संतोष प्रधान

शिवसेनेबरोबर हातमिळवणी केल्यास त्याचे देशभर उमटणारे पडसाद आणि अल्पसंख्याक मतपेढीवर होणारा परिणाम यामुळे सोनिया गांधी किंवा अन्य काँग्रेस नेते शिवसेनेबरोबर जाण्यास तयार नव्हते. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस नेतृत्वाचे मन वळविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली..

२४ ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि भाजप-शिवसेना युतीला बहुमत प्राप्त झाले. युतीने विजयाचा जल्लोष सुरू केला होता. साताऱ्यातील मतमोजणी केंद्रात विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारण्यास गेलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मनात काही तरी वेगळा विचार आला. भाजपच्या विरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आल्यास संयुक्त सरकार स्थापन होऊ शकते, असे मत त्यांनी नोंदविले. त्यांच्या या मताची फारशी नोंदही घेतली गेली नाही. ‘शिवसेनेकडून संयुक्त सरकार स्थापण्याचा प्रस्ताव आल्यास दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू,’ असे विधान पृथ्वीराजबाबांनी दोन दिवसांनी केले. तेव्हा बिगरभाजप किंवा शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे संयुक्त सरकार स्थापन होऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली होती. शिवसेनेबरोबर संयुक्त सरकार स्थापन करण्याच्या चव्हाण यांच्या प्रस्तावाची दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी हेटाळणीच केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली असता, सोनियांनी शिवसेनेबरोबर संयुक्त सरकारची कल्पना फेटाळून लावली होती. मात्र, काँग्रेस आमदारांचा दबाव वाढू लागला. बिगरभाजप सरकार स्थापन होत असल्यास त्याला मदत करावी, अशी मागणी पुढे येऊ लागली.

११ नोव्हेंबर : संयुक्त सरकार स्थापण्याकरिता शिवसेनेकडून अधिकृतपणे काँग्रेसशी संपर्क साधण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. कारण शिवसेनेला सायंकाळपर्यंत राज्यपालांकडे दावा करण्याची मुदत होती. या दिवशी सकाळी झालेल्या काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत एकूणच शिवसेनेसोबत जाण्यास नकारघंटाच होती. पण महाराष्ट्रातील नेत्यांचे मत विचारात घेण्याकरिता त्यांना पाचारण करण्यात आले. सोनियांच्या ‘१०, जनपथ’ या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सुरुवातीलाच पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याकरिता शिवसेनेबरोबर हातमिळवणी करणे कसे आवश्यक आहे, हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. गेल्या पाच वर्षांत भाजपकडून काँग्रेसचे कसे खच्चीकरण करण्यात आले, हे निदर्शनास आणून दिले. पृथ्वीराजबाबा आणि अशोक चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेबाबत अनुकूल भूमिका मांडली. राज्यातील नेत्यांचा एकूण सूर लक्षात घेऊनच सोनियांनी अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे यांना चर्चेकरिता मुंबईत धाडले.

शिवसेनेबरोबर हातमिळवणी केल्यास त्याचे देशभर उमटणारे पडसाद आणि अल्पसंख्याक मतपेढीवर होणारा परिणाम यामुळे सोनिया गांधी किंवा अन्य नेते शिवसेनेबरोबर जाण्यास तयार नव्हते. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस नेतृत्वाचे मन वळविण्यात महत्त्वाची भूमिका बजाविली.

दक्षिण कराड या मतदारसंघात भाजपने काँग्रेसचा विधान परिषदेचा आमदार आणि काही नगरसेवक फोडले याचे शल्य चव्हाणांना होतेच. शिवाय शिवसेनेने यापूर्वी मुंबई महानगरपालिकेत मुस्लीम लीगबरोबर केलेली हातमिळवणी किंवा काँग्रेसची मुस्लीम लीग किंवा एमआयएमबरोबर झालेली आघाडी याची उदाहरणे त्यांनी दिली. शिवसेनेबरोबर जाण्यासाठी पुढाकार घेतल्याने एक वेळ तर सोनिया यांची नाराजीही पृथ्वीराजबाबांनी ओढवून घेतली. पण शेवटपर्यंत त्यांनी आपला आग्रह कायम ठेवला आणि भूमिका पुढे रेटली. अखेर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता शिवसेनेशी हातमिळवणी करायची हे दिल्लीतील नेत्यांच्या पचनी पाडण्यात पृथ्वीराजबाबांना यश आले. किमान समान कार्यक्रमावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेबरोबर चर्चा करण्यास दिल्लीने मंजुरी दिली. शिवसेना व राष्ट्रवादीबरोबर चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांच्या बंडाने सारे गणित बिघडते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. सत्ताधारी भाजपने साऱ्या यंत्रणांचा केलेला गैरवापर आणि राज्यपालांनी फडणवीस यांना दिलेली शपथ याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याकरिता पृथ्वीराज चव्हाण यांनीच पुढाकार घेतला. कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, रणदीपसिंग सुरजेवाला या वकिलांशी चर्चा केली आणि न्यायालयात याचिका दाखल झाली. तीन दिवस सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी त्यांनी हजेरी लावली. सर्वोच्च न्यायालयाने २४ तासांत हंगामी अध्यक्षांच्या मार्फत खुल्या पद्धतीने मतदान घेण्याचा आदेश दिला आणि सारे चित्रच पालटले. शिवसेनेबरोबर सत्तास्थापनेच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले.

शिवसेनेबरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय योग्य की अयोग्य, हे कालांतराने स्पष्ट होईल. पण भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याची काँग्रेसच्या राज्यातील बहुसंख्य नेते आणि आमदारांची इच्छा पूर्ण झाली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याकरिता शिवसेना व काँग्रेसमध्ये दुवा साधण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांना सरकार किंवा सत्तेत महत्त्वाचे स्थान मिळाले नाही, हे मात्र दुर्दैवच म्हणावे लागेल.