विशिष्ट धर्माचे नेते व प्रतीके यांना दूर ठेवून, सरकारी यंत्रणा व राजकीय पक्ष यांचा आधार न घेता योग दिनाचा कार्यक्रम झाला असता तर तो केवळ इव्हेण्ट न राहता उत्सव झाला असता. पण तेवढा मोठा विचार करणे ही गोष्ट संघ परिवाराच्या आवाक्याबाहेरची आहे, हेच त्यांनी या निमित्ताने दाखवून दिले. दुसरीकडे डाव्यांनी या प्रकरणी चुकीच्या मुद्दय़ावर वाद घालून अपयश पदरात पाडून घेतले.

कविवर्य गुलजार यांचे एक सुंदर गीत आहे- ‘ऐसा होता तो नहीं, ऐसा हो जाये अगर.’
अगदी साध्या साध्या गोष्टी, ज्या सहज घडू शकतात, पण त्या प्रत्यक्षात कधी घडत नाहीत आणि आपल्या वाटय़ाला (पुन्हा एकदा) निराशा येते. २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने देशात जे राजकारण झाले व त्यात नेहमीच्या खेळाडूंनी आपली जुनीच हातखंडा भूमिका ज्याप्रमाणे बजावली, त्यावरून जाणकारांनाही असेच वाटले असेल.
देशाच्या राजकीय रंगमंचावरील या प्रमुख पात्रांकडे वळण्यापूर्वी आधी नेपथ्याचा विचार करू या. मुळात योग ही भारताने जगाला दिलेली महत्त्वाची देणगी आहे, यात कोणाला शंका असू नये. त्याचबरोबर ती सर्वार्थाने ‘भारतीय’ आहे, केवळ ‘हिंदू’ नाही याकडेही दुर्लक्ष होऊ नये. दिवस इतिहासाच्या पुनल्रेखनाचे आहेत, तसेच इतिहास व परंपरा यांकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्याचेदेखील आहेत. म्हणून काही इतिहास सांगायलाच हवा. योगाच्या वैचारिक बठकीत जैन व विशेषत: बौद्ध तत्त्वज्ञानाचा मोलाचा वाटा आहे. हजारो वष्रे योगाचे अस्तिव टिकवून ठेवण्यात व भारताबाहेर तो लोकप्रिय करण्यात बुद्ध भिख्खूंनी मोलाची कामगिरी बजावली आहे. इ.स.१००० च्या आसपास पतंजलींच्या योग सूत्राचे पहिले भाषांतर अरबी भाषेत करण्यात आले. सुप्रसिद्ध अरबी विद्वान व भारतीय ज्ञानपरंपरेचे जाणकार अल्-बिरूनी यांनी केलेले हे भाषांतर ‘किताबी बतंजल’ नावाने आजही उपलब्ध आहे. त्यानंतर देशात व परदेशात योगपरंपरा समृद्ध करण्यात सुफी संतांनी हातभार लावला. अलीकडच्या काळात योगाचार्य बी के एस अय्यंगारसारख्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक पाश्चात्त्य व पौर्वात्य देशांत विविध धर्मीय प्रशिक्षित योगगुरू तयार झाले. गेल्या २१ जून रोजी १९१ देशांतील लोकांनी योगासने करून योगदिन साजरा केला, याचे श्रेय या सर्व परंपरेला आहे.vv06
आज सारे जग अ‍ॅक्युपंक्चर ही चीनने जगाला दिलेली देणगी आहे असे मानते. तद्वतच योगविद्या किंवा योगशास्त्र हे भारताने (कोणत्याही धर्माने किंवा पक्षाने दिलेले नव्हे) जगाला दिलेले ‘योगदान’ आहे, असेच जग मानते. योग शब्दाचा मूळ अर्थच ‘जोडणे’ असा असल्यामुळे योगाच्या माध्यमातून साऱ्या विश्वाशी जोडून घेणे ही आपल्यासाठी सहजसाध्य बाब होती. म्हणूनच, २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणे, ही भारतासाठी व येथील नेत्यांसाठी एक सुवर्णसंधी होती. हा देशाच्या बहुविध परंपरेचा गौरव आहे, असे मानून त्या माध्यमातून देशातील सर्व पंथांच्या उपासकांना एकत्रित करणे सहज शक्य होते. अशा सर्व उपासकांना तसेच कोणतेही संप्रदाय न मानणाऱ्या मंडळींना योगाच्या माध्यमातून एकत्र येण्याचे आवाहन जर करण्यात आले असते, तर मग २१ जून हा सरकारी उत्सव न होता जनोत्सव झाला असता. (‘राजपथा’वर तो साजरा होणे यातही एक संकेत दडला आहे.) या संदर्भात ‘धर्म’ किंवा ‘सरकार’ हे मुद्देच मुळात गरलागू आहेत, हे लक्षात घेऊन विशिष्ट धर्माचे नेते व प्रतीके यांना दूर ठेवून, सरकारी यंत्रणा व राजकीय पक्ष यांचा आधार न घेता हा कार्यक्रम झाला असता तर तो केवळ इव्हेंट न राहता उत्सव झाला असता.
