रात्रीच्या वेळी ‘साप्ताहिक माणूस’चं कार्यालय उघडं असण्याचं खरेतर काही कारणच नव्हतं. पण वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या पुण्यातील काही निवडक साक्षेपी मंडळींनी माणूसचं कार्यालय भरलं होतं. निमित्त होतं शरद जोशी या नावाच्या माणसाला समजून घेण्याचं. श्री. ग. माजगावकर यांच्यासारख्या साक्षेपी संपादकाला शरद जोशींच्या आंदोलनात एक वेगळीच चमक सापडली होती, ती त्यातील सैद्धान्तिक मांडणीची होती. भारतीय टपाल सेवेतून बाहेर पडून स्वत:च शेती करताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे अधिक खोलात जाऊन पाहणाऱ्या शरद जोशी यांचं पहिलंच आंदोलन सगळ्यांना झपाटून टाकणारं होतं. शेतीमालाचे भाव ठरवताना, शेतकऱ्याने घेतलेल्या कष्टांचाही समावेश व्हायला हवा, असा आग्रह धरणारे शरदराव काहीतरी वेगळी मांडणी करू पाहात होते. ती जशी शेतकऱ्यांच्या हृदयाला थेट भिडत होती, तशीच ती बुद्धिमंतांनाही भिडायला हवी, असा श्रीगमांचा हट्ट होता. एका अर्थानं त्यांनी शरद जोशी नावाच्या एका प्रमेयकाराचा शोधच लावला होता. त्यादिवशी रात्री शरदरावांनी जो संवाद साधला, तो ऐकताना सगळेच जण स्तिमित होत होते. या देशात दोन देश नांदतात, हा त्यांचा सिद्धान्त सगळ्यांना अंतर्मुख करायला लावणारा होता. भारत आणि इंडिया अशी या प्रश्नाची मांडणी करणारे शरद जोशी हे केवळ लढवय्ये नेते नव्हते. ते जे सांगत होते, ते त्यापूर्वी कोणीच त्या पद्धतीनं मांडलेलं नव्हतं आणि आंदोलनाला मिळणारं यश तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनाही अक्षरश: घाबरवून सोडणारं होतं.
चाकणचं आंदोलन, पिंपळगाव बसवंतचं आंदोलन पाहणाऱ्या प्रत्येकाची छाती दडपून जावी, अशी तेव्हाची स्थिती होती. या आंदोलनांचा प्रतिसाद मराठी वृत्तपत्रांनी टिपला, तरीही त्याला भारतभर नेण्यासाठी इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये स्पर्धाच सुरू झाली. चित्रवाणीच्या माध्यमांची बजबजपुरी नसतानाच्या त्या काळात जीन्स आणि बुशकोट घातलेला हा शेतकरी नेता माध्यमांना दोन कारणांनी जवळचा वाटत होता. त्यातलं एक कारण तो एक नवा विचार मांडत होता आणि त्याला अभ्यासाची जोड होती. आणि दुसरं, तो देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मनातलं सत्य बुद्धिमंतांना कळणाऱ्या भाषेत मांडत होता. हा झपाटा इतका प्रचंड होता, की राजकारणातल्या अनेकांच्या पायाखालची जमीन अक्षरश: थरथरू लागलेली. गुंठेवारीनं शेती करणाऱ्यांपासून ते मोठय़ा शेतकऱ्यापर्यंत सगळ्यांना आपल्या प्रश्नांची जाणीव तर होतीच होती. प्रश्न होता तो विखुरलेल्या अशा लाखो जणांना एकत्र आणण्याचा. शरदरावांनी मोठय़ा कष्टानं आणि हिकमतीनं हे काम पायपीट करत केलं. आंदोलनाचं यश मागण्या मान्य होण्यातच असतं, असं मानण्यापेक्षा हे प्रश्न ज्यांना कधी कळलेच नव्हते, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यातलंही होतं, याचं स्पष्ट भान असणारे शरद जोशी हे खरे विचारवंत शेतकरी होते. आपला हा विचार लिखित स्वरूपात मांडायला हवा, हा श्रीगमांचा हट्ट शरदरावांनी पुरा केला आणि त्यातून ‘योद्धा शेतकरी’ या सैद्धान्तिक मांडणी करणाऱ्या ग्रंथाची निर्मिती झाली.
आंदोलनाचं म्हणून एक शास्त्र असतं, त्यासाठी नेत्यानं सतत जागरूक असावं लागतं आणि मागे वळताच येणार नाही अशा ‘पॉइंट ऑफ नो रीटर्न’पर्यंत कुठलंच आंदोलन नेत्याने नेता कामा नये, असं त्यांचं मत होतं. त्यामुळे आंदोलनाच्या यशापयशापेक्षा त्यातून नेमकं हाती काय लागलं, याचा लेखाजोखा त्यांच्यासाठी नेहमीच अधिक महत्त्वाचा वाटला. शेतकरी हा सरकारी धोरणांचा बळी असून त्याला सन्मानानं जगण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या कृपेची आवश्यकता नाही. तर केवळ त्याच्या घामाचे आणि कष्टाचे फळ त्याच्या हाती पडण्यासाठी त्या धोरणांत आमूलाग्र बदल व्हायला हवेत. यासाठी शरदरावांनी शेतकऱ्यांना रस्त्यावर यायला भाग पाडलं. आंदोलनाच्या काळात काय किंवा शेतकरी संघटनेच्या बांधणीच्या काळात काय, शरदराव प्रत्येकाला अतिशय जवळचे वाटत, याचं कारण ते त्यांच्या भाषेत बोलू शकत. जोशी आडनावाचा हा माणूस अंतर्बाह्य़ पारदर्शक राहिल्यानेच महाराष्ट्रातल्या लाखो अशिक्षित शेतकरी महिलांनी त्यांना आपला भाऊ मानलं आणि त्यांच्या सैद्धान्तिक मांडणीला प्रखर आंदोलनाची साथ दिली.
गप्पांमध्येही आंदोलनात आपण कुठं चुकलो आणि का चुकलो, याचं परखड विवेचन करण्याची क्षमता असणाऱ्या या माणसाला ज्यांनी ऐंशीच्या दशकात जवळून पाहिलं, त्यांना त्यांच्या आंदोलनाची धग स्मरणात राहणारी आहे. जोशी आडनावाच्या या माणसानं महाराष्ट्रातलंच नव्हे, तर देशातलं राजकारण जातीच्या पलीकडे नेऊन ढवळून काढलं. स्पष्टवक्तेपणानं जवळ आलेल्या अनेकांना गमावल्याचे जराही क्लेश न बाळगणाऱ्या शरदरावांना जिवापाड जपणारे आणि अतोनात प्रेम करणारे हजारो जण मिळाले. शेतकऱ्याचं दु:ख वेशीवर टांगताना, भिकेची अपेक्षा करण्यापेक्षा हक्काची जाणीव करून देणं, हेच त्यांच्या जगण्याचं इंगित. ‘तत्त्वज्ञानी नेता’ अशी सहसा क्वचित दिसणारी उपाधी निरलसपणे अंगावर मिरवू शकणारा हा नेता शेवटपर्यंत फक्त एकाच विचारानं व्यापलेला होता. बुद्धिमंत, संघटक, शेतकरी नेता असे कुठलेच कप्पे त्यांनी कधी निर्माण होऊ दिले नाहीत. अर्थशास्त्रापासून ते अन्नधान्याच्या उत्पादनातील तांत्रिक प्रगतीपर्यंत सगळ्याबद्दल मुळापासून विचार करणारे शरदराव माणूस म्हणून फार ‘भले’ होते!
mukund.sangoram@expressindia.com
सचिनने जसे म्हटलं, की मी रेकॉर्ड केलं ते मोडणारा भारतीयच निघावा, तसं या महाराष्ट्रातला आणखी एक सुपुत्र जन्मावा, अशी एक इच्छा फक्त मी व्यक्त करू शकतो. माझा कालखंड हा संपत आला आहे, अशी माझी प्रामाणिक भावना आहे. मी जेव्हा आत्मविश्वासाच्या गोष्टी केल्या तेव्हा ते इंडिकेट करीत होतो, पण काही कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी आपलं चालत राहिलो; पण ते दिवसेंदिवस सहन होईना आणि मग त्याचा परिणाम माझ्या प्रकृतीवर होऊ लागला. नंतर मग आता प्रत्यक्षात अपंगावस्थेत येऊन पोहोचलो..

