरू झाले. ५०च्या दशकात अमेरिकन अध्यक्षांनी अर्थकारणातून ‘मुस्लीम ब्रदरहूड’च्या प्रमुखांचा पाहुणचार केला आणि पुढील अध्यक्षांनीही हीच प्रथा कमीअधिक प्रमाणात सुरू ठेवली. यासाठी कारण दिले ते म्हणजे रशियाच्या ‘निधर्मी’साम्यवादाच्या प्रसारास रोखण्याचे! मग तेलासाठी ‘अल कायदा’च्या ओसामा बिन लादेनला पाळले, तर अफगाणिस्तानात राजद्रोही तालिबान्यांना. इस्लामी देशातील तेलावर होणाऱ्या या सर्व देशांनी तेथील जनतेस मात्र गरीबच ठेवले आणि म्हणून रागावलेल्या अतिरेकी माथेफिरूंनी शस्त्र हाती घेतले ज्याचे भयंकर परिणाम आज समोर आहेत.

एकंदरच, सौदीचे मध्य आशियात वर्चस्वाचे स्वप्न असो वा इराक-इराणमधील शिया-सुन्नीवाद असो; तालिबानचे सबलीकरण असो वा सीरिया-इराकमधील अराजकतेने ‘आयसिस’चे उदय असो; या सर्वाचे सामूहिक पालकत्व अमेरिका आणि इतर सर्व पाश्चात्त्यांचे आहे, हे अमान्य करता येणार नाही. एकेकाळी तेलासाठी पूर्णपणे अरबांवर अवलंबून राहणारा अमेरिका म्हणूनच आतापर्यंत त्यांचे दुखणे पोसत होता; पण आता स्वत: तेलनिर्यात करणारा हा देश मध्य आशियामधून पाय काढत आहे. आणि म्हणून त्याने आणि इतरांनी पाळलेले इस्लामी धर्माध भस्मासुर जगासमोर आव्हान म्हणून उभे ठाकत आहे. या दहशतवादी दानवाचे काही प्यादे अमेरिकेने अफाट ताकदीच्या बळावर अनिच्छेने यमलोकी पाठवले आहे – लादेन, जिहादी जॉन आणि अलिकडेच मुल्ला महंमद अख्तर मंसूर इत्यादी. अशा प्रकारे भस्मासुरांना जन्माला घालणे आणि त्यांना गरज संपल्यावर अनौरस सोडणे अशी अमेरिका आणि इतर राष्ट्रांची नीती असल्याचे दिसून येते. अशा प्रकारे अमेरिका आणि रशियामधील शीतयुद्धोत्तर कुरबुरींचे परिणाम जगासमोर नवनवीन आव्हाने निर्माण करून देत आहे. फक्त तालिबान आणि ‘आयसिस’चे म्हटले तर ते भारतासाठी तितकेच घातक आहेत, जितके संबंध जगाला आणि मानववंशाला.. त्यात पाकिस्तानी लष्कर आणि तालिबान एकाच नाण्याच्या दोन बाजू. भारतविरोधी तत्त्वांना पाकिस्तानी गुप्तहेर संस्था ‘आयएसआय’ची मदत मोफत मिळत असते, हे कित्येकदा सिद्ध झालेच आहे. अमेरिकेने केलेली आíथक मदत भारतविरोधी कारवाईत जाते हेही तितकेच बरोबर आहे. तालिबानची पाकिस्तानातील शाखा तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (ळळढ) भारतासाठी जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि अल कायदा इतकाच घातक आहे. ‘आयसिस’चा उदय शिया-सुन्नीवादातून झाला असला तरी त्याने स्वत:कडे संपूर्ण इस्लामचे धार्मिक नेतृत्व घेण्यास ही संघटना प्रयत्नरत आहे. सर्व इस्लामिक गटांना त्यांच्या नेतृत्वाखाली आणणे, हा आयसिसचा उद्देश आहे. जगातील काही िहसक अशा गटांनी त्यांना पािठबादेखील जाहीर केला आहे. तालिबान आणि ‘आयसिस’ या दोन्ही संघटना शरिया कायद्याचे पालन आणि अनुकरण करताना, तसेच जिहाद आणि मुजाहिद्दीन म्हणवून काम फत्ते लावताना दिसते. भारतीय युवकांचे आयसिसमध्ये सामील होणे आणि काश्मीरमध्ये ‘आयसिस’चे झेंडे फडकावले जाणे, या गोष्टी भारताच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहेत. इंडोनेशिया आणि पाकिस्ताननंतर जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेला देश म्हणजे भारत होय. बहुतत्त्ववादी आणि धर्मनिरपेक्ष भारतात मुस्लिमांना भडकावण्याचे काम ‘आयसिस’ मोठय़ा हुशारीने करीत आहे. भारतात जिहादच्या नावावर कट्टरधर्मवादी तरुणांचे ‘आयसिस’मध्ये सामील होण्याचे कल चांगलेच वाढत आहे. इंटरनेट आणि सोशल नेटवìकग माध्यमांचा उपयोग करून ही संघटना आपले जाळे भारतभर पसरवत आहे. भारताच्या पाकिस्तानआणि अफगाणिस्तान सीमारेषांवर तालिबानच्या कारवायांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. आयसिस आणि तालिबानचे हे आव्हान भारताच्या सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय एकतेस हानिकारक आहे. म्हणून तातडीने उपाय आणि नियोजन करणे हिताचे ठरेल. भारतातील जवळपास हजारभर मुस्लीम नेत्यांनी ‘आयसिस’ला फतवा काढून गैरइस्लामी आणि क्रूरही म्हणून घोषित केलेलेच आहे; पण इतकेच पुरेसे आहे, असे म्हणता येणार नाही.