पण तेवढा मोठा विचार करणे ही गोष्ट संघ परिवाराच्या आवाक्याबाहेरची आहे, हेच त्यांनी या निमित्ताने दाखवून दिले. अगदी सुरुवातीपासून त्यांनी आपला आवडता खेळ खेळायला सुरुवात केली. म्हणजे मोदींनी सर्व धर्माचे नाव घ्यायचे व इतरांनी िहदू धर्म व संस्कृतीच्या नावाने गगनभेदी घोषणा द्यायच्या. मोदीभक्तांनी आव तर असा आणला होता, जणू योगाच्या संदर्भात पतंजली ते अय्यंगार, कोणाचेही नाव घ्यायची गरज नाही. बाबा रामदेवांनी योगाला पृथ्वीवर अवतीर्ण केले व नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्रांना आदेश दिल्यामुळे सर्व जगाने ते स्वीकारले! संघ-भाजपाने हा खेळ सुरू केल्यावर नाटकाच्या इतर पात्रांनीही मग आपापल्या भूमिका यथासांग वठविल्या. योग हा इस्लामच्या विचारसारणीच्या विरुद्ध आहे, असे कोणी मुस्लीम धर्मगुरूने सांगितले. रविवारी हा कार्यक्रम आयोजित करणे म्हणजे ख्रिश्चन समुदायाच्या धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घालणे आहे, असा शोध कुणा ख्रिश्चन नेत्याने लावला. (असे करताना आपण संघाने लिहून दिलेल्या संहितेनुसार भूमिका करीत आहोत, हे भान त्यांना नेहमीप्रमाणे राहिले नाही.) मग भाजपने काही मुस्लीम योगशिक्षक शोधून आपला सर्वधर्मसमभाव सिद्ध केला आणि त्याच वेळी योगाला विरोध करणाऱ्या देशद्रोहय़ांनी भारत सोडून चालते व्हावे असेही त्यांच्याच इतर नेत्यांनी जाहीर केले. कार्यक्रम संपल्यावरही राम माधवांनी केलेला तमाशा म्हणजे ‘कवित्व अजून बाकी आहे’ याचीच पावती होती.