वाचनातून क्वांटम फिजिक्सशी माझा संबंध आहे; पण प्रत्यक्षामध्ये सध्या मला अध्यात्मात स्वारस्य वाटते, जेनिटेक इंजिनीअरिंग आणि जीन मॉडिफिकेशन या सिद्धांतात पडल्यानंतर. या सगळ्या क्षेत्रांत जीवनाचे महत्त्व काय आहे, अशा प्रवाहातनं जात असताना मी अध्यात्माकडे गेलो. शेतीबद्दल एक नवा विचार मांडू शकलो, तितकाच अध्यात्मातही मांडता यावा, अशी माझी प्रार्थना आहे.

आम्ही सरकारी अनुदानाची भीक न मागता प्रत्यक्षात शेतकऱ्यांना खुल्या बाजारात जो काय भाव मिळेल तो मान्य होईल, असं सांगितलं. जर का सरकारी हस्तक्षेप नसेल, तर त्या बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरून निघणारी किंमत मिळते. ज्या बाजारपेठेमध्ये सरकारी हस्तक्षेप आहे, त्या बाजारपेठेमध्ये योग्य ती किंमत ठरणं अशक्य आहे, ही मुळामध्ये आमची अडचण आहे. शेतीवर वेगवेगळी बंधन घालणं हे जे सरकारला करता येतं, ते करणं सरकारला अशक्य व्हावं, अशी जर परिस्थिती झाली, तर मग खऱ्या अर्थानं खुली बाजारपेठ निर्माण होईल. या बाजारपेठेत जी किंमत ठरेल ती आम्हाला मान्य होईल आणि त्या किमतीमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळतो.

एकाच वर्षी कांद्याचे भाव वाढल्यामुळे पाच ठिकाणच्या पोटनिवडणुका केंद्र सरकार हरलं. तेव्हापासून त्यांनी थोडा काळ धसका घेतला; पण लगेच पुढच्या वर्षी त्यांनी लगेच ग्राहकांचं हित सांभाळण्यासाठी निर्यातबंदी केली होती. ज्या वेळी कांद्याचा भाव एक रुपया किलो होता, तेव्हा सिनेमाच्या बाल्कनीचं तिकीट अडीच रुपये होतं. आता बाल्कनीचं तिकीट अडीचशे रुपये झालं आहे. या न्यायाने कांद्याचा भाव शंभर रुपये व्हायला हवा. ग्राहक राजकीयदृष्टय़ा किती संवेदनशील आहे आणि शेतकरी तितका होऊ शकतो का, हा मुद्दा खरा महत्त्वाचा आहे.
शरद जोशी यांचे ‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’मधील विचार (१ एप्रिल, २०१२)