याच वेळी जिहाद आणि इस्लामी मूलतत्त्ववादाच्या नावावर तरुणांचे ध्रुवीकरण थांबविण्यासाठी त्यांना पुढाकार घ्यावाच लागेल. सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘नाटो’सारख्या लढाऊ सन्यासोबत (मर्यादित) संबंध वाढवणे उपयुक्त  ठरेल. तसेच गुप्तहेर संस्था आणि माहिती अन्वेषकांकडून मिळालेल्या माहिती आणि सूचनांवर योग्य पावले उचलणे सरकारचे कर्तव्य आहे. या संघटनांच्या लढय़ाला मुख्यत: बौद्धिक स्तरावर सामोरे जाणे गरजेचे आहे. मुस्लीम धर्मगुरू, नेते, अभिनेते, सामाजिक संस्था इत्यादींची मदत घेऊन सरकारने मुस्लीम तरुणांमध्ये मार्गदर्शन करून याबाबत जागरूकता आणणे जास्त उपयोगाचे ठरेल.  इंटरनेटवर फिल्टर  सिस्टीम आणि अशा प्रकारच्या सुरक्षा प्रणालींची व्यवस्था सरकारलाच करावी लागेल. दहशतवाद विरोधी कायद्यांचे सक्षमीकरण करून त्यातील दंडात्मक तरतुदींचे दंड कठोर आणि गतिमान करणे अत्यंत आवश्यक आहे. पश्चिम आशियाई राष्ट्रांच्या शासन व्यवस्थेत सुधार करून तेथील जनतेचे विकास होणे हे उपाय अमेरिका आणि पाश्चात्त्यांच्या नि:स्वार्थ मदतीशिवाय शक्य नाही, असे मला वाटते. संबंध मानवजातीचे कल्याण आणि जागतिक शांतता, तसेच भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडतेसाठी या आव्हानांना सर्वानाच मिळून हाताळावे लागेल. भारतवर्ष जी देव-प्रेषितांची भूमी आहे, तिचे पावित्र्य प्रत्येक भारतीय नागरिकाने जपले तरच ‘गदिमां’च्या ओळी चिरकाल सार्थसत्य ठरतील : आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे॥

(रावबहाद्दुर नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर, नगर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 4:43 am

Web Title: lakhanlal bhurelal opinion terrorism
टॅग : Terrorism
Next Stories
1 माझ्या मते.. : मर्यादा पाळा!
2 समाजोपयोगी ‘दुय्यम’ अभ्यासक्रम!
3 महाविद्यालय प्रवेश याचि देही याचि डोळा
Just Now!
X