हे नाटक सादर होत असताना इतर कलाकार काय करीत होते? काँग्रेसचा तर विचार करण्याचीही गरज नाही. कारण देशाच्या राजकीय रंगमंचावर आपल्याला काही भूमिका आहे, याचे त्या पक्षाला भानही उरलेले नाही आणि ठोस राजकीय भूमिका घेतल्याशिवाय ते येणारही नाही. नाटकाचा पडदा पडल्यावर त्यांना नेहरूंचे योगप्रेम जाहीर करण्याची आठवण झाली, यातच सर्व काही आले. डाव्यांनी काय केले, तर जे त्यांना करता येते ते ते सर्व त्यांनी केले – म्हणजे हा भगवेकारणाचा अजेंडा पुढे नेण्याचा डाव आहे, हा िहदू विचारसरणी अन्य धर्मीयांवर लादण्याचा कावा आहे, हा अल्पसंख्याकांच्या हक्कांवर घातलेला घाव आहे इत्याही. त्यानंतर कोणाला तरी आठवण झाली की २१ जून हा रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा स्मृतिदिन आहे. त्यामुळे योग दिनाचा विरोध करायला त्यांना एक हत्यार सापडल्यासारखे वाटले. २१ जूनला योग दिन साजरा व्हावा ही कल्पना ४-५ डिसेंबर २०११ ला झालेल्या योगगुरू व धार्मिक नेते यांच्या एका परिषदेत मांडण्यात आली. कारण या दिवशी दक्षिणायनाला प्रारंभ होतो, ज्याचे योगाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. याच कारणामुळे संयुक्त राष्ट्रांनी नरेंद्र मोदींची २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्याची सूचना मान्य केली. मुळात संयुक्त राष्ट्रांना हेडगेवार कोण हे माहीत असण्याचे कारणच काय? भारतातही किती लोकांना या विवादापूर्वी २१ जून व हेडगेवार यांचा संबंध माहीत होता? पण याचा विचार न करता डाव्यांनी चुकीच्या मुद्दय़ावर वाद घालून अपयश पदरात पाडून घेतले. भाई बर्धनसारख्या ज्येष्ठ नेत्याने ‘मीही नियमित योगासने करतो,’ असे सांगितले, पण त्याचबरोबर भगवेकरण या मुद्दय़ावर योग दिनाला विरोधही केला. डावे विचारवंत व नेते यांपकी कोणीही योग ही भारताची महान परंपरा आहे व तिचा आम्हाला अभिमान वाटतो, असे सांगितले नाही. योगपरंपरा सर्व जातीधर्माच्या लोकांची आहे, सर्व मानवजातीच्या हितासाठी आहे व तिला संकुचित करणे आम्हाला मान्य नाही. सरकार व पक्ष बाजूला ठेवा, आपण राष्ट्र म्हणून या उत्सवात भाग घेऊ या, अशी भूमिका त्यांना घेता आली असती, जी त्यांनी घेतली नाही.
हे अर्थात होणारच होते. हिमालयासारख्या प्रचंड घोडचुका वारंवार करायच्या व त्यातून काही शिकायचे नाही, हा डाव्यांचा इतिहास आहे. कारण भारतातील सर्व रंगच्छटांचे डावे मुळातून युरोपकेंद्री विचारांच्या चक्रव्यूहातून बाहेरच पडू शकलेले नाहीत. त्यांना भारतीय परंपरा कळतच नाही. परिवर्तनाचीही परंपरा असते व तिच्याशी फारकत घेऊन विद्रोहाचे रोपटे तग धरू शकत नाही, हे त्यांना कळते. पण भारतीय परंपरेशी नाते जोडण्याची प्रेरणाच त्यांना होत नाही. इथल्या बहुविधतेत परिवर्तनासाठी किती तरी अवकाश आहे, हे त्यांना समजत नाही. म्हणूनच बुद्ध, चार्वाक ते मीरा, कबीर, तुकाराम या सर्वाकडे ते पाठ फिरवतात. अगदी अलीकडच्या काळातील विवेकानंदांनाही ते आपलेसे करत नाहीत. धर्म व अध्यात्म यातील फरक त्यांना कळत नाहीच, पण नास्तिकतेसह अनेकेश्वरी पंथांना सामावून घेणारी परंपरा ही संघटित धर्म/ संप्रदायापेक्षा भिन्न असते हेही समजत नाही. मग ते भगवा रंग, देवाचे नाव अशा वरवरच्या प्रतीकांकडे पाहून त्याला अकारण विरोध करतात. मुळात भगवा रंग हा बौद्ध भिख्खूंच्या कषाय वस्त्रापासून आला, जो नंतर िहदू संन्याशांनी स्वीकारला. ते त्यागाचे प्रतीक आहे, वैदिक धर्माचे नाही हा इतिहासही त्यांना माहीत नसतो. म्हणून संघ-भाजपच्या सांप्रदायिकतेला विरोध करताना ते हमखास ‘भगवेकरण’ असा शब्दप्रयोग करतात व संघाविषयी ममत्व नसणाऱ्या िहदूंना संघ-भाजपकडे ढकलतात. कारण अशा लोकांना डाव्यांचा हल्ला आपल्या धर्मावर आहे, असे वाटते.
