ज्येष्ठ लेखक, पत्रकार खुशवंतसिंग वयाच्या ९८ व्या वर्षीही धाक दाखवत ‘सांगतो गोष्टी, युक्तीच्या चार’ असा आग्रह धरत नाहीत. आपली बाजू निसंकोचपणे मांडून टाकतात. आयुष्याकडून काय शिकलो ते प्रांजळपणे सांगताना आयुष्यालाही चार धडे घालून दिल्याचं समाधान ते मानत असावेत.
‘खुशवंतनामा – द लेसन्स ऑफ माय लाइफ’ या पुस्तकात खुशवंतसिंग यांच्या चाहत्यांना किंवा खुशवंतसिंग हे काय व्यक्तिमत्त्व आहे हे जाणणाऱ्या कोणालाही अभिप्रेत असलेलं काही मिळण्याची शक्यता तशी कमीच. मग या पुस्तकात आहे तरी काय? असा प्रश्न कोणी विचारला, तर त्याचं उत्तर, ‘तरीही हे खुशवंतसिंग यांचं पुस्तक आहे,’ असंच द्यावं लागेल. खुशवंतसिंग यांच्याकडून अभिप्रेत असलेलं कमी, मात्र खुशवंतसिंग यांना अभिप्रेत असलेलं भरभरून सांगणारा हा ‘खुशवंतनामा’ त्यांच्या आजवरच्या लेखनातील गिमिक्सचा पल्ला पार करतो. पुस्तकात कोणाची फारशी खिल्ली उडवलेली नाही, गॉसिप नाही, प्रेमप्रकरणं नाहीत, चटपटीत किस्से नाहीत, ‘तसलं’ही काही नाही, कविता आहेत- पण त्यांच्यात भावना चाळवणारं काही नाही, आणि जोक्स? ते तर आहेतच, मात्र त्यांत ती मजा नाही.
आता, एवढं सारं ‘नाही’ सदरात मोडणारं असतानाही या पुस्तकाची शिफारस करावीशी वाटते याचं पुन्हा एकमेव कारण हेच की, हे खुशवंतसिंग यांचं पुस्तक आहे! लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे ते त्यांनी अलीकडेच वयाच्या ९८ व्या वर्षी लिहिलं. वयाच्या या टप्प्यावर आयुष्याकडून घेतलेल्या धडय़ांविषयी खुशवंतसिंगसारखा माणूस काही सांगू पाहात आहे, यातील खुमारी ज्यांना अनुभवावीशी वाटत असेल त्यांनी बिनदिक्कतपणे या पुस्तकाच्या वाटेला जावं. पूर्वअट हीच, ती म्हणजे खुशवंतसिंग हे काय प्रकरण आहे याचा वाचनानुभव गाठीला असावा किंवा सहा-सात दशकं अविरतपणे लिहीत आणि बेफामपणे जगत आजही ‘तरुण’ राहिलेला हा माणूस काय सांगू पाहात आहे याची उत्कंठा असली पाहिजे. एवढी पूर्वतयारी असेल, तर हे पुस्तक तुम्हाला एका आगळ्या खुशवंतसिंगाशी भेट घालून देईल. असा खुशवंतसिंग जो अंतर्मुख झाला आहे, जो स्वत:ला पारखून पाहात आहे अन् बेधुंदपणे जीवनानंद उपभोगून त्याबाबत गांभीर्याने बोलत आहे..
एखाद्याने स्वत:च्या प्रेमात आकंठ बुडावं यात नवल ते काही नाही, मात्र आपल्या या स्वप्रेमाची भुरळ इतरांनाही घालण्याची किमया सगळ्यांनाच साधते असं नाही. खुशवंतसिंग यांच्याकडे ते कसब आहे. जीवनाचा भरभरून उपभोग घेताना त्यांनी ना कशाची पर्वा केली, ना कोणाची पत्रास ठेवली. मनसोक्तपणे जीवनानंद घेत त्यातील खुमारी विनोदी आणि चुरचुरीत शैलीत लिहिण्याची ऊर्मी सदासर्वदा ताजीतवानी राखली. त्यांच्यासारखं उत्स्फूर्तपणे जगणं ज्यांना जमलं नाही, अशांनी त्यांचा हेवा केला, दुस्वास नाही. याचं कारण त्यांचं लेखन प्रामाणिक आहे अन् आयुष्याकडे पाहायचा दृष्टिकोन कमालीचा सकारात्मक आहे. तीक्ष्ण निरीक्षणशक्ती आणि निवेदनाची मोकळीढाकळी शैली यांमुळे खुशवंतसिंग यांचं लेखन सदैव ताजंतवानं राहिलं आहे. प्रस्तुत ‘खुशवंतनाम्या’त या वैशिष्टय़ांना खुशवंतसिंग एका वेगळ्या टप्प्यावर नेऊन ठेवतात.
आयुष्याला भिडणाऱ्या बहुतेक सर्व बाबी अन् पैलूंकडे पाहण्याची खुशवंतसिंग यांची दृष्टी मर्मग्राही असल्याचा प्रत्यय या पुस्तकातील पाना-पानांवर येतो. हे त्यांचं आत्मचरित्र नाही. (ते तर त्यांनी दहा-एक वर्षांपूर्वी ‘खुशवंतीय’ शैलीत सादर केलंच होतं.) या पुस्तकातील त्यांचा सूर आत्मनिवेदनाचा आहे, तसाच स्मरणरंजनाचादेखील आहे.
स्मरणरंजन करताना ऐन तारुण्यात वकिली शिकण्यात आणि करण्यात गेलेला काळ अन् पुढे विदेश वकिलातींमध्ये केलेलं काम हा काळ फुका वाया गेला याची खंत ते व्यक्त करतात. मात्र, यापेक्षाही एका गोष्टीची त्यांना अधिक खंत वाटते. ‘मला कितीतरी जणी आवडत होत्या, पण मी काहीच करू शकलो नाही. त्यांच्याबरोबर अफेअर करण्याचं तेव्हा धाडस माझ्यापाशी नव्हतं.’ खास खुशवंतसिंग शैलीतील अशी टिपण्णी व खुलेआम दिलेल्या कबुलींमुळे पुस्तकाची रंगत अधिकच वाढते.
लिहिता झालो अन् आयुष्याचं श्रेयस गवसलं याचं खुशवंतसिंग यांना अप्रूप आहे. लेखन, लेखन व्यवसाय, कालची- आजची पत्रकारिता यांबाबत त्यांची मतं आणि निरीक्षणं ठाम आहेत, ती त्यांनी पुस्तकात नोंदवली आहेत. प्रामाणिकपणे जे वाटलं ते लिहीत जाण्याची ऊर्मी या वयातही शाबूत असण्याबाबत ते धन्यता मानतात. भारतीय इंग्रजी लेखनाविषयी मत नोंदवताना आज इंग्रजीत मुशाफिरी करणारी भारतीय लेखक मंडळी हुशार असल्याचं ते सांगतात. राजा राव,     आर. के. नारायण यांनी इंग्रजीत लिहिण्याची खऱ्या अर्थाने सुरुवात केली, मात्र त्यांचं लेखन बाळबोध वळणाचं होतं. आजची तरुण पिढी त्यापुढे गेली आहे. झुम्पा लाहिरी, अरुंधती रॉय हे अधिक सरस असल्याचं ते प्रमाणपत्र देऊन टाकतात.
आयुष्याकडून काय शिकलो हाच खुशवंतसिंग यांच्या येथल्या लिखाणाचा सूर असल्याने साहजिकच बालपण, धर्म, निसर्ग, साहित्य, पत्रकारिता, कविता, उर्दू शायरी, राजकारण, देशाचं भवितव्य, दारूबंदी यांची एकीकडे चर्चा करतात तेव्हा कविता व उर्दू शायरीवर लिहिताना ते हळवे झाल्याचं जाणवतं. मरणाबाबतचं त्यांचं चिंतन असंच आहे. किंबहुना, मृत्यू, विनोद- एक जीवघेणं हत्यार अन् महात्मा गांधी यांबाबतचे त्यांचे विचार मुळातूनच वाचावे असे उतरले आहेत. मृत्यूही साजरा करता आला पाहिजे, असं ते म्हणतात. महात्मा गांधी यांच्या विचारसरणीशी आयुष्यभर फटकून राहिलेले खुशवंतसिंग बापूंचं माहात्म्य सांगू लागतात तेव्हा गंमत वाटते. ‘अनेक प्रेषितांना आपण फक्त ऐकलं-वाचलेलं असतं, त्यांच्या चमत्कारांचं- कर्तृत्वाचं ठोस प्रमाण देता येत नाही. मात्र महात्मा गांधी ही व्यक्ती आपल्यासमोरचं जितंजागतं उदाहरण आहे,’ असं ते सांगतात तेव्हा ती उपरतीची नव्हे, तर कौतुकाच्या पातळीवरची भावना मानावी लागते.
‘खुशवंतनामा’त असे काही धक्के मिळतात. खुशवंतसिंग यांच्या लेखनाचा हा स्थायिभाव येथेही प्रत्ययाला येतो. एक मात्र खरं की, हे पुस्तक लिहिताना वयाचा धाक दाखवत ‘सांगतो गोष्टी, युक्तीच्या चार’ असा आग्रह ते धरत नाहीत. आपली बाजू नि:संकोचपणे मांडून टाकतात. आयुष्याकडून काय शिकलो ते प्रांजळपणे सांगताना आयुष्यालाही चार धडे घालून दिल्याचं समाधान ते मानत असावेत. खुशवंतसिंग यांना ते शोभतंही!
खुशवंतनामा – द लेसन्स ऑफ माय लाईफ  :
 खुशवंतसिंग,
पेंग्विन प्रकाशन, नवी दिल्ली,
पाने : १८८, किंमत : ३९९ रुपये.