परंपरेचे सजग भान असणारा अखेरचा नेता म्हणजे महात्मा गांधी. म्हणूनच त्यांनी िहदू परंपरेतील अस्पृश्यता नाकारली, पारंपरिक बंधने नाकारून स्त्रियांनी स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरावे असे आवाहन केले, आयुर्वेद सर्वसामान्यांपासून दुरावला अशी टीका केली, पण मुळात परंपरा नाकारली नाही. म्हणूनच ते संघ-िहदू महासभेच्या संकुचित धर्माच्या विरोधात व्यापक धर्माची ताकद घेऊन उतरू शकले. रहीमशी नाते जोडणारा त्यांचा राम जोवर भारतीयांच्या मनात वसला होता, तोवर रामजन्मभूमीच्या आक्रमक श्रीरामाला राजकारणाच्या आखाडय़ात उतरविण्याची हिंमत संघ परिवाराला झाली नाही. डाव्यांनी गांधीजींकडून थोडा राजकीय शहाणपणा उसना घेतला असता तर योगाविषयी अभिमान दाखवत योगदिनाचे संकोचन व सरकारीकरण यांना विरोध करण्याची भूमिका त्यांना घेता आली असती. मोदी सरकारने आपला आडमुठेपणा सोडला नसता तर सर्व पक्ष-पंथ यांना सामावून घेणारा असा व्यापक व सरकारी कार्यक्रमाला समांतर असा कार्यक्रम घेऊन संघ परिवाराला राजकीय उत्तर देणे त्यांना शक्य झाले असते. या विवेचनात मी डावे (मार्क्‍सवादी) व अन्य पुरोगामी यांत फरक केला नाही. कारण जेपी-लोहिया यांच्या शिष्यांना परंपरेचे भान त्यांच्या गुरूंनी दिले होते. पण संघाची रणनीती समजून न घेता त्याला साचेबद्ध पुस्तकी प्रतिक्रिया देण्यात ते डाव्यांहून वेगळे नाहीत, हेच त्यांनी आतापर्यंतच्या राजकारणातून दाखवून दिले आहे.
या नाटकबाजीचा तात्पुरता फायदा तरी संघ परिवारालाच होणार हे स्पष्ट आहे. संघाने आपल्या राजकीय विरोधकांच्या मानसिकतेचा जेवढा अभ्यास केला आहे, त्याच्या एक दशांशही अभ्यास त्यांच्या विरोधकांनी केलेला नाही, हे संघ ओळखून आहे. म्हणूनच घर वापसी, लव्ह जिहाद, व्हॅलेंटाइन डेला विरोध अशा नवनव्या पुडय़ा सोडून विरोधकांची गंमत पाहणे हा त्याचा लाडका खेळ झाला आहे. पण या खेळात प्रत्येक वेळी हार होते ती येथील सर्वसामान्य जनतेची. जखमी होते ती या देशाचे व लोकशाहीचे प्राणतत्त्व असणारी संपृक्त बहुविधता! भाजप हा विरोधी पक्ष होता, तेव्हा येथील जनतेत फूट पाडण्याची त्याची खेळी देशहिताच्या विरोधात असली, तरी निदान त्याच्या राजकीय फायद्याची तरी होती. पण सत्ताधारी पक्षाने असे राजकारण खेळणे हे पक्षाच्या व देशाच्या – दोघांच्याही हिताचे नाही हे भान अद्याप त्याला आलेले दिसत नाही.
सांप्रदायिकता व मूलतत्त्ववादाच्या वाघावर आरूढ होण्याची किंमत काय द्यावी लागते हा इतिहास आपल्या व आपल्या शेजारच्या देशात अजूनही ताजाच आहे. सत्ताधाऱ्यांचे स्वार्थाध वर्तन व विरोधकांचा मूर्खपणा या दुष्टचक्रातून बाहेर काढणारे ‘अच्छे दिन’ या देशाच्या वाटय़ाला कधी बरे येतील? तोवर आपणही ‘ऐसा होता तो नहीं, ऐसा हो जाये अगर’ म्हणत आपली आशा जिवंत ठेवायला काय हरकत आहे?

Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ – ravindrarp@gmail.com